भारतात ८१ कोटींपेक्षा जास्त मतदार असून, २०१४ची निवडणूक ही जगातील सर्वांत जास्त मतदारांनी भाग घेतलेली निवडणूक ठरली आहे. भारतीय जनता सध्या आपल्या १६व्या लोकसभेसाठी ५४३ खासदार निवडण्यात गुंतलेली आहे. ७ एप्रिलला सुरू झालेले हे मतदान नऊ टप्प्यांनंतर १२ मे रोजी संपेल व त्यानंतर १६मे रोजी मतमोजणी सुरू होऊन बहुदा त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत भारतीयांना आपला पुढील पाच वर्षांसाठीचा भाग्यविधाता कोण आहे हे कळेल.
आपली ही पाच आठवडे चालणारी निवडणूक जगातली सर्वात जास्त कालावधी घेणारी आणि आतापर्यंतच्या सर्व लोकसभेच्या निवडणुकांपेक्षा जास्त खर्चिक निवडणूक आहे. ३५०० कोटी रुपयांचा भार सरकारी तिजोरीवर पडणार असून, त्यात सुरक्षेवर होणारा खर्च धरलेला नाही. शिवाय विविध राजकीय पक्ष ३००० कोटी खर्च करतील, असा अंदाज आहे. हा खर्च २००९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूक खर्चाच्या तिप्पट असणार आहे. अमेरिकेने गेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत केलेल्या ७०० कोटी डॉलर्सच्या खर्चाच्या (४२०० कोटी रुपये) तुलनेत आपला दुसरा क्रमांक लागतो!
१५ व्या लोकसभेची मुदत ३१ मे रोजी संपत असून, त्या आधी नव्या सरकारचा शपथविधी करविण्याचे सर्व प्रयत्न केले जात आहेत.
आजच्या तारखेच्या परिस्थितीनुसार बहुतेक सर्व समीक्षकांचे, संख्याशास्त्रज्ञांचे व वेगवेगळ्या मतचांचण्या घेतलेल्यांचे एकमत आहे की या वेळी नरेंद्र मोदी विजयी होण्याची दाट शक्यता आहे.
भारताचे पंतप्रधान होऊ घातलेले मोदी आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन (१९८१ ते १९८९) यांच्यात बर्याच बाबीत साम्य दिसून येते. दोघांचा जन्म-खास करून मोदींचा-कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात झाला. रेगन व मोदी हे दोघेही राज्यपातळीवर तुफान लोकप्रिय व यशस्वी नेते ठरले आहेत. रेगन कॅलिफोर्नियाचे अधिशासक (गव्हर्नर)[१] होते तर मोदी गेली १२ वर्षें महात्मा गांधींची जन्मभूमी असलेल्या गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आहेत. १९११ साली जन्मलेले रेगन वयाच्या ६९ व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष झाले तर १९५० साली जन्मलेले मोदी विजयी झाल्यास वयाच्या ६४ व्या वर्षी आपले पंतप्रधान होतील. रेगन यांच्याप्रमाणेच मोदीही आपल्या ‘मोदीनॉमिक्स’ या मुक्त व्यापारव्यवस्थेवर आधारित अर्थव्यवस्थेचे आणि भ्रष्टाचारविरोधी सुधारणांचे उघड, खंदे पुरस्कर्ते आहेत. रेगन यांच्या ‘रेगनॉमिक्स’ या संज्ञेची आठवण करून देणार्या ‘मोदीनॉमिक्स’ने (मोदींच्या आर्थिक धोरणाने) गुजरातची आर्थिक भरभराट घडवून आणलेली आहे!
