विनोदाबरोबरच सामाजिक संदेश देणाऱ्या ‘झाला बोभाटा’ या चित्रपटाचा प्रिमिअर शो गुरुवारी मोठय़ा उत्साहात माहिम येथील ‘सिटीलाईट’ चित्रपटात पार पडला. प्रिमिअर सोहळ्यास चित्रपटातील प्रमुख कलाकारांसह निर्माते, तंत्रज्ञ, त्यांचे कुटुंबीय, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ‘केसरी टूर्स’चे केसरी पाटील व सुनिता पाटील या सोहळ्यास खास उपस्थित होते.
प्रिमिअरसाठी चित्रपटातील कलाकार व मान्यवर हजेरी लावली होती. त्या सर्वाबरोबर उपस्थिताना ‘सेल्फी’ काढून घेण्याचा मोह आवरला नाही. सगळ्यांनी प्रत्येकाबरोबर भरपूर ‘सेल्फी’काढून घेतले. ‘झाला बोभाटा’चा हा विशेष खेळ झाल्यानंतर चित्रपटाच्या सर्व चमूने खास केक कापून प्रिमिअरचा आनंद साजरा केला.
चित्रपटाचा विशेष खेळ झाल्यानंतर ‘झाला बोभाटा’च्या सर्व संबंधितांची ओळख उपस्थिताना करुन देण्यात आली. या वेळी बोलताना चित्रपटातील ‘आप्पासाहेब झेले’ या भूमिकेतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर म्हणाले, विनोदी चित्रपटात काम करताना चित्रपटातील कलाकारांनी पहिल्यांदा त्या चित्रपटाचा आनंद घेतला तर ते प्रेक्षकांना आनंद देऊ शकतील.
चित्रपटातील आम्ही सगळ्या कलाकारांनी चित्रपट करताना तो आनंद, लुटला. हा चित्रपट म्हणजे सगळ्यांचे सामुहिक प्रयत्न आहेत. चित्रपटाच्या निर्माता द्वयीपैकी एक साईनाथ राजाध्यक्ष यांनी सांगितले, निखळ विनोद आणि सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही ‘झाला बोभाटा’ चित्रपटातून केला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील २०० चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘चित्रपटाची कथा आवडली आणि आपण चित्रपट निर्मितीत सहभागी झालो. चित्रपटासाठी आमच्या सर्व चमूचे उत्तम सहकार्य आम्हाला मिळाले. तर ‘केसरी टूर्स’चे केसरी पाटील यांनी ‘झाला बोभाटा’ प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करेल, असा विश्वास व्यक्त केला.
चित्रपटातील प्रमुख कलाकार व ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, कमलेश सावंत, दिपाली नंबीयार, मयुरेश पेम, मोनालिसा बागल, रोहित चव्हाण तसेच निर्माते साईनाथ राजाध्यक्ष व महेंद्रनाथ, ‘केसरी टूर्स’च्या सुनिता पाटील यांच्यासह अश्विनी सुरपूर, श्वेताली पालेकर, काजल, निलेश, मंगेश कंगणे, ए. व्ही. प्रफुल्लचंद्र, संतोष भांगरे, हरी प्रिया, वासू पाटील, संजय पाटील, प्रथमेश, तृप्ती, प्रतिक, अक्षय, दिशा, युसुफ, मयुर, रोहित, सातवे आदी या वेळी उपस्थित होते. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे यांच्या वडिलांचे निधन झाले असल्याने या प्रिमिअरला ते उपस्थित नव्हते.
मनोरंजनातून सामाजिक संदेश
‘झाला बोभाटा’ चित्रपटात ग्रामीण पाश्र्वभूमीवरील निखळ मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘देऊळ’, ‘नारबाची वाडी’, ‘पोस्टर बॉईज’ नंतर पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत मी प्रेक्षकांना दिसेन. या चित्रपटात मी ‘आप्पासाहेब झेले’ ही भूमिका करत असून गावात वाईट गोष्टी घडू नयेत, सामाजिक सुधारणा व्हाव्यात यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. चित्रपटाच्या अखेरीस एक ‘आयटम सॉंग’ असून त्यात मी ‘रॉक स्टार’च्या वेषभूषेत आहे.
– दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ अभिनेते
निखळ मनोरंजनातून प्रबोधन
दैनंदिन जीवनातील ताण-तणाव, चिंता विसरुन प्रेक्षकांनी मनमुराद हसावे आणि त्यांना निखळ विनोदाचा आनंद मिळावा असा प्रयत्न या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही केला आहे. मनोरंजनातून प्रबोधनाचा संदेशही हा चित्रपट देतो. पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला त्याचा विशेष आनंद आहे.
– अनुप जगदाळे,
‘झाला बोभाटा’चे दिग्दर्शक विनोदातून सामाजिक उपदेश
‘विनोदातून सामाजिक उपदेश’ ही ‘झाला बोभाटा’ चित्रपटाची संकल्पना असून विनोदी पद्धतीने ही कथा सादर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. चित्रपट पाहताना प्रेक्षकांना तो कुठेही रटाळ व कंटाळवाणा वाटणार नाही याची काळजी घेतली आहे. कुटंबातील सर्वानी एकत्र बसून पाहावा असा हा चित्रपट आहे.
– साईनाथ राजाध्यक्ष,
निर्माते ‘झाला बोभाटा’‘बॉक्स ऑफिस’ चांगला उपक्रम
‘रमा माधव’ हा चित्रपट, ‘समुद्र’ हे नाटक आणि आता ‘झाला बोभाटा’ यांची प्रसिद्धी ‘बॉक्स ऑफिस’ उपक्रमात करण्यात आली. मराठी चित्रपट आणि नाटकाच्या प्रसिद्धीसाठीचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. लोकसत्ताचे ‘लोकसत्ता लोकांकिका’, ‘वक्ता दशसहस्त्रेषू’, ‘लोकसत्ता गप्पा’, ‘व्हिवा लाऊंज’ आणि अन्य सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमही कौतुकास्पद आहेत. ‘झाला बोभाटा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी उत्कृष्ट भूमिका केली असून त्यांच्या अभिनयाला सलाम.
– केसरी पाटील, केसरी टूर्स
खूप काही शिकायला मिळाले
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासह मराठीतील अन्य मान्यवर कलाकारांसोबत ‘झाला बोभाटा’च्या निमित्ताने काम करण्याची संधी मिळाली. हा अनुभव छान होता. चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला खूप काही शिकायला मिळाले.
– मोनालिसा बागल, मयुरेश पेम, चित्रपटातील अभिनेत्री व अभिनेता