माझे पणजोबा हौसेखातर दिलरुबा वाजवायचे असं मी ऐकलं होतं. आजोबादेखील कधी कधी व्हायोलिन वाजवत असत. पण ते तितपतच. स्वान्त सुखाय. न्हाणीघरात गुणगुणण्याव्यतिरिक्त आमच्या रानडेंच्या किंवा आजोळच्या खरे कुटुंबात कोणी गाणंबिणंही फारसं म्हणत नसे. त्यामुळे फारसं संगीतमय वातावरण नव्हतं आमच्या घरात. मावशीसाठी हौसेने घेतलेली एक हार्मोनियम होती. पण ती कायम एका मोठय़ा निळ्या पेटीत बंद असे. दुसऱ्या इयत्तेत गेल्यावर मी तबला शिकायला लागलो आणि माझी तबलावादनातली प्रगती बघून आईच्या लक्षात आलं की याला संगीत उपजतच येतंय. ती मला तिच्या पद्धतीने प्रोत्साहन देत असे. एका सुट्टीत पुण्याला आल्यावर मी त्या निळ्या पेटीतली हार्मोनियम काढून त्यावर बोटं फिरवायचा प्रयत्न करू लागलो. आणि अहो आश्चर्यम्! माझ्या बोटांतून सूर उमटू लागले. मला खूप मजा वाटली. त्या दिवसापासून पेटीच्या त्या काळ्या-पांढऱ्या पट्टय़ांशी माझी घट्ट  मत्री झाली. तबला मी शिकत होतोच; पण न शिकताही पेटीशी, तिच्यातून उमटणाऱ्या सुरांशी माझी खऱ्या अर्थानं जवळीक निर्माण झाली. माझ्या कानाला चांगल्या वाटणाऱ्या सुरांवरून माझी बोटं फिरत असत. ‘कुठला राग वाजवतो आहेस रे?’ असा प्रश्न आईने केला तर मात्र माझी भंबेरी उडत असे. कारण मी नेमकं काय वाजवतो आहे, ते माझं मलाच माहीत नसायचं! ‘असू दे. असू दे. चांगलं वाटतंय ऐकायला.’ आईदेखील काय ते समजून दाद देत असे!

एके दिवशी पेटीच्या वर-खाली होणाऱ्या पट्टय़ांकडे, हलणाऱ्या भात्याकडे बघत बसलो असताना माझ्या मनात विचार आला : किती सुलभ, सहजतेने सुरांशी माझी ओळख करून दिली हिने! लहानपणीच मला भेटलेल्या या किन्नरीचे उपकार मी आजन्म विसरणार नाही. कारण माझी ‘बोटं’ धरून तिनेच मला संगीताच्या दुनियेकडे आकृष्ट केलं. माझ्या आयुष्यात ही अजब वस्तू आली नसती तर मी संगीत दिग्दर्शनाकडे वळलो असतो का? माझ्या सांगीतिक कारकीर्दीचा उगम हिच्यापासून झाला हे खरं; पण हिचा उगम कधी झाला असावा?

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”

‘१८४२ साली.. फ्रान्समध्ये.’ मी चमकून इकडे तिकडे पाहिलं. ‘अ‍ॅलेक्झँडर डिबेन यांनी माझ्या पूर्वजांची- म्हणजे रीड ऑर्गनची निर्मिती केली. आणि प्रथमच त्याचं पेटंट घेतलं.’ माझ्या समोरची पेटी तिच्या किनऱ्या आवाजात माझ्याशी चक्क बोलत होती! ‘त्याकाळी चर्चमध्ये प्रार्थनेला साथ करण्यासाठी पाइप ऑर्गन्स असायचे. जे अवाढव्य आणि अत्यंत अवजड होते. डिबेनसाहेबांनी लहान चर्चमध्ये मावेल असा, ने-आण करायला सोपा, आकाराने छोटा, पायांनी भाता मारून वाजवता येणारा ‘रीड ऑर्गन’ तयार केला. म्हणजेच पायपेटी. हाच आमचा मूळपुरुष.’ मी कान देऊन ऐकत होतो. भारावलेल्या अवस्थेतच माझ्या तोंडून निघालं, ‘मग इथे भारतात कधी आणि कोणी..?’ तिला माझा प्रश्न अपेक्षितच होता. ‘ब्रिटिश त्यांच्यासोबत मला कलकत्त्याला घेऊन आले.’ ती उत्तरली, ‘कारण आमची ने-आण करणं सोपं होतं. आणि पियानो सुरात लावण्यासाठीचा खटाटोपदेखील टळला होता. १८६० मध्ये द्विजेंद्रनाथ टागोर यांच्या खाजगी थिएटरमध्ये माझ्या खापरपणजोबांचे सूर घुमले. बहुधा भारतात प्रथमच. याच काळात भारतीय आणि पाश्चिमात्य वाद्यांचे व्यापारी द्वारकानाथ घोष यांनी आमचं स्वरूप बदलण्याचा- म्हणजेच पायपेटीची हातपेटी करण्याचा उद्योग चालू केला होता. याचं एक कारण म्हणजे भारतीय कलाकारांची खुर्चीपेक्षा भारतीय बठकीला जास्त पसंती होती. आणि दुसरं म्हणजे साहेबासमोर सामान्य वादकानी खुर्चीत कसं बसावं? माझ्या आजच्या स्वरूपाला मुख्यत: द्वारकानाथजी कारणीभूत आहेत. अर्थात हळूहळू भारताच्या इतर राज्यांमध्येही आमच्या कुटुंबातले अनेक लोक पांगले. स्थिरावलेदेखील.’

