आपल्या हुकमी अभियनाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६६ वर्षांचे होते. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९५० रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला होता. त्यांच्या अकाली निधनामुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून ओम पुरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

घाशीराम कोतवाल चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनयक्षेत्रात पर्दापण केले होते. आक्रोश हा ओम पुरी यांचा पहिला गाजलेला चित्रपट होता. केंद्र सरकारने त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केले होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या १९७३ बॅचचे ते विद्यार्थी होते. अभिनयाबरोबरच त्यांचा भारदस्त आवाज व संवादफेक कौशल्य अप्रतिम होते. अर्धसत्य चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ओम पुरी यांनी हॉलीवूडमध्येही आपली छाप सोडली होती. अनेक इंग्रजी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला.

 

अभिनयाबरोबर सामाजिक विषयांवरही ते भाष्य करत. अनेकवेळा ते यामुळे वादातही अडकले होते. १९९३ मध्ये त्यांनी  नंदिता पुरी यांच्याशी विवाह केला होता. २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांना इशान नावाचा एक मुलगा आहे. ओम पुरी यांनी ब्रिटन, अमेरिकेतील चित्रपटांमध्येही कामे केली. आस्था, हेराफेरी, अर्धसत्य, चक्रव्यूह, चायना गेट, घायल यासारख्या विविध चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.

अनेक गंभीर भूमिका साकारणारे ओम पुरी विनोदी भूमिकाही तितक्याच लिलयापणे निभावत. हेराफेरी चित्रपटातील विनोदी भूमिकेसाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता. एक कलासक्त अभिनेता हरपल्याने अनेकांनी दुख: व्यक्त केले आहे. अभिनेत्याला शोभेल असे रूप नसतानाही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर भूमिका मिळवल्या.

अमरीश पुरी, नसरूद्दीन शहा, शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांच्याबरोबर त्यांनी अनेक कलात्मक चित्रपटात काम केले. त्यांनी १९८० मध्ये आलेल्या भवानी भवई, १९८१ मधील सद्गती, १९८२ मध्ये अर्धसत्य, १९८६ मध्ये मिर्च मसाला आणि १९९२ मध्ये आलेल्या धारावी चित्रपटात त्यांनी उत्कृष्ठ काम केले होते. चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी ओम पुरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.