डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे हजारो वर्षांपासून चालत आलेल्या अन्यायाविरोधातील बंडखोरीचे मूíतमंत प्रतीक होते. त्यांना स्वत:ला या भूमिकेची जाण होती. ती भूमिका पार पडण्यासाठी ते अनेक प्रकारे कार्यातून आणि संघर्षांतून व्यक्त झाले. त्यात पत्रकार, संपादक, सामाजिक संस्था संस्थापक, अध्यापक, संशोधक, राजकारणी, संसद सभासद, घटनाकार, पक्ष नेतृत्व, ग्रंथकार या आणि अशा अनेक पलूंतून त्यांची ओळख सांगता येते. या साऱ्या पलूंमागील अधिष्ठान होते ते प्रचंड अभ्यास आणि सातत्यपूर्ण व्यासंगाचे. या अभ्यासाचे त्यांनी साधन बनवले. त्यातून मिळणाऱ्या वैचारिक आत्मविश्वासाचे शस्त्र करून युगानुयुगे चाललेल्या अन्यायाविरोधात बंड केले.
प्राचार्य व. न. इंगळे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या संघर्षमय आयुष्यातील नेमका हाच भाग घेऊन त्यावर चरित्रपर कादंबरी लिहिली आहे. त्यामुळे ती अत्यंत वाचनीय आणि रोचक झाली आहे. लेखकाने अत्यंत ओघवत्या आणि चित्रमयी शैलीत आठ प्रकरणांत बाबासाहेबांचे एक विद्यार्थी म्हणून चरित्र मांडले आहे. बालपण ते १९२३ सालापर्यंतचा काळ त्यासाठी निवडला आहे. त्यातून पुढील संघर्षमयी नेतृत्वदायी जीवनाचा पाया स्पष्ट होतो.
ही कादंबरी एक कलाकृती म्हणून सुंदर वठली आहे. या कादंबरीला डॉ. गंगाधर पानतावणे यांची प्रस्तावना आहे. कादंबरी इतकी चांगली उतरली आहे की तिला खरे तर प्रस्तावनेची गरज नव्हती. कादंबरीतील ‘डॉ. आंबेडकरांचा आत्मसंवाद’ हे सातवे प्रकरण बहारीचे झाले आहे. कादंबरीचा कळसाध्याय मानता येईल इतके वेगळेपण त्यात आहे.  
पुस्तकातील प्रसंग चित्रण करताना झालेले काही किरकोळ चित्रणदोष दिसून येतात ते म्हणजे कादंबरीची सुरुवात दंतकथेने सुरू होते. त्यातील नदीकाठी कपडे धुणी केल्यानंतर अंमळ थकव्याने विसाव्यासाठी आंब्याच्या झाडाखाली पहुडलेल्या भीमाबाईला स्वप्न पडते. त्यात गोसावींचा आशीर्वाद मिळालेली भीमाबाई निद्रेतच अलख निरंजन म्हणते. मात्र ती जागी होते ती मात्र तिच्या घरात पतीने विचारलेल्या प्रश्नाने.. अगं कसलं स्वप्न पडलं? या प्रसंगातील स्थळकाळभान चित्रण करताना राहून गेले आहे. तसेच मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीटचे होते हे वर्णन आजच्या मुंबईचे आहे. त्या काळातील रस्ते फार तर डांबरी असू शकतील. तसेच बाबासाहेब १९०४ साली पाचवीत होते आणि १९०८ साली मॅट्रिक झाले असा उल्लेख आहे. त्यातील वर्षांचा हिशेब तपासून घेतला पाहिजे असे वाटते.    
‘असे घडले ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ – प्राचार्य व. न. इंगळे
साकेत प्रकाशन, औरंगाबाद,
पृष्ठे – २००, मूल्य – २०० रुपये.  

Story img Loader