जेम्स बॉन्डचं नाव घेतलं की त्याच्या एन्ट्रीच्या वेळेस वाजणारं गिटारवरचं म्युझिक आपसूक आपल्या कानात रुंजी घालू लागतं. ‘फॉर अ फ्यू डॉलर्स मोअर’ किंवा ‘द गुड, द बॅड अ‍ॅण्ड द अग्ली’ या चित्रपटांची नावं घेताच जुन्या पिढीतल्या लोकांच्या डोक्यात त्यात वाजणारी शिट्टी घुमू लागते. गब्बरसिंग म्हटलं की त्याच्या मागे वाजणाऱ्या गूढ ध्वनीची आठवण सगळ्याच ‘शोले’करांना होते. आत्ताच्या पिढीला ‘डी. डी. एल. जे’मधलं मँडोलिन किंवा ‘कभी खुशी कभी गम’चं (चित्रपटाच्या पाश्र्वसंगीतात साधारण पाच कोटी वेळा वाजलेलं!) टायटल साँग आठवतं. या चित्रपटांची किंवा व्यक्तिरेखांची नावं घेतली की त्यांच्या आठवणींबरोबर त्यांच्याशी निगडित सूर आपल्या मनात का उमटतात? आजी आपल्याला लहानपणी झोपवताना जी अंगाई गायची, त्याचे सूर आजही कानावर पडल्यानंतर आजीच्या हातांच्या सुरकुतलेल्या मायाळू स्पर्शाची आठवण प्रकर्षांनं का बरं होते? सनईचे सूर कानावर पडताक्षणी मंगलमय वातावरणाची अनुभूती होण्याचं कारण काय असावं? या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आहे- ‘श्रवणसंस्कार!’

मनुष्यप्राण्याच्या मेंदूमध्ये ‘हिप्पोकॅम्पस’(मूळ ग्रीक शब्द. अर्थ- पाणघोडय़ासदृश दिसणारे) नावाचे दोन छोटे भाग असतात; ज्यामध्ये स्मृती तयार करणं, तिचं आयोजन आणि साठवण करणं, अशी महत्त्वाची कामं होतात. सुरांची आणि ठरावीक व्यक्तीची किंवा प्रसंगाची सांगड घालायचं काम याच ‘हिप्पोकॅम्पस’मध्ये होत असतं. आणि नेमकं हेच पाश्र्वसंगीत करण्याचं मर्म आहे! चित्रपटातल्या एखाद्या पात्राबरोबर विशिष्ट वाद्यमेळाची आणि सुरांची सांगड घालून ती लोकांच्या मनावर बिंबवायची, आणि अमुक सुरावट अमुक वाद्यावर अमुक पात्र आल्यावर वाजते आहे याची प्रेक्षकांच्या मेंदूने नोंद घेतल्यानंतर त्याचा आपल्याला हवा तसा वापर करून घ्यायचा. या सुरावटीला ‘थीम म्युझिक’ म्हणतात. स्टीव्हन स्पिलबर्गच्या ‘जॉज’ या नरभक्षक शार्क माशावर आधारलेल्या भयपटात संगीतकार जॉन विलियम्स यांनी हा शार्क जेव्हा जेव्हा दिसतो तेव्हा तेव्हा चेलो आणि व्हायोलिन्सची एक स्वररचना थीम म्युझिक म्हणून वाजवली. शार्क दिसल्यावर वाजणारं हे थीम म्युझिक एवढं परिणामकारक झालं, की नंतर नंतर चित्रपटामध्ये शार्क न दिसतासुद्धा नुसती ती सुरावट वाजली तरी प्रेक्षकांची घाबरगुंडी उडत असे. ‘शोले’मध्ये पंचमदांनी गब्बरची थीम म्हणून एक ध्वनी तयार केला. (आश्चर्य म्हणजे हा विचित्र ध्वनी सुताराच्या करवतीवर चेलोचा बो वाजवून काढलेला आहे! पंचमदांच्या अचाट कल्पनाशक्तीला साष्टांग दंडवत.) ‘शोले’ प्रदर्शित होऊन आता एक्केचाळीस र्वष झाली, पण आजदेखील हा ध्वनी कानावर पडला की बंदुकीच्या गोळ्यांचा पट्टा खडकावर आपटत चालणारा गब्बर आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. हीच थीम म्युझिकची ‘हिप्पोकॅम्पस’द्वारा केलेली किमया!

kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
Marathi Singer Arvind Pilgaonkar career information in marathi
व्यक्तिवेध : अरविंद पिळगावकर
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो

अर्थात चित्रपटामध्ये थीम म्युझिक करून त्याची सांगड पात्रांशी घालून देणं हे तात्पुरते ‘स्वरसंस्कार’ झाले. लहानपणापासून आपल्यावर जे ‘ध्वनिसंस्कार’ झालेले असतात, त्यांचाही वापर चित्रपटाच्या पाश्र्वसंगीतात करणं आवश्यक ठरतं. पण हे ‘संस्कार’ देशागणिक किंवा प्रांतागणिक बदलत असतात. उदाहरणार्थ- शंखाचा ध्वनी उत्तर भारतीयाला युद्धाची आठवण करून देतो, तर तोच शंखध्वनी बंगाली माणसाला पवित्र दुर्गापूजेची आठवण करून देतो. भारतीय लोकांसाठी शहनाईचे सूर मंगल प्रसंगाशी जोडले गेले आहेत, पण ग्वाटेमालातल्या एखाद्या व्यक्तीने हेच शहनाईचे सूर ऐकले तर त्याला काहीतरी संगीत कानावर पडतं आहे, एवढंच वाटेल. असं असतानाही संगीत भाषेच्या पलीकडे आहे, असं का म्हटलं जातं? याचं मुख्य कारण म्हणजे प्रत्येक सूर हा एक विशिष्ट फ्रीक्वेन्सी आहे. आणि फ्रीक्वेन्सीज्चा किंवा ध्वनीलहरींचा सर्व मानवांच्या मेंदूवर गाढा परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, लो फ्रीक्वेन्सी ऐकली (बेसड्रम, ढोल वगैरे) की आपल्या मेंदूतून अ‍ॅड्रनॅलिन स्त्रवतं. अ‍ॅड्रनॅलिन हे उत्साह निर्माण करणारं संप्रेरक (हॉर्मोन) असल्यामुळे डिस्कोथेक्समध्ये किंवा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सामील होणारे लोक या ढणढणाटात रात्र रात्र न थकता नाचू शकतात. कर्णकटू (हाय फ्रीक्वेन्सी) आवाज ऐकले की आपोआपच कॉर्टिसॉल हे तणाव (स्ट्रेस) निर्माण करणारं संप्रेरक मेंदूमध्ये निर्माण होतं. त्याने अस्वस्थ वाटू लागतं. असा आहे फ्रीक्वेन्सीज्चा महिमा! बासरीवर वाजलेले कातरवेळच्या मारवा रागाचे सूर शास्त्रीय संगीत कळणाऱ्या माणसाला हुरहूर लावतात आणि संगीत न कळणाऱ्या अभारतीय माणसालाही चटका लावतात. एल्टन जॉन या संगीतकाराने ‘लायन किंग’ या चित्रपटात वापरलेले आफ्रिकन चॅन्ट्स जगभरातल्या आबालवृद्धांना एकच विलक्षण अनुभूती देतात, हे अचंबित करणारं आहे. मारवा रागाचे किंवा आफ्रिकन संगीताचे संस्कार नसतानाही हा परिणाम का होत असावा? याचं मुख्य कारण म्हणजे वेगवेगळ्या सुरांच्या समूहातून आणि विविध वाद्यांमधून ध्वनीलहरींची वेगवेगळी कॉम्बिनेशन्स निर्माण होतात आणि देश, प्रांत असा कुठलाही भेदभाव न करता सर्व लोकांच्या मेंदूवर एकसारखाच परिणाम करतात. हे ध्वनीलहरींचे समूह जगभरातल्या श्रोत्यांच्या विविध भावना जागृत करत असतात. म्हणूनच संगीताला ‘भावनेची भाषा’((language of emotions) असंही संबोधलं जातं.

