‘तू पाश्र्वसंगीत करायच्या आधी चित्रपट किती वेळा बघतोस?’ किंवा ‘नेमकं कोण ठरवतं- कुठे कुठलं वाद्य वाजवायचं?’, ‘कसं काय सुचतं बुवा शब्द नसताना संगीत?’ हे मला हमखास विचारले जाणारे प्रश्न. कुठल्याही प्रकारचं संगीत द्यायचं असो- गाणं वा पाश्र्वसंगीत- सगळ्यात आधी ते डोक्यात तयार होत असतं. नेमकं काय करायचं, याचा निदान एक कच्चा आराखडा तरी बनवावाच लागतो. नंतर त्याला सजवण्याचं काम सुरू होतं. चित्रकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर आधी रफ स्केच काढून मगच त्यात रंग भरायला सुरुवात करता येते. ज्या सिनेमाचं पाश्र्वसंगीत करायचं असतं, तो एडिट होऊन माझ्याकडे आला की त्याची मी पारायणं करतो. जितक्या वेळा मी सिनेमा बघत जातो, तितका तो माझ्यात भिनत जातो. त्यातल्या पात्रांची आणि माझी ओळख होत जाते. अगदी दोस्तीदेखील होते! पात्रांची आणि माझी मैत्री झाली तरच त्या व्यक्तिरेखांना साजेसं संगीत मी देऊ शकतो.. दिग्दर्शकाच्या दृश्यभाषेला श्राव्य स्वरूपात अनुवादित करू शकतो. चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. त्यामुळे दिग्दर्शकाला कुठल्या बाजाचं संगीत हवं आहे, कुठले सीन्स जास्त ठसवायचे आहेत, याविषयी त्याच्याशी माझी चर्चा चालू असतेच. काही सीन्स जसे आहेत तसे उत्तम परिणाम करत असतील तर त्याला पाश्र्वसंगीताचा टेकू देण्याचं मी टाळतो. खूप वेळा चित्रपट पाहिल्यामुळे मला चित्रपट जवळजवळ पाठ होतो. याचा फायदा असा की, मी कुठेही असलो तरी हे सीन्स डोक्यात चालवू शकतो. मी चित्रपट रवंथ करतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही! यामुळे पाश्र्वसंगीत ‘सुचायला’ मला मदत होते.
अनेकदा चित्रपटातली पात्रं मला अक्षरश: झपाटून टाकतात. ‘अस्तित्व’मधले सचिन खेडेकर आणि तब्बू, ‘पिता’मधला संजय दत्त, ‘सातच्या आत घरात’ मधली बेनेका, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’मधले नाना आणि सोनाली या पात्रांमध्ये मी आकंठ बुडून गेलो होतो. या झपाटलेपणामुळेच त्या व्यक्तिरेखांचा ठाव घेत घेत त्यांना साजेसे सूर माझ्या डोक्यात उमटू लागतात! अगदी प्रवास करतानाही मला त्यांच्या ‘थीम्स’ सुचतात. त्या मी फोनवर रेकॉर्ड करून ठेवतो आणि नंतर रेकॉìडगच्या वेळेस वापरायला काढतो!
