अलीकडे ‘सीक्वेल’ लेखनाचे प्रयोग होत आहेत. ‘सीक्वेल’मध्ये मूळ कादंबरीचा नायक, काही महत्त्वाची पात्रे घेऊन कथावस्तूचा विकास दाखवायचा असतो. म्हणजे मूळ कादंबरी ज्या बिंदूवर संपते, तिथून ‘सीक्वेल’ (कादंबरी) सुरू होतो. हे एक प्रकारचे सर्जनशील आव्हानच असते.
‘रारंग ढांग’ ही प्रभाकर पेंढारकर यांची गाजलेली कादंबरी. ढांग म्हणजे कडा किंवा सुळका. हिमालयाच्या पर्वतराजीत असे सुळके खूप. एका बाजूला उंचच उंच सुळके, दुसऱ्या बाजूला खोलवर दऱ्या. अशा दुर्गम भागांतून रस्ते बांधणे, त्यांची डागडुजी करणे ही आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक बाब. १९६१ साली चीनने भारतावर आक्रमण केल्यानंतर तर याबाबतीतले आपले मागासलेपण अधोरेखित झालेले. त्याकरिता भारत सरकारने मिलिटरीची ‘सीमा सडक संघटना’ (म्हणजे बॉर्डर रोडस् ऑर्गनायझेशन्स) ही शाखा निर्माण केलेली. विश्वनाथ मेहेंदळे नावाचा एक बुद्धिमान तरुण मुंबईतील आपली सुखासीन नोकरी सोडतो आणि सिव्हिल इंजिनीअर म्हणून ‘सीमा सडक संघटने’त नोकरी स्वीकारतो. ‘रारंग ढांग’ परिसरातील रस्ताबांधकामातील त्रुटी त्याच्या लक्षात येतात. तो त्या वरिष्ठांच्या नजरेस आणून देतो. ते त्याकडे दुर्लक्ष करतात. उलट वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन केले नाही, सैन्याच्या मालाची अफरातफर केली, असे आरोप ठेवून विश्वनाथची चौकशी होते. त्यात त्याला दोषी ठरवून निवृत्त केले जाते. पेंढारकर यांनी या आशयसूत्रावर अतिशय कल्पकतेने कादंबरी लिहिली.
‘रारंग ढांग’चा सीक्वेल म्हणून ‘रारंग ढांग नंतर..’ ही कादंबरी श्रीकृष्ण सवदी यांनी लिहिली आहे. पेंढारकरांच्या ‘रारंग ढांग’मध्ये विषयाचे वेगळेपण, त्यातील बारीकसारीक तपशिलांबाबतची जागरूकता आणि तो अनुभव तर्कशुद्धरीत्या प्रस्थापित आणि विकसित करण्यातले भान लक्षणीय होते. मूळ कादंबरीतील सारे पर्यावरण तितक्याच ताकदीने पेलत विश्वनाथ या मध्यवर्ती पात्राचा आणि कथावस्तूचा अर्थपूर्ण, सौंदर्यपूर्ण विकास ‘सीक्वेल’मध्ये चित्रित करणे, हे सवदी यांच्यापुढे आव्हानात्मक स्वरूपाचे काम होते. ते त्यांनी इथे पुरेशा ताकदीने पेललेले दिसते.
‘रारंग ढांग नंतर..’विषयी लिहिण्याआधी तिच्या निर्मात्यासंबंधी लिहायला हवे. १९६४ साली सवदी यांनी इंग्रजी विषयात एम. ए. केले. पुण्याच्या एस. पी. कॉलेजात त्या विषयाचे त्यांनी दोन वर्षे अध्यापनही केले. या काळात त्यांनी आयएएसच्या परीक्षेत यश संपादन केले. ‘सीमा सडक संघटना’ या संस्थेत त्यांनी वेगवेगळ्या आणि वरच्या पदांवर ३१ वर्षे नोकरी केली. त्यांचा सुरुवातीचा काळ हिमालयातील लाचेन, रिशी, गँगटोक, कालिम्पाँग, सिक्कीम या भागांत गेला. तेथील डोंगराळ प्रदेश, दऱ्या, नद्या, कांचनगंगासारखी सुंदर पर्वतशिखरे, तेथील माणसे, त्यांच्यावरील बौद्ध धर्म-तत्त्वज्ञानाचा असलेला पगडा, त्यांचे कलाविष्कार, त्यांची संस्कृती आणि नैसर्गिक आपत्ती यांची त्यांना अगदी जवळून माहिती होती. मिलिटरी अधिकाऱ्यांचे स्वभाव, त्यांचे ग्रह-पूर्वग्रह, व्यसने, आनंद साजरा करण्याची पद्धती, खवय्येगिरी यांचेही त्यांचे निरीक्षण चांगले आहे. नव्हे, या साऱ्या जीवनाचा ते एक भाग होते.
