गणेशोत्सव जवळ आला की विविध मंडळांच्या उत्साही कार्यकर्त्यांच्या अंगात संचारते. आपल्याच मंडळाचा देखावा सर्वार्थाने सर्वोत्तम व्हावा यासाठी अहमहमिका चालू होते. ‘आपला डीजे लय भारी आहे. आपण सॉलिड डॉल्बी मागवलाय राव!’ अशी वाक्यं गणेशोत्सवादरम्यान हमखास ऐकू येतात. कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ‘डॉल्बी’चा अर्थ ‘खूप मोठ्ठा आवाज करणारे स्पीकर्स’ असा आहे, हे चुकून जर डोल्बी लॅबोरेटरीज्चे जनक रे डोल्बी यांच्या कानावर गेले असते तर ते निश्चित हबकले असते. कारण ‘डोल्बी’ हा स्पीकर्सचा प्रकार नसून विविध माध्यमांतला ध्वनिमुद्रित आवाज श्रोत्यांच्या कानांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचावा याकरिता निर्माण केलेल्या प्रणालीचे ते नाव आहे. अर्थात येनकेन प्रकारेण महाराष्ट्रातल्या खेडय़ापाडय़ांमध्येही रे डोल्बीसारख्या महान तंत्रज्ञाचे नाव पोहोचलंय याचाच आनंद जास्त आहे!

रे डोल्बी.. जन्म- सन १९३३. स्टॅनफर्ड विद्यापीठाचे इलेक्ट्रिकल इंजिनीयिरगचे पदवीधर. हाडाचे इंजिनीयर असूनही कलेची नितांत आवड आणि सर्जनशील म्हणून प्रसिद्ध. तंत्र आणि कला या दोन्हींचा सुंदर मिलाफ साधलेल्या रे डोल्बी यांनी १९६५ साली इंग्लंडमध्ये डोल्बी लॅबोरेटरीज्ची स्थापना केली. गंमत म्हणजे त्याआधी दोन वर्षे त्यांनी संयुक्त राष्ट्रांचा प्रतिनिधी या नात्याने भारतात राहून पंजाब आणि उत्तर प्रदेशात भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीताची ध्वनिमुद्रणे केली होती. आपणच केलेले हे ध्वनिमुद्रण ऐकताना टेपमधून येणारा अतिरिक्त आवाज काढून टाकण्यासाठी त्यांनी ‘डोल्बी नॉइज रिडक्शन’ ही यशस्वी प्रणाली विकसित केली, ती बाजारात आणली आणि ‘डोल्बी’ हे नाव घराघरांत पोहोचले! म्हणजे एका अर्थाने त्यांच्या या कल्पनेचा उगम भारतात झाला असे म्हणणेही वावगे ठरणार नाही. ध्वनिमुद्रण जास्तीत जास्त सुस्पष्ट व्हावे यासाठी डोल्बी लॅबोरेटरीज्नी त्याकाळी सतत नवनवीन तंत्रे विकसित केली.

Aakhil bharatiya chitrapat mahamandal meeting held peacefully Kolhapur news
कोल्हापूर: चित्रपट महामंडळाची बैठक खेळीमेळीत झाल्याचा दावा; बाहेर गोंधळ आत शांतता
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Marathi Singer Arvind Pilgaonkar career information in marathi
व्यक्तिवेध : अरविंद पिळगावकर
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Aishwarya Narkar
“जर मला डिवचलं, तर मी…”, ऐश्वर्या नारकर ट्रोल करणाऱ्यांच्या बाबतीत करतात ‘ही’ गोष्ट; म्हणाल्या, “काय दिवे…”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…

