सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेत्री कंगना रणौतची सर्वाधिक चर्चा आहे. ‘इंडिया टीव्ही’च्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात तिनं अभिनेता हृतिक रोशन, करण जोहर, आदित्य पांचोली, अध्ययन सुमन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझानने तिला पाठिंबा दर्शविला. मात्र गायिका सोना मोहपात्रानं कंगनाच्या मुलाखतीला ‘सर्कस’ म्हणत तोफ डागली आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी कंगनाचं समर्थन केलंय. पण आदित्य पांचोलीनं तिच्यावर कडवट टीका केलीय.
चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करण्यासाठी कंगना संघर्ष करत होती. त्याच दरम्यान आदित्य पांचोलीसोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या कंगनानं त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आदित्यनं मला घरात डांबून ठेवून माझं शोषण केल्याचा आरोप तिनं यावेळी केला. या आरोपांवर ‘बॉलिवूड लाइफ’ला दिलेल्या मुलाखतीत आदित्य म्हणाला की, ‘ती वेडी झालीये? मी काय करु शकतो? तुम्ही तिची मुलाखत पाहिली का? एखादा वेडा माणूस बोलतोय असं तुम्हाला वाटलं नाही का? अशा पद्धतीनं कोण बोलतं का? चित्रपटसृष्टीत मी बऱ्याच वर्षांपासून आहे. पण कोणाविषयी इतक्या वाईट पद्धतीनं कधीच बोललं गेलं नाही. ती खरंच वेडी झालीये. तुम्ही चिखलात दगड फेकलात तर तुमचेच कपडे खराब होतील.’ इतकंच नाही तर कंगनाविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही त्यानं सांगितलं.
PHOTOS : किंग खाननंतर ‘देसी गर्ल’ प्रियांकानंही घेतली दिलीप कुमार यांची भेट
ती खोटं बोलतेय म्हणून मी तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करेन. इतरांबद्दल मला माहित नाही; पण माझ्यावर तिनं केलेले सर्व आरोप खोटे आहेत. माझ्या कुटुंबियांना याचा त्रास झालाय, असंही तो म्हणाला. यावेळी आदित्यनं कंगनाविषयी चिंताही व्यक्त केली. ‘तिनं केलेल्या आरोपांमुळं मला खूप दु:ख झालंय. ती एक चांगली अभिनेत्री असून मला तिची काळजी वाटतेय. देवानं तिला खूप काही दिलंय आणि त्यासाठी तिनं देवाचे आभार मानले पाहिजेत. तिनं सर्वांशी विनम्रतेनं वागायला हवं. पण तिच्या मते संपूर्ण जग वाईट आहे आणि फक्त ती एकटीच चांगली आहे, असंही तो म्हणाला.