चक्रावणारा रहस्यखेळ
मधु राय हे गुजरातीमधील एक महत्त्वाचे लेखक, संपादक आणि नाटककार. सुमारे अर्धशतकापूर्वी (१९६८ साली) त्यांनी लिहिलेल्या ‘कोई पन एक फूल नु नाम बोलो तो’ या नाटकानं त्यांनी नाटय़क्षेत्रात पदार्पण केलं. (चित्रपट दिग्दर्शक केतन मेहता यांनी त्यावर आधारित केलेली ‘किसी एक फूल का नाम लो’ ही दूरदर्शन मालिका गाजली होती.) आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. आजवर अनेक भाषांतून त्यांच्या नाटकांचे अनुवाद व सादरीकरणं झालेली आहेत. (नाटककार विजय तेंडुलकरांनीही त्यांच्या ‘कुमारनी आगाशी’ या नाटकाचा ‘मी कुमार’ या नावाने अनुवाद केला आहे. पॉप्युलर प्रकाशनाने तो नुकताच पुस्तकरूपानं प्रसिद्ध केला आहे.) नुकतंच मराठी रंगभूमीवर आलेलं ‘हा शेखर खोसला कोण आहे?’ हे नाटक ‘कोई पन..’चंच मराठी रूपांतर! विजय शिर्के यांनी हे रूपांतर केलं आहे. मंगेश कुळकर्णीनी त्याची रंगावृत्ती तयार केली आहे. चाळीसेक वर्षांपूर्वी अमोल पालेकरांच्या संस्थेतर्फे हे नाटक ‘आणि म्हणून कुणीही’ या नावानं राज्य नाटय़स्पर्धेत सादर झालं होतं. व्यावसायिक मराठी रंगभूमीवर मात्र ते आलेलं नव्हतं. भद्रकाली प्रॉडक्शनने ‘हा शेखर खोसला कोण आहे?’ या नावानं आता त्याची निर्मिती केली असून, याचं दिग्दर्शन केलं आहे विजय केंकरे यांनी.
मधु राय यांच्या नाटकांची काही वैशिष्टय़ं या नाटकात एकवटलेली दिसून येतात. वास्तव आणि आभासी विश्व यांच्या सरमिसळीतून मधु राय यांची काही गाजलेली नाटकं आकारलेली आहेत. विशेषत: मानवी नातेसंबंध. त्यातही स्त्री-पुरुष संबंधांतली गुंतागुंत त्यांना जास्त आकर्षित करते. ती समजून घेण्याचा प्रयत्न त्यांच्या नाटकांतून केलेला जाणवतो. परंतु रूढ चाकोरीत नाटकात थेटपणे स्त्री-पुरुष संबंध ते मांडत नाहीत. तर रहस्याच्या अवगुंठनातून ते त्यावर प्रकाश टाकू पाहतात. जेणेकरून वाचक/ प्रेक्षकांनी आपल्या परीनं ते समजून घ्यावेत, आपल्या आपणच आपल्या परीनं त्यांचा अन्वय त्यांनी लावावा. म्हणूनच नाटकातील अध्याहृत विषयाला ते थेटपणे भिडत नाहीत. वाचक/ प्रेक्षकांनी आपल्या मेंदूला ताण देऊन त्यातले गुंते, पेच जाणून घ्यावेत अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणूनच त्यांची ही नाटकं हा बुद्धिगम्य प्रकार आहे. खरं तर सर्वसामान्य प्रेक्षकाला आपल्या मेंदूला असा ताण देणं आवडत नाहीत. पण मधु राय यांची अशी काही नाटकं पाहायची असतील तर याची तयारी ठेवूनच ती बघावी लागतात. ‘शेखर खोसला’ हे त्याचं वानगीदाखल उदाहरण! हे करत असताना ते नाटकाच्या फॉर्मशीही हेतूपूर्वक खेळ करतात.
हे नाटक सुरू होतं ते एका अतिवास्तव नोटवर. ‘आणि म्हणून कुणी’ या नाटकाचा प्रयोग सुरू असतो. आणि एका प्रसंगात नाटकाची नायिका अनुपमा ही हातातल्या पिस्तुलानं प्रेक्षकांत बसलेल्या कुणा शेखर खोसला नामक माणसाचा चक्क गोळ्या घालून खरोखरीचा खून करते. खरं तर तिनं नाटकातल्या कुणा शेखर खोसलाचा खोटा खून करणं अपेक्षित असतं. प्रत्यक्षात ती वास्तवातील एका माणसाचा खून करते.
