अॅन फेल्डहाऊस यांनी गेली पंचेचाळीस वर्षे महाराष्ट्राच्या नद्या, धार्मिक परंपरा, लोकजीवन यांच्या अभ्यासात स्वत:ला झोकून दिले असून ‘नदी आणि स्त्रीत्व’ हे पुस्तक त्यांचे कष्ट, भ्रमंती,
महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्यांचा अभ्यास केवळ संबंधित जुने ग्रंथ वा नद्यांची माहात्म्ये, पोथ्या यांच्या आधारे सिद्ध केला नसून या सर्व नद्यांच्या कैक परिक्रमा करत त्यांनी नदीकाठ पिंजून काढले आहेत. अक्षरश: हजारो लोकांशी त्या बोलल्या आहेत. त्यातून त्यांना महाराष्ट्रातल्या नद्यांशी निगडित कथा, विधी आणि देवतांच्या माहितीचा प्रचंड खजिना सापडला. लोकमानसात या नद्यांचे स्थान देवदेवतांचे असून आपल्या जीवनात सुफलदायित्व आणि इतर ऐहिक मूल्यांची अपेक्षापूर्ती नद्यांमुळे होते अशी लोकांची श्रद्धा असते. हे लक्षात घेता हे पुस्तक धार्मिक इतिहासाच्या भक्कम पायावर उभे आहे हे लक्षात येईल.
या पुस्तकाच्या प्रकरणांची विभागणी सुभग आहे. विषयाची प्रचंड व्याप्ती लक्षात घेता प्रकरणांचे नियोजन अतिशय काटेकोरपणे करणे आवश्यक होते आणि तसे ते झाले आहे. हेच परिशिष्टांबद्दलही म्हणता येईल. ‘पर्वत, नद्या आणि शंकर’, ‘नद्यांचे स्त्रीत्व’, ‘विपुलता’, ‘अर्निबध निसर्गसंपदा’, ‘पुत्रसंतती आणि पुत्रशोक’, ‘पाप, आपत्ती आणि दुर्भिक्ष’ ही प्रकरणांची नावे विषयाची व्याप्ती आणि मर्यादा तर सूचित करतातच, परंतु लेखिकेचा धर्माभ्यास हा प्रांत आणि लोकतत्त्वीय दृष्टिकोनाकडेही अंगुलीनिर्देश करतात. महाराष्ट्रातील बहुतांश मुख्य नद्यांबद्दल जी ग्रंथरचना झाली तिचा उल्लेख लेखिका ‘माहात्म्य कथा’ असा करते. पहिल्या प्रकरणात (‘पर्वत, नद्या आणि शंकर’) त्या त्या नदीच्या माहात्म्य कथांत, नदीच्या उगमाजवळच्या धार्मिक स्थापत्यात आणि नदीकाठच्या क्षेत्रांवर केल्या जाणाऱ्या लोकधर्म विधींत अशा तीन वेगवेगळ्या आविष्कारात नद्या, पर्वत आणि शिवमहेश्वर यांना कसे एकत्र आणले आहे हे लेखिकेने सप्रमाण व सोदाहरण दाखवून दिले आहे. या तिन्ही घटकांतली क्रमनिश्चिती महत्त्वाची नसून समांतरत्व महत्त्वाचे आहे, असे लेखिकेला वाटते.
त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीवरचा गोदावरीचा उगम, महाबळेश्वरचा कृष्णेचा आणि भीमाशंकरचा भीमेचा उगम यांच्या चिकित्सेमध्ये जे उपरोक्त समांतरत्व लेखिका दाखवून देते ते चकित करणारे आहे. प्रत्येक ठिकाणी एक पर्वत, एक नदी आणि एक शंकर आहेच, असेच का? या प्रश्नाचे उत्तर मात्र लेखिका स्वत: न देता सॉन्थायमरचे शब्द उद्धृत करते. ते असे- ‘लोकधर्म स्वत:चे स्पष्टीकरण देत नाही.’ एका नदीचे पाणी लांबवरच्या देवाला अनवाणी पायाने नेऊन टाकणे अशा पंधरा-वीस उदाहणांची चर्चा केल्यानंतर असे का? हा प्रश्न लेखिकेने स्वत:च उपस्थित केला असून तिचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे.