‘नॉइज रिडक्शन’ने आपली पाळेमुळे जगभरात रोवल्यावर रे डोल्बी यांनी चित्रपटाच्या ध्वनीमध्ये क्रांती करणारी ‘डोल्बी स्टिरिओ’ ही चार स्रोतांची प्रणाली बार्बरा स्ट्रायसंडच्या ‘अ स्टार इज बॉर्न’ या चित्रपटात प्रथम वापरली. मात्र, या प्रणालीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले, ते जॉर्ज ल्युकसच्या ‘स्टार वॉर्स’ या चित्रपटातल्या त्याच्या प्रभावी वापरामुळे. साल होते १९७७. चित्रपडद्याच्या मागच्या एकाच स्पीकरमधून (मोनोफोनिक) सगळे ध्वनी ऐकू येण्याच्या त्या दिवसांमध्ये लेफ्ट, सेंटर, राइट आणि सराऊंड (एल. सी. आर. एस.) या चार स्रोतांमधून ऐकू येणाऱ्या या नव्या ध्वनियंत्रणेमुळे चित्रपट अधिक खरा भासू लागला. एखादी गाडी किंवा व्यक्ती डावीकडून उजवीकडे गेली तर आवाजदेखील तिच्याबरोबर फिरू लागला. ही क्रांती होती. आवाजाचे जास्त स्रोत असल्यामुळे प्रत्येक ध्वनीला स्वत:ची जागा मिळाली. प्रेक्षकांच्या मागे बसवलेल्या सराऊंड स्पीकर्समुळे ध्वनीला वेगळेच परिमाण मिळाले. या अस्सल ध्वनीपरिणामांमुळे चित्रपट बघताना प्रेक्षकांना जिवंत अनुभव मिळू लागला.

भारतातदेखील चित्रपटाच्या ध्वनीने कात टाकायला सुरुवात केली होती. साधारण याच सुमारास ‘टॉड-ओडी’ ही प्रणाली वापरून ध्वनी-आलेखन (साऊंड डिझाईन) आणि पुनध्र्वनिमुद्रणाचे (मिक्सिंग) जादूगार मंगेश देसाई यांनी ‘शोले’ या चित्रपटासाठी स्टिरिओफोनिक साऊंड वापरला. भारतात तेव्हा मल्टी-ट्रॅक मिक्सिंग करणारी ध्वनियंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे ‘शोले’ लंडनच्या पाइनवूड स्टुडिओमध्ये मिक्स करण्यात आला. ७० एमएम पडद्यावर दिसणारी अफलातून दृश्यं आणि त्याला चार ट्रॅक स्टिरिओफोनिक साऊंडची साथ.. प्रेक्षकांनी ‘शोले’ डोक्यावर घेतला नसता तरच नवल! तिकडे डोल्बी यांनी १९८६ साली डोल्बी एस. आर. (स्पेक्ट्रल रेकॉìडग) ही नवीन प्रणाली आणली. १९९१ साली त्यांनी निर्माण केलेली आणि सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेली प्रणाली म्हणजे ‘डोल्बी डिजिटल’- ज्याला ५.१ असेही संबोधले जाते. सहा ट्रॅक्स असलेल्या या ध्वनिव्यवस्थेत ‘डोल्बी स्टिरिओ’मध्ये असलेल्या लेफ्ट, सेंटर आणि राइटबरोबरच लेफ्ट सराऊंड (एल. एस.), राइट सराऊंड (आर. एस.) आणि एक लो फ्रीक्वेन्सी इफेक्ट्स (एल. एफ. ई. किंवा सब-वुफर) हे अतिरिक्त ट्रॅक्स सामील करण्यात आले. सब-वुफरमधून केवळ लो फ्रीक्वेन्सीचे (बॉम्बस्फोट, गडगडाट, धरणीकंप) ध्वनी ऐकू येतात. पण त्यामुळे ध्वनीपरिणाम अधिक गडद होतो. ५.१, ७.१ या प्रणालीत ५ किंवा ७ साधे ट्रॅक्स आणि ०.१ म्हणजे सब-वुफरचा ट्रॅक. १९९२ सालचा ‘बॅटमॅन रिटर्न्‍स’ हा ‘डोल्बी डिजिटल’चा वापर केलेला पहिला चित्रपट. डी. टी. एस. आणि सोनी या कंपन्यांनीदेखील ५.१ प्रणाली आणली. पण डोल्बीचे वर्चस्व कायम होते आणि आहे. डोल्बी लॅबोरेटरीज्मध्ये सतत नवीन तंत्रज्ञान शोधले जाते. १९९९ साली ‘डोल्बी ई. एक्स.’ (७.१) आणि २०१२ साली ‘डोल्बी अ‍ॅटमॉस’ (७.१.४) ही तंत्रं डोल्बींनी लोकार्पण केली आणि प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे वळायला भाग पाडले.