इथूनच नाटक एक वेगळी कलाटणी घेतं. अनुपमाची भूमिका करणाऱ्या मधुरा देसाईला अटक होते. तिच्यावर खटला सुरू होतो. तिचे सहकलाकार असलेल्या लोकेश, शर्वरी, तुषार, विवेक, सुशील यांच्या कोर्टात साक्षी होतात. त्यांतून खून झालेला शेखर खोसला नेमका कोण आहे? मधुरा त्याचा खून का करते? तिच्या सहकाऱ्यांना त्याच्याबद्दल काही माहिती असते का? लेखकानं ‘आणि म्हणून कुणी’ या नाटकात रंगवलेला शेखर खोसला आणि प्रत्यक्षात खून झालेला शेखर खोसला यांचा काय संबंध असतो? ज्याचा खून होतो तो खरोखरच शेखर खोसला असतो का?.. असे अनेक प्रश्न नाटक पाहताना पडत जातात. आणि नाटकात त्यांची उकल करता करता मानवी नातेसंबंधांतील अनेक अंधाऱ्या गुहा हे नाटक आपल्याला दाखवीत जातं. आणि त्याचवेळी आपल्या किंवा आपल्या भोवतालच्या व्यक्तींच्या आयुष्यातल्या अशाच समांतर घटनांशी ते आपल्याला परिचित करत जातं.
नाटककार मधु राय यांनी अत्यंत कौशल्यानं या नाटकाची अनेकस्तरीय रचना केलेली आहे. नाटकातलं नाटक, नाटकातील कलावंतांच्या आयुष्यातले घटना-प्रसंग आणि त्यांचंही त्या नाटकातील कथानकाशी समांतर असणं, नाटकातल्या नाटकाच्या लेखकानं स्वत:च्या आयुष्यातल्या वास्तव घटनांचा हिशेब चुकता करण्यासाठी केलेला ‘नाटक’ या माध्यमाचा वापर, त्यासाठी नायिकेच्या डोक्यात सोडलेला ‘शेखर खोसला’ नामक किडा.. आणि त्याच्याद्वारे नायिकेनं आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील असुरक्षिततेच्या भावनेवर मात करण्यासाठी, तसंच इतरांवर वर्चस्व मिळवण्यासाठी रचलेलं एक जगावेगळं आभासी विश्व.. अशा अनेकविध पातळ्यांवर हे नाटक फिरत राहतं. नाटकाचं मराठी रूपांतर करताना विजय शिर्के आणि रंगावृत्तीकार मंगेश कुळकर्णी यांनी हे नाटक मनोविश्लेषणात्मक अंगानं नेताना त्यातला रहस्याचा धागा सुंदररीत्या खेळवला आहे. दिग्दर्शक विजय केंकरे यांनी या अनेक मिती असलेल्या नाटकाचा प्रयोग उभा करताना त्याचे एकेक पापुद्रे उलगडत नेत ते अधिकाधिक रहस्यमय व उत्कंठावर्धक कसं होईल हे पाहिलं आहे. केंकरे यांच्या आजवरच्या नाटकांमध्ये बसवायला सर्वाधिक अवघड असं हे नाटक असावं. कारण यात नाटकातील पात्रं आणि प्रत्यक्षातली माणसं यांच्या आयुष्याची अशी काही विलक्षण गुंतवळ नाटककारानं केली आहे, की त्याची उकल करून दाखवताना कुणाचीही दमछाक व्हावी. पुन्हा प्रेक्षकाला ती सुलभ करून दाखवायची नाही, असाही नाटककाराचा असलेला हट्टाग्रह. त्यामुळे नाटकानं रंजन तर करायला हवं; परंतु त्यानं प्रेक्षकांना विचारप्रवृत्त व अंतर्मुखही करायला हवं, हे ‘शेखर खोसला’मध्ये अनुस्यूत आहे. जे विजय केंकरे यांना उत्तम प्रकारे साध्य झालेलं आहे. मनोविश्लेषणाचा हा गोफ विणत नेताना तो समोरच्याला सहजगत्या कळता नये, हीही लेखकाची अट आहे. तीही पाळायची होती. हे सगळं दिग्दर्शक म्हणून त्यांनी लीलया जमवलं आहे. नाटकाची अनेकस्तरीय रचना समजून घेत त्यातले पापुद्रे वेगवेगळे करण्याचं आव्हान त्यांच्यापुढे होतं. पहिल्या प्रवेशात सेपिया टोनचा वापर करत त्यांनी नाटकातलं नाटक व त्याची अतिवास्तववादी मांडणी उभी केली आहे. नंतर नाटकातल्या कलाकारांची व्यक्तिगत आयुष्यं, त्यांतले पेच आणि भावनिक-मानसिक गुंते- हा दुसरा भाग. तिसरीकडे कोर्टातील कलाकारांच्या साक्षीमध्ये रहस्य अधिक गडद करत नेण्याचा भाग येतो. त्यानंतरच्या फ्लॅशबॅकमध्ये या रहस्याशी संबंधित घटना-प्रसंग.. ‘शेखर खोसला’ नामक रहस्याची उकल करताना याच माणसांची अतिशय वेगळी रूपं सादर करणाऱ्या प्रसंगांची गुंफण.. आणि या सगळ्याच्या एकमेळातून मानवी नातेसंबंधांबद्दल भाष्य करण्याचं शिवधनुष्य उचलण्याचं आव्हान! हे सगळं बुद्धिगम्य प्रकरण विजय केंकरे यांनी अत्यंत कौशल्यानं हाताळलं आहे. त्यासाठी नाटकात वापरलेले सादरीकरणाचे विविध फॉर्मस् आणि त्यांची एकजिनसी वीण त्यांनी आकारली आहे. कोर्टातील अदृश्य जज्च्या आवाजाच्या रूपात साक्षीदारांच्या सदसद्विवेकबुद्धीला केलेलं आवाहन आणि त्यातून साधलेला दृश्य परिणाम अतिशय महत्त्वाचा आहे.