‘नद्यांचे स्त्रीत्व’ या दुसऱ्या प्रकरणात माहात्म्य कथा तसेच मौखिक कथने, मूर्तीशास्त्र आणि धार्मिक आचारविधी यांच्या आधारे नद्यांच्या स्त्रीत्वाचा मागोवा घेतला आहे.
इथे एक गंमत नोंदविली पाहिजे. संपूर्ण भारतात नद्या या स्त्रीरूपात आहेत. (अपवाद : ब्रह्मपुत्र, सिंधू) लेखिका अमेरिकन असल्याने तिला तिच्या भाषेत, अमेरिकेत वापरला जाणारा ‘म्हातारा नदी’ (ओल्ड मॅन रिवर) हा शब्द -प्रयोग विरोध न्यासातून आणि गमतीने आठवतो.
महाराष्ट्रातील नद्या सुहासिनी असल्या तरी त्यांचा पती कोण? समुद्र? तो तर महाराष्ट्रातल्या पठारापासून फार दूर आहे. म्हणून तो त्यांचा पती होऊ शकत नाही. कैलास पर्वतही दूर आहे. त्यामुळे शंकर हा पती होऊ शकत नाही. लेखिकेने म्हटले आहे- ‘महाराष्ट्रातल्या नद्या आणि नदीदेवता यांच्या बाबतीत नवरा प्रत्यक्ष दाखवता येत नसला तरी गृहीत धरलेला असतो. तो नेमका कोण हे कोणालाच माहीत नसते आणि त्याच्या अस्तित्वाबद्दल फारशी फिकीरही कोणाला वाटत नाही.’
तिसऱ्या प्रकरणात अन्न, संपत्ती आणि मुबलक कृषी उत्पन्न यांच्याविषयीच्या माहात्म्य कथा आणि काही नदीदेवतांच्या उपासनेत प्रामुख्याने या आशयसूत्रांची येणारी वर्णने यांची सांगड घातली आहे. नद्यांचे सख्य लक्ष्मीशी आहे. लक्ष्मी म्हणजे भरभराटीचे, समृद्धीचे मूíतमंत रूप. वैभव, सुख, साम्राज्य, सौंदर्य, सौभाग्य आणि एकंदरच ऐहिक मूल्ये यांची लक्ष्मी ही देवता आहे. ऐहिक मूल्यांमधले सगळ्यात पायाभूत मूल्य म्हणजे अमाप पिकणारी शेती. धान्याने ओसंडणारे शेत शिवारे, शेतमळ्यांचे भरघोस उत्पन्न ही लक्ष्मी प्रदान करण्यामध्ये नद्यांचा मोलाचा वाटा आहे. नद्या हा अन्नधान्यांचा मूळ महत्त्वाचा स्रोत असल्यामुळे अन्नदानाच्या धार्मिक विधींसाठी नदीकाठच योग्य ठरतात.
नद्यांशी निगडित असलेली स्त्रीगुणी प्रतिमासृष्टी समजून घ्यायला नद्या आणि अन्न यांच्यातला संबंध आणखी हातभार लावतो. नदी ही जनसामान्यांची माता आहे. ‘जननी’ नसली तरी ती त्यांचे संगोपन करते आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या अन्नाची ती तरतूद करते म्हणून ती लोकमाता. नद्यांना आई मानण्यामध्ये जननकारणांपेक्षा काठांवरच्या माणसांचे भरणपोषण हे महत्त्वाचे ठरते.
‘अर्निबध निसर्गसंपदा’ या चौथ्या प्रकरणामध्ये लेखिकेने सृष्टीची वन्य बाजू ही पूरक आशयसूत्र म्हणून विचारात घेतली आहे. याच प्रकरणात महाराष्ट्रातल्या दंडकारण्यात रामायण आणि महाभारताच्या नायकांनी भोगलेल्या वनवासाची मनोज्ञचर्चा घडवली आहे. महाराष्ट्रातल्या मौखिक कथांची सुरुवात बहुतेक वेळा ‘इथे दंडकारण्य होतं’ या शब्दांनी होते आणि ब्राह्मणी धार्मिक विधींची सुरुवात ‘दंडकारण्य देशे’ हे शब्द उच्चारून होते. गोदावरी माहात्म्य पयोष्णी आणि नर्मदा या दोन नद्यांच्या माहात्म्यातदेखील गोदावरीचा उल्लेख दंडकारण्याची नदी म्हणून येतो.
