२० वर्षांपूर्वी ‘हम आपके है कौन?’ या चित्रपटाने हिंदी चित्रपटांचा फॉम्र्युलाच केवळ बदलला नाही, तर अवघे भारतीय जनमानसही त्याने कवेत घेतले. श्रीमंतीचे उथळ प्रदर्शन, ‘संस्कृती’च्या नावाखाली थिल्लर गोष्टींचा अतिरेक, दाखवेगिरीचा प्रचंड सोस आणि सामाजिकतेला सोडचिठ्ठी ही सगळी या चित्रपटाचीच देन आहे. याचदरम्यान भारतीय समाजात आणि त्याच्या मानसिकतेत जे बदल घडले, त्याची सुरुवात या चित्रपटाने करून दिली. आजच्या वाढत्या चंगळवादाचा हा चित्रपट सर्वार्थाने प्रतीक आहे.
‘लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला..’ असं अगत्याचं आमंत्रण देणारी पुस्तकाच्या आकाराची, पुठ्ठा बांधणीची, खलित्यासारखी पत्रिका येताच घर सुगंधानं भरून गेलं आहे. समक्ष भेट शक्य नसल्याने हळद-कुंकू, अक्षता धाडल्या आहेत. आपुलकी इतकी, की रसरशीत फळे, चमचमीत मिठाई व स्वादिष्ट चॉकलेट्सनी कुटुंबातील आबालवृद्धांचं तोंड गोड केलं आहे. हल्लीच्या धकाधकीच्या, वेगवान काळात प्रेमानं आहेर देण्या-घेण्यासाठी वेळ मिळेल की नाही, हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक सदस्याकरिता घरपोच यथोचित आहेर आलेला आहे. पठणी पाहून गृहिणी गहिवरून आली आहे. लेटेस्ट फॅशनचे तयार कपडे आणि उंची जाकीटसह कुर्ता-पायजमा न्याहाळण्यात घरातली मुले आणि कर्ता दंग झाले आहेत. विवाहाच्या मंगल सोहोळ्यात सर्वाना सहभागी करून घेण्याची आपली संस्कृती वृिद्धगत करण्याचा हा उपक्रम पाहून मन भरून येणार नाही तर काय? प्रत्यक्ष विवाहाचा सोहोळ्याचे वर्णन काय करावे? आसमंतातील वाहनतळ महागडय़ा वाहनांनी ओसंडून गेले आहेत. सर्व सुखसोयींनी सुसज्ज भव्य शामियाना उभारला आहे. बाहेर फटाक्यांची आतषबाजी चालू आहे. आत डोळे दिपवून टाकणारी रोषणाई केली आहे. या पवित्र समारंभातील क्षण न् क्षण ३६० अंशांतून टिपण्यासाठी क्रेनवरील कॅमेरे टपून बसले आहेत. सनई-चौघडे वाजताहेत. अधूनमधून तुतारी निनादते आहे. पाहुण्यांच्या आगमनामुळे मन प्रसन्न झालेले खुद्द यजमान त्यांचं स्वागत करताहेत. पारंपरिक पोशाखातील स्वागतक सरबतापासून त्यांची सगळी सरबराई करताहेत. तऱ्हेतऱ्हेचे खाद्यपदार्थ विविध स्टॉल्सवर विराजमान आहेत. या मंगलमय वातावरणाला भावपूर्ण गाण्यांची झालर लाभली आहे. ज्यांना जी रुची असेल त्यांनी ते मनसोक्त ऐकून, पाहून व खाऊन घ्यावे असा जंगी बेत आहे. दरवर्षी लातुरात पंचवीस-तीस, तर पुण्या-मुंबईत असे शेकडो शाही विवाह होत असतील. आपल्याकडला विवाह सोहळा आगळावेगळा, हटके असावा असं सर्वानाच वाटत असतं. त्यातूनच कल्पकतेला व नावीन्याला बहर येतो. गोव्याला वा महाबळेश्वरला लग्न आणि स्वागत समारंभ स्व-गावात असा प्रस्ताव त्यातूनच येतो. आणखीनही काही नवं करून दाखविण्याची जणू अघोषित स्पर्धाच लागते. गल्ली ते दिल्लीतील लग्नाच्या आवृत्त्यांमध्ये विविधता असली, तरी त्यांच्या गाभ्यामध्ये मात्र एकता असते.
