अश्विनी भावे यांच्या ‘मांजा’ या चित्रपटाचा टिझर पोस्टर नुकताच रिलीझ करण्यात आला. ‘मांजा’ या वेगळ्या आणि आधी कधीच न पाहिलेला विषय असलेल्या चित्रपटाच्या टिझर पोस्टरनंतर अश्विनी यांच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मकर संक्रांतीचं औचित्य साधून या चित्रपटाच्या टिझर पोस्टर सोबतच प्रदर्शनाची तारीख देखील घोषित केली आहे. हा सिनेमा २१ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. ‘मांजा’ चित्रपटाची कथा, पटकथा, आणि दिग्दर्शन दिग्दर्शक जतिन वागळे यांनी केलं आहे. ‘इंडिया स्टोरीज’ निर्मित मांजा चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश या हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांनी मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अश्विनी भावे सोबतच या चित्रपटात ‘बालक पालक’ फेम रोहित फाळके आणि ‘डान्स इंडिया डान्स’ फेम सुमेध मुद्गलकर देखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत, त्यामुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अजूनच वाढली आहे यात शंकाच नाही.

manjha-final-teaser

दरम्यान,  काही वर्षांपूर्वीच या मराठमोळ्या अभिनेत्रीने एका एनआरआयशी विवाह केला आहे. मूळचे महाराष्ट्रीयन असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियर किशोर बोपर्डीकर यांच्याशी अश्विनी यांनी लग्न केले. किशोर हे एका इंटरनॅशनल कंपनीचे मालक आहेत. अश्विनी यांना दोन मुले आहेत आणि त्या सॅन फ्रॅन्सिस्कोला (अमेरिका) राहतात. नुकताच त्यांनी मकर संक्रांतीचा सणही अमेरिकेत साजरा केला. त्यांनी आपल्या मुलांसह पतंग उडविण्याचा आनंदही लुटला. तसेच, त्यांनी आपल्या सर्व चाहत्यांना मकर संक्रांतीच्या खूप सा-या शुभेच्छाही दिल्या आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीत ९० च्या दशकात अभिनेत्री अश्विनी भावे यांनी अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९८७ साली ’राजलक्ष्मी’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ’किस बाई किस’, ’अशी ही बनवाबनवी’, ’कळत नकळत’, ’झुंज तुझी माझी’, ’वजीर’ यांसारख्या चित्रपटात त्या झळकल्या.

Story img Loader