चित्रपटाचं पाश्र्वसंगीत करण्याच्या प्रोसेसमधला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे संगीत नेमकं कुठे सुरू होईल आणि कुठे संपेल, ते ठरवणं. याला ‘मार्किंग’ म्हणतात. मी त्या जागा मार्क करतो आणि दिग्दर्शकाबरोबर टॅली करतो. दिग्दर्शकाच्या आणि माझ्या सेन्सिबिलिटीज जुळल्या तर हा टप्पा सोपा ठरतो. बरेचसे दिग्दर्शक माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून हवं ते करण्याची मुभा देतात. पण सगळेच संगीतकार माझ्याइतके सुदैवी नसतात. त्यांच्या वाटय़ाला अत्यंत हट्टी निर्माते, दिग्दर्शक येऊ शकतात. काही निर्माते इतर चित्रपटांची उदाहरणं देऊन तसं म्युझिक बनवायला सांगतात. ‘‘ज्युरासिक पार्क’ में था ना, वैसा बॅकग्राऊंड म्युझिक चाहिये’(त्याच्या चित्रपटाचं नाव असतं- ‘छबूला भेटला ढबू’!) काही निर्मात्यांना वडा-पावच्या बजेटमध्ये तंदुरी चिकन हवं असतं. काही निर्मात्यांना असंही वाटतं, की संगीत वाजवण्यासाठी पैसे मोजले असल्यामुळे भरपूर आणि सतत संगीत वाजलं तरच त्यांचे पैसे वसूल होतील. पण संगीताचा योग्य परिणाम प्रेक्षकांवर करायचा असेल तर आधी शांतता तयार करावी लागते. ‘दि साऊंड ऑफ सायलेंस इज गोल्डन’ हे खरं म्हणजे पाश्र्वसंगीताचं गमक आहे. कारण शांततेच्या कॅनव्हासवरच सुंदर ध्वनीचित्र रेखाटता येतं. आधीच चितारलेल्या कॅनव्हासवर व्हॅन गॉगलाही बरं चित्र काढता येणार नाही. आजपर्यंत पाश्र्वसंगीतविरहित चित्रपट झाले नाहीत असंही नाही. हिंदीतला ‘एक रुका हुआफैसला’ किंवा इंग्रजीतले ‘डॉग डे आफ्टरनून’, ‘ब्लेअरविच प्रॉजेक्ट’ हे पाश्र्वसंगीताचा अजिबात वापर न केलेले काही चित्रपट त्यांच्या ट्रीटमेंटमुळे अत्यंत परिणामकारक झाल्याची उदाहरणं आहेत.
एकदा मार्किंग करून झालं की मग सुरू होते प्रत्यक्षात चित्रपटावर संगीताचा मुलामा चढवण्याची प्रक्रिया. पूर्वी सर्व वादक एकत्र बसून समोर चित्रपट चालू असताना एक-एक तुकडा वाजवत असत. आता तंत्रज्ञान प्रगत झाल्याकारणाने सर्व मंडळी आपल्या सोयीनुसार येऊन आपापले पीसेस वाजवून जातात. या पद्धतीचे फायदे आहेत आणि तोटेदेखील. चित्रपटाचं पाश्र्वसंगीत सिंथसायझरवर किंवा कीबोर्ड्सवर होऊ शकतं. पण मला स्वत:ला सतार, बासरी, व्हायोलिन यांसारखी वाद्यं ‘खऱ्या’ वादकांकडून वाजवून घ्यायला आवडतात. कारण प्रत्येक माणसाचा बोलण्याचा लहेजा असतो, तसा वादकांचासुद्धा वाद्य वाजवण्याचा असतो असं मला वाटतं. शिवाय मशीनमधून वाजणारे सूर मशीन कितीही प्रगत असलं तरी कृत्रिमच वाजणार. संगीतात तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा, पण त्याचा अतिरेक करून त्यातलं माणूसपण घालवू नये, या प्रामाणिक मताचा मी आहे. प्रेक्षकांना एखादा आवाज मशीनमधून काढलाय की प्रत्यक्षात कोणी वाजवलाय, हे जरी कळत नसलं, तरी त्यांच्या मन:पटलावर त्याचा परिणाम निश्चितच होत असतो. म्हणून तंत्रज्ञानाकडे केवळ ‘सोय’ या दृष्टीनंच बघणं आवश्यक आहे.
‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटात मी सरोद, बासरी, व्हायोलिन यासारखी वाद्ये निष्णात वादकांकडून वाजवून घेतली आहेत. अनेक वेळा एकाच म्युझिक पीसमध्येही ती वाजतात. पण प्रत्यक्षात हे वादक कधीही समोरासमोर आले नव्हते! त्यासाठी आयोजन व पेपरवर्क चोख असणं आवश्यक आहे. आणि ते संगीतकारालाच करावं लागतं. मशीनवर सोडून नाही चालत! अनेकदा संगीत वापरायच्या ऐवजी ध्वनीपरिणाम वापरण्याकडे माझा कल असतो. अर्थात यासाठी साऊंड डिझायनरला विश्वासात घेणं आवश्यक असतं. कारण साऊंड इफेक्ट्स त्याचं डिपार्टमेंट असतं. टिटवीचं ओरडणं, कावळ्यांची कावकाव, कुत्र्यांचं विव्हळणं, ढगांचा गडगडाट, माश्यांचं घोंगावणं हे ध्वनी कधी कधी पाश्र्वसंगीतापेक्षाही अधिक परिणामकारक ठरू शकतात. कारण या ध्वनींशी असलेलं आपलं असोसिएशन आणि आपल्यावर झालेले श्रवणसंस्कार लक्षणीय आहेत.
