गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी सोमवारी बाजारत एकच गर्दी झाली होती. ग्राहकांनाआकर्षित करण्यासाठी व्यापा-यांनी सवलतीच्या अनेक योजनांही जाहीर केल्या आहेत. सोन्याचे दर कमी झाल्याने सुवर्ण खरेदीला ग्राहकांनी प्राधान्य दिले. शहरामध्ये ५० कोटीची तर जिल्ह्य़ात १०० कोटी रूपयांची उलाढाल केवळ सोन्यामध्ये झाली.     
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तावर गृहोपयोगी साहित्य,सदनिका, सोन्या-चांदीचे दागिने, कपडे यांच्या खरेदीला प्राधान्य दिले जाते. साहजिकच या वस्तू खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांनी बाजारपेठेत मोठी उपस्थिती लावली होती.  आज सकाळी आठपर्यंत अमृतयोग तर साडेअकरा पर्यंत शुभयोग होता. दुपारी अडीच वाजल्यानंतर लाभ योग होता. ग्राहकांनी शुभ व लाभ योग साधत खरेदीस प्राधान्य दिले. परिणामी दुकानांमध्ये ग्राहकांची या काळात झुंबड उडाली होती.त्याचबरोबर एकावर एक मोफत, डिस्काऊंट यांचा शोध घेतांनाही ग्राहक दिसत होते. इंडक्शन कुकरवर प्रेशर कुकर फ्री, आटा चक्कीवर इंडक्शन कुकर फ्री, वॉटर प्युरीफायरवर साईड कुकर फ्री, वाहन खरेदीवर इन्शूरन्स फ्री अशा प्रकारच्या योजनांना ग्राहकांची पसंतीची पावती मिळाली.     
कोल्हापुरातील सोन्याची बाजारपेठ ही राज्यातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. पाडव्याच्या सणाला करवीर नगरीत सोने घेण्यासाठी ग्राहक आवर्जून येतात. सोन्याचे दर अलीकडच्या काळात उतरले असल्याने ग्राहकांनी सोने खरेदीत आपला कल ठेवला होता. ब-याच दिवसानंतर गुजरी पेठ ग्राहकांनी ओसंडून जाताना दिसली. त्यामुळे शहरात दिवसभरात ५० कोटीहून अधिक रूपयांची उलाढाल झाली, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे जिल्हाध्यक्ष रणजित परमार यांनी दिली. जिल्ह्य़ात १०० कोटी रूपयांची उलाढाल सुवर्ण खरेदीत झाल्याचेही त्यांनी नमूद केले.