अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे संत नामदेवांची कर्मभूमी म्हणून पंजाबमधील घुमानचा सध्या गाजावाजा सुरू आहे. मात्र, संत नामदेवांची ‘नरसी’ वेगवेगळ्या कारणांनी उपेक्षितच राहिली. हिंगोली जिल्ह्य़ातील नरसीपर्यंत जाताना हाडे खिळखिळीच होतात. पोहोचल्यावर ना राहण्याची सोय, ना भोजनाची व्यवस्था. २९ वर्षांपूर्वी माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग नामदेवाच्या जन्मगावी येणार, अशी बातमी आली होती, तेव्हापासून विकासासाठी निधी येतो, अर्धवट खर्च होतो. विकासाचे अर्धवट अवशेष कोठे कोठे दिसतात. बाकी नरसी उपेक्षितच!
संत नामदेवांचा जन्म सन १२७० मध्ये हिंगोली जिल्ह्य़ातील नरसी येथे झाला. १३५० मध्ये त्यांनी समाधी घेतली. आयुष्यभर वारकरी संप्रदायाची पताका खाद्यांवर घेऊन संत नामदेव पंजाबपर्यंत गेले. साहित्यिकांना पंजाबमधल्या घुमानचे भलते कौतुक. मात्र, नरसीचा उल्लेखही कोठे होत नसल्याची खंत हिंगोलीच्या साहित्य क्षेत्रातील मंडळी व्यक्त करीत आहेत.
विकासाचे अर्धवट अवशेष
तीर्थक्षेत्र विकास निधीतून भक्तनिवास बांधण्यासाठी तीन वर्षांपूर्वी ९९ लाख ९७ हजार रुपये आले. २५ लाख खर्च झाले. त्याचे भग्नावशेष आता शिल्लक आहेत. १५ वर्षांपूर्वी भाविकांच्या सोयीसाठी ३६ लाख रुपये मिळाले होते. त्यातून १२ खोल्या बांधल्या गेल्या. तेथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणारे ३५ विद्यार्थी राहतात. पर्यटन विभागाने हिंगोली-रिसोड रस्त्यावर पर्यटन निवासही बांधले होते. त्याची अवस्था एवढी वाईट आहे, की कोणी तिकडे फिरकतच नाही. येणाऱ्या भक्तांसाठी साधी स्वच्छतागृहाची सोय सध्या उपलब्ध नाही.
‘१०० कोटींचा निधी हवा’
नांदेड येथील गुरू-ता-गद्दीच्या धर्तीवर नरसी नामदेव तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने १०० कोटींचा निधी द्यावा, अन्यथा शिवसेना या प्रश्नी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करील, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी दिला.
नामदेव मंदिरासमोर मंगळवारी या प्रश्नी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. नरसी येथील शिवसेनेच्या उपोषणाच्या भूमिकेविषयी थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली. घुमान येथील मराठी साहित्य संमेलनासाठी लाखोंचा निधी मंजूर करण्यात आला. इतकेच नव्हे, तर घुमान साहित्य संमेलनासाठी पुणे, मुंबईच्या लोकांसाठी विशेष सुविधा देण्यात आल्या. परंतु मराठवाडय़ाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप थोरात यांनी केला.

तुकाराम झाडे, हिंगोली</strong>

Story img Loader