प्रयोगशील नाटकांमध्ये सहभागी होण्याचं आव्हान आणि मजा काही औरच असते. अर्थात ‘प्रयोगशीलता’ ही काही शिकवून येणारी गोष्ट नव्हे; ती रक्तातच असावी लागते. डोळे आणि कान उघडे ठेवून आपल्या आजूबाजूला आणि जगात काय चाललंय याचं भानही असायला लागतं. आणि चांगल्या लोकांबरोबर, संस्थांबरोबर काम करण्याची संधी मिळण्याचं नशीबही लागतं. भास्कर चंदावरकर, आनंद मोडक यांनी संगीत दिलेल्या ‘घाशीराम कोतवाल’, ‘महानिर्वाण’, ‘तीन पैशाचा तमाशा’ यांसारख्या अजरामर कलाकृतींमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं. विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार यांच्यासारख्या लेखकांशी; दामू केंकरे, कमलाकर सारंग, सई परांजपे, सत्यदेव दुबे यांच्यासारख्या दिग्दर्शकांशी चर्चा करण्याची संधी मिळाली. काहींबरोबर कामही करायला मिळालं. अरुण काकडे, सुलभा देशपांडे यांची प्रायोगिक नाटकावरची निष्ठा बघून प्रेरित झालो नसतो तरच नवल! या ज्ञानी मंडळींच्या ज्ञानाचे काही अमृतकण माझ्यासारख्या संगीत आणि नाटय़शास्त्राच्या विद्यार्थ्यांवर शिंपडले गेले. त्याचीच शिदोरी घेऊन माझ्यातला कलोपासक मार्गक्रमण करतो आहे.
या सगळ्या दिग्गजांमध्ये एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे- चाकोरीबाहेरचा विचार करणं! त्यांची ही गोष्ट माझ्यामध्ये सगळ्यात जास्त झिरपली. नाटय़वर्तुळातले माझे समकालीन मित्र, लेखक, दिग्दर्शक, नट, तंत्रज्ञ यांच्यामुळे तिला खतपाणी मिळालं. एखाद्या नाटकाचा विचार किती खोलवर जाऊन करता येऊ शकतो, याचं बाळकडू मला माझा अभ्यासू मित्र राजीव नाईक याच्याकडून मिळालं. नाटकाचं विश्व फक्त आपल्या शहरापुरतं मर्यादित नसतं, तर देशातल्या बाकी प्रांतांमध्ये आणि जगात इतरत्र चालणाऱ्या नाटकांकडे डोकावून बघणं हे विद्यार्थी म्हणून आपलं कर्तव्य आहे याची जाणीव त्याने मला करून दिली. माझ्या नाटक बघण्याच्या कक्षा राजीवमुळे रुंदावल्या. केवलम पणिक्कर, बादल सरकार, रतन थिय्याम, हबीब तन्वीर, शंभू मित्रा यांच्या कामाची ओळख झाली. ही सगळी नाटकामधली विद्यापीठंच होय! संगीत असो वा नृत्य- अभिजात कलांचा नाटकात किती विविध प्रकारे वापर करून घेता येतो, हे त्यांच्या कलाकृतींमधून शिकण्यासारखं आहे. नाटकाच्या परदेश दौऱ्यांमुळे तिथले भव्य ऑपेराज् पाहता आले. म्युझिकल्स बघता आली. रशियाचं बॉलशॉय थिएटर बघण्याचाही योग आला. जर्मनीच्या ग्रिप्स थिएटरशी तर नातंच जोडलं गेलं. थिएटर अॅकॅडमी, आविष्कार, आंतरनाटय़ या प्रायोगिक नाटकं करणाऱ्या संस्थांमधून काम करत हौशी रंगकर्मी म्हणून मिरवण्यात मला विलक्षण आनंद मिळालेला आहे, मिळतो आहे.
