भारतातील सर्वच रसिक प्रेक्षकांना सैराट करणाऱ्या ‘बाहुबली २’ ने दहा दिवसात १००० कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘बाहुबली २’मुळे अनेक कलाकारांची नव्याने ओळख झाली आहे. पिंपरी चिंचवड मधील दोन मराठी कलाकारही या ऐतिहासिक चित्रपटाचे साक्षीदार असून, प्रताप बोऱ्हाडे आणि डी एन इरकर अशी यांची नावे आहेत. ते गेली २०-२५ वर्षांपासून पिंपरी- चिंचवडंमधील भोसरी या गावात वास्तव्यास आहेत. ‘बाहुबली २’ या चित्रपटांमधील ‘देवसेना’ या पात्राचा मेकअप दोघांनी केला आहे.
‘बाहुबली २’चे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी सुरुवातीला फॉरेन मधील आणि मुंबईच्या काही मेकअप आर्टिस्टना ‘देवसेना’ या पात्राच्या मेकअपसाठी बोलवले होते. मात्र त्यांच काम न आवडलेल्या राजमौली यांनी पिंपरी- चिंचवड मधील प्रताप बोऱ्हाडे आणि डी.एन. इरकर यांना नोव्हेंबर २०१६ला बोलावले. त्यानंतर या जोडीने हैद्राबादच्या रामोजी फिल्मसिटीमध्ये त्यांची कला दाखवत अवघ्या तीन तासात राजमौली यांच मन जिंकलं आणि ‘बाहुबली २’ या ऐतिहासिक चित्रपटातील ‘देवसेना’ या पत्राचे मेकअप साकारण्याचे काम या दोघांना देण्यात आले. विशेष म्हणजे मेकअपचे सर्व साहित्य परदेशातून आणले होते. १५-२० वर्ष साखळीत जखडलेली देवसेना ही मेकअप मधून साकारायची होती. तीच्या संपूर्ण मेकअप आणि लूकमधून ती राणी देखील असल्याचे वाटायला हवे होते. ही खरी आमच्या सामोरील एक पैज होती जी आम्ही पूर्ण केली अशी माहिती इरकर आणि बोऱ्हाडे यांनी दिली. हा सर्व पल्ला एक महिना दहा दिवस चालला.
बोऱ्हाडे आणि इरकर या जोडीचा प्रवास तसा खडतर, प्रताप बोऱ्हाडे हे पुणे जिल्ह्याच्या तेजवाडी येथील शेतकरी कुटुंबातील. ते बी. ए पदवीधारक आहेत. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये ते शेती करायचे. मात्र १९८८ साली शेती सोडून ते पिंपरी- चिंचवडच्या भोसरीमध्ये दाखल झाले आणि रोजीरोटीसाठी ते तीनचाकी छोटा टेम्पोचे चालक झाले, इतकंच काय तर केळई विकण्याचे कामही त्यांनी केले. दरम्यान, प्रताप यांना नाटकात काम करण्याची संधी मिळाली आणि १९९२ साली शिवाजी महाराजांवर आधारित ‘जाणता राजा’ या नाटकात त्यांना काम मिळाले, इथेच मेकअप करण्याची संधी त्यांना मिळाली. शिवाजी महाराजांच्या साक्षीनंच त्यांच्या मेकअप आर्टिस्टच्या प्रवासाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही.
डी. एन. इरकर हे मूळचे लातूर मधील सोनवती गावचे. १० वी पर्यंतच्या शिक्षणानंतर उत्तीर्ण होऊन टेक्निकल डिप्लोमाचे शिक्षण घेतले आहे. १९९४ साली भोसरीतील एमआयडीसी मध्ये नोकरी आणि पेंटिंगचे बॅनर बनविण्याचा साइड बिझनेस सुरु केला आणि ते पिंपरी- चिंचवडला स्थायिक झाले. २००६ साली मात्र एमआयडिसीतील नोकरी शरीरास अपायकारक ठरू लागल्यानं त्यांनी ती नोकरी सोडली. हा सर्व प्रसंग सांगत असताना इरकर याना भावना आवरता आल्या नाहीत आणि डोळ्यात पाणी आले. २००७ मध्ये इरकर मेकअप क्षेत्राकडे वळले. त्यानंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. २००८-०९ मध्ये इरकर यांनी पुण्यातील एफटीआयआयमध्ये विद्यार्थाना मेकअप विभागातील शिक्षणाचे धडे दिले.
दरम्यान, भोसरीतच राहणारे प्रताप बोऱ्हाडे यांच्याशी ओळख झाल्यानंतर त्यांची मैत्री वाढली, अधिक दृढ झाली आणि २००९ पासून ‘डी. एन. स्टुडिओ’च्या नावाने या जोडीने बॉलिवूड क्षेत्रात पाऊल टाकले. ‘मर्दानी’, ‘उडता पंजाब’, ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांसाठई या जोडीने काम केले. आगामी ‘बादशाहो’ या चित्रपटातही त्यांच्या कलेचा ठसा उमटवला आहे. एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या माजिद मजिदी यांच्या ‘बियाँड द क्लाऊड’साठीही त्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले आहे.
प्रताप बोऱ्हाडे गेली २५ वर्ष तर, डी. एन. इरकर हे गेली आठ वर्ष बॉलिवूड मध्ये पिंपरी- चिंचवडचे नावलौकिक करत आहेत याची तिळमात्र कल्पना शेजारच्याना किंवा शहरवासियांना नाही. मात्र ‘बाहुबली २’ या चित्रपटाच्या निमित्ताने इरकर आणि बोऱ्हाडे ही जोडी सर्वांच्याच समोर येत आहे.