एक क्षण थांबून भात्यात हवा भरून घेऊन तिने पुढचा प्रवास सांगायला सुरुवात केली.. ‘इकडे महाराष्ट्रात कीर्तनकारांनी आमचं पाश्चात्त्य मूळ असूनही मंदिरात आणि देवळात वापर करण्यासाठी सगळ्यात जास्त पसंती दिली. कारण कीर्तनाचा बाज हा गद्य-पद्य असल्यामुळे त्यात सलग सूर देणं महत्त्वाचं असतं. संगीत न वाजवता येणारा माणूसदेखील भाता पायाने मारून ठरावीक सूर सलग वाजवू शकायचा. याहीपेक्षा महत्त्वाचं कारण म्हणजे आमचा खणखणीत आवाज. याच कारणासाठी नाटकवाल्यांनाही आम्ही फारच भावलो. ध्वनिक्षेपक नसतानाही शेवटच्या रांगेपर्यंत आवाज पोहोचणारं एकमेव सुराचं वाद्य त्याकाळी आम्हीच होतो. पायपेटी किंवा रीड ऑर्गन. १८८२ साली दादा मोडक यांनी ‘संगीत सौभद्र’ या नाटकामध्ये पहिल्यांदा आमचा वापर केला. आणि त्यात ८७ पदं त्यांनी या नव्याने दाखल झालेल्या ऑर्गनवर वाजवली. यानंतर शास्त्रीय गायनाच्या बठकींमध्येदेखील आमचा वापर होऊ लागला. कलकत्त्याच्या द्वारकानाथजी यांच्यासारखेच टी. एस. रामचंद्र अँड कंपनी या पेटय़ा आयात करणाऱ्या पुण्याच्या कंपनीनेदेखील लोकाग्रहास्तव आमचं रूपडं बदलण्याचं मनावर घेतलं आणि ते हातपेटय़ा बनवायच्या मागे लागले.’

मी अत्यंत एकाग्रतेने ऐकतो आहे हे बघून ती पुढे सांगू लागली, ‘रीडसकट संपूर्ण भारतीय बनावटीची पेटी बनवणारे भावनगरचे वरजीवनदास हरजीवनदास हे पहिले सद्गृहस्थ. १९०१ साली त्यांनी पहिली भारतीय बनावटीची रीड स्वत: बनवली. त्यांचा कित्ता अनेक लोकांनी गिरवला आणि भारतात दर्जेदार पेटय़ा तयार होऊ लागल्या. १९०५ पासून ‘मेहेंदळे म्युझिकल्स’, ‘गोपाळ रामचंद्र’, ‘भगत’, ‘डी. एस. रामसिंग’, ‘दास म्युझिकल्स’ ही देशाच्या विविध भागांतली मंडळी या धंद्यात उतरली आणि साधारण १९०५ साली पहिल्या महायुद्धाच्या सावटाने कमी झालेली आमची आयात १९२० साली पूर्णपणे थांबली. याच सुमारास आमची कीर्ती भारतात सर्वदूर पसरली. आणि या नवीन वाद्याला- ‘हार्मोनियम’ला भरपूर मागणी येऊ लागली. शास्त्रीय संगीताच्या मफिली, संगीत नाटक, कव्वाली, कीर्तन, तमाशा, इतकंच काय, लग्नाच्या बँडमध्येही आमचा सर्रास वापर होऊ लागला. ‘बँडबाजा’मधला ‘बँड’ म्हणजे इतर वाद्यं आणि ‘बाजा’ म्हणजे हार्मोनियम! म्हणूनच काही लोक आम्हाला ‘बाजाची पेटी’ असंही संबोधू लागले. पुढील काही वर्षे सर्व उत्तम चाललं होतं. पण..’ अचानक तिचा सूर अडकला. माझी चलबिचल सुरू झालेली बघून ती पुढे सांगू लागली..

