शांता गोखले

स्वातंत्र्योत्तर काळातील कादंबऱ्यांमधील भारतीयता शोधायची तर प्रांतोप्रांतीच्या भाषावैविध्यामुळे ते अवघड आहे. परंतु केवळ मराठीपुरता जरी हा विषय सीमित केला तर काय आढळतं? कादंबरीच्या श्रेष्ठत्वाचे निकष अनेकानेक असले तरी वाचकाच्या जीवनविषयक धारणांमध्ये किंचित का होईना, बदल करणाऱ्या कादंबऱ्या श्रेष्ठ होय. पण या निकषावर किती मराठी कादंबऱ्या खऱ्या उतरतात? 

Manmohan Singh
असायलाच हवे मनमोहन सिंग यांचे संगमरवरी स्मारक…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ulta chashma
उलटा चष्मा: असला भुसभुशीतपणा नको!
Technology and Urbanization Human Progress
तंत्रकारण: तंत्रज्ञान आणि नागरीकरण
तर्कतीर्थ विचार: तर्कतीर्थांचे वेदाध्ययन
Maharashtras highest murders occurred in Mumbai and some city of Maharashtra
हत्याकांडांच्या घटनेत गृहमंत्र्यांचे राज्यात शहर तिसऱ्या स्थानावर
Baahubali Beed Murder in Beed News
बाहुबलींचे बीड: अराजकाचे वर्तुळ!
Loksatta lokrang Publisher obsessed with words
शब्द-सुरांत रमलेला प्रकाशक

सुरुवातीस सांगण्याची गरज नसलेले दोन मुद्दे.. स्थानिक भाषा ही स्थानिक संस्कृतीचं अंग आणि वाहन असते. भारतीय भाषेतलं कोणतंही साहित्य या अर्थाने भारतीयच असतं. त्याचे पुरावे द्यावे लागत नाहीत. दुसरा जोडमुद्दा.. असं आहे म्हणूनच परभाषेचा अभ्यास हा आपोआपच परसंस्कृतीचा अभ्यास होतो. तसा अभ्यास नसेल तर आपण त्या भाषेतल्या साहित्याविषयी अधिकारवाणीने बोलू शकत नाही. माझा कोणत्याही भारतीय भाषेचा तसा अभ्यास नाही. त्यामुळे ही चर्चा भारतीय कादंबरीविषयी नसून मराठी कादंबरीविषयी असेल. मराठी भाषा भारतीय आहे. तिचं साहित्य कितीही परकीय प्रभावाखाली लिहिलं गेलं तरी मराठी भाषेत रुतलेली संस्कृती त्यामधून व्यक्त होणं अपरिहार्य आहे.