काही बाबतीत ते वेगळेही आहेत. उदा. रेगन यांनी पूर्वी हॉलीवूडच्या Love in the Air, Dark Victory, Knute Rockne, All American[२] व King’s Row अशा सुमारे वीस चित्रपटांत नायकाच्या भूमिका केलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा ‘ग्लॅमर’ आहे जो मोदींच्या व्यक्तिमत्वात दिसत नाही, पण त्यांचे व्यक्तिमत्व काही इतर स्वभावविशेषांमुळे भारतीय जनतेला भावले आहे. रेगन यांनी जेन वायमनशी व तिच्याबरोबर घटस्फोट झाल्यावर नॅन्सी डेव्हिसशी अशी दोन लग्ने केली, याउलट मोदींचा जरी जशोदाबेन यांच्याशी विवाह झालेला असला तरी त्यांनी रा.स्व.संघाच्या कार्याला वाहून घेतल्यामुळे वैवाहिक जीवनाकडे पाठ फिरविली होती. रेगन रोज जास्त तास काम करणार्यातले नव्हते. ते रोज रात्री ८ तास झोप घेत व त्यांना अर्ध्या रात्रीत कुणी उठवले नाही. एकदा आपल्या सहकार्यांना आपल्या धोरणाचे ठळक मुद्दे नीट समजावून सांगितले की त्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ते त्या त्या सहकार्यावर सोडत असत. या उलट मोदी रोज १६ तास आपल्या कार्यालयात कार्यमग्न असतात.
रेगन व मोदी यांच्या टीकाकारांमध्येही खूप साम्य आहे. अमेरिकन उच्चभ्रू वर्ग रेगन यांचा जसा तिटकारा करत असे अगदी तस्साच तिटकारा भारतातील आचार-विचाराने स्वत:ला उच्चभ्रू समजणारा वर्ग मोदींचा करतो[३]. एकेकाळी चहा विकणार्या व धड इंग्लिश बोलू न शकणार्या मोदींकडे ही मंडळी तुच्छतेने बघतात. (जणू काही रशियाचे सर्वेसर्वा पुतिन आणि चीनचे सर्वेसर्वा शी चिनपिंग (Xi Jinping) ‘फाडफाड’ इंग्लिश बोलतात!) रेगन निवडून आल्यास कसा हाहाकार उडेल याबद्दलची एक यादी (आणि घोर ताकीदही) त्यांच्या टीकाकारांनी अमेरिकन जनतेला दिली होती, आपल्याकडेही आपले मावळते पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जानेवारी २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून दिलेल्या आपल्या शेवटच्या पत्रकारपरिषदेत सांगितले की भाजपने पंतप्रधानपदासाठी निवडलेले उमेदवार नरेंद्र मोदी जर खरोखरच पंतप्रधान झाले तर भारताच्या दृष्टीने तो एक अनर्थ ठरेल. पण जसा रेगन यांच्या कारकीर्दीत सोव्हिएत राष्ट्रसंघाचा पाडाव झाला तसाच चमत्कार चीन-पाकिस्तानच्या संदर्भात मोदींच्या हातूनही घडो अशीच आशा त्यांच्या भारतीय समर्थकांना आहे.
हा अमेरिकन उच्चभ्रू वर्ग रेगनना ‘वर्णद्वेष्टा’ही मानत असे. कंबरडं मोडणार्या, संख्येने प्रचंड होत जाणार्या सरकारी नोकरशाहीऐवजी तगड्या, धडधाकट व वाढत्या व्यापारावर विसंबणार्या अर्थव्यवस्थेवर विश्वसणार्या व्यक्तींना समाजवादाकडे झुकणारा उच्चभ्रू वर्ग सर्वसाधारणपणे ‘वर्णद्वेष्टा’ ही संज्ञा वापरतो. उलट अशी अर्थव्यवस्थाच गरीबांची आणि अल्पसंख्याकांची उन्नती करण्याचा उत्तम मार्ग आहे, असे रेगन आणि मोदी मानतात.[४] प्रचंड संख्येची सरकारी नोकरशाही वैयक्तिक व उद्योगशहांच्या लोभी वृत्तीमुळे व एकमेकांच्या क्षेत्रांत हस्तक्षेप केल्याने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार फैलावण्यास पोषक ठरते व शेवटी अशी नोकरशाही कुठल्याही समस्येचा उलगडा करण्यात असमर्थ ठरते असे रेगन समजत. मोदींचाही भर शासनापेक्षा सुशासनावरच आहे.
गेल्या दहा वर्षांतला policy paralysis च्या रूपाने दिसणारा आपलाही अनुभव असाच आहे.