प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमधली रेषा नेहमीच धूसर होती. ‘घाशीराम कोतवाल’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’, ‘दुर्गा झाली गौरी’, ‘राजा सिंह’ यांसारखी ‘प्रायोगिक’ म्हणता येतील अशी नाटकं मोठय़ा नाटय़गृहांमध्ये व्यावसायिक नाटकांचे तिकीट दर लावूनच झालेली आहेत. फरक हा, की त्यातले कलाकार मानधन किंवा नाइट न घेता काम करीत असत. म्हणजेच कलाकार हौशी, पण नाटकं चालवली जायची व्यावसायिक पद्धतीनं. अर्थात या नाटकांचे विषय आणि सादरीकरण वेगळे होतेच. आता ही रेषा अजूनच विरळ होत चाललेली आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे भद्रकाली या व्यावसायिक नाटय़संस्थेचं मधु रायलिखित नाटक- ‘हा शेखर खोसला कोण आहे?’ १९६९ साली मूळ गुजरातीमध्ये लिहिलेलं हे नाटक याआधीही काही हिंदी, मराठी हौशी नाटय़संस्थांनी समांतर रंगभूमीवर सादर केलं होतं. अत्यंत क्लिष्ट मांडणी असलेलं, नात्यांची आणि पात्रांची गुंतागुंत असलेलं हे सस्पेन्स नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणणं धाडसाचंच म्हटलं पाहिजे. पण भद्रकाली संस्थेची धुरा सांभाळणाऱ्या प्रसाद कांबळीने विजय केंकरेच्या दिग्दर्शनाखाली हे अचाट धाडस केलं. नाटक प्रदर्शित झाल्यावर सरळसोट नाटकं बघण्याची सवय असलेल्या प्रेक्षकांना पंचपक्वान्नाच्या जेवणामध्ये अचानक मटणाच्या रश्श्याची वाटी समोर यावी तसं झालं! संभ्रमात पडलेले प्रेक्षक एकदा चवीचा अंदाज आल्यावर हळूहळू या नाटकाला गर्दी करू लागले. निर्मितीप्रक्रियेमध्ये विजय केंकरेला या नाटकातला अनवटपणा सतत खुणावत होता, म्हणून त्याने संगीताच्या दृष्टीने वेगळा विचार करण्याची मला पूर्ण मुभा दिली.
नाटकाच्या विविक्षित रचनेमुळे मला यात क्वाड्राफोनिक साऊंड सिस्टिम वापरण्याचा वेगळाच प्रयोग करता आला. ध्वनियंत्रणेचे चार स्रोत ‘शेखर खोसला’मध्ये वापरले गेले आहेत. रंगमंचावर एक, प्रेक्षकांकडे तोंड करून दुसरा, पहिल्या रांगेतल्या एका खुर्चीखाली तिसरा आणि प्रेक्षकांच्या मागे रंगमंचाकडे तोंड करून चौथा. प्रेक्षकांच्या मागे ठेवलेल्या स्पीकर्समधून कोर्ट सीन्समध्ये वकिलाचा (शरद पोंक्षेचा) ध्वनिमुद्रित आवाज आहे- जो रंगमंचाच्या मध्यावर उभ्या असलेल्या पात्रांची उलटतपासणी घेतो आहे. प्रेक्षकांच्या मागून हा वकील बोलत असल्याचा भास निर्माण केल्यामुळे या नाटकाला एक वेगळंच ध्वनिपरिमाण प्राप्त झालं. खुर्चीखालचा स्पीकर इफेक्टसाठी वापरलाय. अर्थात या ध्वनियोजनेसाठी प्रत्येक प्रयोगाला स्वतंत्र ध्वनियंत्रणा मागवावी लागते. त्याकरिता अतिरिक्त खर्च येतो. तंत्रज्ञांच्या प्रयोगावर निर्मात्यानं विश्वास ठेवणं नितांत गरजेचं असतं. प्रसाद कांबळीने तो विश्वास दाखवला. म्हणूनच आत्तापर्यंत कुठल्याही मराठी नाटकात न झालेला हा ध्वनिप्रयोग होऊ शकला. ध्वनियंत्रणेची सुलभ आखणी करणारा रुचिर चव्हाण आणि ध्वनिसंकेत देणारा रूपेश दुदम या दोघांचाही या अनोख्या प्रयोगात मोलाचा वाटा आहे.
भारतीय रंगभूमीवर सादर झालेली पहिली त्रिनाटय़धारा म्हणजेच आविष्कार निर्मित, महेश एलकुंचवार लिखित ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगांत’! ११ एप्रिल १९९४ या दिवशी प्रायोगिक रंगभूमीवर त्रिनाटय़धारा सलग सादर करण्याचा विक्रम ‘आविष्कार’चे काकडेकाका, चंद्रकांत कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीपणे केला. बरोब्बर २२ वर्षांनी यातल्या पहिल्या दोन नाटकांचे प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर एकामागे एक सादर झाले. ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘मग्न तळ्याकाठी’ ही दोन नाटकं १२ जून २०१६ रोजी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात हाऊसफुल गर्दीत संपन्न झाली. माझ्या माहितीप्रमाणे, जगात कुठेही व्यावसायिक रंगभूमीवर द्विनाटय़ सलग सादर झाल्याची नोंद नाही. ‘वाडा चिरेबंदी’ या पहिल्या भागाचे १३० यशस्वी प्रयोग झाल्यानंतर ‘मग्न तळ्याकाठी’ची तयारी सुरूझाली. १९९४ साली आनंद मोडक यांनी त्रिनाटय़धारेचं संगीत केलं होतं. काळानुरूप त्यात काही बदल अपेक्षित असल्यामुळे ‘मग्न तळ्याकाठी’करिता चंदूने मला पाचारण केलं. मोडक माझ्या गुरुस्थानी असल्यामुळे त्यांनी दिलेलं जुनं संगीत कायम ठेवून अतिरिक्त संगीत करण्यास मी आनंदानं होकार दिला आणि या ऐतिहासिक द्विनाटय़धारेचा भाग बनलो.
