साप्ताहिक ‘मनोहर’मध्ये ५० वर्षांपूर्वी- नोव्हेंबर आणि डिसेंबर १९६३ च्या अंकात ‘आजकालच्या मराठी वाङ्मयावर ‘क्ष’-किरण’ या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यानं त्यावेळी महाराष्ट्राच्या साहित्यिक वर्तुळात मोठीच खळबळ उडवून दिली होती. त्या लेखाचे कर्तेधर्ते अशोक शहाणे यांनी त्या लेखाच्या पन्नाशीनिमित्ताने आजचं मराठी साहित्य आणि एकूणच साहित्यव्यवहार याबद्दल व्यक्त केलेली रोखठोक मतं..त्याकाळी आम्ही असं म्हणायचो की, कुठल्याही पुस्तकाचं परीक्षण ते पुस्तक प्रकाशित झाल्यावर २५ वर्षांनी लिहावं.. म्हणजे ते २५ र्वष टिकलं तरच लिहावं लागेल. तसा दंडकच हवा!
पन्नास वर्षांपूर्वी मी लिहिलेल्या लेखाचं मूळ शीर्षक ‘आजकालच्या मराठी वाङ्मयावर ‘क्ष’-किरण’ असं नव्हतंच. ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’तर्फे पुण्यात ‘लिटरेचर अँड कमिटमेंट’ या विषयावर एक परिसंवाद झाला होता. त्यासाठी तो लेख लिहिला होता. त्यावेळी ‘कमिटमेंट’ या शब्दाला डावा अर्थ होता. तो मराठीला लावला तर काय दिसतं, काय नाही- असा एक प्रश्न होता. त्यातनं बाकी काही झालं असेल-नसेल, ते असू द्या. तोवर माणसं काहीतरी विचित्र शब्द वापरायची. त्याच्याऐवजी ‘बांधीलकी’ शब्द मराठीत रूढ झाला. हे एक माझं योगदान. काही नाही, तर निदान हा एक शब्द तरी. तो लेख मराठीत अनुवादित केला. त्यावेळी पुण्यात ‘मनोहर’ साप्ताहिक होतं. त्यांना तो दिला अन् त्यांनी तो छापला. त्यांनीच ‘आजकालच्या मराठी वाङ्मयावर ‘क्ष’- किरण’ असं लेखाला नाव दिलं.
या लेखाचा पहिला- म्हणजे जो तात्त्विक भाग आहे, तो मी लिहिलेला आहे. मराठी साहित्याच्या संदर्भातला भाग मी आणि नेमाडय़ांनी मिळून लिहिलेला आहे. त्यातलं माझं किती आणि नेमाडय़ांचं किती, असं नाही सांगता येणार. नेमाडे साहित्याचाच विद्यार्थी असल्यामुळे त्याला सगळी माहिती होती. त्यामुळे ते र्अधमरुध नेमाडय़ांचंच आहे. नेमाडय़ांचं असं म्हणणं होतं की, २५-३० वर्षांनी मराठी साहित्याचा आढावा घेतला गेला पाहिजे. त्यातून आपल्याला काय झालं, काय नाही, याचा एक पत्ता लागतो. आता ५० वर्षे झालीत- म्हणजे आत्तापर्यंत किमान दोन आढावे घेतले जायला पाहिजे होते. ते घेतले गेलेत की नाहीत, मला माहीत नाही.
मी ज्यावेळेला लिहिलं तेव्हा मासिकं जोरात होती. ‘सत्यकथा’, ‘वसंत’, ‘वाङ्मयशोभा’, ‘हंस’.. भरपूर मासिकं होती. त्यांचं जागेचं जे काय गणित असेल, हिशेब असेल, त्याप्रमाणे दर अंकात तीन-चार गोष्टी, लघुकथा हव्या असत. त्यामुळे त्यावेळेला लघुकथा लिहिणाऱ्यांचं पेव फुटलं. गेल्या ५० वर्षांत ही सगळी मासिकं बंद झाली. आता त्या मासिकांचं काम दैनिकांच्या रविवार पुरवण्यांवर येऊन पडलंय. त्यातून काय मिळणार? त्यातून काही होण्याची शक्यता नाही.
