ऊस आंदोलनामुळे देशभर परिचित झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्य थरारक म्हणावे असे आहे. त्यांचे ‘शिवार ते संसद’ हे आत्मकथन लवकरच पद्मगंधा प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश..
मीचळवळीतून जसा दूधदराचा लढा उभा केला, त्याचबरोबर स्वाभिमानी अॅग्रो प्रोडय़ुसर्स प्रॉडक्ट्स कंपनी नावाची शेतकऱ्यांची संस्था उभी करून अमूल, गोकुळसारख्या प्रस्थापित संस्थांबरोबर स्पर्धा करत सरकारची कोणतीही मदत न घेता उत्तमपणे चालवलेली आहे. रत्नाप्पाण्णा कुंभार सहकारी पाणी पुरवठा संस्था ही आठ गावांना शेतीसाठी पाणीपुरवठा करणारी संस्था कर्जबाजारी झाल्याने भूविकास बँकेने लिलावात काढलेली होती. सहकार शताब्दी वर्षांत महाराष्ट्रातील अनेक पुढाऱ्यांनी कितीतरी सहकारी संस्था लिलावाने स्वत:च्या घशात घातलेल्या असताना मी मात्र ती संस्था लोकवर्गणी गोळा करून लिलावात घेतली व शेतकऱ्यांच्या मालकीची करून टाकली. आज ती उत्तम सहकारी संस्था म्हणून कार्यरत आहे.
मी जशी यशस्वी ऊस आंदोलने केली, तशीच द्राक्ष उत्पादक, कांदा उत्पादक, कापूस व भाज्या उत्पादकांसाठीही अनेक आंदोलने केली. संपूर्ण देशभर फिरून ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी हाक दिली, त्या त्या ठिकाणी धावून गेलो. इतर राजकारण्यांप्रमाणे मी मतदारसंघ व पक्षबंधने कधीही पाळली नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळा मित्रही शत्रू झाले, पण मी त्याची कधीच पर्वा केली नाही. एकदा पंतप्रधानांनी साखर उद्योगासंदर्भात नेमलेल्या सी. रंगराजन कमिटीसमोर शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी म्हणून मी डॉ. महावीर अक्कोळे, प्रा. जालंदर पाटील, अॅड. सतीश बोरुलकर यांच्यासह सह्य़ाद्री अतिथिगृह, मुंबई येथे गेलो होतो. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सी. रंगराजन यांना माझी ओळख करून देताना म्हणाले, ‘Meet Mr. Raju Shetty. Farmers leader. He creats a lot of problems for me.’ या विधानावर माझ्यासह सर्वजण खळखळून हसले. खरं तर शासनकर्त्यांकडून मला मिळालेली ही माझ्या कार्याची पोचपावतीच होती.
शेतकरी चळवळ चालवत असताना सामाजिक बांधीलकीकडे मी कधीच दुर्लक्ष केलं नाही. माझ्या चळवळीसोबतच इतर सामाजिक चळवळींनाही मी जमेल तेवढे बळ देत राहिलो. मग ती असंघटित कामगारांची चळवळ असो वा मोलकरणींची चळवळ असो, भंगार गोळा करणाऱ्यांची चळवळ असो वा अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ असो. अशा कोणत्याही सामाजिक चळवळीला मी माझ्या परीने सहकार्य करत आलो. यातील काहींच्या बरोबर माझे वैचारिक मतभेद होते; तरीही चळवळी टिकल्या पाहिजेत हीच माझी भूमिका होती. त्यामुळेच विधानसभेत मी आमदार असताना व खासदार झाल्यानंतरही अनेक चळवळींमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी हक्काचा माणूस वाटत राहिलो.
अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी जो लढा उभा केला, त्या लढय़ाला महाराष्ट्रातून बळ देण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले. त्यांच्या समर्थनार्थ मी स्वत: मदानात उतरलो. सांगलीला मशाल मोर्चा काढला; तर कोल्हापुरात सरकारच्या प्रतिमेचे दहन केले. अण्णांच्या आंदोलनात सक्रियपणे उतरणारा देशातील मी एकमेव खासदार होतो.