‘१९४० साली देशात स्वदेशीचे वारे वाहत होते. त्याच काळात आमचं मूळ परदेशी असल्याचं कारण पुढे करण्यात आलं आणि ऑल इंडिया रेडिओने आमच्यावर बंदी घातली. याशिवाय आमच्यावर ‘िमड’ काढायला असमर्थ असण्याचा आणि आमची ‘टेम्पर्ड स्केल’ आहे, म्हणजे सगळे सूर फ्रीक्वेन्सीनुसार समान अंतरावर आहेत असे आरोप करून ‘िहदुस्थानी शास्त्रीय संगीत वाजविण्यास अपात्र’ असा शेरा आकाशवाणीकडून मारण्यात आला. या दोन्ही गोष्टी खऱ्या असल्या तरी काही लोकांनी सूडबुद्धीने आमच्याविरुद्ध षड्यंत्र रचलं, हेच खरं. देशातल्या सगळ्या महान शास्त्रीय गायकांनी कायम पसंती देऊनसुद्धा ही बंदी शिथिल करायला १९७० साल उजाडलं. २००७ साली ही बंदी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे, असा दावा जरी आकाशवाणीने केला असला तरी आजही हार्मोनियम सोलोवादन सादर करण्यास बंदी कायम आहे! त्यामुळे मला कायम ‘साथीचं वाद्य’ अशी दुय्यम दर्जाची वागणूक मिळते तिथे.’ मी चमकलो. अनेक महान हार्मोनियमवादकांवर केवढा हा अन्याय!

खरं म्हणजे हार्मोनियमची अनेक लोकांनी जिवापाड भक्ती करून तिला एका उच्च स्तरावर नेऊन ठेवलं आहे. हार्मोनियमवादनाचे अध्वर्यु गोिवदराव टेंब्यांची प्रथा यशस्वीपणे चालवणारे पं. गोिवदराव पटवर्धन, पं. मधुकर पेडणेकर, पं. आर. के. बिजापुरे, पं. पुरुषोत्तम वालावलकर, पं. मनोहर चिमोटे, राजाभाऊ कोकजे, पं. तुळशीदास बोरकर, अप्पा जळगावकर, वासंतीताई म्हापसेकर.. किती नावं घ्यावीत? ‘माझे लाडसुद्धा भरपूर झाले बरं का!’ आपल्या भक्तांची नावं ऐकून पेटीबाई पुन्हा रंगात आल्या, ‘पं. चिमोटे यांनी ‘संवादिनी’ हे सुंदर नाव देऊन माझं बारसं केलं. पं. विद्याधर ओक यांनी सगळ्या २२ श्रुती वाजणारी पेटी बनवली. पं भीष्मदेव वेदी यांनी मला स्वरमंडल जोडण्याची किमया केली. खूप माणसांचं प्रेम मिळालं. आजही अनेक घरांमध्ये आमचं वास्तव्य आहेच.’ ‘अर्थातच!’ मी उद्गारलो, ‘नवीन पिढीदेखील बेहद्द खूश आहे तुझ्यावर. आजचे आघाडीचे अभ्यासू वादक आदित्य ओक आणि सत्यजीत प्रभू हे तर तुझ्या एकटीवर ‘जादूची पेटी’ हा बहारदार कार्यक्रम सादर करतात. यापेक्षा ‘सोलो’ अजून काय पाहिजे?! तू खूप भारी आहेस गं. तुझ्यावर बंदी घालणारे आणि ती कायम ठेवणारे खरोखरच नादान आहेत यात शंका नाही.’

माझं हे वाक्य संपताक्षणी माझी बोटं तिच्याकडे खेचली गेली. बहुधा तिनेच लाडानं माझा हात ओढला असावा. माझी बोटं तिच्या सुबक काळ्या-पांढऱ्या पट्टय़ांवरून फिरू लागली. ती माझ्याकडून प्रात:कालचा राग अहिर भरव वाजवून घेत होती..

राहुल रानडे

rahul@rahulranade.com

Story img Loader