‘हॅमिल्टन’ या नावाने सध्या सातासमुद्रापारहून येऊन सगळीकडे गोंधळ घातला आहे. ‘ब्रॉडवे म्यूझिकल’विषयी कित्येकांनी ऐकलं असेल, क्वचित वाचलंही असेल, ज्यांना आवड आहे त्यांनी ब्रॉडवे म्यूझिकल्स पाहिलीही असतील, मात्र आजवर हॉलीवूडच्या सिनेमानेही एवढं कमावलं नसेल तेवढं कौतुक आणि पैसा अगदी काही दिवसांत ‘हॅमिल्टन’ने कमावलं आहे. १६ टोनी अॅवॉर्ड्सची नामांकनं, त्यापैकी ११ अॅवॉर्ड्स ग्रॅमी अॅवॉर्ड, पुलित्झर अॅवॉर्ड अशी पुरस्कारांची भली मोठी यादी आणि त्याच्या तिकिटांना लाभलेला सोन्याचा भाव या सगळ्यामुळे काय आहे ‘हॅमिल्टन’ प्रकरण हे शोधण्याचा प्रयत्न जगभर झाला आहे. या शोधातून ज्यांच्या हाती ‘हॅमिल्टन’चे सांगीतिक तुकडे लागले तेही आता या ब्रॉडवे म्यूझिकलच्या प्रेमात पडले आहेत.
अमेरिके चे ‘फाउंडिंग फादर’ अॅलेक्झांडर हॅमिल्टन यांच्या आयुष्यावरची संगीतमय दास्ताँ म्हणजे ‘हॅमिल्टन’ हे संगीत नाटय़. रॉन शेर्नो यांनी लिहिलेल्या अॅलेक्झांडर हॅमिल्टन यांच्या चरित्रावर लिन मॅन्युल मिरांडा यांनी ‘हॅमिल्टन’चं ब्रॉडवेवरचं विश्व उभं केलं आहे. मिरांडा यांनीच त्याची कथा लिहिली आहे, गाणी लिहिली आहेत आणि त्यांनीच संगीतही दिलंही आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीत या नाटकाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आणि २०१५ च्या ऑगस्टमध्ये रिचर्ड रॉर्जस थिएटरमध्ये पहिल्यांदा ‘हॅमिल्टन’ ब्रॉडवेवर आलं. ब्रॉडवेवर आलेल्या या संगीतमय नाटय़ाने इथे केवळ प्रेक्षकांची पसंतीच मिळवली असं नाही तर ब्रॉडवे म्यूझिकल्सच्या इतिहासात विक्रमी यश मिळवत हे स्थान निर्माण केलं आहे. ब्रॉडवेने आजवर कधीच एवढी आर्थिक उलाढाल अनुभवली नव्हती. याआधी ‘द फँ टम ऑफ द ओपेरा’, ‘द लायन किंग’ आणि ‘विकेड’ या तीन म्यूझिकल्सना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. ही म्यूझिकल्स दीर्घकाळ चालली होती. मात्र तरीही हॉलीवूडमध्ये जसे तिथले चित्रपट इतिहास रचतात, भरपूर कमाई करतात तशी स्थिती दीर्घ सांस्कृतिक परंपरा असलेल्या ब्रॉडवे म्यूझिकल्सच्या बाबतीत तेव्हाही नव्हती आणि आजही नाही. या सगळ्या पाश्र्वभूमीवर ‘हॅमिल्टन’चं यश सामान्य प्रेक्षकांबरोबरच जाणकारांचीही उत्सुकता चाळवणारं ठरलं आहे.
‘हॅमिल्टन’चं यश नेमकं कशात आहे?, याचाही ऊहापोह करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने झाला. संगीत आणि कलेचा अप्रतिम आविष्कार अशी पावती या ब्रॉडवे म्यूझिकलला खुद्द मिशेल ओबामा यांनी दिली आहे. याआधी ‘द लायन किंग’ हे ब्रॉडवे म्यूझिकल अ‍ॅनिमेटेड चित्रपट स्वरूपात प्रेक्षकांसमोर आला होता. चित्रपटाला यश मिळाल्यानंतर ती कथा ब्रॉडवेवर आली असल्याने त्याला प्रेक्षकांची गर्दी होणार हे अपेक्षित होते. ‘द फँटम ऑफ द ऑपेरा’मध्ये टॉम हँक्ससारखा हॉलीवूड अभिनेता प्रेक्षकांसमोर होता. ब्रॉडवेसाठी हॉलीवूडच्या मोठय़ा कलाकारांची मदत घेणं ही नवीन गोष्ट नाही. त्यामुळे काही ब्रॉडवे म्यूझिकल्सना यश मिळणार हेही साहजिक होतं, मात्र यातली कोणतीही गोष्ट ‘हॅमिल्टन’मध्ये नाही. त्याचे यश हे लिन मॅन्युल मिरांडा यांच्या गीतात-संगीतात आहे. खरंतर मिरांडा यांनी याच महिन्यात ‘हॅमिल्टन’चा निरोप घेतला असला तरी त्यांच्या संगीताची जादू अजूनही ‘हॅमिल्टन’च्या प्रेक्षकांच्या मनावर गारूड करून आहे. या ब्रॉडवेला मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे. सोन्याच्या भावात विकली जाणारी तिकिटे, एकेका प्रयोगाच्या तिकिटासाठी सहा- सहा महिने ताटकळणारे प्रेक्षक हा अभूतपूर्व अनुभव एकीकडे आहे. तर दुसरीकडे या ब्रॉडवेमुळे न्यू जर्सीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली आहे. अ‍ॅलेक्झांडर हॅमिल्टन यांच्याशी संबंधित वास्तूंना भेट देण्यासाठी पर्यटक न्यू जर्सीत येत आहेत. आशय-संगीत-कला यांचा अनोखा मिलाफ सामान्य प्रेक्षकांपासून ते त्याच्या कर्त्यांपर्यंत किती विविधांगी परिणाम करू शकतो, याचे ‘हॅमिल्टन’ हे एक अभिजात आणि विलक्षण असं उदाहरण ठरलं आहे.

Story img Loader