महापुरात अडकलेल्या लोकांना मदत करण्याची भूमिका असो किंवा इचलकरंजी शहरामध्ये आलेल्या काविळीच्या साथीत डॉक्टरांच्या साहाय्याने हजारो गोरगरिबांची मोफत रक्त-लघवी तपासणीची मोहीम असो, सामाजिक बांधीलकी आम्ही कधीच सोडली नाही. त्यासाठी लागणारा पसा आम्ही शेतकऱ्यांकडून गोळा करतो आणि तेही मोठय़ा विश्वासाने मला तो देतात.
एकदा मी ठरवलं की आमचा शेतकरी उसाचा पसा मिळवतो, त्या पशातून तो घर बांधतो; परंतु तो ज्या विटांपासून घर बांधतो त्या विटा तयार करणाऱ्या भट्टीवर काम करणारे मजूर हे स्थलांतरित असतात. त्यांच्यासोबत त्याचं कुटुंब आणि मुलंही असतात. त्या मुलांच्या शिक्षणाचं काय, हा मोठाच प्रश्न होता. कृष्णा नदीकाठी आज अनेक वीटभट्टय़ा आहेत. त्या मुलांसाठी आम्ही गेल्या तीन वर्षांपासून शाळा चालवत आहोत. त्यासाठी सरकारची एक रुपयाचीही मदत आम्ही घेत नाही. त्या मुलांचं कुपोषण टाळण्यासाठी त्या मुलांना दूध आणि फळांचा चौरस आहार दिला जातो. त्याचा सगळा खर्च शेतकरी देतात. त्या मुलांसाठी एक निवासी वसतिगृह सुरू करण्याच्या माझा संकल्प आहे. मला विश्वास आहे की माझं ते स्वप्न निश्चितच पूर्ण होईल.
आम्ही नेहमी निराधार लोकांना मदत करण्याची भूमिका घेतली. शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या चंद्रकांत नलावडे आणि कुंडलिक कोकाटे यांच्या कुटुंबीयांना काहीतरी मदत केली पाहिजे असे मला वाटत होते. मीही शहीद होता होता वाचलो होतो. त्यामुळे ती कल्पनाच अंगावर शहारे आणत होती. तंबाखू, कांदा, कापूस आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दुरवस्था मी पाहत होतो. माझ्या चळवळीत विश्वासाने येणाऱ्या कोणाही शेतकऱ्याचा व त्यांच्या कुटुंबीयांचा भ्रमनिरास होऊ नये असे मला वाटत होते. म्हणून या दोघांच्या कुटुंबीयांना आíथक मदत करण्यासाठी मी झोळी घेऊन फिरलो आणि शेतकऱ्यांनी मला अमाप प्रतिसाद दिला. जमलेल्या पशातून त्यांना प्रत्येकी वीस लाख रुपये प्रदान करण्यात आले. शिवाय आंदोलनात ज्यांच्या मोटरसायकलींची मोडतोड व जाळपोळ झालेली होती त्या सर्वाना नुकसानभरपाई तर दिलीच; शिवाय आंदोलनात जखमी झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यालाही पन्नास हजार रुपयांची मदत केली.
२०१२-१३ मध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात भीषण दुष्काळ पडला. या दुष्काळाची झळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही बसली. मी आणि सदाभाऊ दुष्काळी परिसर अक्षरश: िपजून काढत होतो. या वर्षांत आम्ही ५५ दुष्काळ परिषदा घेतल्या. त्याचा आमच्या प्रकृतीवरही परिणाम झाला. पण आम्ही मागे हटलो नाही. कारण त्याला भावनेची किनार होती.
