भूषण प्रधान, संस्कृती बालगुडे प्रमुख भूमिकेत
कधी आनंदाने, कधी रागावून प्रत्येकजण शिव्या देतोच. अनेक जणांच्या रोजच्या बोलण्यातही शिव्या असतात. शिव्या हा जणू काही आता भाषेचाच एक भाग झाला आहे. त्यामुळे शिव्या ही संकल्पना घेऊन तयार केलेला ‘ती देते तो देतो ते देतात सगळेच देतात शिव्या’ हा चित्रपट २१ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सतत शिव्या देणाऱ्या एका माणसाच्या आयुष्यात असा एक प्रसंग येतो, की दुसऱ्या दिवसापासून त्याला शिव्या देता येत नाही. मग त्या माणसाचं काय होतं? अशा धमाल संकल्पनेवर हा चित्रपट बेतला आहे. साकार राऊत आणि निलेश झोपे यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर साकार राऊत यांनीच चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सारा मोशन पिक्चर्स, गोल्डन पेटल्स फिल्म्स, कर्मा फिल्म्स आणि रंगमंच एन्टरटेंन्मेट यांच्या संयुक्त विद्यमाने ध्वनी साकार राऊत, नीलेश झोपे, मिहीर करकरे आणि आशय पालेकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान अभिनेत्री संस्कृती बालगुडे, विद्याधर जोशी, उदय सबनीस, पियुष रानडे, शुभांगी लाटकर अशी उत्तम स्टारकास्ट आहे.
चित्रपटाविषयी दिग्दर्शक साकार राऊत म्हणाला की , ‘आपण बोलताना सहजपणे शिव्या देतो. त्या शब्दाचा अर्थ काय, आपल्या आजुबाजूला कोण आहे याचाही विचार करत नाही. शिव्या दैनंदिन आयुष्याचाच भाग आहेत. शिव्या ही संकल्पना घेऊन एक वेगळ्या धाटणीचं कथानक मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे केला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल अशी मला अपेक्षा आहे.’