मोदींचे टीकाकार स्वाभिमानी हिंदूधर्मीय असलेल्या मोदींनाही वर्णद्वेष्टे समजतात. ही संज्ञा जशी रेगनना लागू पडत नव्हती, तशीच ती मोदींनाही लागू पडत नाही. या संज्ञेचा दुरुपयोग मोदींचे राजकीय विरोधक अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी व त्यातून अल्पसंख्याकांचे अनुमोदन स्वत:कडे खेचण्यासाठी करतात. गुजरातेत हिंदू यात्रेकरूंना नेणार्या रेल्वेला लावलेल्या आगीत ६० लोक मृत्यू पावले. या जाळपोळीला मुस्लिम दंगलखोर जबाबदार होते हे कानावर आल्यावर मुस्लिमविरोधी उग्र दंगल उसळली आणि त्यात शेकडो लोक बळी पडले. मोदींच्या कारकीर्दीवर २००२ सालच्या या मृत्यूंचे सावट पडलेले आहे. दंगलीत सापडलेल्या मुस्लिम समाजाच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी संचारबंदी पुकारणे, लष्कराला पाचारण करणे व दंगलखोरांना दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश देणे यासारखी अनेक पावले दंगल आटोक्यात आणण्यासाठी मोदींनी उचलली. तरीही त्यांच्यावर दंगलीपासून मुस्लिमांचे संरक्षण करण्यासाठी पुरेसे उपाय न योजल्याचेच नव्हे तर दंगलींकडे काणाडोळा केल्याचेही आरोप त्यांच्या विरोधकांनी केले आहेत.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची चौकशी करण्यासाठी एका खास अन्वेषण गटाची (SIT) स्थापना केली. या गटाच्या अन्वेषणातून मोदींविरुद्धचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे उघडकीस आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने ते निर्दोष असल्याचे जाहीर केले. मोदींच्या राजकीय विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निष्कर्षाकडे दुर्लक्ष करून त्यांच्याविरुद्धची चारित्र्यहननाची व वर्णद्वेष्टे म्हणण्याची मोहीम (आणि त्यातून आपला राजकीय स्वार्थही) सुरूच ठेवला आहे.
भारतात इतर धर्म स्थापले जाऊन त्यांची भरभराट झालेली आहे हे भारतीय हिंदू बहुसंख्यांकांच्या सहिष्णुतेला मिळालेले प्रमाणपत्रच आहे. याउलट शेजारच्या पाकिस्तानात व बांगलादेशात तेथील मुस्लिम बहुसंख्यांकांच्या मतांनुसार न वागल्यास तेथील अल्पसंख्यांकाना अतिशय प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागले आहे व त्या कशाबशा जिवंत आहेत. अल्पसंख्यांकांबाबत असहिष्णू असल्याचे बिनपुराव्याचे आरोप मोदींवर करताना ते दक्षिण आशियातील चालू परिस्थितीतील प्रमाणांकडे दुर्लक्ष करून बोलत असतात.
पाकिस्तानप्रणीत दहशतवादाविरुद्ध कठोर धोरण स्वीकारण्याचे आश्वासन मोदींनी दिलेले आहे. हे अमेरिकेच्या धोरणाशी सुसंगत आहे. मुस्लिम दहशतवादी जगातील सर्व बिगर-मुस्लिम राष्ट्रांबरोबर लढत आहेत. त्यात थायलंडमधील बुद्धधर्मीय आले, नायजेरिया, फिलिपीन्स, चेचन्या, सायप्रस, कोसोवो, बोस्निया, मॅसेडोनिया, आयव्हरी कोस्ट, सुदान (व पूर्वी इंडोनेशियाचा भाग असलेल्या) लेस्ते-तिमूर या देशांतील ख्रिश्चनधर्मीय आले, इस्रायलमधील ज्यूधर्मीय आले, संपूर्ण मुस्लिम जगतातील अल्पसंख्यांक आले व शेवटी ‘दहशतवादाविरुद्धच्या युद्धा’च्या आघाडीवर असलेल्या भारतातील बहुसंख्यांक हिंदूही आले.
मोदींचा पाकिस्तानविरुद्धच्या खंबीर पवित्रा रेगन यांच्या सोवियेत संघराज्याविरुद्धच्या खंबीर पवित्र्याची आठवण करून देतो व म्हणून मोदींना अमेरिकेने स्वाभाविक मित्र मानणे अमेरिकेच्या हिताचे आहे.