आपण ज्या ७५ वर्षांच्या कालखंडाकडे बघत आहोत तो स्वातंत्र्योत्तर काळ आहे आणि त्या कारणानेच तो आधीच्या कोणत्याही काळाच्या तुलनेत मूलत: वेगळा आहे. मराठी कादंबरी जन्माला आली ती आपण परकीय सत्तेखाली असताना. कादंबरी हा कथाकथनाचा प्रकार ब्रिटिश साहित्य संस्कृतीत त्याआधी शंभरेक र्वष अस्तित्वात आला होता. तो प्रकार आपल्याकडे येण्याआधी भारतीय साहित्य इतिहासात जिला आपण कादंबरी म्हणू शकू अशी एकच दीर्घ कल्पित गद्य कथा लिहिली गेली होती.. बाणभट्टाची ‘कादंबरी’! हे शीर्षक वर्णनात्मक नसून ते त्या ग्रंथातल्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेचं नाव आहे. तरीही मराठी साहित्यात जेव्हा ‘नॉव्हेल’ या प्रकाराचा प्रवेश झाला, तेव्हा त्याला आपण ‘कादंबरी’ हेच नाव दिलं. तेलुगु भाषेत ‘नॉव्हेल’चं सरळसरळ भाषांतर ‘नवल’ असं करण्यात आलं. गुजरातीत भाषांतर म्हणावं असा ‘नवलकथा’ हा शब्द योजला गेला. हिंदी व बंगालीत काहीसा अधांतरी तरंगणारा ‘उपन्यास’ हा शब्द वापरण्यात आला. या साऱ्या नामांकनांत एक लक्षवेधी गोष्ट अशी की, कन्नड भाषेतसुद्धा नॉव्हेलसाठी ‘कादंबरी’ हाच शब्द प्रचलित झाला. महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकेकाळी जे अनेक सांस्कृतिक दुवे होते, जे भाषावार प्रांतरचनेनंतर भाषिक अभिनिवेशात आपण विसरलो, त्याचं हे द्योतक. ‘‘कादंबरी’ हे नामकरण मराठीतून कन्नडमध्ये आलं,’ असं विधान एकदा एका सभेत गिरीश कार्नाड यांनी केलं. त्यांचं हे म्हणणं काही लेखकांनी खोडून काढलं. हे लेखक म्हणाले, ‘आपण मराठीतून हा शब्द घेण्याचं काय कारण? मराठी आणि कन्नडमध्ये एकाच वेळी तर कादंबरीलेखन सुरू झालं. योगायोगाने दोन्ही भाषांमध्ये तोच शब्द योजला गेला, एवढंच.’ कार्नाडांना अंधुकसं माहीत होतं की मराठी कादंबरी कन्नडच्या आधी लिहिली जाऊ लागली. त्याची खात्री त्यांनी करून घेतली. कन्नडमधली पहिली कादंबरी ‘इंदिराबाई’ १८९९ साली प्रसिद्ध झाली. त्याआधी मराठीत किमान चार कादंबऱ्या लिहिल्या गेल्या होत्या. बाबा पदमनजी यांची ‘यमुनापर्यटन’ (१८५७), लक्ष्मण मोरेश्वरशास्त्री हळबे यांची ‘मुक्तामाला’ (१८६१), नारो सदाशिव रिसबुड यांची ‘मंजुघोषा’ (१८६८), रा. भि. गुंजीकर यांची ‘मोचनगड’ (१८७१). आणि कार्नाडांना खासकरून आठवत होती ती हरी नारायण आपटे यांची ‘पण लक्षात कोण घेतो’ (१८९०). हा वाद चढाओढीबद्दल नव्हता; ऐतिहासिक तथ्याबद्दल होता. जाता जाता सहज सांगावेसे वाटते की, बंगालीतली पहिली कादंबरी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची ‘दुर्गेशनंदिनी’ १८६५ साली प्रसिद्ध झाली. तमिळ, मल्याळम्, तेलुगु, हिंदी, पंजाबी अशा सर्वच भाषांत पहिल्या कादंबऱ्या ‘यमुनापर्यटन’नंतर प्रसिद्ध झाल्या.

पण प्रश्न असा आहे की, सातव्या शतकात बाणभट्टाने लिहिलेल्या ‘कादंबरी’नंतर आपल्याकडे कादंबरी म्हणावा असा दुसरा ग्रंथ का लिहिला गेला नाही? संस्कृतमध्येही नाहीच. आणि मराठीत तर नाहीच नाही. याबद्दल तर्क करायचा झाला- आणि तो करण्यास भरपूर वाव आहे- तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की लेखकाला तयार वाचकवर्गाची गरज असते. मध्ययुगीन काळात कीर्तनकारांना श्रोतृवर्ग होता तसा लेखकाला वाचकवर्ग अस्तित्वात नव्हता. त्याचं कारण- शिक्षणाचा अभाव. महाराष्ट्रात ब्रिटिशांच्या आगमनाआधी शिक्षणाची परिस्थिती काय होती, या प्रश्नाचं उत्तर ‘महाराष्ट्र-जीवन : परंपरा, प्रगती आणि समस्या’ (१९६०) या गं. बा. सरदार आणि इतरांनी संपादित केलेल्या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात सापडतं. त्यातील दोन-चार उतारेपुढील प्रमाणे..

‘‘इ. स. ११०० ते इ. स. १८०० या आठशे वर्षांत शिक्षणविषयक विचारात व शिक्षणपद्धतींत लक्षात भरण्यासारखा विशेष फरक काहीच झाला नाही.’’

‘‘प्राथमिक शिक्षक हा बलुतेदारांमध्ये नाही, ही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे. ब्रिटिश अंमल सुरू होण्यापूर्वी व खेडय़ांतूनसुद्धा पंतोजी शाळा असत. त्याचा फायदा ब्राह्मण, वैश्य व कायस्थ घेत असत. साक्षरता फार नव्हतीच.’’

‘‘ज्यांना आधुनिक अर्थाने शाळा म्हणता येईल त्यांची स्थापना महाराष्ट्रात व भारताच्या इतर भागांतही प्रथम ख्रिस्ती मिशनरी लोकांनी करण्यास आरंभ केला.’’

‘‘१८४० मध्ये स्थापिलेल्या ‘बोर्ड ऑफ एज्युकेशन’ या संस्थेच्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत मराठी भाषेच्या अभ्यासाला चालना मिळाली व अनेक मराठी शाळा निघून सुमारे ३००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली.’’