मी लिहिलं तेव्हा मराठी भाषा टिकते की नाही अशी परिस्थिती नव्हती. दरम्यानच्या काळात आई-बापांची निदान एक पिढी- ज्यांच्या पोरांना मराठी बोलता येतं, पण लिहिता अन् वाचता येत नाही अशी- तयार झाली. मराठीच्या वापराचं क्षेत्र कमी कमी होत चाललं आहे, किंवा ते बोलाचालीच्या पातळीवर राहिलं आहे; लिहिण्याच्या पातळीवर आलेलं नाही- असा प्रकार दरम्यानच्या काळात घडला आहे.
पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागाच्या प्राध्यापक (आता निवृत्त) नीती बडवे यांनी अमेरिकेतील मराठी माणसांच्या मुलांना मराठी शिकवता यावे यासाठी ‘मराठी अॅज अ सेकंड लँग्वेज’ या नावाने दोन खंड काढले आहेत. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘या पुस्तकाचं तुमचं नाव चुकलेलं आहे. ते ‘मदरटंग अॅज अ फॉरेन लँग्वेज’ असं पाहिजे. मराठीचं शिक्षण इंग्रजीतून द्यायचा हा द्राविडी प्राणायाम करायची गरज भासावी, हे म्हणजे फारच झालं.
दुसरं, मराठीला मातृभाषा का म्हणतात? तिच्यावर बाप दावा सांगत नाही. भाषा ही आईकडून शिकली जाते. मुलाचं आईशी जितकं नातं असतं, तितकं कुणाशीच असत नाही. आईशी तुमची नाळ चिकटलेली असते. आमची असं म्हणायची पद्धत होती की, ‘बापाशी आपलं थेट नातं असत नाही. बापाशी आपलं नातं असतं ते आईकडून.’ ते खरं आहे. तसंच भाषेच्या बाबतीतही आहे.
या लोकांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही. मुलांना शिकण्याचा हक्क असतो म्हणजे त्याला समजणाऱ्या भाषेत शिकण्याचा हक्क आहे. म्हणजे त्याला मातृभाषेतून शिकण्याचा हक्क आहे. तो तुम्ही डावलू नाही शकत.
आता सरकार मराठी शाळांना परवानगीच देत नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं आता जाहीर करावं की, त्यावेळी भाषिक राज्याची मागणी केली ते आमचं चुकलंच. त्याची जरूर नव्हती. कुणीतरी हडसून-खडसून सरकारला जाब विचारायला पाहिजे की- ‘जाहीरपणे तुम्ही लोकांची माफी मागा. आम्ही मागणी केली ती चुकीची होती.’ त्यांची हिंमत असेल तर त्यांनी लोकांच्या समोर येऊन हे सांगावं.
म्हणजे हलके हलके मराठीच्या वापराचं क्षेत्रच कमी करायचं.. निकालात काढायचं. साहित्य संमेलनं या अगदीच बेकार गोष्टी. त्यातनं काही होत नाही. ‘क्ष-किरण’ लिहिला त्यावेळेला एखाद्या लेखकाबद्दल अगदी वाईट बोलायचं झालं तर आम्ही म्हणायचो, ‘हा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याच्या लायकीचा आहे.’ म्हणजे साहित्य संमेलनाला त्याही वेळेला किंमत नव्हती. आता तर आणखीनच कमी झाली आहे. आता तर कुणीही उठतं आणि साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतं. त्यावेळी जरा नावं असलेले लोक तरी व्हायचे. आता तर नाव असलेले कुणी लोकच राहिलेले नाहीत.
दरम्यान, संगणक आला. तुमची भाषा उखडून टाकायला टेक्नॉलॉजी कामी येऊ शकते. तसं मराठीचं झालं आहे. सी-डॅकवाल्यांनी मराठीची वाट लावली.. सगळय़ाच भारतीय भाषांची वाट लावली. त्यांनी प्रत्येक अक्षराला एक कोड दिला. ही कोड सिस्टीम त्यांनी १९८३ साली अमलात आणली. आणि त्याला ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड’चं सर्टिफिकेट आहे. या कोड सिस्टीममध्ये तीन वर्षांनी त्यांनी पुन्हा सुधारणा केली. असं करणारा भारताशिवाय जगात दुसरा देश नाही. त्याचा अर्थ असा होतो की, आधीच्या कोडमध्ये केलेलं सगळं काम वाया गेलं. आता जे कोड आहेत, त्यातले तीन कोड जास्तीचे आहेत. म्हणजे ते असायची जरूर नाही. असे कोड देणं हेसुद्धा जगातल्या दुसऱ्या कुठल्याही भाषेत नाही. हे भारतातच आहे फक्त. याकरता विजय भटकर वगैरे मंडळी जबाबदार आहेत.  
