इंडियन पिक्सचर्स प्रोड्युसर असोसिएशनने (इम्पा)  पाकिस्तानी कलाकार, गायक यांना यापुढे हिंदी चित्रपटामध्ये काम न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने वादग्रस्त वक्तव्य केल्याचे वृत्त आहे. एका मुलाखतीत फवाद खानने बॉलिवूड कोणाच्या बापाचं नाही, असे म्हटल्याचे वृत्त स्पॉटबॉय या वेब पोर्टलने दिले आहे.
स्पॉटबॉय या वेबपोर्टलने ‘इम्पा’चे अध्यक्ष आणि निर्माता अग्रवाल यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. ‘बॉलिवूड कोणाच्या बापाचं नाही अशी प्रतिक्रिया फवाद खानने प्रसारमाध्यमांना दिल्याचं मला आपल्याच क्षेत्रातील एका व्यक्तीकडून कळलं आहे’, असं अग्रवाल यांनी सांगितलं आहे. फवाद खानच्या या वक्तव्यावर अग्रवाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याचसोबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही फवादबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘हिंदुस्तानी लोगो का दिल बहुत छोटा है’ असे फवाद म्हणाल्याचे मी ऐकलेय. यात किती सत्य आहे ते मला माहित नाही. पण आमच्या कानावर अशा काही बातम्या पडत आहेत. पाकिस्तानी कलाकार भारतात वेगळं बोलतात आणि आपल्या देशात जाऊन राग व्यक्त करतात, असेही अमेय खोपकर म्हणाले.
इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशनने (इम्पा)ने आपल्या ७७ व्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तान कलाकारांना काम न देण्याचा निर्णय घेतला. त्यावर अग्रवाल म्हणाले की, पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणण्याचा निर्णय मी एकट्याने घेतलेला नाही. २०० चित्रपट निर्माते या वार्षिक बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला.
उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने बुधवारी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. लष्कराच्या या निर्णयाचे देशभरातून स्वागत झाले. याच दरम्यान पाकिस्तानी कलाकारांना काम न देण्याचा निर्णय इम्पाच्या सर्वसाधारण बैठकीत एक मताने संमत झाला. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना आता भारताच्या चंदेरी दुनियेत स्थान मिळणार नसल्याचे पक्के झाले आहे.