‘‘पुणे शहरात मुलींकरिता फुले यांनी इ. स. १८५१ मध्ये शाळा उघडली. इ. स. १८५३ मध्ये त्यांनी पुण्यासच अस्पृश्यांकरिता शाळा काढली.’’

याचा अर्थ ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली त्याआधी जी काही विद्या होती ती संस्कृतमध्ये होती आणि ती फक्त उच्चवर्णीय पुरुषांसाठीच उपलब्ध होती. स्त्रियांना आणि शुद्रातिशुद्रांना संस्कृत शिकण्याची आणि बोलण्याची बंदी होती. त्यामुळे देशातल्या जनतेचा एक मोठा भाग अशिक्षितच राहिला. ब्रिटिशांनी मोठय़ा प्रमाणावर शाळा-कॉलेजं सुरू केली तेव्हा लेखकांना वाचकवर्ग मिळाला आणि तिथून निबंध-कथा-कादंबरी या ललित लेखनप्रकारांचा उगम झाला. आपण बाणभट्ट आणि बखरी ही उदाहरणं देऊन आपल्याकडे गद्यलेखनाची परंपरा होती असा राष्ट्रीय अभिनिवेशातून कितीही आग्रह धरला तरी कादंबरी हा ललित लेखनाचा विशिष्ट प्रकार इंग्रजांकडूनच आपल्याकडे आला हे सिद्ध आहे. त्याचं आपण काय केलं, किंवा काय काय केलं, हे आपण तपासून बघणार आहोत. त्यासाठी ‘यमुनापर्यटन’ या मराठीतल्या पहिल्या कादंबरीतले काही उतारे नमुन्यादाखल देत आहे. कारण पुढील विवेचनात तिचा ठळकपणे उल्लेख येणार आहे. कादंबरीचा विषय आहे- विधवांचा प्रश्न. सुरुवातीचं एक संभाषण भाषेच्या मराठमोळेपणाचं आणि स्त्रियांना लागू असलेल्या नियमांचं उदाहरण म्हणून देत आहे : 

‘‘यमुने, बरी आठवण झाली, तुला मी सांगितले होते की विठय़ास थोडासा भात आणि द्रोणभर आंबटी दे आणि पोळी उरली नाही म्हणून सांग. ते न ऐकता पोळ्या आहेत असे त्याला का सांगितलेस?’’

यमुना बिचारी हळूच उत्तर देते- ‘‘त्याने विचारिले तेंव्हा मी नाही कसे म्हणू, माझ्या पदरी लबाडी आली असती.’’

सासू- केवढी मोठी खरेपणाची खाणच मला मिळाली हो! पोरीच्या जातीने सांगितली गोष्ट निमुटपणे ऐकावी.

गंगा- ती जेंव्हा-तेंव्हा तसेच करिते आई.

यमुना- त्यात काय मी खोटे तर बोलले नाही ना?

गंगा- बापाने लाड करून शाळेत पाठवल्याचे हे फळ.

कादंबरीच्या शेवटाकडला हा उतारा- जो कादंबरीकाराचा  परिवर्तनशील  दृष्टिकोन दर्शवतो :

‘‘विनायक- शेटजी, आपण एवढा वेळ जे भाषण केले त्यावरून या मंडळींत आपली प्रशंसा झाली. पण केवळ प्रशंसेसाठी खरेपणावर पाणी ओतावे हे योग्य नाही. विधवांच्या स्थितीविषयी मी जे बोललो त्याजवरून आपण मला असा दोश लावता की मी केवळ इंग्लिश पुस्तके वाचून व साहेब लोकांच्या सांगण्यावरून मात्र त्यांच्या दु:खाचे वर्णन करितो. मी पुष्कळ देश फिरून आलो आहे व जे काही मी स्वता पाहिले त्यावरून आता माझी पुरती खातरी झाली आहे की, आमच्या विधवा स्त्रियांसारख्या हतभाग्य व नीचावस्थेत बुडालेल्या स्त्रिया या भूतळावर दुसरे कोणत्याही स्थळी नसतील.. पण कोणी जर निश्चयच केला आहे की, आपले डोळे झाकून बसायचे; कोणतीही बरीवाईट गोष्ट पाहायची नाही, तर मग त्याजविषयीचे विचार त्याच्या मनात कोठून येतील व त्याला पदार्थमात्राचे वास्तविक स्थितीस्वरूप कोठून दिसेल?’’