पांडुरंग जाधव या माळकरी गृहस्थाने हाताचे बोट धरून ज्या राजू जाधव याला पंढरपूर ते बारामती या पदयात्रेत आणून सोडले होते तो पांडुरंग जाधव राजूची जबाबदारी माझ्यावर सोपवून कायमचा निघून गेला होता. घडले असे की, पांडुरंग जाधवने तोंडले-बोंडले या माळशिरस तालुक्यातील गावात कॅनॉलच्या शेजारी एक विहीर काढलेली होती. शासनाच्या योजनेतून त्याला विहीर मिळाली. परंतु सरकारी अनुदान मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांचे हात ओले करण्यात बराच पसा संपला. अर्धी विहीर पूर्ण करण्यासाठी पतसंस्थेचं कर्ज काढलं. विहीर पूर्ण झाली, परंतु मोटर बसवायला पसा नव्हता म्हणून खाजगी सावकार गाठला. मोठय़ा अपेक्षेने शेतात ऊस लावला. दुष्काळ पडला आणि धरणातलं पाणी संपल्याने कॅनॉल आटला. त्यामुळे विहीर आटली. उसाचं पीक डोळ्यांसमोर वाळून गेलं. उसासाठी काढलेलं पीककर्ज, पतसंस्थेचं कर्ज आणि मोटारीसाठी घेतलेलं सावकारी कर्ज भागवायचं कसं, याची चिंता पांडुरंग जाधव यांना लागली. कशीतरी तोंडमिळवणी करण्यासाठी मोठय़ा मुलाला घेऊन त्यांनी ऊसतोडणीची मजुरी करून पाहिली. पण त्यात व्याजही भागत नव्हतं. लहानगा राजू तर आठवीत शिकत होता. भोळ्या-भाबडय़ा पांडुरंगाला त्या कर्जाची इतकी चिंता लागली की त्यांनी आपली समस्या इतरांना न सांगता आतल्या आत पचवली आणि आत्महत्येचा मार्ग पत्करला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा दर मिळावा म्हणून रक्ताळलेल्या पायांनी बारामतीपर्यंत चालणारा राजू स्वत:च अनाथ झाला. खरं तर हा राजू म्हणजे आमचा सावळ्या तांडेलच होता. वर्गणी गोळा करून आम्ही एक लाख रुपये त्याच्या कुटुंबाला दिले व सर्व कर्ज भागवले. राजूला घेऊन मी सरळ जयसिंगपूरला आलो आणि त्याला सांगितलं की तुला जेवढं शिकायचं असेल तेवढं शीक. पुढची जबाबदारी माझी.
कधी कधी मनात विचार येतो.. ज्या माणसाला इयत्ता आठवीपर्यंत साधी चप्पलही मिळाली नाही, पाचवीत असताना पन्हाळा-जोतिबा या सहलीला जाण्यासाठी दहा रुपयेसुद्धा मिळाले नाहीत, तो माणूस आज वेगवेगळ्या परिसंवादांच्या निमित्ताने जगभर फिरतो आहे, पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहतो आहे. मला आजही ते दिवस आठवतात आणि त्यामुळेच भोवतीच्या मोहमयी दुनियेचे आकर्षण वाटत नाही. आजही मला सहलीसाठी न मिळालेली दहा रुपयांची ती नोट आठवते. कधीकाळी शेतकरी असताना मी बांधलेलं ते शिवारातलं माझं घर मला कधीही सोडावंसं वाटत नाही. कारण, याच घरात राहून मी माझ्या गोठय़ातल्या अनेक गाई-म्हशींची बाळंतपणं माझ्या हातांनी केली आहेत. नवजात वासरांच्या अंगावरचा तो चिकट आणि बुळबुळीत स्राव अजूनही मला हवाहवासा वाटतो. आजही म्हैस विणार आहे म्हणून रात्रभर केलेली जागरणं आठवतात. शेतात केलेले कष्ट आठवतात. उसात काम करताना उसाच्या पात्यांनी कापलेले ओठ आणि गाल आठवतात.