फॅन्सी ड्रेस, विविध गुणदर्शन आणि मनोरंजक उत्सव असा शाही थाटमाट लग्नात करण्याच्या या उत्क्रांतीचं जनकत्व ‘हम आपके है कौन?’ या चित्रपटाकडे जातं. वीस वर्षांपूर्वी या चित्रपटानं मध्यमवर्गीयांना गुदगुल्या करीत उंची जीवनशैलीची आगळी दुनिया दाखवली आणि त्याने मध्यमवर्गीय जीवन आमूलाग्र बदलून गेलं. त्याकाळी लोकप्रियतेचा उच्चांक प्रस्थापित करण्यात ‘हम आपके है कौन?’ यशस्वी झाला. िहसक वा उत्तान चित्रपटांच्या पाश्र्वभूमीवर हे पारंपरिक मूल्यं व संस्कारांचं क्षोभनाटय़ (मेलोड्रामा) भारतीय मनाला भुरळ पाडणारं होतं. परंपरेला कुठलेही प्रश्न न विचारणारा नव्यांचा आज्ञाधारकपणा भारतीय मनाला भावतो. ‘मला बीअर पिऊ द्या नं!’ पद्धतीचे हट्ट हे मूल्यात्मक बंड असल्याचं भासू लागतं. सिनेमात मध्यंतरापर्यंत अर्धवस्त्रांत िहडणारी स्त्री लग्न होताच डोक्यावर पदर व अंगभरून साडी नेसली की ती सोज्वळतेचं प्रतीक बनते. भंपक आधुनिकतेचा अभिकल्प, निर्माण व विकास या अपूर्व कामगिरीचा साक्षात्कार म्हणजे लोकप्रिय िहदी चित्रपट! ‘लोकप्रिय िहदी चित्रपट हे अताíकक वाटत असले तरी ते पूर्णपणे असत्य नसतात,’ या मानसशास्त्रज्ञ सुधीर कक्कर यांच्या विश्लेषणाची त्यातून प्रचीती येते.
‘हआहैकौ’च्या सुमारासच चित्रपटांतील प्रमुख पात्रांचा सामाजिक परीघ आक्रसण्यास सुरुवात झाली. यापूर्वीच्या चित्रपटांतील राजू, विजय अशा नायकांचे आजूबाजूच्या लोकांशी व समाजाशी जिवंत संबंध असत. ते नायक सभोवतालची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करीत. ‘हआहैकौ’मधील ‘प्रेम’च्या जमान्यात समाज, गरिबी, महागाई, भूक असल्या किरकोळ सामाजिक प्रश्नांना पार हाकलून दिलं गेलं. ‘उगाच डोक्याला त्रास नको!’ हा वसा मध्यम व उच्च वर्गानी मनोभावे स्वीकारून त्याचा पुढे प्रसार केला. ज्ञानक्रांतीच्या कालखंडात स्वत:च्या मेंदूला निष्क्रिय करण्याची आज्ञा देणाऱ्या या प्रक्रियेला कोणती संज्ञा द्यावी, या विचाराने वर्तनशास्त्रज्ञ दिङ्मूढ झाले आहेत. आपल्या मेंदूमध्ये दृष्टी आणि भावना यांची एकाच वेळी नोंद होत असते. ‘कॅपग्रॅस लक्षणसमूह’ हा मनोविकार असलेल्या रुग्णांना व्यक्ती वा वस्तू दिसते, परंतु त्यांच्या मेंदूमध्ये भावनांची संवेदना पोहोचत नाही व त्यामुळे कुठलीच भावना निर्माण होत नाही. या मानसिक विकारानं आपला अवघा देश पादाक्रांत केला आहे. उच्च व मध्यमवर्गीयांनी आधी मनातून आणि मग वास्तवातून ‘इतरां’पासून फारकत घेऊन टाकलीय.