बाबा पदमनजी यांनी कोणत्याही परकीय कादंबरीकाराचा आदर्श डोळ्यांसमोर न ठेवता केवळ वास्तवावर नजर ठेवून त्यांच्या मनात चाललेल्या गोंधळाचं कथानक तयार करून ही कादंबरी लिहिली. पुढे लिहिते झालेले कादंबरीकार मात्र पायाखालची जमीन सोडून हवेत तरंगू लागले. त्यांची भाषा कृत्रिम आणि नटवी झाली. ती तशी का झाली याच्या कारणावर वि. का. राजवाडे यांनी त्यांच्या कादंबरीबद्दलच्या दीर्घ निबंधात नेमकं बोट ठेवलं आहे. ते म्हणतात, ‘‘कादंबरी हा प्रकार हाताळणाऱ्या लेखकांना आपल्या कलांचे, वाङ्मयीन परंपरांचे, स्वत्वाचे यित्कचितही ज्ञान नव्हते. इंग्लिश लेखकांचे अनुकरण करताना चांगल्या-वाईटासाठी लागणारी चिकित्सक बुद्धी त्यांच्यापाशी नव्हती. त्यामुळे रेनल्ड्ससारखे सुमार लेखक त्यांचे आदर्श ठरले.’’

जॉर्ज डब्ल्यू. एम. रेनल्ड्स या लेखकाच्या गूढ कादंबऱ्या १८४० च्या दशकात ब्रिटनमध्ये डिकन्सच्या कादंबऱ्यांपेक्षाही लोकप्रिय झाल्या होत्या. राजेरजवाडे, भुतंखेतं, अमानुष खलनायक, त्यांच्या तावडीत सापडलेल्या निष्पाप कन्यका इत्यादींचा रेनल्ड्सच्या कादंबऱ्यांत भरणा होता. या लेखकाचं अनुकरण ना. स. रिसबूडांनी ‘मंजुघोषा’ कादंबरीत केलंय की काय, असं कादंबरीच्या शीर्षकपृष्ठावर केलेल्या ‘मनोरंजक कल्पित कादंबरी’ या वर्णनावरून वाटतं. ‘मंजुघोषा’त विमान आहे, आमरापुरी नामक शहर आहे, छळ करणारी सावत्र आई आहे, प्रेम आहे आणि गांधर्व विवाहही आहे. लक्ष्मण मोरेश्वर हळबे यांच्या ‘मुक्तामाला’ कादंबरीत निसर्गाचे साचेबद्ध वर्णन आहे. त्याचबरोबर अद्भुतरम्य वातावरणही आहे आणि अर्थात दुष्टांवर सुष्ट मात करतात असा शेवट आहे.

रा. भी. गुंजीकरकृत ‘मोचनगड’ ही कादंबरी ‘ऐतिहासिक’ आहे. याचा अर्थ ऐतिहासिक व्यक्ती किंवा घटनांविषयी ती आहे असं नाही, तर मराठेशाहीचं कल्पित वातावरण घेऊन त्या पार्श्वभूमीवर हे मसालेदार कथानक रचलं आहे. त्यात गंगूबाई नामक एका विवाहित स्त्रीवर वाईट नजर ठेवणारा लंपट शिलेदार आहे. त्याच्यापासून तिला खूप त्रास होतो, पण शेवटी त्याची हार होते आणि शेवट गोड होतो. थोडक्यात, या सुरुवातीच्या काळात कादंबरी हे केवळ मनोरंजनाचं, स्वप्नरंजनाचं माध्यम आहे असं लेखकांनी ठरवलं होतं हे उघड आहे.

पुढे बऱ्याच अंशी हाच समज चालू राहिला. ना. सी. फडक्यांच्या कादंबऱ्यांतून तो उघडपणे दिसतो. त्यांनी विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापासून सातव्या दशकापर्यंत (म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातही) शंभराहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या. त्या कादंबऱ्यांची पार्श्वभूमी कोणतीही असो, पण प्रत्येकीत तरुण-तरुणींच्या प्रणयाची संयत पखरण हमखास असे. आधुनिकतेच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या त्या काळातल्या नवशिक्षित तरुण-तरुणींना विवाहपूर्व प्रणयाविषयी आकर्षण वाटू लागलं होतं. त्याचं एक कारण म्हणजे त्यांच्या वास्तव जीवनात असं प्रेम वर्जित होतं, हे असू शकतं. फडक्यांच्या कादंबऱ्यांतल्या सद्गुणी, सुशील नायक-नायिकांमध्ये ते आपलं प्रतििबब पाहू इच्छित होते. त्यांच्या प्रेमाचा शेवट नेहमी गोड असे ही गोष्ट आश्वासक होती. मनोरंजनाचं हे मुख्य सूत्र फडक्यांनी सदैव सांभाळलं.

