डीजेंच्या दणदणाटात ध्वनीमर्यादेचे सर्व नियम धाब्यावर बसविणाऱ्या दहीहंडी मंडळांवर पोलिसांनी कोणती कारवाई केली, असा प्रश्न विचारणारे ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर (५३) यांना नौपाडा पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. या प्रकाराने अतिउत्साही नेत्यांच्या दहीहंडी मंडळांना वाचविण्यासाठी खाकी वर्दीतील गुंडगिरीच समोर आली.
 ध्वनीप्रदुषणासारख्या ज्वलंत विषयावर इंदुलकर गेली अनेक वर्षे काम करत आहेत. ठाण्यातील बडे राजकीय नेते गुरुवारी नियमांना धुडकावून दहीहंडी उत्सव साजरा करीत असताना इंदुलकरांनी यासंबंधीच्या तक्रारी नौपाडा पोलीस ठाण्यात केल्या होत्या. या तक्रारींवर काय कारवाई केली, अशी विचारणा करण्यासाठी इंदुलकर शुक्रवारी पोलीस ठाण्यात गेले असता ‘या माणसाने कालपासून खूप त्रास दिला आहे’ असे म्हणत पोलीस निरीक्षक (गुन्हे) आर. एस. शिरतोडे यांनी त्यांच्या एकामागोमाग एक कानशिलात भडकावल्या. ठाण्यातील सामाजिक वर्तुळात या घटनेविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून इंदुलकर यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.