तो दिवस अजूनही स्मरतो. माझा मितवा मोहन गोखले मला ‘घाशीराम कोतवाल’ या नव्या नाटकाच्या तालमीला घेऊन गेला, ते मला त्यात सहभागी करायचं, या हेतूनं. डेक्कनवरच्या महिला निवासच्या तळघरात नाटकाच्या रिहर्सल्स आयोजित केल्या होत्या. संध्याकाळी सात-साडेसातची वेळ असेल. महिला निवास या वास्तूच्या तळघरात नेणाऱ्या त्या पायऱ्या माझ्या आयुष्याच्या नव्या वळणावरल्या प्रवासाच्या वाटचालीची सुरुवात करणाऱ्याहेत हे तेव्हा मला कुठं माहीत होतं? तळघरातल्या बालक मंदिराच्या वर्गातच चिमुकल्या खुच्र्या/बाकांना एका कोपऱ्यात हलवून आणि सतरंज्या अंथरून त्यावर हार्मोनियम ठेवली होती. जमलेल्या तरुण रंगकर्मीमध्ये हार्मोनियम वाजवता येणारे एकमात्र अस्मादिक असल्यानं हार्मोनियमचा ताबा मी घेतला.. दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल हे मौजे दौंड येथे बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असल्यानं संध्याकाळी साडेआठ वाजता दवाखाना बंद करून पुण्याला येणारी रेल्वेगाडी पकडून साडेदहाच्या सुमारास तालमीला पोहोचत. आठ वाजेपर्यंत मंडळी जमत तोवर हार्मोनियमच्या साथीनं गाण्याचं अंग असणारे रंगकर्मी आपापले गळे तापवून घेत. नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद सर आले, की नाटकाचे सहायक दिग्दर्शक सतीश आळेकर आम्हा सर्वाना त्यांच्या ताब्यात देत.
मुळगुंदसरांनी सुरुवातीला तालाच्या मात्रांवर बद्ध अशा काही स्टेप्स आम्हाला शिकवल्या आणि ते रोज तालमीच्या पूर्वार्धात आमच्याकडून शाळेतल्या कवायतीसारख्या त्या स्टेप्सचा रियाज करवून घेत. गंमत म्हणजे त्यातली एकही स्टेप नाटकात वापरली नाही. पण आमची शरीरे नृत्य करण्याकरिता लवचिक आणि अनुकूल व्हावी हा त्यामागचा हेतू. त्या रियाजामुळे पुढे मुळगुंदसरांनी प्रत्यक्ष नाटकात योजलेल्या नृत्यात्मक मुद्रा आणि विरचना साकारताना आम्हा सर्वाना फारशी अडचण आली नाही. खरं तर आमच्यातलं कुणीही नृत्याची तालीम घेतलेलं नव्हतं. थोडय़ाफार फरकानं तीच गोष्ट गाण्याबाबतची. आमच्यातला रवींद्र साठे आणि मी- आम्हीच दोघं थोडंफार गाणं शिकलेलो. चंद्रकांत काळ्यांचा गाता गळा, पण अधिकृत शिक्षण नाही. मुळातच नटाचा पिंड असल्यानं गायकांच्या नकला उत्तम करी. बाकीच्यांना स्वरांचं भान होतं, पण शास्त्रशुद्ध शिक्षण अगर रियाज नव्हता.
संगीतकार भास्कर चंदावरकर लवकरच आमच्या तालमींना येऊ लागले. पांढरा लेंगा आणि सुती, पण वेगळ्या रंगाचा खूप छान, सुंदर झब्बा ल्यालेले, उंचेपुरे, प्रसन्न चेहऱ्याचे भास्करजी तालमीच्या हॉलमध्ये प्रवेशले, की  वातावरणात एक ताजगी पसरे. साडेदहाच्या सुमारास दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या आगमनानं सर्वाना नवे संजीवन, नवा हुरूप येई. जवळची हार्मोनियम हाताशी धरून चंदावरकर आम्हाला संहितेतल्या गाणुल्यांच्या किंवा पद्यात्मक नादमय संवादांवर चढवलेल्या स्वरावली शिकवत. तो एक सुंदर अनुभव होता. परिपाश्र्वक रवींद्र साठे नाटकात प्रसंगी मंजिरी/टाळ वाजवी, तर चंद्रकांत काळे चिपळी वाजवत कीर्तन करत असे. अशोक गायकवाड (ढोलकी/ तबला), प्रभाशंकर गायकवाड (सुंद्री/ मंजिरी), श्रीकांत राजपाठक (मृदंग) आणि श्याम बोंडे (हार्मोनियम) अशा वाद्यवृंदालाही आमच्याबरोबर शिकवत शिकवत भास्करजींनी  या नाटकाचं अप्रतिम संगीत निर्मिलं. मराठी मातीतल्या लोकसंगीताच्या अनेक धारांचे नाटय़ाभिमुख असे सर्वोत्तम उपयोजन ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाच्या संगीतात झालं आहे.