‘डोल्बी अ‍ॅटमॉस’मध्ये तर प्रेक्षकांच्या डोक्यावरदेखील स्पीकर्स आहेत! (‘अ‍ॅटमॉस’मध्ये ७ साधे, ०.१ हा सब-वुफर आणि ०.४ हा आकडा छतावर लावलेल्या डोक्यावरच्या स्रोतांचा आहे; ज्यामुळे त्रिमितीय ध्वनीचा आभास निर्माण होतो). ‘अ‍ॅटमॉस’मध्ये पाऊस अक्षरश: तुमच्या डोक्यावरच पडतो आहे असा भास होतो.  प्रेक्षकांना अधिकाधिक ‘खरा’ अनुभव देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग चित्रपटकत्रे करून घेतात. तंत्राची ही सुविधा उपलब्ध असल्यामुळे वेगवेगळ्या विषयांचा आणि दृश्यांचा विचार होऊ लागला. अर्थात हे ध्वनीपरिणाम ऐकण्यासाठी चित्रपटगृहेसुद्धा या अद्ययावत यंत्रणेने सुसज्ज असावी लागतात. भारतात बहुसंख्य चित्रपटगृहांमध्ये डोल्बीची यंत्रणा बसवलेली आहे. याशिवाय डोल्बी लॅबोरेटरीज्ने वेळोवेळी ‘होम थिएटर साऊंड सिस्टम्स’मध्येही उच्च दर्जाच्या यंत्रणा तयार करून घरबसल्या चित्रपटाचा उत्तम अनुभव घेण्याची सोय केली आहे. पण डोल्बी लॅबोरेटरीज् स्वत: या साऊंड सिस्टम्स बनवत नाही. ही यंत्रे सोनी, फिलिप्स, बोस यांसारख्या कंपन्या बनवतात आणि त्यांना डोल्बीचे प्रमाणपत्र किंवा लायसन्स घ्यावे लागते. म्हणूनच ‘डॉल्बी लावलाय राव..!’ या एखाद्या कार्यकर्त्यांच्या फुशारकीचे हसू येते!

अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून सदोष ध्वनिमुद्रणातील अनावश्यक खरखर काढण्यासाठी  हे तंत्र नेहमीच वापरले जाते. पण माझ्यासमोर अशी एक संधी येऊन उभी राहिली, की अत्याधुनिक तंत्राचा वापर करून ध्वनी गढूळ करावा लागला. झाले असे, की २०१३ साली भारतीय चित्रपटसृष्टी आणि दादासाहेब फाळकेंच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाला शंभर वर्षे पूर्ण होणार होती. मूकपटांना मानवंदना द्यावी म्हणून पुण्यातल्या राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाने (एन. एफ. ए. आय.) तीन मूकपटांना पाश्र्वसंगीताची जोड देऊन त्यांची एक डीव्हीडी प्रकाशित करायचे ठरवले. यात फाळकेंचे ‘राजा हरिश्चंद्र’ (१९१३) आणि ‘कालिया मर्दन’ (१९१९) हे दोन चित्रपट आणि कलिपदा दास या बंगाली दिग्दर्शकाचा ‘जमाई बाबू’ (१९३१) अशा तीन चित्रपटांचा समावेश होता. या चित्रपटांसाठी नव्याने संगीत देण्याचे काम माझ्यावर सोपवण्यात आलंय हे कळल्यावर माझा आनंद गगनात मावेना. कुठल्याही पुरस्कारापेक्षा हे काम अधिक मोलाचे होते. माझ्या तुऱ्यात आकाराने मोठे, तिरंगी रंगाचे पीस खोवले जाणार होते! ज्या माणसाने रचलेल्या पायावर अख्खी भारतीय चित्रपटसृष्टी उभी आहे, त्याने दिग्दíशत केलेल्या दोन चित्रपटांचे संगीत मला करायला मिळणार होते! केवढे हे भाग्य!! आनंदाचा भर ओसरल्यावर मला जबाबदारीची जाणीव एकदम टोचली आणि मी भानावर आलो. मूकपटांच्या जमान्यात चित्रपटाला संगीतच नसे. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी कुठलाही संदर्भ नसणार आहे हे लक्षात आले आणि मी विचारमग्न झालो. काम अवघड आणि जिकिरीचे होते. पण मी मनापासून हे आव्हान स्वीकारले आणि कामाला लागलो.

