जगाशी पहिली ओळख होते ती दाणा घेऊन भुर्रकन उडून जाणाऱ्या चिऊताईमुळे.. अशा चिऊताईशी साधलेला हा जिवाभावाचा संवाद-

आमच्या घरासमोर एक खूप मोठ्ठे पिंपळाचे झाड आहे. त्याला छानसा पार बांधलेला आहे. आसपासची माणसे पारावर बसून शिळोप्याच्या गप्पा मारत असतात. पण दुपारी चिमण्यांची शाळाच भरते. असा काही चिवचिवाट करतात काही विचारू नका. एके दिवशी मी अंगणात उभे राहून त्यांना साद घातली. विचारलं, का गं असा चिवचिवाट करताय? कशासाठी एवढा कलकलाट? सांगा तरी मला. तुमचा धिटुकलेपणा अलीकडे वाढतच चाललाय. पूर्वी कशा शहाण्यासारख्या वागायच्या तुम्ही. आई, आजी ओसरीवर तांदूळ निवडायच्या. जवळच आम्ही दुपट्टय़ावर पडून असायचो. आई म्हणायची, चिमण्यांनो या गं बायांनो. माझ्या मैनेशी खेळायला या. आई तांदळाचे दाणे समोर टाकायची, तुम्ही भुर्र्कन येऊन निमूट दाणे टिपायच्या अन् खुदकन हसून भुर्र उडायच्या. उन्हाच्या वेळी परसदारी आडाजवळ साठलेल्या पाण्यात चोची बुडवून तुम्हीच ना पाणी प्यायच्या. कशा गुपचूप पाणी प्यायच्या अन् पुन्हा भुर्रऽऽऽ आई झोपलेली असायची ना, तुम्ही म्हणायच्या, ‘मोठय़ा माणसाला विसावा हवा.’

दूर जाऊन खेळ खेळूया नवा!

lp57असं म्हणून पळायच्या तुम्ही थेट विजेच्या तारेवर हिंदोळे घेत गाणी गायच्या तुम्ही. तीसुद्धा हलक्या आवाजात. आठवतं सारं मला. मग आजच का गं अशा कलकलाट करताय. कायऽऽऽ? स्त्रीमुक्तीच्या पुरस्कर्त्यां झालात? अच्छा हा तुमचा जुना आवाज नाही तर. हा चिवचिवाट नसून लिबलिबाट आहे तर. ही काय नवी बला..? तुमचे चिमणे अरेरावी करतात? दाणे वेचून आणा आणि बाळांना भरवा म्हणतात. काय बाई तरी ऐकावं ते नवलच. तुमचं चिमणी पण मानत नाही तुम्ही? मग काय हक्कासाठी हा चिवचिवाट होय. मग त्यासाठी इतका ओरडा कशाला गं? ठाऊक आहे ते साऱ्यांना. तुम्ही वडापिंपळावर घरटी बांधलीत तरी आम्ही तुम्हाला वडपिंपळ म्हणणार थोडेच? तुम्ही आमच्या मैत्रिणी व ते वडपिंपळ! चिमणा तुमच्याशी भांडला तरी तो तुमचाच. बाळासाठी घरटं बांधलं कुणी? एकटय़ा तुम्ही की दोघांनी? काडय़ा, पिसं जमवून आणली चिमणरावांनी. तुम्ही घरटं बांधलं. बाळं पण दोघांचीच ना? बाळांना जीव लावला, त्यांना जोजवलं, दोघांनीच ना गं? दाणे वेचले, घरटी बांधली, तुम्ही दोघांनीच ना गं? म्हणून सांगते, अशा भांडू नका. आपल्या जिवलगाशी. दोघांची पण प्रीत असू दे पिलांपाशी.

चिमणा-चिमणी-चिमणबाळ.

डोक्यात वेड

घेऊ नका फार काळ.

आपलं चिमणीपण त्यातच आहे.

चिवचिवाट करू नका, हक्काचे झेंडे उभारू नका. ऐका माझं, माझ्या बालमैत्रिणींनो ऐका गं. ज्याचं त्याचं स्थान असतं. त्याचं त्याला ते शोभून दिसतं. देवाजीचं वरदान असतं. त्यातच आपला गौरव असतो. आपली जागा सोडू नका. दुसऱ्यावर मात करू नका. त्यातच तुमचा गौरव आहे. गौरवशाली उज्ज्वल काळ आहे.

Story img Loader