मराठी चित्रपटांमध्ये कलाकारांपेक्षा नेहमीच ‘गोष्ट’ किंवा आशय वरचढ राहिला आहे. त्यामुळेच हिंदीतील जाणकारांचेही कौतुक मराठी चित्रपटांच्या वाटय़ाला येते. ‘पोरबाजार’मध्येही गोष्ट फार महत्त्वाची आहे. ज्यामुळे फरहान अख्तरसारखा समर्थ अभिनेता या चित्रपटाशी जोडला गेला आहे. ‘पोरबाजार’ हा पुढच्या पिढीच्या सुरक्षिततेवर भाष्य करणारा चित्रपट आहे जो प्रेक्षकांनी समजून घेतला पाहिजे
एखाद्या कलाकाराला आपण आदर्श मानतो. त्याला डोळ्यासमोर ठेवून आपण आपले काम करत असतो. आणि अचानक तुमच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कोंदणात त्या स्वप्नवत वाटणाऱ्या आदर्शाची एक सहज आठवण ‘पिंपळपाना’सारखी अडकून बसते. असंच एक ‘फरहान अख्तर’ नावाचं पिंपळपान मराठीत पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून एक पाऊल पुढे टाकणारी अभिनेत्री मनवा नाईक हिच्या मनात सजून बसलं आहे. ‘पोरबाजार’ या चित्रपटाच्या निमित्ताने मनवाचा दिग्दर्शकीय पैलू पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. आणि तिच्या या पहिल्याच प्रयत्नात एका महत्त्वाच्या दृश्यासाठी चक्क स्वत: उत्तम दिग्दर्शक, अभिनेता असणाऱ्या फरहानला दिग्दर्शन करण्याची संधी मनवाला मिळाली.
‘पोरबाजार’ मनवाच्या चित्रपटाचे नावच त्याच्या कथेविषयी बरेच काही सांगून जाणारे आहे. लहान मुलांना पळवून नेऊन त्यांना विकून टाकण्याच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. या विषयावर मुलांच्याच दृष्टिकोनातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मनवाने केला आहे. तिच्या चित्रपटाचा कथाविषय आणि कथाच इतकी प्रभावी आहे की त्यामुळेच फरहान अख्तर या चित्रपटाशी जोडला गेला, असं मनवाने ‘रविवार वृत्तांत’शी बोलताना सांगितलं.
 फरहानने या चित्रपटात काम करणं हे माझ्यासाठी स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासारखंच आहे. मुळात, या चित्रपटातून जो विचार लोकांसमोर ठेवायचा होता ते करताना एक सामाजिक भान असलेला, वैचारिक, प्रगल्भ आणि लोकांमध्येही तशीच प्रतिमा असणारा अभिनेता आम्हाला हवा होता. त्याला जेव्हा चित्रपटाच्या कथेविषयी सांगितलं तेव्हा लहान मुलांच्या होणाऱ्या व्यापारावर हा विषय आहे त्यामुळे हे मी करणारच.. असं त्याचं उत्तर होतं. फरहान यात आमचा आणि प्रेक्षकांचाही प्रतिनिधी या नात्याने तो विचार मांडताना दिसणार आहे. त्याच्यासारखा नावाजलेला अभिनेता, ज्याला एक आदर्श दिग्दर्शक, अभिनेता, विचारी माणूस असं सगळंच मानते त्याला माझ्याच पहिल्या चित्रपटात दिग्दर्शन करायला मिळणं हा माझ्या आयुष्यातला परमोच्च क्षण होता.. असं मनवा सांगते. फरहानला दृश्य समजावून सांगताना मनात भीती होती खरी पण, तो इतक्या तयारीने आला होता. त्याने दोन दिवस आधीच त्याचे संवाद मागवले होते, त्याचा सराव केला होता. तो उत्तम मराठीत बोलतो. त्यामुळे, मी त्याला चित्रीकरणाविषयीच्या गोष्टी समजावून दिल्या. त्यानंतर तो भरभर शॉट्स देत गेला. इतक्या सहजतेने ते घडलं, असं मनवा सांगते. दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न