१९९१ नंतर जागतिक बाजारपेठेनं सार्वभौम होण्याची वाटचाल सुरू केली. ‘आपणच विशेष राजे आहोत!’ हा भाव प्रत्येक ग्राहकाच्या मनात आला तर तो खरेदीमग्न होईल, हे सूत्र या बाजारास अभिप्रेत आहे. नेमक्या याचवेळी ‘हआहैकौ’नं ‘बिनदिक्कतपणे मजा करा.. स्वत:चाच तेवढा विचार करा’ या स्वकेंद्रिततेच्या जाहीरनाम्याचं दर्शन घडवलं. त्यातच दूरचित्रवाहिन्या व असंख्य मालिकांतून नवनवीन उत्पादनांच्या जाहिरातींचा भडिमार सुरू झाला. मध्यमवर्गीयांना खेचून घेणाऱ्या या सर्व प्रतिमा या ‘हआहैकौ’च्याच आविष्कार होत्या. काटकसर ही संज्ञा हद्दपार करून श्रीमंतांच्या खांद्याला खांदा लावून हौसेखातर बेधडकपणे मोल देण्याला मध्यमवर्ग सिद्ध झाला. चंदेरी पडद्यावरील प्रतिमा वास्तवात उतरवण्यासाठी आटोकाट प्रयत्नांत भारतातील थोर मध्यमवर्ग गुंतून गेला. साडय़ा व दागिन्यांची साठवणूक करण्यात महिला, मोक्यावरील जागा व मोठाल्या सदनिका घेण्यात पुरुष, तर मॉलमध्ये चक्कर टाकून नवनवे नमुने खरेदीत मुले दंग झाली. या वळणिबदूनंतरच्या चित्रपट व मालिकांवर ‘हआहैकौ’चीच छाप राहिली. अभिजात साहित्यावरील मालिका गायब होऊन कुटुंबकलहाच्या उखाळ्यापाखाळ्यांना बहर आला. या काळात ‘न-कला’नाच कलेचा मान बहाल केला गेला. गाण्याच्या भेंडय़ांना अभूतपूर्व प्रतिष्ठा आली. पेहेराव बदलत गेले. मध्यम व उच्चवर्गीयांच्या लग्नांत पायताणे चोरण्याची प्रथा रूढ झाली. लहानथोर या मज्जेचा आनंद लुटू लागले. चित्रीकरण व छायाचित्रीकरण करून ते दाखवण्याचा लग्नोत्तर कार्यक्रम सर्वदूर होऊ लागला. थोडक्यात, भारतीय परंपरेनं वर्णिलेल्या ६४ कलांमध्ये ‘हआहैकौ’नं आणखीन नव्या कलांची भर घातली.
१९९० नंतर जगात संपत्तीच्या निर्मितीला आलेल्या प्रचंड गतीचा उच्च व मध्यमवर्गीयांना अधिकाधिक लाभ होत गेला. वाढीव धनाचं करायचं काय, याचं मार्गदर्शन बाजारपेठ आणि धनाढय़ांची जीवनशैली करीत होतीच. विवाह असो वा घरबांधकाम; सार्वजनिक प्रसंगी स्वत:चं आíथक स्थान ठसविण्याची कुठलीही संधी दवडायची नाही, हा संदेश समाजात पाझरत गेला. संपत्तीचा अविवेकी देखावा करण्यात एकमेकांना मागे टाकावे, हे उच्च व मध्यमवर्गीय आयुष्याचं ब्रीद झालं.
२००४ साली जगातील चौथे धनिक लक्ष्मी मित्तल यांनी ‘जाईल त्या देशी निवास’ या तत्त्वानुसार इंडोनेशिया, त्रिनिदाद व लंडन येथे १२ शयनगृहांचे महाल विकत घेतले. याच सुमारास जगातील पाचवे धनसम्राट मुकेश अंबानी यांनी पाचजणांच्या कुटुंबासाठी ६०० सेवक, सहा वाहनतळ, नऊ स्वयंपाकगृहे, वाहनांकरिता उद्वाहक, जलतरणतलाव, हिमवर्षांवापासून सर्व काही अनुभवण्यासाठी अंदाजे ६००० कोटी रुपयांची २७ मजली वास्तू बांधली. आजमितीला ते जगातील सर्वाधिक किमतीचे वास्तुवैभव आहे. भारताची शान म्हणतात ती हीच! केवळ विजय मल्ल्या, सुब्रतो रॉय यांच्यासाठीच नाही, तर सचिन तेंडुलकर, शाहरूख खान, राजकीय नेते व प्रशासनकत्रे या शाही लोकांसमोर मित्तल-अंबानी यांच्या सरंजामी वास्तू हेच ‘आदर्श’ होते. ‘फोर्ब्स’च्या धर्तीवर आपल्याकडेही देश, राज्य, जिल्हे, तालुके आणि शहरांतील श्रीमंतांची यादी जाहीर व्हायला हवी. या संभाव्य यादीत समाविष्ट असलेल्यांनी त्यांच्यापेक्षा वरचढ धनाढय़ांचा कित्ता गिरवायला सुरुवात केलीय. चेन्नईचा वास्तुशास्त्र सल्लागार, दिल्लीचा वास्तुविशारद, राजस्थानहून संगमरवर, तामिळनाडूतून ग्रॅनाइट, हाँगकाँगहून विद्युत साहित्य आणून शाही प्रासाद उभे राहत आहेत. ‘आपण घराला आणि मग घर आपल्याला आकार देते’ या उक्तीप्रमाणे जमेल तिथे सांपत्तिक स्थितीचं मग्रूर व बीभत्स प्रदर्शन करण्याचा अट्टहास सुरू झाला आहे.
