अभिनयाच्या माध्यमातून हिंदी, मराठी सिनेसृष्टी त्याचबरोबर रंगभूमीवर आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू Reema Lagoo यांचे गुरुवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.
रिमाताईंनी आपल्या कसदार अभिनयाच्या माध्यमातून अनेक व्यक्तिरेखा जिवंत केल्या होत्या. आईकडूनच त्यांना अभिनयाचे बाळकडू मिळाले होते. मोठा पडदा असो की रंगभूमी अत्यंत सहजपणे त्या आपली भूमिका साकारायच्या. अनेक हिंदी चित्रपटांमधून त्यांनी साकारलेली ‘आई’ आजही सिनेप्रेमींच्या अगदी लख्खपणे लक्षात आहे. विशेषतः सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटांमधून त्यांनी साकारलेली ‘आई’ विशेष गाजली होती.
ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन
१९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा ‘फिल्मफेअर’ पुरस्कारही मिळाला होता. त्याचबरोबर ‘हम आपके है कोन’मधील व्यक्तिरेखेसाठीही त्यांना १९९५ मध्ये ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेल्या वास्तव चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखाही खूप गाजली होती.