असताना त्यात लहान मुलांचा व्यापार हा गुंतागुंतीचा विषय आणि तोही मुलांच्याच माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणारी मनवा आपल्या चित्रपटाच्या नावातली मेख छान समजावून सांगते. ‘पोरबाजार’ म्हणजे सगळी मुलं एकत्र येऊन दंगा करतात, सगळा पसारा मांडून ठेवतात तेव्हा आपण म्हणतो काय रे पोरांनो हा बाजार मांडून ठेवला आहे.. आणि हीच मुलं एका घटनेमुळे अशा वास्तवापर्यंत पोहोचतात जिथे लहान मुलांना बाजारात विकलं जातं.. दोन्ही अर्थाने हा ‘पोरबाजार’ आहे, असं मनवा सांगते. आपल्याक डची मुलं आज खरोखरच सुरक्षित आहेत का?, माझ्या अवतीभोवती असलेल्या मुलांमधून, नेहमीच्या घटनांमधूनच हा प्रश्न माझ्या मनात रेंगाळत राहिला आहे. आणि म्हणून तो या चित्रपटातून मांडतानाही मी पाच मुलांना कें द्रस्थानी ठेवलं आहे, हे सांगताना त्यामागचं कारणही मनवा सांगते. चित्रपटातून गंभीर विषय मांडतानाही समोरचा प्रेक्षक मनोरंजनासाठी आलेला असतो, हे भान ठेवावं लागतं. लोकांच्या आयुष्यात मुळात इतक्या अडीअडचणी असतात की चित्रपट पाहायला आल्यानंतर त्यांना जो आनंद हवा तो मिळायलाच हवा. मात्र, आनंदाने पाहत असतानाच सहज कुणीतरी त्यांच्या कानात सांगून जाईल इतक्या अलवार पद्धतीने त्यांना वास्तवाची जाण व्हायला हवी, या पद्धतीने ‘पोरबाजार’ची मांडणी केली आहे. आणि मनोरंजन आणि वास्तवाचा समतोल साधणं हेच दिग्दर्शक म्हणून आपल्यासमोरचं एक आव्हान होतं, असं तिने सांगितलं.
‘पोरबाजार’ या चित्रपटात पाच मुलं केंद्रस्थानी असली तरी एकूण ६० मुलांनी काम केलं आहे. या मुलांना सेटवर सांभाळून चित्रीकरण करण्याची अवघड जबाबदारी आपल्या आईमुळे मीना नाईक यांच्यामुळे शक्य झाल्याचे तिने सांगितले. या चित्रपटासाठी ‘सलाम बॉम्बे’ या सामाजिक संस्थेतील ज्या मुलांना मीना नाईक यांनी नाटकाची तालीम दिली आहे त्यांना घेतल्याचेही तिने सांगितले. अनुराग वरळीकर, अभिनेता महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या, अतुल परचुरे यांची मुलगी सखिल, मनोज जोशी यांचा मुलगा धर्मराज जोशी आणि स्वरांगी मराठे ही या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहे. त्यांच्या जोडीला अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अंकुश चौधरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अंकुश यात ‘भुरा’ नावाची खलनायकी व्यक्तिरेखा साकारतो आहे. त्याविषयी बोलताना ‘भुरा’ हा चित्रपटातला खलनायक नाही तर तो नकारात्मक विचारांचा पण नायक म्हणूनच मुलांसमोर येतो. त्या भूमिकेसाठी मला ‘हिरो’ व्यक्तिमत्त्व असलेलाच अभिनेता हवा होता. अंकुश त्यात एकदम चपखल बसतो. त्यामुळे या व्यक्तिरेखेसाठी पहिल्यापासून अंकुशच आपल्या डोळ्यासमोर होता, असे मनवाने सांगितले. कॅमेऱ्यासमोर आणि आता कॅमेऱ्यामागे अशा दोन्ही भूमिकांमध्ये ती वावरली आहे. पण, अभिनेता म्हणून जबाबदारी कमी असते तर दिग्दर्शक म्हणून ती दुपटीने जास्त असते. असं असलं तरी दोन्ही भूमिकांमध्ये आलटूनपालटून वावरण्यावर आपला भर असल्याचे तिने सांगितले.