पाश्र्वसंगीताबाबतची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाश्र्वसंगीत केवळ प्रेक्षकांच्या सबकॉन्शियस माइंडवर किंवा अंतर्मनावर परिणाम करत असतं. ते केवळ भावना अधोरेखित करायचं साधन आहे. त्याने सीनवर हावी होता नये. अस्तर हे अस्तराच्या जागी हवं. पांढऱ्या रंगाच्या कापडाला लालभडक रंगाचं अस्तर लावलं तर अस्तरच डोळ्यात भरेल! पाश्र्वसंगीत सीनमध्ये असं विरघळलं पाहिजे, जशी चक्क्यात साखर! श्रीखंड ओरपताना मधेच दाताखाली साखर आली तर जेवढा वाईट चेहरा होईल, तेवढाच वाईट परिणाम अयोग्य आणि कर्कश्श पाश्र्वसंगीतामुळे होऊ  शकतो. फक्त तो व्यक्त करता येत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे दाताखाली येणारी कचकच शारीरिक असते, थेट असते आणि कानावर होणारे अत्याचार श्रवणेंद्रिय आणि मेंदूशी निगडित असतात, अप्रत्यक्ष असतात. त्यामुळेच ते सहन केले जात असावेत. नाही तर हिंदी/ मराठी टेलिव्हिजन सीरिअल्समध्ये दर सेकंदाला झ्झूम, झूश्श, ढुश्श, ढढम् ढढम् ढढम् वाजणारे आवाज बघणं कधीच बंद केलं असतं लोकांनी!

या आपल्या सीरिअलवाल्यांची फार मोठी गंमत आहे. त्यांना लहानपणी आई-वडिलांनी ‘गप रे’ असा दम कधीच दिला नसावा. कारण त्यांचा ‘शांतता’ या शब्दावर बिलकूल विश्वास नाही. म्हणूनच की काय, २२ मिनिटांच्या एपिसोडमध्ये २२ मिनिटांचं पाश्र्वसंगीत देण्याची लीला ते करू शकतात. याला ‘कार्पेट म्युझिक’ म्हणून संबोधलं जातं. हॉलमध्ये वॉल टू वॉल कार्पेट असतो, तसं हे म्युझिक एपिसोडच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाजत असतं. अर्थात चॅनलवालेही धंदा करत असल्यामुळे ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वावर ते काम करत असतात. आपल्या देशातील बहुसंख्य जनतेला भडक, अतिरंजित गोष्टी आवडतात आणि चमच्याने भरवल्याशिवाय त्यांचं समाधान होत नाही. त्यातून या सीरियलवाल्यांची एपिसोडमध्ये म्युझिक वाजवण्याची कारणंही वेगळीच असतात. भावना अधोरेखित करणं वगैरे झालंच; पण स्वयंपाकघरातल्या गृहिणीला सतत सीरियल ‘ऐकू’ जावी, हा मूळ उद्देश. मधेच शांतता झाली तर- ‘टी. व्ही. बंद पडला की काय?’ ‘या एपिसोडमध्ये काहीच घडत नाहीये की काय?’ ‘ही सीरिअल नीरस आणि बोरिंग आहे की काय?’ अशा भलत्यासलत्या शंका गृहकृत्यदक्ष स्त्रीवर्गाला येऊ  नये, एवढीच माफक अपेक्षा असते या सीरिअलकर्त्यांची. म्हणूनच त्यांना आपल्या एपिसोडमध्ये पाश्र्वसंगीताचा जीर्ण झालेला, मधे मधे फाटलेला, मधेच उंचवटे असलेला बोचरा गालिचा पांघरावा लागतो. बेसुमार सीरियल्स बघणारे प्रेक्षकही थेट शारीरिक इजा होत नसल्यामुळे श्रवणसंस्थेवर होणारे हे अत्याचार सहन करत असावेत. असो. ईच टू हिज ओन!

आपल्या चित्रपटांचा सीन टेलिव्हिजनपेक्षा खूप बरा आहे. नवनवीन कल्पना घेऊन आलेले जाणते आणि सजग निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांच्यामुळे आपण चित्रपटनिर्मितीच्या बाबतीत तरी मेंढय़ांच्या कळपासारखे वाहवत गेलो नाही आहोत. पाश्र्वसंगीत आणि ध्वनी-आरेखनाचं महत्त्व आपल्या सध्याच्या फिल्म मेकर्सना पुरेपूर पटलं आहे. आणि आपल्याकडे बनणारे बहुसंख्य चित्रपट आशय, विषय आणि तांत्रिक हाताळणीच्या बाबतीत प्रगल्भता दाखवत आहेत. चित्रपटाचं अथवा नाटकाचं पाश्र्वसंगीत करताना ‘श्रवणसंस्कार’ करण्याबाबत नेमका कसा विचार केला जातो, मी तो कसा करतो, याविषयी पुढच्या लेखात..

राहुल रानडे – rahul@rahulranade.com

Story img Loader