राहुल गांधी यांना पंतप्रधान बनविण्याची घाई झालेल्या काँग्रेसने लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी नक्षलवाद्यांची मदत मागितली असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकसत्ता’च्या हाती आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह हे यासाठी नक्षलवाद्यांच्या संपर्कात होते. या मदतीच्या बदल्यात, काँग्रेसची सत्ता आल्यानंतर नक्षलग्रस्त भागांतील सुरक्षा सैनिकांची संख्या कमी केली जाईल, असे आश्वासन त्यांच्यातर्फे देण्यात आले. काही नक्षलवादी नेत्यांच्या संभाषणातून ही खळबळजनक बाब उघड झाली असून, या संभाषणाची ध्वनिफीतच गुप्तचर यंत्रणांकडे असल्याचे समजते.
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि आंध्र प्रदेशचे प्रभारी दिग्विजय सिंह यांनी सर्वप्रथम गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये काही खास दूतांमार्फत नक्षलवादी नेत्यांशी संपर्क प्रस्थापित केला. त्या वेळी छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण होते. राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे असल्याने वातावरणनिर्मितीसाठी ही विधानसभा निवडणूक जिंकणे आवश्यक असून, त्यासाठी मदत करावी, अशी विनंती सिंह यांनी या नेत्यांना केली. त्यांनी त्यावर बराच खल केला आणि अखेर आता बराच उशीर झाल्याने मदत करता येणार नाही, असे सिंह यांना कळविले. विधानसभेसाठी मदत मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर दिग्विजय यांनी पुन्हा दूतांमार्फत नक्षलवाद्यांशी संपर्क साधला आणि लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला
मदत करावी, असे सुचविले. त्यावर, विचार करू असे उत्तर नक्षलवादी नेत्यांनी दिले. या संदर्भात काही बडय़ा नक्षलवादी नेत्यांमध्ये झालेले संभाषण गुप्तचर यंत्रणांनी ध्वनिमुद्रित केले आहे.
राहुल गांधी यांना पंतप्रधान बनविता यावे याकरिता जास्तीत जास्त जागाजिंकणे आवश्यक आहे, असे सिंह यांचा दूत सांगत असल्याचे या संभाषणातून स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यास नक्षलवादी चळवळीचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या बस्तर व ओडिशा या भागांतील सुरक्षा सैनिकांची संख्या कमी केली जाईल, असा प्रस्ताव सिंह यांनी दिल्याचेही समोर आले आहे.
नक्षलवाद्यांनी या गोपनीय संभाषणात अनेक सांकेतिक शब्द वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. दिग्विजय सिंह यांच्या दूताचे नाव घेणेसुद्धा त्यांनी टाळले आहे. आंध्र प्रदेशातील वारंगल जिल्ह्यात  सक्रिय असलेला जहाल नक्षलवादी हरिभूषण याने मात्र या दूताचा ‘सेठजी’ असा उल्लेख केला आहे. एका संभाषणात तर ‘या गोष्टी दूरध्वनीवर बोलणे योग्य नाही, प्रत्यक्ष भेटून बोलणेच योग्य ठरेल,’ असेही या दूताला सुचवण्यात आले आहे.
राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण करणाऱ्या या चळवळीचा नायनाट झाला पाहिजे, असे उच्चरवात सांगणाऱ्या काँग्रेसचे नेतेच स्वार्थासाठी या िहसक चळवळीची मदत घेण्यासही मागेपुढे पाहत नसल्याचे या संभाषणातून स्पष्ट झाले आहे. गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी या वृत्तास पुष्टी दिली आहे.

उमेदवारांची नावेही सुचवा!
दिग्विजय सिंह यांच्या दूताने हा मदतीचा प्रस्ताव देताना लोकसभा निवडणुकीत चळवळीचा प्रभाव असलेल्या भागात नक्षलवाद्यांनीसुद्धा काही उमेदवारांची नावे सुचवावीत, असेही काँग्रेसच्या वतीने सांगितल्याचा उल्लेखही नक्षलवाद्यांच्या संभाषणाच्या ध्वनिफितीत आहे.

“हा माझ्या विरोधातील दुष्प्रचार आहे. मी कधीही नक्षलवाद्यांशी चर्चा केली नाही वा त्यांना भेटलो नाही. नक्षलवादी चळवळीला मी नेहमीच तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे मी स्वत: अथवा माझ्या वतीने अन्य कुणीही नक्षलवाद्यांशी चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीपूर्वी मी नक्षलवाद्यांशी हातमिळवणी केल्याचे वृत्त निराधार आहे. मला बदनाम करण्यासाठी भारतीय जनता पक्षानेच हे कुंभाड रचले आहे.”
दिग्विजय सिंह, राष्ट्रीय सरचिटणीस, काँग्रेस</strong>

Story img Loader