कोल्हापुरात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी भाषणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फिल्मी अंदाजात ‘आता आमची सटकली, आम्हाला राग येतोय’ म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केला.
सभेत गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या युतीवरील टोमणेबाजीला उपस्थित राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. आर.आर.पाटील यांच्या भाषणाला मिळालेल्या प्रतिसादाचा धागा पकडून अजित पवार म्हणाले की, “आबांचे भाषण ऐकून जनतेची युतीबद्दलची भावना ‘आता आमची सटकली, आम्हाला राग येतोय’ अशी झाली आहे.” असे म्हटले.
मोदी सरकारने देशाच्या जनतेला खोटी आश्वासने देऊन फसविले आहे. त्यामुळे आता लोकांना आता त्याबद्दल राग येऊ लागला आहे. विधानसभेवर आजपर्यंत कधीही निवडून न गेलेले विनोद तावडे काहीही बरळू लागले आहेत. अशी झोंबरी टीकाही अजित पवार यांनी यावेळी केली. तसेच आघाडी सरकारवरील आरोपांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे असे मतही अजित पवार यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर आणि खारघर टोल शंभर दिवसांत बंद करण्याचे आश्वासनही अजित पवार यांनी कोल्हापूरच्या सभेत दिले. लोकांना समजून घेण्याची ताकद आणि धमक राष्ट्रवादीमध्ये आहे. त्यामुळे जनता पुन्हा एकदा आघाडीच्या बाजूने कौल देईल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.