महेश एलकुंचवार या माझ्या मित्राची लेखणी इतकी जबरदस्त आहे, की तालमीत, प्रयोगात असंख्य वेळा या नाटकातले संवाद ऐकले तरी गुंगून जायला होतं. अनेकदा डोळे डबडबतात. नाटककार म्हणून एलकुंचवार महान आहेत यात शंकाच नाही. सिद्धहस्त लेखणीतून संवाद उतरले असले की त्यांना संगीताने मढवायला फार कष्ट पडत नाहीत. मग्न तळ्याकाठच्या परागच्या स्वगताने पियानोच्या स्वरांना आणि चाईम्सना जणू साद घातली आणि ते स्वर उमटले. प्रभाचं पात्र न बोलता इतकं अंगावर येतं की गूढरम्य व्हायोलिन्सचा वापर करणं भागच पडलं. परागचा तडकभडक स्वभाव दाखवण्यासाठी चिरेबंदी वाडय़ाच्या दिंडीदरवाजाचा ध्वनीही परिणामकारकरीत्या वापरता आला. चंदू कुलकर्णीच्या नाटय़प्रवासाची सुरुवातच औरंगाबादच्या प्रायोगिक रंगभूमीवरून झाल्यामुळे त्यालाही असे प्रयोग अभिप्रेत होते.
सण-समारंभांतील ध्वनिप्रदूषणावर भाष्य करणारं चं. प्र. देशपांडेलिखित ‘ढोलताशे’ हे नाटक आविष्कार नाटय़संस्थेनं प्रायोगिक रंगभूमीवर आधी केलं. नंतर प्रसाद कांबळीनं भद्रकालीच्या बॅनरखाली हेच नाटक व्यायसायिक रंगभूमीवर आणलं. विजय केंकरे दिग्दर्शित हे नाटक घडतं- अनंत चतुर्दशीला पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील एका घरात. या नाटकामध्ये सेटच्या मागे स्पीकर ठेवून नाटकभर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमधले ढोलताशे वाजवण्याचा प्रयोग मी केला; अर्थात त्या ध्वनीवर प्रक्रिया करून! जेणेकरून संवादांमध्ये संगीताचा अडथळा यायला नको. घराचा दरवाजा किंवा खिडकी उघडल्यावर भस्सकन् बाहेरचा गोंगाट आत येईल अशीही ध्वनीयोजना केली. लेखकाच्या स्क्रिप्टला संगीताचं सब-स्क्रिप्ट देण्याचा हा प्रयत्न बऱ्यापैकी सफल झाला असं जाणकारांचं मत पडलं.
नाटक हे असं माध्यम आहे की ज्यामध्ये सतत विविध प्रयोग करून बघणं शक्य असतं. जगाच्या कानाकोपऱ्यातून मिळवलेलं ज्ञान रंगभूमीवर निश्चितच अजमावून बघता येतं. एखादा प्रयोग फसला तर हिरमुसलं न होता नव्या प्रयोगाची आखणी करण्याची मुभा असतेच रंगकर्मीना! जगभरातील नाटय़प्रयोगांतून वेचलेली, माझ्या परडीत साठलेली ज्ञानाची फुलं मला परत रंगभूमीलाच अर्पण करता येतात याचं मनस्वी समाधान वाटतं. प्रयोगशील नाटकांशी माझी नाळ कायमची जोडली गेलेली राहो, हीच नटराजाचरणी प्रार्थना!
राहुल रानडे – rahul@rahulranade.com
मागच्या लेखामध्ये ‘प्रपोजल’ची प्रकाशयोजना शीतल तळपदेची होती’ असा चुकीचा उल्लेख माझ्याकडून झाला. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. वास्तविक प्रदीप मुळ्येंनीच नेपथ्य आणि प्रकाशयोजना- दोन्हीचा भार उचलला होता.