प्रदीप मुळ्ये यांनी नाटकात अनेक पातळ्यांवर खेळल्या जाणाऱ्या ‘माइंड गेम’ला नेपथ्यातून सुयोग्य अवकाश उपलब्ध करून दिला आहे. नाटकातील नाटकाच्या प्रयोगासाठीचा रंगावकाश, रिहर्सल हॉल, भासमान कोर्ट, मधुराचं घर ही स्थळं त्यांनी मागणीनुरूप साकारली आहेत. शीतल तळपदेंच्या प्रकाशयोजनेचाही यात कस लागला आहे. कोर्टातील साक्षीचे प्रवेश व त्यानंतर संबंधित फ्लॅशबॅकमधील घटना यांतील सांधेजोड त्यांनी प्रकाशयोजनेतून उत्कृष्टरीत्या साधली आहे. राहुल रानडे यांच्या संगीताने नाटकातलं रहस्य अधिकच गूढ झालं आहे. मंगल केंकरे यांची वेशभूषा आणि दीपाली विचारेंची नृत्यरचना नाटकाचा हेतू लक्षात घेऊन केलेली आहे. सचिन वारिक व चंदर पाटील यांच्या रंगभूषेचाही नाटकात मोलाचा वाटा आहे.
‘शेखर खोसला’ हे नाटक यशस्वी करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका निभावली आहे ती यातल्या कसलेल्या कलाकारांनी! मधुरा वेलणकर-साटम यांनी प्रत्यक्षातली मधुरा आणि नाटकातली अनुपमा यांच्यातलं स्किझोफ्रेनिक अंतर्द्वद्व अतिशय ताकदीनं अभिव्यक्त केलं आहे. ‘शेखर खोसला’चं रहस्य अधिकाधिक गडद करत नेण्याचं दायित्व त्यांच्यावर आधिक्यानं होतं. मानवी संबंधांतले अवघड गुंते, त्यांतले पेच आविष्कृत करता करता त्यांचं हळूहळू स्किझोफ्रेनिक होत जाणं लाजवाबच. ही भूमिका त्यांच्यातल्या सशक्त अभिनेत्रीचं दर्शन घडवते. लोकेश गुप्ते यांनी प्रमोद (नाटकातलं पात्र) आणि प्रत्यक्षातला लोकेश यांच्या व्यक्तित्वांची सरमिसळ होऊन मानवी मनातली भविष्यासंबंधीची असुरक्षिततेची प्रबळ भावना, त्यातून त्यांची होत गेलेली पझेसिव्ह, नकारात्मक वृत्ती यथार्थ दाखविली आहे. तुषारचा (आणि निरंजनचाही!) उच्छृंखलपणा आणि त्याचा उनाडटप्पू, बेफिकीर स्वभाव तुषार दळवी यांनी अचूक टिपला आहे. त्यांच्या दिसण्यातूनही तो प्रकटतो. शर्वरी लोहोकरे यांनी स्त्रीचं गूढ अथांगपण, वागण्या-बोलण्यातली अतक्र्यता, आणि त्याचवेळी तार्किक विचार करण्याची तिची पद्धत व त्याद्वारे समोरच्याबद्दल ती बांधत असलेले अचूक आडाखे हे सारं आपल्या (ज्योत्स्ना आणि शर्वरी) भूमिकांतून अत्यंत परिणामकारपणे दाखवलं आहे. विवेक गोरे यांनी आपल्यातील न्यूनत्वामुळे नको इतका समजूतदार झालेला, इतरांना समजून घेण्यात धन्यता मानणारा आणि अशा वागण्यानं आपल्या अंतरीचं दु:ख इतरांपासून लपवू पाहणारा पुरुषोत्तम (नाटकातलं पात्र) तसंच विवेक (प्रत्यक्षातला) संयमितपणे साकारला आहे. वरपांगी बावळट, परंतु मुळात चलाख व हुशार असलेला नाटकाचा लेखक सुशील कर्णिक व देशपांडे (नाटकातलं पात्र) या दोन्ही भूमिका सुशील इनामदार या गुणवत्तावान अभिनेत्याने समजून-उमजून साकारल्या आहेत. त्याकरता संवादांतील विरामाच्या जागांचा वापर त्यांनी उत्तमरीत्या केला आहे.
वरकरणी रहस्यनाटय़ाचा बाज असलेलं, परंतु अंतर्यामी मानवी नातेसंबंधांवर सखोल भाष्य करू बघणारं हे नाटक एका आगळ्या नाटय़ानुभवासाठी नक्कीच पाहायला हवं.