नाटय़-दूरचित्रवाणी मालिका निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते विनय आपटे यांचा आज (७ डिसेंबर रोजी) पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी जागविलेल्या त्यांच्या उत्कट आठवणी..
ख ऱ्या आयुष्यात इतक्या जवळून बघितलेला ‘फॅन्टसीतला हीरो’ म्हणजे विनयसर. आज सरांना जाऊन एक वर्ष झालं. पण अजूनही मोबाइलमधला सरांचा नंबर आणि नाव डिलिट करायला मन धजावत नाही. आयुष्यातल्या चांगल्या-वाईट कोणत्याही प्रसंगात कोणत्याही प्रहरी हक्काने हाक मारावी आणि एकमेकांसाठी धावून जावं, अशी मोजकी माणसं भेटतात आपल्याला. ती कधी, कशी, कुठे भेटावीत याला काही नियम नाही. ती आपल्या ‘जवळची’ असण्याकरता जातपात, वय, हुद्दा, स्त्री-पुरुष भेद अशी कुठलीही बंधनं नसतात. ती माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्याला कळतं, की ‘आपलं माणूस’ आलंय आपल्या आयुष्यात. तसा हा माझा खऱ्या आयुष्यात फॅन्टसीतल्या हीरोसारखा वाटणारा अ 3 ंे ऋ१्रील्ल,ि ‘आपला माणूस’ म्हणजे माझे विनयसर. ‘कबड्डी-कबड्डी’ नाटकाच्या निमित्ताने ते माझं आयुष्य भरून गेले.
खरं तर सरांची माझी पहिली भेट खूप आधीच झाली होती. करिअर करण्याची इच्छा असलेली असंख्य तरुण मुलं-मुली फार आशेनं विनयसरांना भेटायची. आणि ‘कोणतंही काम शोधण्याआधी शिक्षण पूर्ण कर,’ असा भारदस्त आवाजातला आशीर्वादपर सल्ला देऊन येणाऱ्याच्या पाठीवर सर जोरदार थाप मारायचे. पुण्यात शिक्षण चालू असताना अशीच थाप माझ्याही पाठीवर पडली होती. ‘डॅडी, आय लव्ह यू’ नाटकाच्या मध्यंतरात मी माझ्या आई-वडिलांबरोबर सरांना भेटायला आत गेले होते. ते नाटक बघून अत्यंत भारावलेले मी- मुंबईची स्वप्नं बघणारी मी.. खरंच त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे शिक्षण पूर्ण करून मुंबईत आले आणि काही वर्षांनंतर नाटकातल्या त्या ‘डॅडी’बरोबर त्यांचीच मुलगी म्हणून उभी राहिले. फार भारावलेले दिवस होते ते. विनयसरांबरोबर स्टेजवर काम करायला मिळणं ही केवळ पर्वणीच होती. सरांची स्वत:ची एक स्टाईल आहे. स्वत:चा एक तोरा आहे. त्यांचा तो सगळं स्टेज व्यापून टाकणारा भारावलेला आवाज! वरकरणी पहाडी, रांगडे, राकट विनयसर बघता बघता भाबडे, हळवे, भावुक होऊन बोलायला लागतात आणि एरवी गुर्र्र गुर्र्र करणारा हा राजा पाणावल्या डोळ्यांनी कापऱ्या आवाजात काहीतरी सांगत राहतो आणि त्यात आपण हरवून जातो.
सर- अतिशय खरा माणूस..जेन्यूईन. आणि सर खरे होते म्हणूनच ते अगदी लहान मुलांसारखे वाटायचे. आयुष्यातल्या, रोजच्या जगण्यातल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टींनी ते खूश होऊन जायचे. हॉटेलातल्या पदार्थाची चव आवडलीपासून नाटकाला उत्तम बुकिंग झालं, त्यांच्या कामाचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं, नवीन फिल्म साइन केली, त्यांचा मुलगा विहान कराटे क्लासला जाऊ लागला, पोट एक इंच कमी झालं.. कोणतंही कारण त्यांना पुरायचं आणि ते खुलून जायचे. लहान मुलांसारखे हरखून जायचे. स्वत: लहान व्हायचेच; पण आम्हालाही वय विसरायला लावायचे. लाड करावेत तर विनयसरांनी. ‘रेशनकार्डावर येणे’ ही एक खास सरांची टर्म. बहुतांश वेळा मुंबईबाहेरून आमच्या क्षेत्रात स्वत:चं नशीब कमवायला आलेली आणि कष्टांची तयारी असलेली अशी बरीच मुलं-मुली सरांच्या रेशनकार्डावर असायची. म्हणजे एकदा का एखादा माणूस आवडला, पटला, की सर आपोआप त्या माणसाची सगळी जबाबदारी घ्यायचे. त्यांच्याबरोबर वावरता वावरता आपण त्यांचे कधी झालो, हे समजायचं पण नाही. त्यातून जर तुम्ही कामात बरे असाल आणि अंमळ आगाऊ असाल तर सरांना फारच आवडायचं. मग लाडच लाड. सर म्हणजे ज्ञान, अनुभवांचं भांडार होते. नाटकाच्या तालमी, दौरे हा काळ म्हणजे आम्हा मित्रमंडळींचा सुगीचा काळ. त्या काळात सरांचा मिळालेला सहवास, त्यांच्याशी मारलेल्या गप्पा.. आम्ही सगळी सरांची पंटर मंडळी (‘कबड्डी’तले कलाकार) संपृक्त होऊन जायचो. याच नाटकाच्या वेळचा एक प्रसंग मी विसरूच शकणार नाही. ‘कबड्डी’ नाटकाचा अमेरिका दौरा ठरला आणि काहीतरी तांत्रिक गडबडीमुळे नाटकातल्या मी सोडून कोणालाच व्हिसा मिळाला नाही. आणि मी माझ्या टीमला सोडून वेगळ्याच टीमबरोबर या दौऱ्यावर गेले. प्रयोग सुरू झाले. वेगळ्या नटमंडळींबरोबर जुळवून घेताना खूप तारांबळ उडायची. आशा शेलार, सुजाता देशमुख, आनंद अलकुंटे, संजय सुगावकर आणि विनयसर यांची खूप आठवण यायची. त्यात नाटकाची अनाऊन्समेंट सरांच्या आवाजात रेकॉर्ड केलेली. ती वाजू लागली की विंगेत उभ्या असलेल्या माझे डोळे वाहू लागायचे. अशातच त्या दौऱ्यात माझ्या वाढदिवसाची तारीख आली. रविवारी प्रयोग होताच. नाटकाचा इंटरव्हल झाला आणि अमेरिकेतला एक कार्यकर्ता आला आणि म्हणाला, ‘मुक्ता, तुझ्यासाठी फोन आहे.’ मला दोन क्षण कळलंच नाही. अमेरिकेत माझ्यासाठी फोन? दौरा सुरू झाल्यापासून मी माझ्या आई-बाबांशीच फक्त दोनदा बोलू शकले होते. आणि इकडे, इतक्या लांब, कोण्या अनोळखी व्यक्तीचा फोन?.. माझ्यासाठी? मी फोन कानाला लावला. मी ‘हॅलो’ म्हटलं आणि पलीकडून सरांचा आवाज.. ‘मेनी मेनी हॅप्पी रिटर्नस् ऑफ द डे.’ मी वेडीच झाल.े आणि काही बोलायच्याऐवजी रडायलाच लागले. थोडं रडून झाल्यावर ‘सर, तुम्ही इकडे या. तुमची आठवण येतेय. मला परत असं नका कुठे जाऊ देऊ..’ असं म्हणत मी पुन्हा भोकाड पसरलं. मी इतकी रडले, की शेवटी सरांनी वैजूताईंकडे (सरांच्या पत्नी) फोन दिला. ‘वैजू, बघ गं ही रडतेय. हिची समजूत घाल.’ आणि मग थोडय़ा वेळानं मी शांत झाले. पण मला अजूनही आश्चर्य वाटतं, की त्या एवढय़ा गदारोळात सर माझ्यापर्यंत कसे पोचले आणि कसं त्यांनी मला विश केलं? पण सरांचं प्रेम हे असंच. प्रत्येक क्षण ते भरभरून जगायचे आणि आम्हालाही जगायला शिकवायचे. ‘कबड्डी’नंतर आम्ही बरंच काम केलं एकत्र. आमचं इतकं जबरदस्त टय़ुनिंग जमलं होतं, की ते कामात दिसायचं. ‘ही तुमचीच मुलगी वाटते आम्हाला!’ अशी कॉम्प्लिमेंट जेव्हा माझ्याच आई-वडिलांनी त्यांना दिली तेव्हा एवढे खूश झाले होते! आई-बाबांचा त्यांना आलेला मेसेज फार कौतुकाने ऑस्कर मिळाल्याच्या थाटात सगळय़ांना दाखवत होते.
खूप आठवणी, खूप घटना आठवतात. सरांच्या नाटकाचे प्रयोग करते, थिएटरमध्ये जाते तेव्हा आणखीनच जाणवत राहतं- सर असे होते, तसे होते. त्यांच्या बाबतीत असा भूतकाळी उल्लेख करणं अवघड जातं. कारण ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात सर आले, ज्यांना ज्यांना त्यांचा सहवास लाभला, त्यांच्यासाठी सर कायमच बरोबर राहतील. जसे माझ्याबरोबर सर कायम आहेत. सर, तुमची आठवण येत नाही. कारण त्यासाठी आधी तुम्हाला विसरावं लागेल. आणि ते शक्य नाही.