थोडक्यात, मी ‘क्ष-किरण’ लिहिलं तेव्हा अशा सगळ्या भानगडी नव्हत्या. मराठी भाषेच्या भवितव्याचीच शंका यावी अशी परिस्थिती ५० वर्षांपूर्वी नव्हती. पण आता एक पिढी वा दोन पिढय़ा अशा तयार झाल्यात, की ज्यांना मराठी बोलता येतं, पण लिहिता येत नाही. त्यांची एक खानेसुमारी केली पाहिजे आणि त्यांचं प्रमाण किती पडतं, ते मोजायला पाहिजे. मातृभाषेबद्दल निरक्षर लोक किती? ही परिस्थिती निर्माण झालीय. ती कुणी केली? याचा खुलासा व्हायला पाहिजे.
आता गंमत अशी की, भाषेबद्दलची तुमची समजच कमी असेल तर असंच होणार. सूर्य उगवतो त्या दिशेला ‘पूर्व’च का म्हणायचं? ‘पूर्व’पासून मराठीत ‘पूर्वी’ असा एक शब्द बनतो. त्याला वेगळाच अर्थ असतो. आता ‘पश्चिम’ असा एक शब्द आहे. असाच ‘शेजारी’ हा शब्द आहे. त्याला आपण एकदम अंथरूणावरच आणून ठेवतो. यातून मराठी माणसांचा दृष्टिकोन सिद्ध होतो. असं प्रत्येक भाषेत असतं. हे आपसूकच आपल्याला फुकट मिळालं. हजार पिढय़ांचं काही ना काही योगदान असतं. त्यातून भाषा बनते. भाषेबरोबर त्यांत गुंतलेल्या हजार कल्पना असतात. आणि ती भाषा नंतरच्यांना फुकट मिळते. तुम्हाला त्याची जाण नसेल, तुम्हाला समजच नसेल तर तुम्ही मूर्ख आहात. अडाणीपणामुळे तुम्ही अडाणीच राहू शकता.
इतर कुठल्याही गोष्टीप्रमाणे भाषा जेवढी वापरावी तेवढी ती लखलखीत राहते. त्यामुळे ती वापरायचं क्षेत्र वाढवायला पाहिजे. मराठी साहित्यिकांना भाषेची समजच नाही. भाषा कशाशी खातात, हे त्यांना माहीत नाही. अशीच माणसं भरपूर झाली आहेत. बुद्धीचं हे दारिद्रय़ घालवणं अवघड आहे. अडाणी माणसाचं काही करता येत नाही.
नाटक-सिनेमात जसं असतं.. एक बालगंधर्व होऊन गेले. मधल्या काळात तेवढय़ा ताकदीचा माणूस नसेल झाला, तरी नावं होत राहतात. कारण नाटकाला जाण्याची परंपरा चालू राहते. मग कुणीतरी मोठा माणूससुद्धा त्यातून निपजतो. तसं मधली माणसं लिहीत जातात. दुसरी माणसं वाचत जातात. लिहिण्या-वाचनाची परंपरा चालू राहिली तर कुणीतरी बरा माणूस निघू शकतो. दरम्यान, ‘ऑल्सो रॅन’सारखी माणसं लिहीत जातात. वाचत राहतात. त्यातून चुकून भयंकर मोठा माणूस निर्माण होईल की नाही, हे सांगता येत नाही.
सगळी माणसं स्वत:ची गरज म्हणून लिहितात. लिहायला पाहिजे अशी सक्ती नाही तरी तो लिहीत राहतो. त्याचा अर्थ असा झाला- जो कुणी लिहितो तो आपल्या आंतरिक तगाद्यामुळे लिहितो. त्यामुळे त्यानं लिहिलेलं सर्वोत्तम असतं. उदा. मंगेश पाडगांवकर. पाडगांवकरांनी कविता चांगल्याच लिहिल्या यात काही वाद नाही. पण चांगल्या म्हणजे पाडगांवकरांच्या चांगल्या. त्या मला चांगल्या वाटतील असं नाही. वाचकाचं मत वेगळं असू शकतं. त्याला ती मुभा आहे. म्हणजे एक प्रकारे लिहिणारा लिहून चुकतो. आपल्याकडे म्हणायची पद्धत आहे- ते होऊन गेलं. म्हणजे होऊन चुकलं. तसं वाचकाचं असत नाही. वाचक मोकळा असतो. लेखक होऊन चुकतो. तसे लिहून चुकणारे लेखक भरपूर असतात. मराठीत लिहून चुकणाऱ्या लेखकांची संख्या जास्त आहे.
