‘बिग बॉस’ म्हणजे वादंग, मतभेद, हेवेदावे. या शोविषयी कितीही नाके  मुरडली तरी शोची लोकप्रियता प्रचंड आहे हे नाकारता येणार नाही. आणि ‘बिग बॉस’ म्हणजे सलमान खान हे समीकरण पुसताही येणार नाही. गेल्या वर्षी आपण या शोला कायमचा अलविदा करणार असल्याचे सलमानने जाहीर केले होते. तरीही यंदाच्या शोचे आठवे पर्व घेऊन सलमान खान परतला आहे. म्हणजेच तो हा शो करतो आहे. एवढय़ा वादंगानंतरही त्याने आपला निर्णय का बदलला? नक्की काय आहे त्याच्या मनात, हे जाणून घेण्यासाठी सलमानशी केलेली बातचीत..
‘चला परत एक सप्टेंबर महिना..कम बिग बॉस..कम सलमान खान’ तुमच्यासमोर हजर आहे. याच आविर्भावात तो आपले स्वागत करतो आणि सुरुवातीलाच सगळे स्पष्ट करायचे याच उद्देशाने तो बोलू लागतो. या वेळी ‘बिग बॉस’साठी केलेला विमानाचा प्रोमो बघून खूप प्रश्न विचारले गेले मला. पहिला तर काय या वेळी ‘बिग बॉस’ परदेशात शूट होणार आहे? तर हो. यावेळी वाहिनीकडे इतके पसे आहेत की ते परदेशात जाऊन लोणावळ्याप्रमाणे बंद घरात शूट करणार आहेत. दुसरा प्रश्न असा होता की परदेशी कलाकार असणार आहेत का? तर हो. यावेळी सर्व स्पर्धक परदेशी कलाकार असतील आणि ते परदेशी भाषा बोलतील, जेणेकरून आमचे प्रेक्षक वैतागून जातील. आणि तिसरा हा की मी पायलटचे कपडे का घातले आहेत? उभ्या आयुष्यात छोटय़ा पडद्यावर मी पायलटचे कपडे घातले नव्हते. त्यामुळे आता घातले. थोडक्यात, आपल्या स्पष्टीकरणांमधून ‘समझदारों को इशारा काफी है..’ हे दाखवून त्याने मूळ गप्पांना सुरुवात केली.
मागच्या पर्वामध्ये सलमानच्या भूमिकेवर खूप आरोप झाले. त्यामुळे वैतागून आपण आठवे पर्व करत नसल्याचे त्याने जाहीर केले होते. मग तो हा पर्व करायला तयार झालाच कसा? हे सांगताना मिश्कीलपणे तो म्हणतो, ‘मी नाही म्हटले नसते तर मला शोसाठी पसे वाढवून मिळाले असते का? इथे तुमच्या ‘नाही’ला महत्त्व असते, ‘हो’ला नाही.’ पण दुसऱ्याच क्षणी गंभीर होऊन तो, ‘मागच्या पर्वानंतर हा शो करायचा की नाही या गोंधळात मी होतो. कारण, तेव्हा स्पर्धक घरात होते आणि मी बाहेर. असे असून मी त्यांच्यात नको इतका गुंतत गेलो. मी शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेने गेलो होतो. त्यांच्या मार्गदर्शकाच्या नाही. त्यांची आपापसातली भांडणे सोडवण्यात मी इतका गुंतलो गेलो की, त्यातून बाहेर पडणे मला कठीण गेले. त्यामुळे तेव्हा मी तसं बोलून गेलो. पण, यंदा आपण तटस्थ राहायचे हे ठरवूनच मी पर्वाचे सूत्रसंचालन करायला तयार झालो’, असे त्याने प्रांजळपणे मान्य के ले.
यंदा तो वैमानिकाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचा हा अंदाज सर्वाना आवडलाच आहे. पण, यशिवाय सूत्रसंचालक म्हणून त्याने यावेळी काय खास तयारी केली आहे याबद्दल विचारले असता तो म्हणतो, ‘मुळात हा शो स्पर्धकांवर आधारित आहे. माझी भूमिका तितकीशी महत्त्वाची नाही. ते आठवडाभर काय करतात त्यावर मी शनिवार-रविवारच्या भागात काय करायचे, काय बोलायचे हे ठरते. त्यामुळे स्पर्धकांची तयारी महत्त्वाची. मागच्या पर्वाच्या स्पर्धकांनी उत्तम कामगिरी केली होती. यंदाचे स्पर्धक अजून चांगले काम करतील अशी आशा करू या.’
शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या नाटय़ावर टीका होत असली तरी हा शो त्यावरच चालतो हेही तो मान्य करतो. पण हे जरी खरे असले तरी प्रत्येकाने आपली मर्यादा स्वत: आखली पाहिजे हेसुद्धा तो अधोरेखित करतो. ‘ड्रामा इतना भी मत करो की, बाहर आने के बाद कोई काम नही देगा’. माझ्यासाठी ते घरात असताना ते काय करतात, हे महत्त्वाचे नाही. तर घराबाहेर पडल्यावर तुमचे काय होतेय हे पाहणे महत्त्वाचे आहे. घरामध्ये तुम्ही कसे वागताय याकडे अख्खे जग पाहत असते आणि त्यानुसारच तुम्हाला भविष्यात काम मिळणार असते. त्यामुळे स्पर्धकांनी या जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे आहे, असे सलमानने यावेळी बोलताना सांगितले.
मागच्या पर्वात सलमानवर पक्षपातीपणाचे अनेक आरोप झाले होते. मग ते तनीषा- अरमान प्रकरण असो किंवा गौहर-कुशाल प्रकरण. त्याने मांडलेली मते ही काही खास लोकांना डोळ्यासमोर ठेऊन मांडली असल्याचा ठपका त्याच्यावर मारण्यात आला होता. याबद्दल बोलताना तो म्हणतो, ‘‘प्रेक्षक म्हणून तुम्ही केवळ एखाद-दोन भाग पाहून स्पर्धकांना तपासता. पण, मला संपूर्ण आठवडाभराची त्यांची कामगिरी पहावी लागते. ती पाहूनच मी बोलत असतो आणि स्पर्धकांमध्ये भेदभाव करण्याबाबत बोलाल तर यांना घरात आल्यावरच प्रेक्षकांप्रमाणे मीपण ओळखायला सुरुवात करतो. याआधी काही स्पर्धकांची नावे मी शोसाठी सुचवली होती. पण केवळ ते लोकशोच्या संकल्पनेला साजेसे होते म्हणूनच. माझ्या फायद्यासाठी मी आतापर्यंत कोणाचेही नाव सुचवलेले नाही.’’
या शोमागच्या उद्देशाबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न असले तरी सलमान मात्र शोच्या संकल्पनेबाबत सकारात्मक आहे. ‘हा शो आजच्या समाजाचे, तरुणाईचे प्रतिनिधित्व करतो. शोमध्ये आलेले सुशिक्षित स्पर्धक समोर आलेल्या परिस्थितीशी कशा प्रकारे जुळवून घेतात, हे शोमध्ये दिसते. जेव्हा तुमच्याकडे मनोरंजनाचे साधन नसते, बाहेरच्या जगाशी तुमचा संबंध येत नाही, अगदी तुम्हाला वेळही कळत नसते, अशा वेळी तुम्ही कसे वागाल याची एक झलक तुम्हाला या शोमध्ये दिसते.  असे सलमान मानतो.
आजची तरुणाई कोणत्या दिशेने चालली आहे, त्यांचा त्यांच्या भावनांवर, वागण्यावर किती ताबा आहे हे या स्पर्धाच्या माध्यमातून दिसून येते. एक काळ होता, जेव्हा नाती आयुष्यभर पुरायची. आज काही दिवसात ग्रुप बनतात आणि तुटतात. नात्यांमधील चढउतारांचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘बिग बॉस’ हा आहे. त्यामधून टिकलेली नाती ही खरेच खरी असतात.
शाहरुख आणि माझ्यात वाद असले तरी आमच्यात युद्ध नाही. त्याला त्याच्या वाटणीचे काम आणि मान मिळतोय आणि मला माझ्या वाटणीचे काम मिळते आहे. ‘हॅपी न्यू इयर’ च्या टीमची इच्छा असेल तर शोमध्ये त्याची प्रसिद्धी नक्की केली जाईल.
“माझी छायाचित्रे काढायची नाहीत छायाचित्रकारांचा निर्णय आहे, माझा नाही. त्यामुळे उद्या जर ते माझे छायाचित्र काढायला आले तर माझे काहीच म्हणणे नाही. फक्त त्यांनी आपले काम शांतपणे करावे अशी माझी अपेक्षा आहे. उलट, त्यांनीच एकत्र येऊन माझ्यावर बंदी आणली. पण, खरे तर तुम्ही त्यांच्या या एकजुटीचे कौतुकच केले पाहिजे. त्यामुळे राग असण्याचे काहीच कारण नाही.”
सलमान खान