 ‘रारंग ढांग’चा ‘सीक्वेल’ लिहिताना सवदी त्या अनुभवांशी स्पंज पाण्यात भिजावा तसे आतून अनुभवसमृद्ध झालेले होते. आणि ते चित्रित करायला आवश्यक असणारी लेखनकला त्यांनी वाङ्मयाचा मन:पूर्वक अभ्यास केलेला असल्याने त्यांना वश होती. या शिवाय सवदी यांनी ‘वित्तीय सल्लागार’ म्हणून काम केले आहे. ‘सीक्वेल’मध्ये देशपांडे या लेखाधिकाऱ्यांसंबंधीचे चित्रण येते. ते साहित्यप्रेमी आहेत. हेमिग्वे, डॉ. झिवागो, ‘रोड कन्स्ट्रक्शन इन द स्वीस आल्पस्’ या पुस्तकांच्याबरोबरीने अन्यही वाङ्मयीन माहिती देशपांडे नायक विश्वनाथला देतात असे चित्रण येते. विश्वनाथचे जे कोणी स्नेही, हितचिंतक दाखविण्यात आले आहेत त्यात देशपांडे हे एक आहेत. देशपांडे हे पात्र सवदी यांनी स्वत:च्या व्यक्तित्वावरून घेतलेले दिसते.
‘रारंग ढांग’मध्ये विश्वनाथ ‘सीमा सडक संघटने’त नोकरी स्वीकारतो इथे कादंबरीची सुरुवात होते, तर त्याला नोकरीतून मुक्त करण्यात येते, इथे (अपरिहार्यतेने) शेवट होतो. ‘रारंग ढांग नंतर.’मध्ये या अनुभवावर तो शोधप्रबंध लिहून लंडनच्या ‘सँपल इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअर्स’ला पाठवतो. त्याला ‘रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअर्स’चे त्यावर्षीचे पारितोषिक मिळते. त्याचा परिणाम म्हणून ‘सीमा सडक संघटने’चे महानिदेशक मेजर जनरल चोप्रा त्याला कॅप्टनच्या हुद्दय़ावर अधिक पगारावर परत नोकरीत घेतात, इथे ‘सीक्वेल’ची सुरुवात होते. त्या कामात त्याने दाखवलेल्या नैपुण्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचा सन्मान केला जातो आणि हा प्रकल्प संपल्यावर तो त्यासंबंधी शोधनिबंध लिहायला सिद्ध होतो. ‘व्हाइस चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ यांच्या शिफारसीमुळे त्याला विशिष्ट सेवा मेडल देण्याचे मान्य होते, या नोंदीने शेवट होतो.
याचा अर्थ ‘रारंग ढांग’मध्ये विश्वनाथला केवळ प्रतिकूल परिस्थितीविरोधात लढणे आणि वरिष्ठांकडून विरोध आणि मानहानी स्वीकारणे, एवढेच होते. ‘रारंग ढांग नंतर.’मध्ये एका वरिष्ठ चीफ इंजिनीअरचा सातत्याने विरोध दिसून येतो, पण त्याचबरोबर त्याच्या बुद्धीचे, श्रमांचे, कल्पकतेचे आणि कार्यनिष्ठेचे कौतुक करणारे, त्याला उत्तेजन देणारे, त्याचे हित चिंतणारे वरिष्ठ अधिकारी, अन्य स्नेही, सहकारीही आहेत. त्यामुळे या कादंबरीत विरोधी ताण आणि त्याला छेद देणारे अनुकूल वातावरण आणि व्यक्ती यांचा सुंदर मेळ घालण्यात आला आहे.
