राजकीय वैमनस्यातून पाच जणांनी धारदार शस्त्रांसह पाठलाग करून आकुंभे (ता. माढा) गावच्या सरपंचाचा निर्घृणपणे खून केला. सोलापूर-पुणे महामार्गावर सापटणे पाटीजवळ भरदुपारी हा खुनाचा प्रकार घडल्यामुळे माढा तालुक्यातील राजकारण पुन्हा बदनामीच्या फेऱ्यात अडकले आहे.
संदीप सुभाष कदम (३५) असे खून झालेल्या सरपंचाचे नाव आहे. मारेकऱ्यांच्या हल्ल्यात कदम यांचे सहकारी बालाजी अभिमान कदम (२०, रा. आकुंभे) हेदेखील जखमी झाले. त्यांच्यावर अकलूजच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात पांडुरंग प्रद्मुम्न ढवळे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सरपंच संदीप कदम यांच्यावर दोन वर्षांपूर्वी राजकीय वैमनस्यातून खुनी हल्ला झाला होता. त्यानंतर माढा तालुका कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही विरोधी गटातील अनिल कदम यांच्यावर हल्ला झाला होता. दोन महिन्यांपूर्वी दोन्ही गटांनी सामंजस्याने वाद मिटविला होता. मात्र तरीही सरपंच संदीप कदम यांच्यावरील रागापोटी मारेकऱ्यांनी त्यांचा खून केला. याप्रकरणी मारुती भानुदास कदम, उत्तम भालचंद्र कदम, कालिदास वामन कदम, रावसाहेब राहू कदम व सिद्धेश्वर भैरू कदम (रा. आकुंभे) यांच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मृत सरपंच संदीप कदम हे बालाजी कदम यांच्यासह मोटारसायकलवरून टेंभुर्णी येथून आकुंभे गावाकडे परत निघाले होते. ते सापटणे पाटीजवळ आले असता पाठीमागून पिकअप व्हॅनमधून पाठलाग करीत आलेल्या मारेकऱ्यांनी संदीप कदम यांच्यावर सळई, टॉमी आदी शस्त्रांनी जोरदार हल्ला केला. त्याच वेळी पाठीमागून निघालेले आकुंभे गावचेच पांडुरंग ढवळे व अमोल कदम हे घटनास्थळी पोहोचल्याने मारेकरी पळून गेले.