पुण्याचाच माझा संगीतकार मित्र नरेंद्र भिडे याच्यावर मी वाद्यवृंद संयोजनाची जबाबदारी सोपवली. सतार, बासरी, व्हायोलिन, जलतरंग ही स्वरवाद्ये आणि पखवाज, डफ, चंडा, दिमडी या तालवाद्यांचा वापर करून ‘राजा हरिश्चंद्र’ आणि ‘कालिया मर्दन’ या दोन्ही चित्रपटांचे पाश्र्वसंगीत तयार झाले. कमी वाद्ये आणि सोपे सूर वापरल्यामुळे या दोन्ही चित्रपटांचे संगीत बरे जमले. ‘जमाई बाबू’ हा चित्रपट फार्सकिल अंगाने जाणारा विनोदी चित्रपट आहे. याचे वाद्यवृंद संयोजन करण्यासाठी मी संगीतकार चतन्य आडकरला पाचारण केले.(हाही पुण्याचाच!) चार्ली चॅप्लिन, बस्टर कीटन यांची छाप असलेल्या या चित्रपटात पियानो, व्हायोलिन्स, क्लॅरिनेट, ट्रम्पेट यांसारख्या वेस्टर्न वाद्यमेळाची योजना केली. नरेंद्र आणि चतन्य या दोघांनीही जीव ओतून काम केले.

मिक्सिंगची वेळ आली तेव्हा मला असे जाणवले की, अगदी कमी वाद्यमेळ ठेवूनसुद्धा संगीत आणि चित्र यांत तफावत वाटते आहे. शंभर वर्षांपूर्वीच्या चित्राची आणि आजच्या काळातल्या चकचकीत ध्वनीची सांगड जमेना. यावर उपाय म्हणून सगळ्यात आधी मी या ध्वनिमुद्रित संगीताचे ‘मोनोफोनिक’ मिक्सिंग केले. म्हणजे एकाच स्रोतातून ते वाजतंय असा आभास निर्माण केला. त्यानंतर वेगवेगळे फिल्टर्स वापरून ते संगीत जुने केले. पांढराशुभ्र पायजमा जुनापुराणा दिसायला चहाच्या पाण्यात बुडवून ठेवतात तसे, किंवा रंगीत फोटो जुन्या काळचा भासावा म्हणून त्याला सेपिया टोनमध्ये रीडेव्हलप करतात तसे. माझी ध्वनीतंत्रज्ञ अर्चना म्हसवडे हिची मोलाची साथ या कामात मला लाभली. ही प्रक्रिया झाल्यावर चित्र आणि संगीत दोन्ही एका काळातले वाटू लागले. हाती घेतलेले हे अतिशय अवघड काम आमच्या अख्ख्या टीमने समाधानकारकरीत्या पूर्ण केले. या तीनही चित्रपटांचा समावेश असलेल्या डीव्हीडीचे प्रकाशन एन. एफ. ए. आय.चे माजी संचालक पी. के. नायर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सत्कार होत असताना माझा ऊर आनंद आणि अभिमानाने भरून आला. कारण वास्तवात दुरापास्त असणारी एक अशक्य गोष्ट घडली होती. बरोबर शंभर वर्षांनी ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या भारतीय चित्रपटाच्या श्रेयनामावलीत ‘दिग्दर्शक- दादासाहेब फाळके’ यांच्यासोबत ‘संगीत- राहुल रानडे’ असे माझेही नाव कायमचे जोडले गेले होते!

(उत्तरार्ध)

राहुल रानडे – rahul@rahulranade.com

Story img Loader