भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या संभाव्य स्वतंत्र वाटचालीने शहरात शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. मात्र सायंकाळी राज्याच्या पातळीवर दोन्ही पक्ष एक पाऊल मागे सरकल्याने शिवसेनेने सुस्कारा टाकला असून युती तुटणार नाही असा दावा केला जात आहे. शहरात भाजपच्या गोटात मात्र या गोष्टीचे स्वागत करण्यात येत होते. स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चाही सुरू झाली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर राज्यात भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या मार्गावर असली तरी स्थानिक पातळीवरील शिवसेनेचे पदाधिकारी युती तुटू नये यासाठी अजूनही देव पाण्यात घालून बसले आहेत. राज्यात या दोन्ही पक्षांची युती झाली तेव्हापासून नगर शहरात शिवसेनेचाच आमदार आहे. युती झाल्यानंतरच्या पहिल्याच म्हणजे सन १९९० च्या निवडणुकीत आमदार अनिल राठोड यांनी बाजी मारली, तेव्हापासून तेच आमदार आहेत. विधानसभेच्या सलग पाच निवडणुका जिंकताना त्यांचे मताधिक्क्य़ चढत्या क्रमाने वाढतच गेले. मात्र यात भाजप आणि संघ परिवाराचाही मोठा वाटा आहे. त्यामुळेच युतीबाबत साशंकता निर्माण झाल्याने शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली.
महानगरपालिका आणि लोकसभा, या नुकत्याच झालेल्या दोन्ही निवडणुकांचीही पार्श्र्वभूमी त्याला आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये शहरात भाजप-शिवसेना युतीची पाळेमुळे खिळखिळी झाली. त्या वेळी दोन्ही पक्षांत कमालीची कटुता निर्माण झाली. विशेषत: भाजपमध्ये त्याबद्दल रोष आहे. युतीचे संरक्षण कवच असल्याने हा रोष प्रकट होत नाही. मात्र युतीच फिस्कटली तर हक्काच्या मतपेढीत मोठा गाळा निर्माण होईल, या शंकेनेच शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता होती. मात्र सायंकाळी राज्याच्या पातळीवर पुन्हा दिलजमाईच्या हालचाली दिसू लागल्याने शिवसेनेला दिलासा मिळाला. दरम्यान, युतीचा निर्णय काही का होईना आमदार अनिल राठोड यांनी त्यांच्या प्रचाराची आघाडी कायम ठेवली आहे, मात्र त्यात भाजपचे कार्यकर्ते सध्या तरी अभावानेच दिसतात.