‘‘पकडा .. पकडा ..’’
‘‘अहो, ते मला धडक मारून पळून चालले आहेत त्यांना पकडा..’’
लोक जमा होतात
काय झालं..? झालं काय..? अर्थ एकच. ‘‘अहो, ते ट्रीपल सीट मोटारसायकलस्वार वेगात आले.. त्यांनी मला धडक दिली. मी रस्त्याबाहेर फेकला गेलो.. ते निघून गेले वेगात..’’
‘‘नंबर पाहिलात..?’’
‘‘अहो, कसं शक्य आहे नंबर पाहणं.. या सगळ्या धडपडीमध्ये नंबर प्लेट पाहायची की स्वत:ला सावरायचं..?’’
‘‘नंबर कळाला असता तर.. पण तरीही मी पाहीलं बरं का.. नंबर प्लेटच नव्हती..’’
‘‘नंबर प्लेट नव्हती..?’’
‘‘हो.. हल्ली काय, नंबर प्लेट असली तरी त्यावर नंबर टाकला की अपमान वाटतो लोकांना.. किंवा आपण फारच सामान्य माणसासारखं वागतो असं वाटत असेल किंवा आपण असामान्य वाटण्यासाठी जे-जे केलं पाहिजे त्यापैकी हे एक असावं..’’ एकजण
‘‘नाही तर काय..? नंबर प्लेटवर नंबराच्या ऐवजी काही तरी दादा, बाबा, राजा, नेते असं काही तरी लिहिलेलं असतं. यांना ‘अक्षर’ आणि अंक यातला फरक कळत नाही काय..?’’
चर्चा जोरात सुरू झाली. तोपर्यंत कुणी तरी त्या जखमी गृहस्थांना शेजारच्या सिमेंटच्या (स्थानिक पुढाऱ्यानं स्वत:च्या नावासकट स्पॉन्सर केलेल्या) बाकावर बसवलं..
‘‘चेन स्नॅचर असेल..?’’
‘‘आपण पोलिसांना सांगायला हवं..’’
‘‘नको. ते माझीच ‘चव’कशी करत बसतील.’’
‘‘ हो, ते एक आहे बुवा..’’
‘‘अहो, हे तर काहीच नाही, काही लोक भर रस्त्यावर ट्रीपल सीट फिरतात आणि पोलिसांना मोठय़ानं नमस्कार घालतात. (खास करून ट्रॅफिक पोलिसांना) त्यात शौर्य वाटतं त्यांना. नियम मोडून आम्ही कसे डायरेक्ट पोलिसांनाच सलाम करतो याचं केवढं समाधान त्यांना मिळत असतं.’’
‘‘अहो, आमच्या गावी तर पारावर पत्ते खेळणारी मंडळी आपली ‘रमी’ किंवा ‘तिरट’ जमवत पोलिसांनाच रामराम घालतात..’’
एका हातात पत्ते आणि दुसऱ्या हातानं रामराम. तोवर त्या गृहस्थांना कुणी तरी पाणी दिलं प्यायला..
‘‘मागच्याच आठवडय़ात.. अगदी.. हो. मागच्याच आठवडय़ात दोन महिला आपल्या मॉर्निग वॉकला निघाल्या नेहमीप्रमाणे. मागून आलेल्या दुचाकीस्वारानं एका महिलेच्या कानातलं सोन्याचं डूल चोरायचा प्रयत्न केला. त्याला ते निघेना म्हणून कानाच्या पाळीसकट खेचून नेलं ते डूल त्या मुलानं..’’
‘‘काही ल्यायचं नाही.. चोरी होते; घरात ठेवायचं नाही चोरी होते. बँकेत ठेवावं तर दरोडा पडतो; कुठे ठेवावं कुठं..?’’ एकाचा तिरकस सूर चर्चेला वेगळाच सूर लावत होता..
‘‘पोलिसांना दिसत नाही का हे सगळं..?’’
‘‘दिसतं. पण त्यांच्या निदर्शनास आणून द्यावं लागतं.. ते तरी बिचारे काय करणार, कित्ती कामं..?’’
‘‘पण तेही पहिला प्रश्न विचारणार..
नंबर काय होता गाडीचा..?’’
‘‘काहींना आपल्या गाडीवर नंबर टाकायला नको. यांच्याकडं सगळी आयडेंटिटी कार्ड्स असतील, पासपोर्ट असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल आणि बरंच काही असेल, पण गाडीवर मात्र नंबर टाकायला नको..’’
‘‘झेंडे कसले टाकता गाडीवर. त्या देशाचा झेंडा लावाचा आणि त्याचे कायदेच पाळायचे नाहीत, ही कसली मनोवृत्ती..’’
‘‘सगळी I-cards ठेवायची, मात्र गाडीसकटची आपली, निमित्ताने गाडीचीही Identity लपवायची, त्याऐवजी आकडय़ांची मोडतोड करून आपलं नाव (?) निर्माण करायचं.. का..?’’
कशातून जन्म घेते ही मनोवृत्ती..
Identity लपवण्याचा Existance प्रॉब्लेम असावा बहुतेक.’’
चर्चा संपली.. आपापली मतं हिरिरीनं मांडून आपल्या कामाला लागली..
त्या गृहस्थांना त्यांची मुलगी येऊन घेऊन गेली..
प्रश्न तसाच पडून आहे.. रस्त्याबाहेर फेकलेल्या अपघातग्रस्तासारखा..

ता.क.
मनोवृत्ती दर्शवणारं I-card देता येईल का..?
– मिलिंद शिंदे