अतोनात संपत्तीचा विनियोग कसा करावा, या विवंचनेने ग्रासलेली मंडळी आता सर्वत्र दिसू लागली आहेत. सामाजिक प्रतिष्ठा विकत घेण्याकरिता ते प्रसिद्ध पावलेल्यांनाच आपल्या आप्तेष्टांच्या नावानं पुरस्कार देतात. फुटकळ दानाचा डंका पिटत मंदिर, कथासप्ताह, अन्नदान करतात. युरोप व अमेरिकेतील धनिकांनी विद्यापीठे, संशोधन संस्था, महाविद्यालये, वाचनालये, कलादालनं, संग्रहालयं निर्माण केली. साहित्य, शास्त्र, कला क्षेत्रातील नामवंतांचा सल्ला घेऊन कित्येक स्वायत्त संस्था उभ्या केल्या. (अमेरिकेचे अध्यक्ष स्टॅनफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांना भेटायला गेले तरी तिथले इतर सर्व वर्ग व कामे व्यवस्थित चालू राहतात.) ऐश्वर्यसंपन्न लोकांनी तिथे सरकारच्या खांद्याला खांदा लावून अनेक क्षेत्रांत आपला ऐतिहासिक वाटा उचलला आहे. त्यांनी आधुनिकता व सुसंस्कृतता रुजविण्याची जबाबदारी स्वत:हून उचलली आहे. आपल्या नफ्यातील वाटा समाजाला परत करावा, हा उन्नत विचार व कृती करणारे अनेक उद्योग तिकडे आहेत. आपल्याकडील उद्योगपतींचे कर्तृत्व याच्या अगदी उलट आहे. केवळ मराठवाडय़ातच व्यापार, बांधकाम, शिक्षण व सहकार क्षेत्रात एक अब्जापेक्षा अधिक संपत्ती असणारे अंदाजे (किमान) हजार लोक तरी असतील. एखाद्या खेडेगावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यानं अथवा पाणलोट क्षेत्राचा विकास करण्यानं तिथल्या धनाढय़ांना काडीमात्र फरक पडणार नाही. त्यांनी गटशेतीला चालना व आच्छादन-शेतीस साहाय्य केल्यास साखर कारखाने, तेल व डाळ-गिरण्यांना स्थानिक पातळीवर भरपूर शेतमाल मिळू शकेल. असाध्य आजारात कर्जबाजारी झालेल्यांना मदत केल्याने या करोडपतींना काहीच तोशीस लागणार नाही. या धनाढय़ांमध्ये दाखल झालेली नवी पिढीसुद्धा असा प्रगत विचार करण्यास तयार नाही. हीच गोष्ट राज्य व देशपातळीवरील कुबेरांनाही लागू पडते.
युरोप-अमेरिकेतील मध्यमवर्गीयांनी आपल्या मिळकतीतील किमान दहा टक्के हिस्सा हा समाजोपयोगी कामांकरिता देण्याची प्रथा सुरू केलीय. युरोपातील कित्येक वित्तसहाय्य संस्थांना (फंिडग एजन्सीज्) ते अशा तऱ्हेनं मदत करत असल्यामुळेच विकासकामं करणाऱ्या जगभरातील स्वयंसेवी संस्थांना अर्थपुरवठा होत असतो. आपला आत्ममग्न मध्यमवर्ग मात्र स्वत:चे फाजील लाड करण्याशिवाय इतर कुठलीही जबाबदारी मानण्यास तयार नाही. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या (किंवा शहरातील कष्टकऱ्यांच्या) एका मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलणं डॉक्टर, इंजिनीअर वा प्राध्यापकांनाही अजिबात जड जाणार नाही. परंतु असं काही त्यांच्या मनाला शिवतसुद्धा नाही. ‘आम्ही आणि केवळ आमचे आम्ही! तुम्ही कोण?’ अशीच त्यांची मनोवृत्ती बनली आहे.
आपलं स्वतंत्र बेट तयार करण्याचा धनिकांचा आटापिटा असा वाढत असताना दुसरीकडे भुकेल्यांच्या असंतोषाचा सागरदेखील वाढतो आहे. याचं वेळीच भान येऊन भोवतालाशी आपल्याला नातं निर्माण करता आलं, तरच बेट आणि सागर यांच्यातील संभाव्य संघर्ष टाळता येणं शक्य आहे.
‘हम आपके है कौन?’ची देन
२० वर्षांपूर्वी ‘हम आपके है कौन?’ या चित्रपटाने हिंदी चित्रपटांचा फॉम्र्युलाच केवळ बदलला नाही, तर अवघे भारतीय जनमानसही त्याने कवेत घेतले.
आणखी वाचा
First published on: 10-08-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hum aapke hain koun a movie symbolises all sort hedonism