उमा ही विश्ननाथची प्रेमिका ‘रारंग ढांग’मध्ये पेंढारकरांनी दाखवली होती. ‘सीक्वेल’मध्ये तिला जे.जे.स्कूल ऑफ आर्टची विद्यार्थिनी दाखवली आहे. तिच्या चित्रकलेतील सर्जनशीलतेची विश्वनाथच्या इंजिनीअरिंगमधील कल्पकतेशी सांगड घालून कथावस्तूच्या विस्तारात व सौंदर्यवृद्धीत सवदींनी सुंदर मेळ साधला आहे.
‘रारंग ढांग नंतर..’मध्ये मूळ अनुभवाच्या अनुषंगाने पूरक पोषक सूत्रांचा आपण कसा वापर केला आहे, यासंबंधी सवदी यांनी ‘मनोगता’त लिहिले आहे. कथानक हिमालयाच्या कुशीत घडत असल्याने तिथल्या निसर्गसौंदर्याचे वर्णन, कॉलिम्पाँग शहराच्या अवतीभवतीचे कलाविष्कार आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वविचारांचा पगडा यांची चित्रे त्यांनी काढली आहेत. प्रारंभी देण्यात आलेल्या आर्ट पेपरवरील छायाचित्रांमध्ये एक लामा करमापा यांचे असून विश्वनाथला भेटणारे डॉ. लामा आणि लामा करमापा यांच्या चित्रणातून हा ‘सीक्वेल’ वास्तवपूर्ण असल्याचा भास निर्माण करण्यात आला आहे.
‘सीक्वेल’मध्ये रारंग ढांग परिसरातील पूलदुरुस्तीतील त्रुटी, रांगपो इथल्या स्वस्तिक प्रकल्पातील नदीवरील पूल मजबूत करणे, नदीचा प्रचंड प्रवाह काबूत ठेवण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात वृक्षारोपण करणे, मेसचा खडकावरील तुटलेला खांब दुरुस्त करणे, पाण्याचा वेग आणि जोर कमी व्हावा म्हणून ठिकठिकाणी बांध बांधून घेणे, मेसच्या धुरांडय़ातून बाहेर पडणाऱ्या धुरावर नियंत्रण करणे अशी आव्हानात्मक कामे विश्वनाथ करतो. त्यासाठी एक सीई वगळता इतर सर्व लहान-मोठय़ा अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करतो आणि दुर्गम भागातील हे रस्तेदुरुस्ती/ पूल बांधण्याचे काम यशस्वीरीत्या करून दाखवतो.
एका बाजूला कथावस्तूचा असा विकास होत असताना विश्वनाथ आणि उमा यांची प्रेमकहाणी हळूहळू पुढे जाताना दिसते. एका बुद्धिमान, कल्पक, स्वतंत्र विचाराच्या इंजिनीअरचे कर्तृत्व आणि त्याच्या प्रेयसीची चित्रकर्ती म्हणून सर्जकता असा समांतर धागा लेखकाने बेमालूमपणे मिसळला आहे. याचबरोबर आर्मी इंजिनीअर आणि सिव्हील इंजिनीअर यांच्यातील विरोध, गीतातत्त्वज्ञान, बुद्धधर्मविचार यांच्यामुळे नायकाच्या मनावर होणारे अनुकूल परिणाम, बौद्ध लामाचे गूढ अनुभव, सभोवतालचा निसर्ग, हिमप्रपात, वादळे, गारांचा पाऊस, अप्रतिम सौंदर्यसंपन्न शिखरांचे मनोहारी चित्रण, सिमला, गँगटोक, कालिम्पाँग, लाचेन, रिशी इथले मानवी जीवन, कलाविष्कार यांचे सूक्ष्म तपशीलवार वर्णन यांमुळे ‘रारंग ढांग नंतर..’ ही कादबंरी अतिशय कलात्म आणि बांधेसूद झाली आहे. ठसठशीत व्यक्तिचित्रण, वास्तवपूर्ण जिवंत अनुभवाची अभिव्यक्ती, कुठेही रचनेतील कृत्रिमता जाणवू नये इतक्या ताकदीने केलेले चित्रण आणि त्यातील लेखकाची यशस्वीता यामुळे ‘रारंग ढांग नंतर.’ हा ‘रारंग ढांग’चा सीक्वेल मानदंड ठरावा या ताकदीचा उतरला आहे.
‘रारंग ढांग नंतर.. – श्रीकृष्ण सवदी, राजेंद्र प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १८७, मूल्य – १८० रुपये.

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!