एकदा संगीताचा मुलामा चढवून झाला, की पाळी येते ज्याच्या बाळाला मी सजवलेलं असतं त्याला त्याचं बाळ दाखवायची! मी ‘आमटे’ चित्रपटाचं पाश्र्वसंगीत करत असताना नाना रोज मी सजवत असलेल्या या बाळाला बघायला यायचा! अर्थात त्याला चित्रपटातलं तर कळतंच, पण संगीतातलंही चांगलंच कळतं. त्यामुळे त्याचं मत हा माझ्या लेखी शेवटचा शब्द होता. त्याला थोडेफार बदल हवे असतील तर ते मी करत असे. पण आमच्या विचारधारा जुळत असल्यामुळे ‘आमटे’ चित्रपटाचं पाश्र्वसंगीत आम्हाला अपेक्षित होतं तसंच झालं. चित्रपटाच्या शेवटी असलेलं प्रकाश आमटेंचं भाषण हा प्रसंग माझ्यासाठी आव्हानात्मक होता. नानानी निक्षून सोनालीच्या- म्हणजेच मंदाताईंच्या पाण्याने डवरलेल्या डोळ्यांतून प्रकाशभाऊंचं भाषण संपेपर्यंत पाणी येऊन दिलं नव्हतं. ज्या क्षणी सोनालीच्या डोळ्यांतून खळ्ळकन् पाणी ओघळतं, तिथेच सरोदची तान मी वापरली. पडद्यावरच्या मंदाताईंबरोबरच अख्ख्या प्रेक्षागृहाच्या डोळ्यांना मोकळी वाट करायला सरोदच्या त्या सुरावटीनं मदत केली. तिथे संगीत वाजलं नसतं तर प्रेक्षक भावनाविवश झाले नसते का? नक्की झाले असते. पण तलावाच्या काठावर उभ्या असलेल्या, उडी मारू का नको, या संभ्रमात असलेल्या प्रेक्षकाला पाश्र्वसंगीत पाण्यात उडी घ्यायला भाग पाडतं, हे नक्की.
पाश्र्वसंगीतातली शेवटची, पण अतिशय महत्त्वाची पायरी म्हणजे मिक्सिंग. संवाद, साऊंड इफेक्ट्स आणि पाश्र्वसंगीत एकत्र करण्याची प्रक्रिया. पाश्र्वसंगीत प्रत्येक सीनला योग्य त्या व्हॉल्यूममध्ये वाजलं तरच त्याचा हवा तो परिणाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे मिक्सिंग इंजिनीअरला साऊंडबरोबरच चित्रपट ‘समजणं’देखील अत्यावश्यक असतं. एका चित्रपटाच्या मागे असंख्य डोकी आणि हात काम करत असतात. पाश्र्वसंगीतकार म्हणून मी स्वत:ला अख्ख्या टीमचा एक छोटासा भाग समजतो. पण सरतेशेवटी सगळं मायबाप प्रेक्षकांवर अवलंबून असतं. दिग्दर्शकाने आखलेल्या चौकटीत राहून त्यांच्या कानावर नवीन श्रवणसंस्कार करण्यात जर मी यशस्वी ठरलो, तर त्याच्यापेक्षा कुठलंही पारितोषिक माझ्या लेखी महत्त्वाचं नाही.
राहुल रानडे rahul@rahulranade.com
विचारवाटा आणि संगीत!
मी चित्रपट रवंथ करतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही! यामुळे पाश्र्वसंगीत ‘सुचायला’ मला मदत होते.
Written by राहुल रानडे
Updated:
First published on: 22-05-2016 at 00:53 IST
मराठीतील सर्व मैफिलीत माझ्या.. बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Background music in marathi movie dr prakash baba amte