नाशिकबद्दल विशेषत्वाने लेखिकेने लिहिले आहे. नाशिकजवळील पंचवटी आणि तपोवन या ठिकाणी राम, लक्ष्मण आणि सीता वनवासातील जास्तीत जास्त काळ होते असे समजतात. नाशिकचे नावही, लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक याच ठिकाणी कापले, म्हणून पडले आहे हे सांगताना लेखिका तपोवनातल्या एका देवळात शूर्पणखेची भव्य मूर्ती असल्याचा पुरावा देते. पांडवांच्या वनवासानंतरचे अज्ञातवासाचे वर्ष ज्या विराटनगरीत काढले ती ‘वाई’ (जि. सातारा) होती म्हणे!
या नायकांनी दख्खनच्या भूभागाची अनेक प्रकारे फेररचना केली. त्याचा एक प्रकार म्हणजे त्यांनी केलेली नद्यांची निर्मिती. इथे वनवासात असताना पांडवांनी कऱ्हा नदी निर्माण केली. कारण त्यांना तिचे पाणी एका यज्ञासाठी हवे होते. महाकाव्यातल्या नायकांच्या वनवासाशी नद्यांच्या निर्मितीची सांगड घातली जाते तेव्हा वाहत्या नद्या हे अरण्याचे अविभाज्य अंग आहे हे त्यातून दाखवायचे असते.
नदी ही भयकारीदेखील असू शकते हा पैलू पाचव्या प्रकरणात येतो. दोन नदीदेवतांच्या उपासनांचे केंद्रवर्ती घटक आणि मुलाचा जन्म आणि त्याच्या मरणाची धास्ती या विषयीची एक माहात्म्य कथा यांच्यात किती प्रकारे समांतरत्व आहे याचा उलगडा या प्रकरणात लेखिकेने केला आहे. राजा हरिश्चंद्र आणि त्याचा मुलगा रोहित यांची कारुण्यमय कथा या प्रकरणात लेखिका विस्ताराने सांगते. हरिश्चंद्राची गोष्ट गोदावरी माहात्म्यात येते. कारण पुत्रप्राप्तीसाठी तरसत असलेल्या हरिश्चंद्राला गोदावरीकाठी पूजा केल्याने पुत्रप्राप्ती होते. पाचव्या प्रकरणाचे नावच ‘मुळी, पुत्रसंतती आणि पुत्रशोक’ असे आहे. माहात्म्य कथा, नद्यांच्या लोकदेवतांची (नवस बोलणे, इ.) उपासना परंपरा आणि सात आसरांच्या उपासना परंपरा या नद्यांशी संबंधित असणाऱ्या त्रिवीध सामग्रीच्या आधारे हा विषय लेखिकेने या प्रकरणात मांडला आहे.
महाराष्ट्रातील नद्यांची पापमोचन क्षमता असा काहीसा विषय शेवटच्या म्हणजे सातव्या प्रकरणाचा आहे. कथात्मकतेच्या आणि रंजकतेच्या दृष्टीने हे प्रकरण सर्वात श्रेष्ठ उतरले आहे. पौराणिक साहित्याला चांगले कथानक सांगण्यात विशेष रुची असल्यामुळे नदी माहात्म्यांचा भर, नद्यांच्या पापनाशन क्षमतेपेक्षासुद्धा ती पापे रंगवून सांगण्याकडे अधिक असतो.
यातील परिशिष्टे अत्यंत मौलिक अशा संदर्भानीयुक्त आहेत. मात्र चौथ्या क्रमांकाच्या परिशिष्टातली एक गोष्ट खटकते. ते मराठी अकार विल्हे असण्याऐवजी अल्फाबेटीकल आहे. बाकी निदरेष, परिपूर्ण आणि नितांत सुंदर असे हे पुस्तक संग्रही ठेवावे असेच आहे.
‘नदी आणि स्त्रीत्व’ – अॅन फेल्डहाऊस, मराठी अनुवाद- विजया देव, पद्मगंधा प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – ४१६, मूल्य – ४५० रुपये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा