सातत्याने चांगल्या अभिरुचीची इंग्रजी नाटके बसवणारी हौशी संस्था ‘यात्रिक’ दिल्लीमध्ये चांगलीच मशहूर होती. नाटय़वर्तुळात तिचा दबदबा होता. सुदेश स्याल हा आमचा मित्र त्या संस्थेच्या व्यवस्थापन विभागात मदत करीत असे. खूप दिवसांपासून ‘एकदा यात्रिकला भेट द्या..’ असे टुमणे त्याने लावले होते. अखेर एके दिवशी आम्ही सुदेशबरोबर ‘यात्रिक’च्या अड्डय़ावर दाखल झालो.
ती पहिली आठवण अशी आहे : दिल्लीच्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या एका वस्तीमध्ये-काकानगरमध्ये मेजर ह्यू मायकल आणि जॉय मायकल यांचे छानसे घर होते. त्या बंगल्याच्या लॉनवर वर्तुळाकार खुच्र्या मांडल्या होत्या. आणि २५-३० नाटकवाले हिवाळय़ाच्या कोवळय़ा उन्हात चहा पीत बसले होते. ते नाटकवाले पाहून जरा दिपल्यासारखे झाले. आफताब आणि रोशन हे सेठ बंधू, कुसुम बहल (हैदर), सलमा रझा, सुषमा सेठ, भास्कर घोष, निगम प्रकाश, मालती नेहरू, मार्कस मर्च, प्रभा रोझारियो, रति बाथरेलोम्यू असे त्यावेळचे रंगभूमीवरचे बरेचसे स्वयंप्रकाशित सितारे त्या हिरवळीवर हजर होते. जॉयने प्रेमाने आमचे स्वागत केले. ‘यात्रिक’ची ती सर्वेसर्वा! सुडौल बांधा, हास्यवदन, नेटके कापलेले दाट काळे केस आणि जीन्स- टी-शर्ट हा पेहेराव असलेली जॉय पहिल्याच भेटीत समोरच्याला गारद करीत असे. कोणतीही संस्था नेमाने आणि जोमाने चालायला संघनिष्ठा (टीम स्पिरिट) असलेले कार्यकर्ते सदैव कटिबद्ध पाहिजेत, हे तर खरेच; पण तरीही कुणीतरी एक ‘बोलविता धनी’ लागतो- म्होरक्या- तरच जगन्नाथाचा रथ मार्गस्थ राहू शकतो. तर जॉय मायकल ही ‘यात्रिक’ची सूत्रधार होती.
लॉनवरचा तो ‘चायपे चर्चे’चा सोहोळा मोठा मनोहर होता. पातळ, सुबक सँडविचेस, प्लमकेकच्या फाका आणि नाजूक कपांमधून गरम गरम (अंमळ अशक्त असा) चहा. आमच्या ‘नाटय़द्वयी’च्या तालमी तारेच्या शिंकाळय़ामधून आलेल्या जाडय़ा ग्लासमधल्या (तेव्हा टीचभर प्लास्टिकचे प्याले आले नव्हते.) काळय़ा चहाच्या रसदीवर चालायच्या. चैन म्हणून क्वचित केव्हातरी पकौडे. तर ही टी-पार्टी आणि ‘यात्रिक’चा एकूण नूर आम्हाला खूपच भावला.
जॉयने ‘नाटय़द्वयी’ची आमची काही नाटके पाहिली होती. तिला ‘यात्रिक’चा हिंदी विभाग सुरू करायचा होता. तेव्हा आमचे ‘नाटय़द्वयी’चे नित्याचे काम न थांबवता पाहुणे दिग्दर्शक म्हणून ‘यात्रिक’ची नाटकं अधूनमधून बसवण्याबाबत आमचे काय म्हणणे आहे, हे तिला जाणून घ्यायचे होते. अरुणला अलीकडे कामानिमित्त दौरे करावे लागत. तेव्हा उरले मी! एक नाटक वानगीदाखल करून पाहूया, असं आमचं ठरलं. हाताशी चांगलं नवीन हिंदी नाटक नव्हतं. तेव्हा मुलांचं एक नाटक मी इंग्रजीतून बसवावं अशी टूम निघाली. त्याप्रमाणे मी ‘The Dancing Donkey ’ हे नाटक बसवलं. या नाटकाची एकच आठवण अशी की, त्यातल्या १८ वर्षांच्या नायिकेचं काम ३८ वर्षांच्या जॉयने हट्टाने केलं. तिचा नायक बावीस-तेवीसचा होता. (मी हे तेव्हा कसं मान्य केलं, याचं आज माझं मलाच आश्चर्य वाटतं.) असो. मुलांचं नाटक म्हणून चालून गेलं (असं म्हणायचं!). त्यानंतर मी मुलांसाठीच आणखी एक नाटक बसवलं.. ‘The Land of Cardsl’! म्हणजे माझ्याच ‘पत्तेनगरीत’चं (मीच केलेलं) भाषांतर. पुण्याला आमच्या ‘बालरंगभूमी’साठी त्याचा जोरदार प्रयोग मी बसवला असल्यामुळे मी झोपेतसुद्धा हे नाटक बसवू शकले असते. ‘यात्रिक’ने प्रयोगासाठी हरप्रकारे मदत केली. ऐटबाज पोशाख, भव्य नेपथ्य, सुसज्ज प्रकाशयोजना, ठेकेदार संगीत, कसलेले तंत्रज्ञ व रंगकर्मी; आणि मुख्य म्हणजे अतिशय गोंडस व निपुण मुलांचा तांडा.. कशाचीच कमतरता नव्हती. कवडय़ा-रेवडय़ा न मोजता नाटक बसवणं, हे खरंच केवळ सुख होतं. प्रयोग रंगतदार न होता तरच नवल! कुणीतरी म्हटलं, ‘अगदी फेसाळणाऱ्या शॅम्पेनसारखा झाला प्रयोग!.. ‘It was like sparkling champagne’ आता मुलांच्या नाटकाला श्ॉम्पेनची उपमा कशाला?
‘चला, मुलांचं कौतुक खूप झालं!’ जॉय म्हणाली, ‘आता मोठय़ा प्रेक्षकांसाठी काय करतेस?’ मी तिला आमच्या पुण्याच्या ‘इडा पिडा टळो’चे वर्णन सांगितले. फोटो दाखवले. अर्थात तिला नोएल कावर्डचं मूळ नाटक ‘Blythe spiritlY’ठाऊक होतंच. अन्य असंख्य नाटकप्रेमींप्रमाणे तीही या नाटकाची चाहती होती. ‘फेसाळणाऱ्या श्ॉम्पेन’ची उपमा खरं तर या नाटकाला शोभेल. ‘इडा पिडा’चं हिंदी भाषांतर करण्याचं काम हाती घेतलं केवल कपूरनं! केवल माझा टेलिव्हिजनमध्ये सहकारी होता. त्याची थोडीशी ओळख मी याआधीच्या ‘दूरदर्शन’वरील माझ्या लेखामध्ये दिलेली आहेच. केवलने फार झपाटय़ाने अनुवादाचे काम पुरे केले. नाटकाला मथळा पण छान दिला.. ‘आई बला को टाल तू.’ म्हणजे येणाऱ्या संकटाला तू टाळ! आया- बाया दृष्ट काढताना म्हणतात, ‘जलतू जलाल तू, आई बला को टाल तू.’ आणि मग कानावर बोटं कडाकड मोडतात. चक्क इडा पिडा टळो! भाषांतर उत्तम झालं होतं. ओघवतं, टोकदार आणि मिश्कील. केवलचा त्यात अंतस्थ हेतू होता. त्याला मुख्य काम करायचं होतं. लेखकाचं. त्याला तर मी घेतलंच; पण त्याचं नशीब बलवत्तर म्हणून त्याला दोन अप्रतिम बायका मिळाल्या (नाटकात)! सुषमा सेठ आणि कविता नागपाल.
सुषमा दिल्या भूमिकेचं सोनं करीत असे. तरलाच्या भूमिकेत ती छान शोभली. पण मला पुण्याच्या खेळातली वंदना कांकणभर सरस वाटली होती. सुंदर, पण अलिप्त पद्मिनी म्हणून कविता अगदी फिट्ट बसली. केवल हा तर मूर्तिमंत विनोदमूर्ती होता. थेट बबन प्रभूच्या पंक्तीला बसेल असा. (दुर्दैवाने तीच घातक आवड असलेला.) टाळीची एक जागा तो सोडत नसे. त्याचं टायमिंग, त्याचं बोलणं, चालणं, हावभाव, आविर्भाव सगळं काही जशास तसं. अगदी नेमकं. अर्थात शिस्तीचा आणि केवलचा संबंध नव्हता. एक दिवस कधी वेळेवर आला नाही. उशिरा येण्यावरून एकदा मी त्याला चक्क काढून टाकला होता. मग तो रडला. वेळेवर यायच्या शपथा घेतल्या. आणि त्याप्रमाणे वेळेवर आलाही दुसऱ्या दिवशी- एक दिवस! पण तो एवढा लोभस, गमतीशीर आणि पोचलेला अवलिया होता, की त्याच्यावर रागावताच येत नसे. प्रत्यक्षातही तो अतिशय गमत्या होत्या. ‘आई बला’मध्ये मी तारकेश्वरी या प्लँचेटची छाछूगिरी करणाऱ्या भंपक बाईचं काम करीत होते. एके ठिकाणी तो आपल्या मनानेच माझ्या चालण्याची वेडीवाकडी नक्कल करायचा. तो एकूण प्रकारच हीन होता. आणि आमच्या प्रयोगाच्या अभिरुचीला साजेसा नव्हता. अनेकदा सांगूनही केवल ऐकत नसे. मग मी एक क्लृप्ती केली. केवलच्या दोन आवडत्या जागा होत्या. तिथे प्रचंड हास्यस्फोट होई. एक म्हणजे मी त्याला काही चार मुद्दे समजावत असताना चार बोटं नाचवीत असे. मग केवल आत जाताना आपली चार बोटं वर धरून तिरळं बघत जात असे. त्याच्या या विदूषकीला प्रचंड दाद मिळायची. दुसरं म्हणजे प्लँचेटसाठी सामान आणायला तो घरात जात असताना मी ओरडून सांगत असे, ‘थोडं मीठ पण आणा.’ मग तो जरा दारात थबकून विचारीत असे, ‘मिरपूड नको ना?’ पुन्हा प्रचंड हशा! तर एका प्रयोगाला मी संवाद बोलताना माझी चार बोटं नाचवलीच नाही. तेव्हा त्याच्या हस्तचेष्टांना प्रेक्षक थंड होता. नंतरच्या डावात मीच त्याचा संवाद हायजॅक केला. ‘थोडं मीठ पण आणा. आणि हो, मिरपूडही.’ हशा मिळाला; पण तो मला. पडदा पडल्यावर केवलने कान धरून लोटांगण घातलं. म्हणाला, ‘माझे आई, चुकलो! पुन्हा तुझी नक्कल करणार नाही. पण माझ्या हक्काच्या जागा हिरावून घेऊ नकोस.’ यानंतर तो सुतासारखा सरळ आला.
‘आई बला’चा प्रयोग धमाल होत असे. फक्त एकच कमतरता होती- प्रेक्षक! नाटय़क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल शाबासकी म्हणून ‘यात्रिक’ला एक छानसे थिएटर देण्यात आले होते. हे थिएटर मथुरा रोडच्या सुप्रसिद्ध प्रगती मैदानात होते. वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या या विशाल भूमीवर अधूनमधून मोठमोठाली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शने भरत. एरवी मैदान मोकळेच असे. तर रिकामा पडून राहिलेला डिफेन्स पॅव्हेलियनचा रंगमंच (त्याच्या छतामध्ये वटवाघळांची वस्ती होती.) ‘यात्रिक’ला प्रयोग करण्यासाठी बहाल करण्यात आला होता. साहजिकच नाटय़यात्रींना आनंद झाला. पण तो फार काळ टिकला नाही. ही भेट म्हणजे एक पांढरा हत्ती आहे, हे लवकरच सगळय़ांच्या ध्यानात आले. शहराच्या अगदी एका कडेला असलेल्या मथुरा रोडपर्यंत पोचणे दुरापास्त. दिल्लीची बससेवा हा एक अद्भुत प्रकार होता. (अद्यापही तसाच आहे.) बस आलीच तर ती थांबेल असा भरवसा नाही. तेव्हा स्वत:चे वाहन असले तरच प्रगती मैदानापर्यंत प्रगती होऊ शकणार. बरं, खुद्द थिएटर फाटकापासून खूप आत. सहज चालत जाण्यासारखे नव्हते. तेव्हा प्रयोगाला २०-३० माणसं आली तरी आम्ही एकमेकांचं अभिनंदन करीत असू. फुकट बोलावलेली दोस्त मंडळीसुद्धा त्या आडरानात यायला कंटाळा करीत.
एकदा ‘आई बला’चा तिथे प्रयोग होता. विक्रीच्या खिडकीमधल्या चार्टवर सहाच काय त्या फुल्या होत्या. हीरो महाशयांचा नेहमीप्रमाणे अद्याप पत्ता नव्हता. बाकीचे आम्ही मेकअप रूममध्ये आपले पडलेले चेहरे रंगवीत होतो. एवढय़ात बाहेर गलका ऐकू आला. खिडकीतून डोकावून पाहतो, तर केवल एका भल्या इसमाचा बखोट धरून त्याला खेचून घेऊन येत आहे. त्याच्याशी तो तावातावाने काही बोलत होता. तो इसम बापडा (बहुधा प्रगती मैदानाचा माळी असावा!) सुटण्यासाठी जिवाची धडपड करीत होता. अखेर केवलने आपले सावज आमच्यापुढे आणले. ‘अब आप लोग बताइये..’ म्हणाला, ‘यह साहब जो है- उन्हे आज के शो के दस टिकट चाहिए. मैंने बता दिया की, भाई हाऊसफुल्ल है. एक भी टिकट बचा नहीं. एक सीट खाली नहीं. ब्लैक में खरीदने को तैयार है. कहते है, मिनिस्टर साब नाटक देखना चाहते है. अरे भई, मिनिस्टर नहीं, उनका बाप भी आये तो जगह नहीं है.’
शेवटी कसातरी हिसडा मारून तो इसम बिचारा निसटला आणि त्याने धूम ठोकली.
त्या दिवशी सहाजणांसाठी खेळ करावा की तो सरळ रद्द करावा, याची आमच्यात चर्चा झाली. ते सहा प्रेक्षक म्हणजे कवयित्री इंदू जैनचे कुटुंबीय होते. (देव त्यांचे भले करो!) अखेर ‘ळँी २ँ६ े४२३ ॠ ल्ल’.. ‘नाटक हे झालंच पाहिजे..’ असं कुणीतरी सुज्ञपणे म्हटलं आणि आम्ही जीव ओतून प्रयोग केला. जैन कुटुंबीय तृप्त झालं.
‘यात्रिक’मध्ये एक फार छान पद्धत रूढ होती. कोणत्याही नव्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी जॉयच्या घरी सगळे लॉनवर जमत. तोपर्यंत झाडून सगळी वृत्तपरीक्षणे आलेली असत. कुणीतरी ही परीक्षणे मोठय़ाने वाचून दाखवी. मग प्रयोगावर उलटसुलट चर्चा व्हायची. चहापान व्हायचे. पुढच्या नाटकाचे मनोरथ रचले जायचे. मजा यायची.
‘आता तू ‘यात्रिक’साठी एक छानसे नवे मराठी नाटक हिंदीमधून कर,’ जॉय म्हणाली, ‘अगदी खळबळ उडाली पाहिजे.’ आता खळबळ उडवणारे मराठी नाटक आणायचे कुठून? मग एक हक्काचा स्रोत आठवला. मी तेंडुलकरांना फोन केला- ‘मला तुमचे आधी कुठेही न झालेले नाटक असल्यास हवे आहे..’ मी मागणी केली. ‘पाहतो!’ तेंडुलकर म्हणाले. दोन दिवसांनी त्यांचा फोन आला. ‘फार पूर्वी लिहिलेली एक संहिता एका जुन्या बासनात सापडली. अगदी पत्रावळी आहेत. विषय थोडा भडक; म्हणून ती बाजूला ठेवली होती. ती तशीच राहून गेली. तुझी वाट पाहत असावी.’ ‘द्या धाडून..’ मी त्यांना म्हटलं, आणि मनात विचार केला की, तेंडुलकर स्वत: भडक म्हणताहेत म्हणजे प्रकार आहे तरी काय?
‘गिधाडे’ वाचून मी सर्द झाले. कुणीतरी आपल्याला सणसणीत चपराक मारल्याचा प्रत्यय आला. ही इतकी सगळी वाईट माणसं तेंडुलकरांना भेटली तरी कुठे? आणि तीसुद्धा एकाच कुटुंबात? नाटकामध्ये नाटय़ भरपूर होते. पानापानागणिक! वाक्यावाक्यागणिक! जॉयला मी कथानकाचा गोषवारा सांगितला. ती भलतीच प्रभावित झाली. ‘घे ताबडतोब करायला..’ म्हणाली.
‘गिधाडे’चं भाषांतर सुधीर टंडनने केले. सुधीर माझा टेलिव्हिजनमधला सहकारी (कॅमेरामॅन) आणि दोस्त होता. हुशार. कवीप्रकृतीचा. प्रत्येक गोष्टीमधले सौंदर्य टिपणारा. त्याने रजनीनाथच्या प्रवेशांमधले काव्य जितक्या हळुवारपणे फुलवले, तितक्याच समर्थ सच्चेपणाने इतर गिधाडांची उघडीनागडी भाषा हातचे राखून न ठेवता शब्दांकित केली.
‘गिद्ध’मध्ये काम करायला फार मोठय़ा ताकदीचे कलाकार दाखल झाले. ठरऊ पदवीधर आणि तेव्हा टी.व्ही.मध्ये फ्लोअर मॅनेजर असलेला बंगालचा शोमीर मोइत्रा- पपा गिधाड. शोमीरचा चेहरा अतिशय बोलका होता. आवाज कमावलेला होता. कुटुंबामधला थोरला दिवटा रमाकांत. त्याची भूमिका बी. व्ही. कारंतने निभावली. कारंत पण राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचा एक तेजस्वी विद्यार्थी होता. त्याने पुढे राष्ट्रीय स्तरावर मोठे नाव कमावले. त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘चोमन दुडी’ चित्रपटाला राष्ट्रीय प्रथम पुरस्कार मिळाला. पुढे त्याने संपूर्णपणे नाटय़सेवेत स्वत:ला झोकून दिले. भोपाळच्या सुप्रसिद्ध भारत भवनचा तो बरेच वर्षे अध्वर्यु होता. मग त्याने आपल्या मायभूमीकडे- कर्नाटकाच्या दिशेला पाय वळवले आणि आपली बायको- प्रेमासमवेत कन्नड रंगभूमीसाठी प्रचंड काम केले. कारंत माझा फार जवळचा मित्र होता. स्कूलपासून ते २००२ मध्ये त्याचे निधन होईपर्यंत. फार उमदा माणूस. त्याने रमाकांतचे काम केले. मागे मी राम खरेच्या संदर्भात लिहिल्याप्रमाणे, तुम्ही कितीही जीव तोडून अभिनय केलात, तरीही भूमिकेच्या सापटींमधून तुमचा मूळ स्वभाव डोकावतोच. अत्यंत सभ्य आणि सालस असा कारंत तालमीत रमाकांतचे संवाद बोलू लागला की त्याला जोरजोरात हलवून, ‘काय रे, बरा आहेस ना?’ असे विचारावेसे वाटे. उमाकांतची व्यक्तिरेखा रंगवली श्याम अरोडाने. श्याम हा दिल्लीचा लाडका ‘हीरो’ होतो. रेडिओ, टी.व्ही., नाटक, जाहिराती- त्याचा हसरा चेहरा सतत सर्वत्र दिसत असे. तो कोणतीही भूमिका आपलीशी करी. या गिद्ध बंधूंची धाकटी बहीण महामाया माणिक हिचे काम करायला कुणी तयार होईना. तेव्हा व्यर्थ शोध करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मीच ते काम करण्याचा निर्णय घेतला. चहूकडून कोंडमारा झालेल्या रमाचे काम ज्योती व्यासने केले. ज्योती पण ठरऊ चीच. मला एक वर्ष सीनियर होती. पुढे बरीच वर्षे ती मुंबई दूरदर्शनमध्ये प्रोडय़ूसर होती. संपूर्ण नाटकामध्ये हिंस्त्र प्रवृत्तीचा स्पर्श नसलेले एकमेव पात्र रजनीनाथ. कुलभूषण खरबंदाने अतिशय तन्मयतेने हा उद्ध्वस्त तरुण साकार केला. त्या काळात कोणत्याही अव्वल भूमिकेसाठी श्याम आणि कुलभूषण यांच्यात ओलीसुकी होत असे. पुढे कुलभूषणला संधी मिळत गेली. श्याम मागे- म्हणजे दिल्लीलाच राहिला.
‘गिद्ध’च्या आम्हा कलाकारांना रांगेने उभे केले असते तर भारताच्या विभिन्नतेची तत्काळ प्रचीती आली असती, इतके सगळय़ांचे चेहरेमोहरे आणि इतर वैशिष्टय़े भिन्न होती. नाकीडोळी आसामी दिसणारा शोमीर, थेट कन्नडिग कारंत, पंजाबदे हट्टेकट्टे पुत्तर श्याम आणि कुलभूषण, तद्दन गुज्जु ज्योतीबेन आणि निम्मी फिरंगी दिसणारी मी- असा आमचा गंगाजमनी ताफा होता. अरुणला टिंगल करायला नामी विषय मिळाला होता. ‘सईच्या कास्टिंगची दाद द्यायला हवी. सगळे कसे एका मुशीमधून घडवले आहेत. पाह्यल्यावरच पटतं, की हे सारे एका कुटुंबातले असणार!’
एवढे सगळे नावाजलेले, समर्थ कलाकार- अगदी त्याकाळचे झगमगते सितारे घेऊनही ‘गिद्ध’चा आमचा प्रयोग तसा निष्प्रभच झाला. मला वाटतं की, मीच बिचकत-बाचकत हे नाटक बसवलं. माझ्या प्रकृतीला- प्रवृत्तीला ते मानवलं नाही, झेपलं नाही, किंवा चक्क जमलं नाही म्हणा; मला प्रयोगाबद्दल एकूण खूप कमी आठवतं. कदाचित मीच स्टेजवर असल्यामुळे नाटक पाहिल्याचा अनुभव हुकला म्हणून म्हणा, किंवा आठवण्याजोगं फारसं काही घडलंच नाही, म्हणून म्हणा; पण हे नाटक विस्मृतीच्या पडद्याआड गेलं आहे, खरं. प्रगती मैदानाच्या वहिवाटीप्रमाणे फारसे प्रेक्षक आले नाहीत. डिफेन्स पॅव्हेलियनच्या वटवाघळांनी मात्र आमचे ‘गिद्ध’ पाहिले.
मी दिग्दर्शित केलेल्या नाटय़कृतींमध्ये या नाटकाचा फारसा वरचा क्रमांक लागत नाही. हां, तेंडुलकरांचे बासनात पडून राहिलेले एक (नंतर) गाजलेले नाटक प्रथम मी प्रकाशात आणले, ही फुशारकीची बाब सोडली तर ‘गिधाडे’च्या बाबतीत मी काही भरीव कामगिरी केली असे म्हणता येणार नाही.
अगदी अलीकडे पुन्हा एकदा या गिधाडांची गाठ पडली. अतिशा नाईकने बसवलेला प्रयोग मी पाहिला, आणि काय गंमत! पुन्हा एकदा सणकन् चपराक बसल्याचा अनुभव आला. हा प्रयोग अंगावर आला.. अगदी धावून चवताळून अंगावर आला. त्यात गौतमने केलेला रमाकांत पाहून तर मी स्तिमितच झाले. त्या व्यक्तिरेखेच्या पापुद्रय़ाखालचे पापुद्रे उलगडून तो पार खोलात शिरला होता. त्याचा हिंस्त्र अभिनिवेश, षंढ जाणिवेमधून उगम पावलेली फोल मर्दुमकी, संवादाला कुत्सित विनोदाची झालर, छोटय़ा हावभावांमधून प्रतीत होणारी लालसा.. विलक्षण! क्षणभर वाटलं, की एक आई म्हणून मी एवढी प्रभावित झाले आहे का? पण नाही! गौतमची मी सर्वात कठोर टीकाकार आहे, हे तोसुद्धा जाणून आहे. तेव्हा एक नि:पक्षपाती प्रेक्षक म्हणून मी म्हणू शकते, की त्याने रमाकांतच्या भूमिकेमधून स्टेजवरून फोडलेली डरकाळी खरोखरच थरारक होती.
अतिशा नाईकच्या ‘गिधाडे’ने तेंडुलकरांच्या हिंसा-नाटकाला पूर्ण न्याय दिला. तो प्रयोग पाहिल्यावर मला वाटलं, की मी बसवलेले नाटक साने गुरुजींनी लिहिले होते की काय?    

Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Forest Minister Ganesh Naik assurance regarding the name of Navi Mumbai International Airport
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव; वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन
kites on Makar Sankranti
मकरसंक्रांतीला पतंग उडवितांना कुठल्या दुर्घटना घडतात माहिती आहे का?
nashik Police inspected various places to prevent use of nylon manja
पतंगबाजीत सारेच दंग, पोलिसांचे नायलाॅन मांजावर लक्ष
Belapur cidco parking news in marathi
नवी मुंबई : सिडको मंडळाचे वाहनतळ धोकादायक स्थितीत
Permission , robotic parking lot, Mumbadevi,
मुंबादेवीतील अत्याधुनिक रोबोटिक वाहनतळाच्या कामाला परवानगी द्यावी, मुंबई महापालिकेचे राज्य सरकारला साकडे
Drones will monitor illegal fishing and boat entry in Thane and Palghars bay
अनधिकृत मासेमारी आणि नौकांवर ड्रोनद्वारे नजर
Story img Loader