विधानभवनाच्या इमारतीत पोलीस अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही चित्रीकरण अस्पष्ट असल्याने ‘ठोकशहा’ आमदार सुटण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच, या मारहाण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमधील एक सदस्य आमदार आर. एम. वाणी यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाणी यांनी जेमतेम सहा-सात महिन्यांपूर्वी पाटबंधारे विभागाच्या तीन अभियंत्यांना आपल्या निवासस्थानी बोलावून मारहाण केली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. असे असताना या महोदयांची विधिमंडळातील हाणामारी प्रकरणाच्या चौकशी समितीत वर्णी लावली गेल्याने पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत.
 या समितीत सदस्य म्हणून दिलीप सोपल, नवाब मलिक, आर. एम. वाणी, सदाशिव पाटील, गिरीश बापट व अ‍ॅड. उत्तम ढिकले या सर्वपक्षीय आमदारांचा समावेश आहे. सदस्यांची निवड करताना नेमका कोणता निकष लावला गेला, याचे मात्र कोडे आहे. कारण समितीतील सदस्य वैजापूरचे शिवसेनेचे आमदार वाणी यांच्याविरुद्ध पाटबंधारे विभागाच्या तीन अभियंत्यांना मारहाण केल्याचा गुन्हा वैजापूर पोलीस ठाण्यात दाखल आहे. १४ ऑगस्ट २०१२ रोजी हा प्रकार खुद्द आमदार महोदयांच्या निवासस्थानी घडला होता. आदल्या दिवशी कालव्यावरील अनधिकृत उपसा बंद करण्याची कारवाई करण्यात आली. या संदर्भात शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर आ. वाणी यांनी नांदूरमध्यमेश्वर कालवा उपविभाग कार्यालयातील तीन अभियंत्यांना निवासस्थानी बोलावून घेतले. त्यात के. पी. धात्रक, व्ही. डी. कुलकर्णी आणि पी. डी. सानप यांचा समावेश होता. वाणी यांनी अर्वाच्च शिवीगाळ करत त्या तिन्ही उपअभियंत्यांच्या श्रीमुखात लगावली. एवढेच नव्हे, तर उपस्थित शेतकऱ्यांनाही चिथावणी देऊन मारण्यास सांगितले.  आ. वाणी यांच्यासह शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  या घटनेमुळे अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण झाले. त्यातील एक जण तर सहा महिन्यांपासून रजेवर असून ते सेवानिवृत्तीच्या निर्णयाप्रत आले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार महोदयांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले; परंतु जिल्हा व उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. सध्या ते या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले जाते. त्याची माहिती तक्रारदाराने ‘लोकसत्ता’ला दिली.

पाणी सोडण्यावरून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी वाद झाला ही वस्तुस्थिती असून त्याबाबत आपल्या विरोधात पोलिसांनी कारवाई करावी. सत्य काय ते न्यायालयात स्पष्ट होईल.     
– आर.एम. वाणी