प्रतिभावंत नाटककार विजय तेंडुलकर यांच्या सिद्धहस्त अलौकिक प्रतिभेतून सिद्ध झालेल्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा रंगमंचीय आविष्कार साकार करताना डॉ. जब्बार पटेल यांनी नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद सर आणि संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्या सर्जनशील योगदानाचं जे ‘न भूतो न भविष्यति’ असं अकल्पनीय अद्भुत योजन केलं की, ही त्यांची निर्मिती नव्या संगीत रंगभूमीची नांदी ठरावी. मी तरी आजवरच्या माझ्या आयुष्यात डॉ. जब्बार पटेलांसारखी संगीताची अत्युत्कृष्ट जाण असलेला कुणीही नाटय़दिग्दर्शक पाहिला नाही. असा दिग्दर्शक झाला नाही, होणेही नाही. प्रतिभावंत कलावंताकडे संगीतातली पराकोटीची संवेदनशीलता असेल तर ती त्याच्या प्रतिभेला नवे आयाम देते. इतरांपेक्षा त्याचे अलौकिकत्व सिद्ध करते.
त्यांच्या संगीतविषयक प्रतिभेचं एक छोटंसं उदाहरण दिल्याशिवाय राहवत नाही. सनई किंवा सुंद्रीवादन ऐकतच आपण सर्व लहानाचे मोठे झालोत. ललितागौरी (घाशीरामची मुलगी) या किशोरीच्या अंतरात पुरुषाच्या प्रथम स्पर्शानं जागवलेली प्रणयोत्सुक भावना, लज्जा आणि तिचं मोहरणं या सर्वाचं सुंदर दर्शन सुंद्रीवर वाजवलेल्या तारस्वरावरून मींड घेऊन खर्ज स्वरापर्यंत उमलणाऱ्या सुरेल कमानीतून मांडण्याची डॉक्टरांची कल्पना भन्नाटच. ‘नाचता नाचता काय घडले, श्रीमंत नाना जाया जाहले, पाय मुरगळले’. यातल्या ‘पाय मुरगळले’ ही ओळ सुरात गाताना ‘मुरगळले’ या शब्दाच्या गायनात नाजूक हरकतीयुक्त स्वरावलींचा प्रयोग लकडी पुलावर थबकून खुद्द पटेलांनी गाऊन सुचवल्याचं मला स्मरतं. दुसऱ्या दिवशीच्या तालमीत चंदावरकरांच्या संमतीनं लगेचच रवींद्र साठे, चंद्रकांत काळे या परिपाश्र्वकांनी सूत्रधार श्रीराम रानडेसह या गायनातल्या नजाकतदार जागा पक्क्या करून टाकल्या.
दिव्यानं दिवा लागत जावा तसे नाटककार विजय तेंडुलकर, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, संगीतकार भास्करजी चंदावरकर व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद या प्रतिभावंतांच्या पारस्परिक आदानप्रदानातून ‘घाशीराम कोतवाल’सारखी युगप्रवर्तक कलाकृती आकाराला आली. या सगळ्या साडेतीन महिन्यांच्या तालमीतून व्यक्तिश: मी स्वत:, गायक रवींद्र साठे, गायक अभिनेता चंद्रकांत काळे, अभिनेते मोहन आगाशे, मोहन गोखले, नाटककार सतीश आळेकर, खरं तर आम्ही सर्वच घडलो असं म्हटले तरी वावगं ठरणार नाही. ‘घाशीराम कोतवाल’ या विद्यापीठात आमचं रंगभूमीविषयक शिक्षण झालं. माझ्यातल्या संगीतकाराला ‘रंगसंगीत आणि त्याकरिता संगीताचे रंगभूमीसाठी प्रभावी उपयोजन’ यासाठीची ती एक कार्यशाळा ठरली. तेव्हा जे शिकलो ते अजून पुरलं आहे आणि तरीही उरलं आहे. संगीतकार भास्कर चंदावरकर यांना मी माझ्या अनेक गुरूंपैकी एक मानतो. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं.