फडक्यांच्या मानाने वि. स. खांडेकरांच्या कादंबऱ्यांची संख्या जरी बऱ्याच पटीने कमी होती तरी त्यांनाही मोठा वाचकवर्ग लाभला होता. त्यांनी एकूण बारा कादंबऱ्या लिहिल्या. त्यापैकी तीन स्वातंत्र्योत्तर काळात प्रसिद्ध झाल्या. त्यांनी त्या केवळ मनोरंजनासाठी लिहिल्या असं म्हणणं कठीण आहे. फडके आणि खांडेकर यांच्यातला हा मूलभूत फरक असू शकतो. खांडेकरी कादंबरीत नायकांवर प्रेम करणाऱ्या मनस्वी तरुणी जरी होत्या, तरी नायक आदर्शवादी होते. त्यांना ध्येयं होती, समाजसुधारणेची ओढ होती. मात्र, या दोन लोकप्रिय लेखकांच्या कादंबऱ्यांत एक साम्यस्थळ होतं. खांडेकरांच्या कादंबऱ्यांमध्येदेखील सुष्ट-दुष्ट प्रवृत्तींच्या संघर्षांत सत्प्रवृत्तीचा विजय होणं अपरिहार्य होतं. पण नवल वाटावं (किंवा वाटू नये) अशी गोष्ट ही, की बऱ्याच अंशी वास्तवाशी नातं सांगणाऱ्या त्यांच्या स्वातंत्र्योत्तर काळातल्या तीन कादंबऱ्यांपैकी १९५९ साली त्यांनी लिहिलेल्या ‘ययाती’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिचे अनेक भाषांत अनुवाद झाले आणि १९७५ साली भारतातला परमोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कारही तिला मिळाला.

‘ययाती’चा जरी या प्रकारे उदोउदो झाला तरी १९६० च्या दशकात लिहू लागलेल्या अग्रेसर कादंबरीकारांनी आणि समीक्षकांनी तिला श्रेष्ठ कादंबरीचं स्थान दिलं नाही. तिच्या दर्जाविषयी शंका घेणाऱ्यांचा कौल उघडपणे वास्तववादाच्या बाजूने होता. ‘ययाती’चं कथानक पौराणिक कथेवर आधारलेलं आहे हा त्यांचा पहिला आक्षेप. त्यातील ‘ययाती’ ही व्यक्तिरेखा जरी आधुनिक काळातल्या भोगलंपट समाजाचं प्रतिनिधित्व करत होती तरी वर्तमानाशी तिचा तितपतच संबंध होता. शैली म्हणाल तर रंजकतेची कास धरणारीच होती. अलंकारिकता, काव्यात्मकता, कल्पनाविलास यांनी नटलेली. ही शैली वास्तववाद्यांना मान्य नव्हती, तरीही नेमकी तीच शैली कलात्मकता नामक गुण मानणाऱ्यांच्या लेखी कादंबरीचं श्रेष्ठत्व वाढवत होती.           

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात १९८० साली ऑगस्ट महिन्याच्या २३ ते २५ या तीन दिवसांत झालेल्या चर्चासत्रात १९५० ते १९७५ या काळात लिहिलेल्या मराठी कादंबऱ्यांविषयी प्रभावी समीक्षक आणि ज्ञानपीठ पुरस्कारविजेते भालचंद्र नेमाडे यांनी विवेचन केलं होतं. त्यासाठी त्यांनी ‘अवास्तव ते वास्तव’ असा पट मांडून त्यात कादंबऱ्यांची वर्गवारी केली. अवास्तवाच्या टोकाला ‘मोचनगड’ प्रवृत्ती, तर वास्तवाच्या टोकाला ‘यमुनापर्यटन’ प्रवृत्ती. आणि या दोन टोकांमध्ये इतर प्रवृत्तींचा त्यांनी समावेश केला. त्यातील एक प्रवाह होता रीतिप्रधान ‘मुक्तामाला’ प्रवृत्तीचा. मराठी कादंबरीचा २५ वर्षांचा पसारा आटोक्यात आणण्यासाठी ही मांडणी जरी उपयुक्त ठरली तरी एकाच लेखकाच्या या अगर त्या कादंबरीत यातल्या एकाहून अधिक प्रवृत्ती हजर असल्याची नोंद करता करता त्यांना आपल्या मूळ पटाची बरीच ओढाताण करावी लागली. पण मराठी कादंबरीतल्या सर्व प्रवृत्ती उलगडून दाखवायच्या तर आपण तयार केलेल्या जाळ्यातून कुठे आणि काय निसटतंय आणि त्याला जाळ्यात आणण्यासाठी त्याची वीण कशी बदलावी, हा विचार करणं त्यांना अपरिहार्य होतं.