मोदी जर खरोखर भारताचे पंतप्रधान झाले तर तो भारताच्या राजकारणातील एका महत्वाच्या बदलाचे निदर्शक ठरेल. पंतप्रधानपदासाठी मोदींचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत नेहरू-गांधी ‘राजघराण्या’चे वंशज राहुल गांधी. स्वातंत्र्यप्राप्तीपासून या घराण्याने भारतावर थोडा काळ सोडला तर सातत्याने राज्य केलेले आहे. इटलीत जन्मलेल्या आणि भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधींच्या पत्नी व राहुल गांधींच्या मातोश्री सोनिया गांधी सध्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आहेत. राजीव गांधी इंदिरा गांधींचे सुपुत्र आणि भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचे नातू होत.
या सर्व गांधी कुटुंबियांचा महात्मा गांधींशी कांहीच संबंध नाहीं. इंदिरा गांधींनी ज्या गृहस्थाशी लग्न केले त्याने आपले मूळ आडनाव बदलून गांधी ठेवून घेतले आणि पहाता-पहाता या ‘गांधी’ नावाने जणू जादूच केली आणि ते कायमचे ‘नेहरू’ या राजवंशाला जोडले गेले. नेहरू राजवंशाच्या (आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या) कारकीर्दीत भारत आपल्या खर्याखुर्या आर्थिक क्षमतेची पातळी कधी गाठूच शकलेला नाही! याचे कारण आहे काँग्रेस पक्षाचे पक्षपाती, भ्रष्ट, बेगडी समाजवादी धोरण! बर्याच लोकांना असे वाटते की ‘मोदीनॉमिक्स’मुळे भारताची स्वाभाविक उद्योजकता तिच्या बंधनांतून मुक्त होऊन तिच्यात एक नवा जोश उत्पन्न होईल व त्यामुळे भारताची आर्थिक प्रगती उंच भरार्या मारू लागेल. मोदींच्या नेतृत्वाखाली झालेला गुजरातचा आर्थिक विकास सर्व विभागांना-खास करून गरीबांना[५]- एक वरदान ठरला आहे. हा भक्कम पुरावा भविष्यकाळातील भारताच्या प्रगतीच्या दृष्टीने आशादायक आहे.
अमेरिकेतील काही वर्तुळांतील मंडळींनी मोदींना जणू वाळीतच टाकलेले आहे. अशाच अमेरिकन मंडळींनी एके काळी रेगन यांनाही वाळीत टाकले होते. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील नोकरशहांमध्ये खूप आधीपासून डाव्या विचारसरणीच्या उच्चभ्रूंचा प्रभाव व वर्चस्व आहे. आणि हा उच्चभ्रू गट आजपर्यंत मोदींना अमेरिकेला भेट देण्यासाठी आवश्यक असलेला व्हिसा नाकारत आलेला आहे. मोदींवर आग पाखडणारे प्रमुख टीकाकार आहेत डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधीगृहाचे सदस्य कीथ एलीसन. यांनी काही लोकांना हाताशी धरून मोदींना अमेरिकेचा व्हिसा अद्यापपर्यंत तरी यशस्वीपणे नाकारलेला आहे.
मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या पहिल्या पाच वर्षाच्या काळात अमेरिकेला भेट देण्याचे टाळावे, असे मला वाटते. आजच्या जागतिक राजकीय पटावर आशिया खंडाचे वाढते महत्व व तेथील चीनचा वाढता प्रभाव पहाता आज तरी अमेरिकेला भारताची जास्त गरज आहे व त्यादृष्टीने हे धोरण चांगलेच ठरेल, असे मला वाटते.
अर्थक्षेत्रातील सरकारी हस्तक्षेप, आपल्या पित्त्यांना पक्षपात करून सवलती देणाचे प्रकार, भ्रष्टाचार अशा गोष्टींना प्रखर विरोध करणार्या मोदींची धोरणे रेगन यांच्या धोरणांशी खूप मिळती-जुळती आहेत. थोडक्यात असे दिसते की भारताला आपले ‘देसी’ रेगन सापडलेले आहेत! या उलट आपल्या चुकीच्या धोरणांमुळे नोकरशाहीच्या भाराखाली वाकलेल्या अमेरिकेला स्वत:चा ‘अमेरिकन मोदी’ शोधावा लागणार आहे काय?