मराठीपणाची मुळं शिवाजी महाराजांपेक्षा तुकारामामध्ये जास्त आहेत. म्हणून दिलीप चित्रे यांनी तुकारामाच्या कविता अनुवादित केल्या. अरुण कोलटकरने तुकारामाचे अभंग आतनं रिचवून ‘चिरीमिरी’ लिहिलं. म्हणायचं झालं तर असं म्हणता येऊ शकतं की, आपली सगळी मुळं भाषेसकट तुकारामामध्ये आढळतात. पण हे बाकीचे लोक मानत नाहीत. सर्वानाच आपलं मोठं शक्तिस्थान तुकाराम आहे असं वाटायला पाहिजे. पण असं काही वाटत नाही. राजकारणातील जी मंडळी आहेत त्यांनी इतिहासातला दुसरा एक राजकारणी माणूस शोधला. तो म्हणजे शिवाजी.. आणि त्याचा उदो उदो केला. त्यांचंही चूक आहे अशातला भाग नाही. पण तो उभा केला की त्याच्याविरुद्ध कोणीतरी शत्रू लागतो. तुकाराम घेतला तर त्याच्याविरुद्ध शत्रू लागत नाही. ‘आमचा स्वदेश भुवन तयामध्ये वास’ असं म्हणणारा हा माणूस. त्याचं कुणाशी शत्रुत्व नाही. आता तो वाचणाऱ्यांच्या लक्षात येणं.. वाचणारे लोक तेवढेच तरल असणं, हा प्रकार मराठीत नाहीसाच होत चाललेला आहे. त्याला काही इलाज नाही. आता तर अगदी दयनीय परिस्थिती आहे. संगणकाची भाषा कवितेमध्ये वापरली की आपण काहीतरी प्रागतिक आणि आधुनिक लिहितोय असं समजणं गैर आहे. यातनं काही होत नाही. कविता लिहिण्याची किंवा कवितेची काम करण्याची पातळी तुम्ही शोधून काढली पाहिजे. त्यात संगणक कुणीच नव्हे. संगणकामुळे काय होत असेल, त्याचा कवितेच्या पातळीवर विचार व्हायला पाहिजे. तसे विचार करणारे लोक आज नाहीत.
कादंबरी लिहिणारा कादंबरीकार. लघुकथा लिहिणारा लघुकथाकार. निबंध लिहिणारा निबंधकार. तसा कवी नाही. कवीचं जे असलेपण आहे ती कविता. ‘कवी’पासून भाववाचक नाम बनवलं की ‘कविता’ होते. त्यानं कविता लिहायला पाहिजे असं नाही. त्याचं असणं आहे, तेच कविता आहे.  
आम्ही गंमत म्हणून म्हणायचो- मराठीत ३०० र्वष गेल्याशिवाय कुणी कवी मोठा होत नाही. ज्ञानेश्वरांनंतर ३०० वर्षांनी तुकाराम झाला. आता मराठीत चांगला कवी होऊ शकतो. आता तो कोण, हे माहीत नाही. मर्ढेकर कदाचित असतील. पण मर्ढेकर आत्ताच होऊन गेल्यामुळे आपल्याला कुणाला चान्स नाही. मराठीत ३०० वर्षांशिवाय काहीच होत नाही. फक्त लिहिण्याची परंपरा चालू राहते.
कविता लिहिणारे नेहमीच जास्त असतात. एक म्हणजे ती थोडक्यात लिहून होते. दुसरं म्हणजे तुमचा वकूब असेल त्याप्रमाणे तुम्ही जास्त अर्थ काढणारं लिहू शकता. भवभूतीचा कवीचा जाहीरनामा आहे- ‘काळ निरवधी आहे आणि पृथ्वी विपुल आहे. माझा कोणीतरी समानधर्मा पुढे निपजेल. त्याला मी काय लिहितोय, कळेल.’ म्हणजे वाचक समानधर्मा असावा लागतो. आणि त्याच्यासाठी कवीची निरवधी काळ थांबायची तयारी असावी लागते.