‘घाशीराम कोतवाल’च्या तालमी सुरुवातीला काही दिवस महिला निवासच्या तळघरात झाल्या. त्यानंतर प्रथम विमलाबाई गरवारे हायस्कूलच्या सभागृहात आणि सरतेशेवटी टिळक तलावाच्या लगतच्या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरल्या वर्गात झाल्या. हळूहळू सर्व रंगकर्मी जमत आणि मग देहभान विसरून आम्ही तालमीत बुडून जायचो. तालीम संपल्यावर सर्वजण आपापल्या सायकली हातात धरून दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेलांच्या सोबत चालत लकडी पुलावरून अलकाच्या चौकातलं ‘रिगल’ हे इराणी हॉटेल गाठायचो. चहा, खारी, क्रीमरोल यांचा आस्वाद घेत होणाऱ्या गप्पांचे विषय नाटक, चित्रपट, साहित्य, संगीत असे विविधांगी असत. आमच्यातल्या एक-दोनच स्कूटरवाल्यांपैकी सतीश घाटपांडे किंवा दीपक ओक उत्तररात्री दौंडला जाणारी आगगाडी गाठायला डॉ. पटेलांना पुणे स्टेशनला सोडून येई. आमच्या सायकली मग मंडई परिसरातल्या मार्केट रेस्टॉरंटकडे वळत. चंदावरकरांनी नाटकात वापरण्याच्या हेतूनं ‘अंधारातील लावण्या’ या दुर्मीळ पुस्तकातून काही लावण्या निवडल्या. ते पुस्तक मोहन गोखलेनं वाचायला म्हणून घेतलं आणि मग त्यातल्या चावट आणि अश्लील लावण्या आस्वादायला रोज कुणीतरी रात्री ते पुस्तक न्यायला लागलं. नव्हे, त्या पुस्तकाकरिता प्रतीक्षायादी अस्तित्वात आली.
१२ डिसेंबर १९७२ रोजी माझा महाराष्ट्र बँकेच्या नोकरीचा पहिला दिवस होता आणि पिंपरीतल्या हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांच्या कॉलनीतल्या सभागृहात ‘घाशीराम’च्या रंगीत तालमीचाही. १६ डिसेंबर १९७२ला महाराष्ट्र राज्य नाटय़स्पर्धेत पुणे केंद्रात भरत नाटय़ मंदिर येथे ‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग संपन्न झाला.
‘घाशीराम कोतवाल’नं मला डॉ. जब्बार पटेल, भास्कर चंदावरकरांसारखे गुरू दिले. रवींद्र साठे, चंद्रकांत काळे,  मोहन आगाशे, सतीश आळेकरांसारखे प्रतिभावंत सुहृद  दिले. पुढे त्याच्या २० वर्षांच्या प्रवासात- सुरुवातीच्या काळात भवतालचे असंतुष्ट रंगकर्मी, राजकारणी, कर्मठ विचारसरणी असणारे प्रतिगामी यांचा विरोध, दहशतवाद याला धैर्यानं सामोरं जायचं मनोबल दिलं. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतांची प्रयोग पाहिल्यानंतरची  दिलखुलास दाद अनुभवली. १९८० साली ‘घाशीराम’च्या पहिल्या युरोप दौऱ्यापूर्वी उद्भवलेले वादविवाद आणि पुण्याहून विमानानं मुंबई आणि तेथून जर्मनीला प्रयाण करतानाचा थरार, इंग्लंड, हॉलंड, इटली, जर्मनी आणि फ्रान्स या देशांच्या यशस्वी दौऱ्यानंतर १९८६चा अमेरिका/कॅनडाचा दौरा आणि १९८९चा रशिया, पूर्व जर्मनी, युगोस्लाव्हिया आणि हंगेरी या देशांचा दौरा असं अध्र्याहून जगाचं दर्शन घडवून माझं कलाजीवन समृद्ध केलं. माझ्या आयुष्याला नवा अर्थ दिला, नवी दिशा दिली. त्यामुळे ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचं माझ्या आयुष्यातलं स्थान, महत्त्व अनन्यसाधारण आहे. 

tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Tata Literature Live The Mumbai Litfest
बुकबातमी : इथं जाऊ की तिथं जाऊ?
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Jheel Mehta Marriage on 28 december
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; ‘या’ दिवशी वाजणार सनई-चौघडे
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
Aishwarya Narkar and Avinash Narkar Romantic Dance On Ajay Devgan Song Sathiya
“मुंबईत दोन दिवसांचे कपडे घेऊन आले होते अन्…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरेने ईशा पात्राच्या ऑडिशनचा सांगितला मजेशीर किस्सा
marathi actress wedding photo
‘पुन्हा सही रे सही’ नाटकातील अभिनेत्रीचं थाटामाटात पार पडलं लग्न! यापूर्वी लोकप्रिय मालिकेत साकारलेली भूमिका, पाहा फोटो