कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव या दोन प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांबद्दल राज्यतील शेतकऱ्यांनी गुरुवारी बेमुदत संपाचे हत्यार उपसले. या संपाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील बहुतांश भागातील कृषी मालाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार, वाहतूक ठप्प झाली. अनेक भागांत शेतीमाल, दूध घेऊन जाणारी वाहने अडवण्यात आली. काही ठिकाणी या वाहनांवर दगडफेक, आग लावण्याच्याही घटना घडल्या. नाशिक जिल्हय़ातील पिंपळगाव जलाल टोल नाका, नगर जिल्हय़ातील कोपरगावमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागून दगडफेक, वाहनांची जाळपोळ आणि लूटमारीच्या मोठय़ा घटना घडल्या. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पिंपळगावमध्ये हवेत गोळीबार, तर कोपरगावमध्ये लाठीमार करण्यात आला. दरम्यान, संपामुळे मुंबई, पुण्यासह सर्व शहरांमधील शेतमालासह दुधाची आवक घटल्यामुळे महागाई भडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या संपाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील बहुतांश भागातील कृषी सेवाही विस्कळीत झाली. राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये शेतमालाची आवक पूर्णपणे थंडावली होती. बाजार समित्यांमधील लिलाव गुरुवारी बंद होते. शेतमाल आणि दुधाची वाहतूक करणारी वाहने महामार्गावरच अनेक ठिकाणी अडवण्यात आल्याने शहरात जाणारा भाजीपाला आणि दूध रोखून धरण्यात आले. या संपास राज्याच्या सर्व भागांत मोठा प्रतिसाद मिळाला असला तरी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नगर जिल्हय़ात या आंदोलनाचा जोर मोठा होता.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारकीर्दीत प्रथमच मोठय़ा प्रमाणावर शेतकऱ्यांचा उद्रेक रस्त्यावर आल्याने भाजपमध्ये चिंतेचे वातावरण असून सरकारचे धाबे दणाणले आहे. संप हा शेतकऱ्यांच्या हिताविरोधात असून ‘संघर्ष’ यात्रांना प्रतिसाद न मिळाल्याने हिंसा घडवून तो चिघळविण्याचा विरोधकांचा राजकीय डाव असल्याचा स्पष्ट आरोप फडणवीस यांनी केला.
Live Updates:

३.००: नाशिक येथे शेतकऱ्यांनी फळं आणि भाजीपाला फेकून दिला.

२.४५: मोहोळ (जि. सोलापूर) येथील शेतकरी आक्रमक, सोलापूर-पुणे महामार्गावर दूध ओतले.

२.३०: अकलूज (ता. माळशिरस, जि. सोलापूर) कृषी उपन्न बाजार समितीत १०० टक्के आवक बंद

२.१५: पुणे- सोलापूर महामार्गावर भाजी रस्त्यावर फेकून देऊन शेतकरी संपात सहभागी

२.००: वाखरी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) मुख्यमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळयास दुधाचा अभिषेक आणि जोडो मार आंदोलन

१.३०:

११.५५: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा

११.४५: औरंगाबाद येथील जाधवमंडीतील  कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली, भाजीपाल्याची ६० टक्के आवक घटली.

११.२५: शिर्डीत दूध वाटप करताना शेतकरी

११.१०:

११.००: महानंदचा भुकटीपासून दूध तयार करण्याचा प्रस्ताव

१०.३०: पुणतांब्यामध्ये सकाळी ११ वाजता किसान कोअर कमिटीची बैठक होणार

१०.१५: नाशिक- सिद्धपिंपरीत धान्य रस्त्यावर फेकले

१०.००: पंढरपूरमध्ये डाळिंबाचे सौदे बंद

९.४५: दुसऱ्या दिवशीही नगरमध्ये शेतकऱ्यांचा संपाला प्रतिसाद

९.३०: पुणे बाजार समितीमध्ये ७ टक्के मालाची आवक

९.१५: दुधासाठी लोकांच्या रांगा, व्यापाऱ्यांकडून काल उरलेल्या भाज्यांची विक्री

९.००: दादर मार्केटमध्ये भाज्यांचा तुटवडा नाही, ५० ते ६० गाड्यांची आवक

८.४५: मुंबईत मोठ्याप्रमाणात दुधाचा तुटवडा

८.३०: महानंदच्या दुधाची फक्त १५ हजार २०० लिटर इतकीच आवक

८.२०:  इंदापूर- मिरच्यांची पोती रस्त्यावर टाकून शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध

८.१५: वसई- विरार भागात दुधाची आवक ३० टक्क्यांनी घटली.

८.१०: येवला पिंपळगाव जलाल भागात १४४ कलम लागू

८.००: ठाणे बाजार समितीत एकाही गाडीची आवक नाही.

७.५०: लातूर बाजारसमितीत ४० टक्के भाज्यांची आवक
७.४०: मनमाड, येवला, लासलगाव येथे एकही भाजीपालाची गाडी आली नाही.
७.३०: नवी मुंबई बाजार समितीत फक्त १४० गाड्या शेतमालाची आवक. दररोज होते ५०० गाड्यांची आवक

Story img Loader