माणूस आहे तोपर्यंत त्याचं काहीच खरं नाही. तो टिकेल- न टिकेल हे सांगता येत नाही. कवी लिहून मरून जाईपर्यंत त्यांनं काय लिहिलंय, हे कळणं अवघड आहे. आता मरून गेलेल्या कवींची यादी करायची आणि त्यांनी काय लक्षात ठेवण्याजोगं लिहिलंय, असं म्हणायचं झालं तर पंचाईत आहे ना? त्यामुळे आता कुणाचंही नाव घेण्यात अर्थ नाही. मरून जाऊ दे, मघ बघू या. एकेकाळी पु. शि. रेगे मोठे कवी होते. आता त्यांच्या कविता किती लोक वाचत असतील, मला शंका आहे. मर्ढेकरांच्या वाचतील. मर्ढेकर-बालकवी राहिले. दोन अगदी भिन्न टोकाची ही माणसं. ती राहिली. हा प्रकार कशामुळे होतो, हे सांगता येत नाही. आता तुकाराम ३०० वर्षांपूर्वी होऊन गेला तरी आपण त्याचं वाचतो.. हा चमत्कार आहे! तुकारामाच्या वेळची परिस्थिती काय अन् आजची परिस्थिती काय! आपण खरं म्हणजे तुकाराम वाचूच नये ना!! कशाकरता वाचतो? पण तुकारामाचं आपल्याला काहीतरी लागू पडतं अजून. हे जे काही शतकं ओलांडून लागू पडणं असतं, ती ताकद कवितेत असते. कुणी एखादा जाणकार वाचक निघाला की तुकारामाची कविता ताबडतोब समकालीन होते. त्याला ती भिडली की जिवंत होते. त्यात जीव ओतायचं काम वाचक करत असतो नेहमी. आता हे वाचकाचं काम असेल, तर त्याला तेवढी जाण पाहिजे. ही गोष्ट काही बाजारात मिळत नाही. ती असेल तिथे असते, नसेल तिथे नसते.
आपण रोज सवयीने अंघोळ करतो, कपडे घालतो, बाहेर पडतो, तसंच सवयीने लिहिलं जातं, वाचलं जातं. त्याचं वैशिष्टय़, मोठेपण सांगणारा माणूस येईल तेव्हा येईल. तसा माणूस नेहमी असेलच असं नाही. सिनेमा काढणारी माणसं गेली १०० र्वष सिनेमे काढतच आहेत. पण मधेच एक सत्यजित राय होऊन गेले. दरम्यानचं सिनेमा काढणं वाया गेलं का? सिनेमा काढणं हीसुद्धा एक करण्याजोगी अॅक्टिव्हिटी आहे, एवढय़ापुरतं ते चालू राहतं. तसं मराठी साहित्याचं आहे. रोज उठून लिहिणारी माणसं असतात, त्यांचा काही उपयोग असतो. त्यांच्यामुळे निदान लिहिण्याची प्रक्रिया चालू राहते.
नावं होणं, पुस्तकाच्या प्रती खपणं, हे होऊ  शकते. तो व्यवहाराचा भाग आहे. ते खरं नव्हे. काय खपतं किंवा काय वाचलं जातं, यावरून काही ठरत नाही. नेमाडय़ाची ‘कोसला’ फारशी वाचली गेली नाही. पण म्हणून त्यावरून ती काही कमी दर्जाची ठरत नाही. काही र्वष गेल्यानंतर कोणालातरी ‘कोसला’ची आठवण होते. नेमाडे तर ही कादंबरी लिहून चुकला. त्यालाही आता पन्नास र्वष झाली. तरीही ती टिकली. ती का म्हणून टिकली?
साहित्यात दोन भाग असतात. एक- तात्कालिक आणि दुसरा- लांब पल्ल्याचा. लांब पल्ल्याच्या बळावर साहित्य टिकून राहतं. छोटय़ा भागावर साहित्य टिकून राहत नाही. अशी पुस्तकं येतात-जातात. जशी अमेरिकेत प्रसंगानुसार पुस्तकं निघतात. तो टॉपिक गरम असतो त्यावेळेला त्यांच्या लाखाने प्रती खपतील. पण नंतर कुणी त्यांचं नावही घेत नाही. सगळे विसरून जायला पाहतात. न खपणारी पुस्तकं भरपूर असतात; पण ५०-६० वर्षांनीसुद्धा चांगल्या पुस्तकाचं नाव राहतं.