आपल्या विचाराला अनुसरून नेमाडेंनी ज्यांच्यावर काट मारली त्यांत पुढील कादंबऱ्यांचा समावेश आहे.. रणजीत देसाईंची ‘स्वामी’, खांडेकरांची ‘ययाती’, गो. नी. दांडेकरांच्या आणि खानोलकरांच्या जवळपास सर्व, श्री. ना. पेंडसेंच्या काही आणि गंगाधर गाडगीळांची ‘लिलीचे फूल’! १९६०पूर्वकाळात लिहिलेल्या कादंबऱ्यांत नेमाडे फक्त विभावरी शिरूरकरांच्या कादंबऱ्यांना मानाचं स्थान देतात. त्यांच्या लेखी, खरी कादंबरी जन्मास आली ती १९६० नंतर! या कादंबरीचा ऊहापोह करताना ते म्हणतात, ‘‘(या कादंबरीने) पंडिती समीक्षेला पायबंद घातला. वास्तववाद अंगीकारला. नवी आशयद्रव्ये निवडली. अ-वास्तव व्यक्तिवाद डावलून व्यक्ती व समाज यांच्यामधला दुवा वेधला. लौकिक व्यवहारातच सौंदर्य शोधण्याची तंत्रे रूढ केली. नव्या सौंदर्यकल्पना शोधल्या.. हे वर्तमान जग सोडून भूतकाळात किंवा अद्भुतात किंवा कल्पित अ-वास्तवात जाण्याची गरज नसते. आहे त्या वास्तवातच सौंदर्य असू शकते, हे गेल्या वीस वर्षांतल्या कादंबरीकारांनी प्रत्यक्ष सिद्ध केले आहे. कादंबरीकारांनी हेही सिद्ध केले की, कादंबरीला नैतिकतेचा आणि कृतिप्रधानतेचा रंजनापेक्षा जास्त आधार लागतो. कारण कादंबरीकाराला सांस्कृतिक मूल्यांचे रक्षण, संवर्धन आणि प्रसार करण्याची सांस्कृतिक भूमिकाही कलावंत या नात्यानेच अपरिहार्यपणे करावयाची असते. ‘यमुनापर्यटन’पासून सुरू झालेली, वास्तवाशी अतूट नाते सांगणारी, कृतीप्रधान सर्जकतेचा अविभाज्य घटक मानणारी ही कादंबरी जगण्याचा नवा मूल्यविचार मानते.’’ १९६० नंतरच्या या प्रवृत्तीत नेमाडे पुढील कादंबऱ्या समाविष्ट करतात : ‘धग’ (उद्धव शेळके), ‘माणूस’ (मनोहर तल्हार), ‘देवाचा शब्द’ (मनोहर शहाणे), ‘काळोखाचे अंग’ (ए. वि. जोशी), ‘अरे संसार’ (प्रभाकर पेंढारकर), ‘सात सक्कं त्रेचाळीस’ (किरण नगरकर) आणि भाऊ पाध्ये यांच्या सर्वच कादंबऱ्या. ‘‘तरी..’’ ते शेवटी म्हणतात, ‘‘संपूर्ण मानवी अस्तित्वाचा विचार मराठी कादंबरीला अजून करता येत नाही, हेही कबूल केले पाहिजे.’’ ही त्रुटी भरून काढण्याचा प्रयत्न त्यांच्या हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या २०१३ साली प्रकाशित झालेल्या विराट कादंबरीत दिसतो. या कादंबरीसाठी त्यांना २०१५ साली ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.