रेगन यांच्याबद्दल बरेच लोक म्हणतात की ते एक आदर्श किंवा परिपूर्ण व्यक्ती कधीच नव्हते व त्यांनी खूप चुकाही केल्या. पण ट्रूमनपासून तो ओबामापर्यंतच्या राष्ट्राध्यक्षात जर कुणी एका राष्ट्राध्यक्षाने अमेरिकन जनतेला ते अमेरिकन असल्याबद्दल व अमेरिकन राष्ट्राबद्दल अभिमान वाटू दिला असेल तर तो रेगन यांनीच. मला खात्री आहे की मोदींच्या कारकीर्दीनंतर भारतीयांनाही असेच वाटेल.
रेगन यांच्याप्रमाणे मोदीही उपजत लोकनायक आहेत. रेगन राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांच्या प्रभावी नेतृत्वगुणांमुळे अनेक डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते (सिनेटर्स व प्रतिनिधीगृहाचे सभासद) “रेगन डेमोक्रॅट्स” म्हणवून घेऊ लागले. मोदी पंतप्रधान झाल्यावर काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार-खासदार स्वत:ला “मोदी काँग्रेसजन” म्हणवून घेऊ लागले तर त्यात नवल वाटायला नको!
टिपा व संदर्भ:
[१] राज्यपाल हा शब्द तितकासा योग्य वाटत नाही
[२] या चित्रपटात त्यांनी जॉर्ज “द गिप्पर” गिप या सुप्रसिद्ध फुटबॉल खेळाडूचे काम केले होते व त्यामुळे त्यांना ‘गिप्पर (Gipper)’ असे टोपणनावही पडले.
[३] अमेरिकेत आहेत की नाहीत माहीत नाही, पण गोर्या लोकांच्या, खास करून ब्रिटिशांच्या, होकाराने धन्य पावणारे उच्चभ्रू भारतात आजही आहेत. आयुर्वेद श्रेष्ठ आहे हे पटविण्यासाठी आजही आपल्यातले काही ढुढ्ढाचार्य गोर्या लोकांनी आयुर्वेदाला दिलेले प्रशस्तीपत्रक वापरताना आपण पाहतोच ना?
[४] जसे मोदी “शासन कमी, पण सुशासन हवे” यावर भर देतात तसेच रेगनही म्हणायचे की सरकार हे कुठल्याही समस्येवरचा उतारा नाही, उलट सरकारचे फाजील अस्तित्वच एक समस्या आहे. (In this present crisis, government is not the solution to our problem; government is the problem.) अर्थात हे अगदी टोकाची भूमिका झाली कारण या विधानाने अमेरिकन जनतेची दिशाभूल झाली व ते आता आपल्या सरकारलाच शत्रू मानू लागले आहेत असे मानणारेही अमेरिकन आहेत. सरकार कधी-कधी समस्या असू शकते पण सरकार हीच एक समस्या आहे असे नाही. व्यक्तींमध्ये व भांडवलशहांमध्ये राजकीय भांडणे लावणारी लोभी वृत्तीच समस्या बनू शकते व मग सरकार कुठलीही समस्या सोडवायला असमर्थ बनते हा गेल्या दहा वर्षांतला policy paralysis च्या रूपाने दिसणारा आपलाही अनुभव आहेच.
[५] मोदींनी प्रथमच जाती-धर्माचा उपयोग न करता आर्थिक विकास व सुशासन या मुद्द्यांवर निवडणूक लढविल्यामुळे नेहमीचे मुद्दे वापरता येईनासे झाले, म्हणूनच की काय, पण गुजरातचा आर्थिक विकास हा एक वादग्रस्त मुद्दा झालेला आहे. तो गरीबांनाही कसा एक वरदान ठरला आहे हे ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये प्रकाशित झालेल्या खालील लेखात वाचता येईल.
https://indianexpress.com/article/opinion/columns/gujarats-inclusive-growth/99/
– लेखक-संकलक : सुधीर काळे
sbkay@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)
BLOG : स्वत:चा ‘रेगन’ निवडायला निघालेले भारतीय मतदार!
भारताचे पंतप्रधान होऊ घातलेले मोदी आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन (१९८१ ते १९८९) यांच्यात बर्याच बाबीत साम्य दिसून येते.
First published on: 28-04-2014 at 12:25 IST
TOPICSनरेंद्र मोदीNarendra Modiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sattarth blog on ronald reagan narendra modi