मराठीतल्या आत्ताच्या लोकांची भाषेची जाण जरा वाढली असती तर बरं झालं असतं. आमच्या नेमाडय़ाच्या मनात होतं की, निवृत्त झाल्यावर निव्वळ मराठी शिकवणारी एक संस्था काढावी. पण त्याला औरंगाबादच्या सवंगडय़ांचा फार पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे ते राहिलं. मराठी लोकांना धड शिकवायला पाहिजे असं नेमाडय़ाला वाटतं. म्हणजे काय, ते मला माहीत नाही. पण आता शिकवलं जातं ते धड नाही.
‘मृत्युंजय’, ‘पानिपत’ वगैरे असलं लिहिणारी माणसं भरपूर असतात. हॉलिवूडवाले वेस्टर्न फिल्म्स काढायचे. अजूनही काढतात. त्यातील नायक रेड इंडियनच्या टोळीत अडकतो, पण त्यांचा नि:पात करून बाहेर पडतो.. या सरधोपट कथानकात बसणाऱ्या गोष्टी खूप लोक लिहितात. ‘स्वामी’ही तशीच आहे. थोरला माधवराव शेवटी नायक म्हणून उभा राहिला पाहिजे. त्याच्यावर आपत्तीमागून आपत्ती कोसळतील आणि त्यांतून तो पार पडेल- असे साधे आडाखे असतात. त्याप्रमाणे लिहिलं जातं. आणि इतिहासकाळातल्या लोकांबद्दल लिहिणं सोपं आहे. शिवाजी महाराजांबद्दलचं बहुतेक लिखाण असंच आहे. हीरो तयार करायचा आणि त्याची पूजा करणारी माणसं उभी करायची. तसलं टिकत नाही. किंवा वाचकांचीसुद्धा तीच पातळी असेल तर टिकेलसुद्धा.. माहीत नाही. आपल्या वाचकांची काय पातळी आहे, यावर ते अवलंबून असतं.
मराठीत लिहिलं खूप जातं. पण आता साहित्य हा मराठी लोकांच्या संस्कृतीचा भाग राहिलेला नाही. लिहिणारे लोक वगळले, सगळं साहित्य वगळलं, तरी मराठी लोकांचं काही बिघडणार नाही.. अशी एक संस्कृती मराठी लोकांनी उभी करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. शिवसेना वगैरे लोकांमुळे तर उघडच! भांडारकर इन्स्टिटय़ूटची नासधूस करणारे जे लोक होते, त्यांना काही जरूर नाही कशाची. असं चालत नाही. अशानं संस्कृती वाढत नाही. ती हजार अंगांनी वाढते. हजार प्रकारचे फाटे फुटले पाहिजेत. हजार प्रकारची मतं आली पाहिजेत. ती मांडली गेली पाहिजेत. त्यातून जो गदारोळ व्हायचा तो होऊ दे. त्यातून कुठलं मत टिकायचं ते टिकू दे. त्यासाठी कुणीतरी विरोध करणारा, उलटं बोलणारा लागतो. असं सगळं असायला लागतं. तेच जर तुम्ही बंद केलंत तर तुम्ही थोर आहात! तुम्ही इथे स्वर्गच निर्माण केलात तर तुम्ही स्वर्गवासी झाल्यातच जमा! सगळी मराठी माणसं स्वर्गवासीच होऊ इच्छित असतील तर गोष्ट वेगळी! म्हणजे इथे काही होणार नाही. स्वर्गात काही होत नाही. स्वर्गातल्या लोकांचं काहीतरी व्हायचं तर त्यांना पृथ्वीवर अवतरावं लागतं. देवांनासुद्धा आपलं काही वेगळं व्हावं असं वाटत असेल तर पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. पृथ्वीवर काहीतरी वेगळं होतं. स्वर्गात एकदा जे ठरून गेलं आहे तेच चालू राहतं.

Salim Khan
“काही वर्षानंतर…”, हेलन व सलमा खान यांच्यातील नात्यावर बोलताना सलीम खान म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Manmohan Singh
असायलाच हवे मनमोहन सिंग यांचे संगमरवरी स्मारक…
ulta chashma
उलटा चष्मा: असला भुसभुशीतपणा नको!
maharashtrachi hasya jatra fame prasad khandekar writes letter
“प्रिय रसिक-मायबाप, मराठी चित्रपटसृष्टीला…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची प्रेक्षकांना भावनिक साद, म्हणाला…
Story img Loader