स्वातंत्र्यपूर्व कादंबरीचा अभ्यासपूर्ण आढावा वि. का. राजवाडे यांनी घेतला, तर १९५० ते १९७५ या कालखंडातल्या कादंबरीचं विशिष्ट सिद्धांतावर आधारित चिकित्सक मूल्यमापन भालचंद्र नेमाडे यांनी केलं. त्यानंतरच्या काळातल्या कादंबरीचं रंगनाथ पठारे यांचं ‘आजची कादंबरी : नोंदी आणि निरीक्षणे’ वगळता परिपूर्ण असं समालोचन झालं असल्यास ते माझ्या वाचनात आलेलं नाही. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाला ५० र्वष पूर्ण झाली तेव्हा कोविडचा काळ चालू होता, म्हणून मराठी कादंबरीवर ऑनलाइन चर्चा झाली. चर्चेच्या एका सत्रात अनेकदा विचारण्यात आलेला प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला गेला. ‘मराठी कादंबरीची समीक्षा तोकडी आहे का?’ त्याचं थोडक्यात उत्तर होतं- ‘हो. समीक्षा आणि सर्जनशील कृती याच्यामध्ये सकारात्मक संवादाची गरज असते. समीक्षक हा लेखक आणि वाचक यांच्यामधला दुवा असतो. तो कादंबरीचं जे विश्लेषण करतो त्यातून वाचकाच्या लक्षात न आलेले मुद्दे त्याच्या लक्षात येतात. कादंबरी कशी वाचावी, त्यात कोणते पैलू शोधावेत हेही त्याला उमगतं. वाचकाची अभिरुची प्रगल्भ होते तेव्हा वाचक कादंबरी केवळ वरवरच्या मनोरंजनासाठी न वाचता तिच्यात अधिक सखोल अर्थ शोधू लागतो. कादंबरीच्या सर्जनशील प्रक्रियेत कादंबरीकार-समीक्षक-वाचक हा संवाद महत्त्वाचा असतो.

कादंबरीविषयीच्या या चर्चेत मी कुठे उभी आहे ते सांगण्याची वेळ आली आहे. लेखकाकडे असलेलं निवेदनाचं, व्यक्तीवर्णनाचं कसब आणि शैलीची आकर्षक वैशिष्टय़ं आपण बाजूला ठेवू. कारण केवळ त्यांच्यामुळे कादंबरी श्रेष्ठता पावत नाही. माझ्या मते, श्रेष्ठ कादंबरीच्या लेखकाचा दृष्टिकोन आपल्याला जगाकडे नव्या नजरेने पाहण्यास भाग पाडतो. या कादंबरीत सत्याचे अनेक स्तर असतात. मानवजातीकडे ती अनुकंपेने पाहते. समाजजीवनाविषयीचं ती जे सत्य सांगते ते सत्य नेमक्या या प्रकारे यापूर्वी मांडलेलं नसतं. आपण मानसिकदृष्टय़ा ज्या जागी असतो तिथून श्रेष्ठ कादंबरी किंचित प्रमाणात का होईना, आपल्याला हलवते. ती वाचून झाल्यावर आपण तिला वस्तू म्हणून बाजूला ठेवतो खरं; पण विचार म्हणून ती आपल्या मनात कायमची राहते.

हे निकष वापरून गेल्या ७५ वर्षांत लिहिलेल्या कादंबऱ्यांचं मी इथे मूल्यमापन करू शकणार नाही. तरीही निदान मला महत्त्वाच्या वाटलेल्या आणि/ किंवा आवडलेल्या कादंबऱ्यांची यादी देण्याचा प्रयत्न मी करू शकते. या यादीत मला आठवत आहेत त्या क्रमाने कादंबऱ्या पुढे देत आहे..

‘धग’ (उद्धव शेळके), ‘कोसला’ (भालचंद्र नेमाडे), ‘अंताजीची बखर’ (नंदा खरे), ‘तहान’ (सदानंद देशमुख), ‘दशक्रिया’ (बाबा भांड), ‘चाळेगत’ (प्रवीण दशरथ बांदेकर), ‘ब्र’ (कविता महाजन), ‘कोबाल्ट ब्लू’ (सचिन कुंडलकर), ‘मेड इन इंडिया’ (पुरुषोत्तम बोरकर), ‘देव चालले’ (दि. बा. मोकाशी), ‘बनगरवाडी’ (व्यंकटेश माडगूळकर), ‘हद्दपार’ (श्री. ना. पेंडसे), ‘अजगर’ (चिं. त्र्यं. खानोलकर), ‘रिबोट’ (जी. के. ऐनापुरे), ‘मुंबई दिनांक’, ‘सिंहासन’ (अरुण साधू), ‘टोकदार सावलीचे वर्तमान’, ‘भर चौकातील अरण्यरुदन’ (रंगनाथ पठारे), ‘शीतयुद्ध सदानंद’, ‘कळ’ (श्याम मनोहर), ‘अच्युत आठवले आणि आठवण’, ‘गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी’ (मकरंद साठे),‘ निळ्या डोळ्यांची मुलगी’ (शिल्पा कांबळे), ‘नवल’ (प्रशान्त बागड). एखाद् दोन मोठी नावं मी विसरले असण्याची दाट शक्यता आहे.

