दिवाळीची चाहूल ही एक महिन्या आधीपासून लागते. घराघरांमध्ये फराळाच्या पदार्थांचे खमंग वास येतात, दिवाळीसाठी कंदील, पणत्या, तोरणं यांची खरेदी सुरु होते. संपूर्ण वातावरण चैतन्यमय होऊन जाते. दिवाळीच्या दिवशी दिव्यांचा असंख्य ओळी घरात लावल्या जातात. खासकरून लहान मुलांची दिवाळीत धामधूम असते. किल्ले तयार करणे, दिवसभर फटाके फोडणे या लहानपणीच्या आठवणी घेऊनच आपण सगळे मोठे झालेलो असतो. प्रत्येकाचा दिवाळीतील एक दिवस आवडीचा असतो. याचबद्दल काही कलाकार सांगत आहेत त्यांच्या या दिवाळी विशेष सदरामध्ये….
चिन्मय उदगिरकर म्हणजे चिवडा आणि लवंगी (फटाका) म्हणजे अतिशा नाईक – सुकन्या कुलकर्णी
‘घाडगे & सून’च्या सेटवर दिवाळीची तयारी सुरु झाली आहे. घराला यावेळेस नवा रंग देण्यात येतोय कारण अक्षयच म्हणजेच माझ्या नातवाचा हा पहिला पाडवा आहे. घरामध्ये सगळे मिळून फराळाची तयारी करत आहेत. कोणती साडी नेसावी, मग रंग सारखा नको, गजरे हवे…. सगळ्या घरातल्या बायकांची अशी चर्चा सुरु आहे. दिवाळीतले सगळेच दिवस तसे खास असतात पण, त्यातला माझ्या आवडीचा दिवस म्हणजे भाऊबीज. घरातले सगळे मंडळी एकत्र येतात, गप्पा होतात, सगळ्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे ते कळतं त्यामुळे मज्जा येते.
चिन्मय उदगीरकर याला मी चिवड्याची उपमा देईन. थोडा गोड, थोडा तिखट तर फटाक्यातील लवंगी म्हणजे आमची वसुधा म्हणजेच तुमची लाडकी अतिशा नाईक.
अण्णा म्हणजे प्रफुल्ल सामंत माझ्यासाठी बेसनाचा लाडू- चिन्मय उदगीरकर
मला पाडवा खूप आवडतो… कारण या दिवशी नवीन सुरुवात होते. सकाळपासून जे सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होतात त्यामुळे वातावरणामध्ये नवेपण, चैतन्य, पावित्र्य निर्माण होतं.
मला फराळामध्ये म्हणाल तर बेसनाचा लाडू खूप आवडतो. आमच्या घाडग्यांच्या परिवारामध्ये देखील या लाडवाचे गुणधर्म असलेली एक व्यक्ती आहे आणि ती म्हणजे अण्णा – प्रफुल्ल सामंत जे माझे खूप आवडते आहेत. ते एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. बेसनाच्या लाडूला ज्याप्रमाणे परंपरा आहे तशीच अण्णांच्या विचारांना देखील परंपरा आहे. म्हणून अण्णा मला बेसनाच्या लाडवासारखे वाटतात.