मी जरी यातून बाहेर पडलेलो असलो तरी आजही माझी आई, पत्नी, माझी भावंडं, त्यांची मुलं तेच कष्ट उपसत आहेत. १९९६ साली माझं लग्न झालं; पण आजअखेर खासदार होऊन पाच र्वष संपत आली तरी पत्नीबरोबर मी एकदाही बाहेर पडू शकलो नाही. आमदार होतो तेव्हा तिला मुंबई दाखवू शकलो नाही आणि आता खासदारकीची मुदत संपत आली तरी दिल्लीसुद्धा दाखवू शकलो नाही. एकदा माझा ड्रायव्हर दत्ता म्हणाला की, आऊंची विमानात बसायची इच्छा आहे. पण त्या म्हणतात की, मला कोण बसवणार बाबा? त्या बिचारीने तिची ही इच्छा माझ्याऐवजी माझ्या ड्रायव्हरजवळ व्यक्त केली, या गोष्टीने मी अंतर्मुख झालो. चळवळीच्या या वेडापायी जन्मदात्रीची एवढी साधी इच्छाही मला ओळखता आली नाही याची मला फार खंत वाटली. शेवटी तिचं वय लक्षात घेऊन मी माझी पुतणी डॉ. श्रद्धा हिला म्हणालो की, चल आपण दोघे आऊला दिल्ली दाखवून आणू. आणि मग तिच्या मुलाने काय पराक्रम केला आहे हे तिला कळावं म्हणून तिला थेट राष्ट्रपती भवनातच घेऊन गेलो. प्रणवदा तसे अर्थमंत्री असल्यापासूनच मला ओळखत होते. मी त्यांची भेट मागितली आणि आऊला त्यांच्या भेटीसाठी घेऊन गेलो. त्यांना सांगितलं की, हीच ती माझी आई, जिने अनेक खस्ता खाऊन मला घडवलं. प्रणवदांनीसुद्धा अत्यंत आपुलकीने आईला नमस्कार केला. त्या वेळी मला माझ्या आईच्या डोळ्यांमध्ये माझ्याबद्दलचा सार्थ अभिमान दिसून आला. तिच्या डोळ्यांतील अश्रू पाहून मला वाटले की, या क्षणी वडील हयात असते तर!
मी कोण होतो? कुठपर्यंत आलो? माझा प्रवास कसा झाला? हा सगळा पट निर्वकिारपणे तुमच्यासमोर उलगडला आहे. माझ्या मनात व्यवस्थेच्या विरोधातील अंगार जेव्हापासून फुलला त्या वेळी पुढे काय होणार आहे, याची पुसटशी कल्पनाही मला नव्हती. माझी जन्मवेळ आणि जन्मतारीखसुद्धा मला व माझ्या आईला आठवत नाही. त्यामुळे भविष्य बघण्याचा प्रश्नच कधी उद्भवला नाही. सीमेवर लढणाऱ्या सनिकाला फक्त शत्रूवर हल्ला करणे एवढेच माहीत असते. त्याने कधीही परिणामांचा विचार करायचा नसतो. तसंच एका एका प्रस्थापिताला अंगावर घेताना मी परिणामांचा विचार कधीच केला नाही. फक्त मनापासून लढत राहिलो. लढलो ते जीव ओतूनच. सोबत किती लोक आहेत याचा विचार केला नाही. असं म्हटलं गेलं आहे की, तुम्ही मरायच्या तयारीने लढायला उतरलात तर तुम्ही जिंकूनच परत येता. सुरुवातीला एकटा होतो, नंतर दोन-चार सवंगडी मिळाले, त्याचे पुढे एक टोळके झाले, हळूहळू गर्दी वाढली. पुढे ती वाढतच गेली. तिचा महासागर झाला. आज मी त्या महासागराचा एक िबदू आहे एवढेच.
मी महासागराचा एक बिंदू
ऊस आंदोलनामुळे देशभर परिचित झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्य थरारक म्हणावे असे आहे. त्यांचे ‘शिवार ते संसद’ हे आत्मकथन लवकरच पद्मगंधा प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे.
आणखी वाचा
First published on: 22-12-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व आगामी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upcoming marathi book