इतर भारतीय भाषांतील माझ्या तुटपुंज्या वाचनात लक्षात राहिलेल्या आणि मूळ भाषेत वाचलेल्या कादंबऱ्या आहेत : ‘कलि कथा वाया बाइपास’ (अलका सरावगी),‘ नोकर की कमीज’ (विनोद कुमार शुक्ल), ‘माई’ (गीतांजली श्री). इंग्लिश अनुवादात वाचलेल्या आहेत : ‘बसाई टुडू’ (महाश्वेतादेवी), ‘सेई समय’ (सुनील गंगोपाध्याय), ‘संस्कारम्’ (यू. आर. अनंतमूर्ती), ‘Me Grandad and an Elephant (वायकोम मुहम्मद बशीर), आंगलियात The Stepchild’ (जोझेफ मक्वान).

शेवटी प्रश्न राहतो तो कोणत्या मराठी कादंबऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर दाद मिळाली आहे, हा. यासाठी दोनच मोजमापं आहेत.. कोणत्या कादंबऱ्यांचे इतर भाषांत अनुवाद झाले आहेत? आणि कोणत्या कादंबऱ्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत?

अनुवादित कादंबऱ्यांची हाती आलेली यादी : तमिळमध्ये ‘ययाती’ (वि. स. खांडेकर), सिंधीमध्ये ‘चानी’ (चिं. त्र्यं. खानोलकर), राजस्थानीमध्ये ‘मृत्युंजय’ (शिवाजी सावंत), पंजाबीमध्ये ‘रणांगण’ (विश्राम बेडेकर), मल्याळममध्ये ‘मृत्युंजय’ (शिवाजी सावंत), ‘सिंहासन’ (अरुण साधू), कन्नडमध्ये ‘कोसला’ (भालचंद्र नेमाडे), ‘महानायक’ (विश्वास पाटील), हिंदीमध्ये ‘ययाती’ (वि. स. खांडेकर), ‘बारोमास’ (सदानंद देशमुख), गुजरातीत ‘मृत्युंजय’ (शिवाजी सावंत), ‘कोसला’ (भालचंद्र नेमाडे), बंगालीमध्ये ‘राघववेळ’ (नामदेव कांबळे), आसामीमध्ये ‘ययाती’ (वि. स. खांडेकर), ‘रथचक्र’ (पेंडसे), ‘झाडाझडती’ (विश्वास पाटील).

साहित्य अकादमी पुरस्कृत कादंबऱ्या : ‘ययाती’ (खांडेकर), ‘रथचक्र’ (पेंडसे), ‘स्वामी’(रणजित देसाई), ‘सत्तांतर’ (व्यंकटेश माडगूळकर), ‘राघववेळ’ (नामदेव कांबळे), ‘ताम्रपट’ (रंगनाथ पठारे), ‘तणकट’ (राजन गवस), ‘बारोमास’ (सदानंद देशमुख), ‘भूमी’ (आशा बगे), ‘उत्सुकतेने मी झोपलो’ (श्याम मनोहर) आणि ‘उद्या’ (नंदा खरे).

ज्ञानपीठ पुरस्कार : ‘हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ’!

आंतरराष्ट्रीय मान्यता फक्त भारतीय लेखकांनी इंग्रजीत लिहिलेल्या कादंबऱ्यांना मिळालेली आहे. उदा. अरुंधती रॉय (The God of Small Things) आणि अरिवद अडिगा (The White Tiger). या वर्षी प्रथमच मूळ भारतीय भाषेतली गीतांजली श्री यांची ‘रेत की समाधी’ या कादंबरीच्या भाषांतरास बुकर प्राइझ जाहीर झालं आहे.

हा मान एखाद्या मराठी कादंबरीला मिळणं शक्य आहे का?

असा मान मिळण्यासाठी प्रथम एखादी कादंबरी इतकी वेगळी असावी लागेल की तिच्याकडे एखादी/ एखादा इंग्लिश भाषांतरकार आकृष्ट व्हावी/ व्हावा. दुसरं म्हणजे ‘रेत की समाधी’च्या अनुवादिकेचा जसा हिंदीचा अभ्यास आहे तसा त्या व्यक्तीने मराठी भाषेचा केलेला असावा. जगात असे किती भाषांतरकार असतील? या प्रश्नाच्या उत्तरात आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे.

shantagokhale@gmail.com

Story img Loader