केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात आठवा आणि महाराष्ट्रात सर्वप्रथम आलेल्या सोलापूर जिल्ह्य़ातील योगेश कुलकर्णी-कुंभेजकर याची यशोगाथा त्याच्या जिद्दीची, परिश्रमाची आणि गुणवत्तेची साक्ष देणारी ठरली आहे. शाळेत सातवीच्या वर्गातच असताना त्याने आपण भविष्यात ‘कलेक्टर’ होणार असल्याचा मनोदय बोलून दाखविला होता. पुढे पवईच्या आयआयटीतून बी.टेक झाल्यानंतर त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या दिशेने जिद्दीने तयारी केली. दोन वर्षांपूर्वी त्याने या परीक्षेत यशस्वी झाला होता खरा; परंतु त्याची निवड आयपीएस सेवेसाठी झाली. परंतु त्याला आयएएसच व्हायचे होते. दुसऱ्यांदा परीक्षा देऊन अखेर तो आयएएस झाला.
योगेश कुलकर्णी-कुंभेजकर हा मूळचा माढा तालुक्यातील कुंभेज या गावचा. त्याचे वडील विजय गोविंद तथा व्ही. जी. कुलकर्णी हे बँक ऑफ इंडियात अधिकारीपदावर होते. त्यांनी नुकतीच स्वेच्छानिवृत्ती घेतली, तर आई सुनीता कुलकर्णी पुण्यात स्टेट बँकेत सेवेत आहेत. त्यांना मुलगा योगेश व कन्या स्मिता ही दोन अपत्ये आहेत. योगेश याचा वाढदिवस उद्या बुधवारी आहे. त्याचे आयएएस होणे ही वाढदिवसाची अनोखी भेट मानली जाते. योगेशचे शालेय शिक्षण हरिभाई देवकरण प्रशालेत झाले. दहावीत तो बोर्डात चमकला होता. योगेशला पवईच्या आयआयटीत प्रवेश मिळाला आणि तो इलेक्ट्रिक विषयात बी.टेक झाला. हे शिक्षण घेताना पवईसह खडकपूर, गोरखपूर, गोहाटी आदी ठिकाणच्या आयआयटीतील सुमारे १७ विद्यार्थ्यांचा मित्रसमूह तयार झाला. या मित्रसमूहात प्रशासनाविषयी चर्चा व्हायची. गप्पांतूनच लोकप्रशासनात जाण्याचे त्याने मनाशी पक्के केले.
- बी.टेकची परीक्षा देत असतानाच योगेशची गुणवत्ता पाहून त्यास सिटी बँकेने वार्षिक १३ लाखांच्या पगाराची नोकरी दिली.
- ही नोकरी सांभाळत असतानाच योगेशने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. कमालीचे परिश्रम घेतले.
- पहिल्या प्रयत्नात देशात १३८ व्या क्रमांकावर येऊन त्याने ही परीक्षा उत्तीर्ण केली खरी; त्याची निवड आयपीएस सेवेसाठी झाली. परंतु त्यावर योगेश समाधानी नव्हता.
www.upsc.gov.in