टोलनाक्यावर लागू असलेला टोल नाकारत तेथील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून तोडफोड आणि मारहाण केल्याच्या आरोपावरून गोवा पोलिसांनी अटक केलेल्या उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र व स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. नीतेश राणे यांच्यासह त्यांच्या तीन इतर सहकाऱयांचाही जामीन मंजूर केला आहे.
सिंधुदुर्ग-गोवा मार्गावरील पेडणे तालुक्यातील धारगळ येथे ही घटना घडली होती.
नीतेश राणे व त्यांचे सहकारी पेडणेच्या दिशेने जात होते. त्यावेळी महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांच्या हद्दीवर असलेल्या पेडणे तालुक्यातील धारगळ येथे टोलनाका आहे. या ठिकाणी टोल भरण्यावरून नीतेश व त्यांच्या सहकाऱ्यांचा टोल कर्मचाऱ्यांशी वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसान टोलनाक्याच्या तोडफोडीत झाले. त्यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी नीतेश व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आधी राणे व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले व नतंर अटक केली. पुढील तपास सुरू आहे. नीतेश यांच्या अटकेचे वृत्त समजताच पेडणे तालुक्यातील संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी पोलिसांविरोधात घोषणाही दिल्याचे समजते. नीतेश यांच्या सुटकेसाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. याआधीही नीतेश अनेकदा वादात अडकले आहेत. स्वाभिमान संघटनेचाच कार्यकर्ता असलेल्या चिंटू शेखवर गोळीबार केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखलकेला होता. ‘झेंडा’ चित्रपटात नारायण राणे यांचे विडंबन करण्यात आल्याचा आरोप करून त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनाही धमकावले होते.
टोलनाका मारहाण प्रकरण: नीतेश राणेंना जामीन मंजूर
टोलनाक्यावर लागू असलेला टोल नाकारत तेथील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून तोडफोड आणि मारहाण केल्याच्या आरोपावरून गोवा पोलिसांनी अटक
First published on: 04-12-2013 at 02:39 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mp nitesh rane arrested for smashing goa toll booth