गिरीश जोशी लिखित-दिग्दर्शित ‘लव्हबर्ड्स’ हे सस्पेन्स थ्रिलर नाटक नुकतंच तिसऱ्यांदा रंगभूमीवर आले आहे. एखादं नाटक पुनरुज्जीवित होण्यामागे विवक्षित कारणं असतात. उदाहरणार्थ ‘घाशीराम कोतवाल’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘महानिर्वाण’, ‘नटसम्राट’, ‘हमिदाबाईची कोठी’सारखी नाटकं त्यांतील अभिजात मूल्यांमुळे rv09रंगकर्मीना पुन:पुन्हा करावीशी वाटतात. तर काही नाटकांतील रंजनमूल्य अधिक मोलाचं ठरतं. उदा. ‘संगीत सौभद्र’, ‘सं. संशयकल्लोळ’, ‘सं. कटय़ार काळजात घुसली’, ‘लग्नाची बेडी’, ‘तो मी नव्हेच’, ‘मोरूची मावशी’च्या जातकुळीतली नाटकं. काही नाटकांमधील प्रश्न व समस्या या सार्वकालिक असतात. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाचं स्वागत होतं. वानगीदाखल ‘सखाराम बाईंडर’, ‘अशी पाखरे येती’, ‘तुघलक’, ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’, ‘देहभान’ इत्यादींचा उल्लेख करता येईल. अर्थात या तिन्हींतल्या कुठल्या तरी गटात बसणारी; तरीही पुनरुज्जीवित न झालेली अशीही अनेक नाटकं आहेत.
गिरीश जोशी यांचं ‘लव्हबर्ड्स’ हे सस्पेन्स थ्रिलर नाटक सादरीकरणाच्या दृष्टीने आव्हानात्मक असल्याने त्याची भूल पुन: पुन्हा दस्तुरखुद्द लेखक (व दिग्दर्शकही!) आणि कलावंतांनाही पडत असावी. म्हणूनच नुकतंच तिसऱ्यांदा ते रंगभूमीवर आलं आहे. मुक्ता बर्वेसारख्या ताकदीच्या अभिनेत्रीला ते करावंसं वाटावं, यातच त्याची यत्ता दडली आहे. ‘लव्हबर्ड्स’ची ही तिसरी आवृत्ती आधीच्या दोन आवृत्तींचा विचार करता सर्वोत्तम उतरली आहे. संहितेतील नाटय़पूर्ण वळणंवाकणं, अनपेक्षित पेच, शह-काटशह, परिस्थितीजन्य चक्रव्यूह यांची अशी काही अप्रतिम गुंफण त्यात आहे, की मराठीतल्या सस्पेन्स थ्रिलर नाटकांतून मेंदूला झिणझिण्या आणणारा आणि शेवटापर्यंत टिकणारा असा थरार सहसा आढळत नाही.
‘लव्हबर्ड्स’चा कथांश असा : देविका इनामदार या उच्चभ्रू स्त्रीचा नवरा (विश्वास) एका जीवघेण्या कार अपघातात कसाबसा वाचतो खरा; परंतु त्यात त्याचा सबंध चेहरा विरूप होतो. अपघातात त्याची पूर्वस्मृतीही संपूर्णपणे नष्ट होते. अर्थात् एका यशस्वी अ‍ॅड एजन्सीचा मालक असलेल्या विश्वासकडे पैशांची ददात नसल्यानं प्लास्टिक सर्जरी करून त्याला नवा चेहरा बहाल केला जातो. मात्र, त्याची पूर्वस्मृती नष्ट झाल्याने त्याला आता मागचं काहीही आठवत नाही. विश्वासला त्याचा भूतकाळ, त्याच्या अवतीभोवतीची माणसं, त्यांच्याशी असलेले त्यांचे नातेसंबंध, त्याचं पूर्वीचं व्यक्तिमत्त्व असं सगळंच नव्याने अवगत करून द्यावं लागणार असतं. देविकाने त्यासाठी कंबर कसलेली असते. सुदैवानं विश्वासला देविका सांगत असलेला त्याचा भूतकाळ हळूहळू पचनी पडू लागतो. मात्र, एके दिवशी तो आपल्या अ‍ॅड एजन्सीच्या ऑफिसमध्ये गेला असताना त्याच्यासमोर पाच लाख रुपयांचे लव्हबर्ड्स आपण ऑर्डर केल्याचं एक बिल येतं. त्याला मोठंच आश्चर्य वाटतं, की का बरं आपण एवढे लव्हबर्ड्स ऑर्डर केले असावेत? तो त्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्या दुकानदाराला फोन लावतो तेव्हा साने नावाचा तो दुकानदार त्याला एक भलतीच चक्रावून टाकणारी माहिती देतो. लव्हबर्ड्स विक्रीचा सानेंचा धंदा हा निव्वळ दाखवण्यापुरता असतो. त्यांचा खरा व्यवसाय असतो तो गुप्तहेरगिरीचा! विश्वासनं सानेंना आपल्या बायकोवर- देविकावर पाळत ठेवण्याची कामगिरी सोपवलेली असते. त्याचंच ते पाच लाखाचं बिल असतं. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त विश्वास आणि देविका गोव्याला गेलेले असताना तिथं योगायोगानं त्यांना भेटलेल्या चित्रकार अभिजीतशी देविकाचे संबंध असावेत असा विश्वासला संशय आलेला असतो. म्हणून त्यानं त्यांची खबर काढण्यासाठी सानेंची मदत घेतलेली असते.
पूर्वस्मृती हरवून बसलेल्या विश्वासचा सानेंच्या या सांगण्यावर बिलकूल विश्वास बसत नाही. कारण देविका आपल्यावर किती जीवापाड प्रेम करते, हे तो तिच्या प्रत्यक्ष वागण्या-बोलण्यातूनच प्रत्यही अनुभवत असतो. अभिजीतशी तिचे ‘तसे’ काही संबंध असते तर तिनं आपण अपघातातून वाचावं म्हणून एवढं आकाशपाताळ एक केलं नसतं.
परंतु साने मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम असतात. अपघात झालेल्या दिवशीचा सगळा घटनाक्रम ते त्याला विस्तारानं सांगतात. त्या दिवशी देविका अभिजीतला एका हॉटेलात भेटली होती आणि त्यानंतर त्याच संध्याकाळी विश्वास दिल्लीला जाणार असल्याचं कळल्यामुळे तो तिच्या घरी आला होता. त्या दिवशी विश्वास दिल्लीला न जाता त्यांना रंगेहात पकडण्यासाठी थेट घरी परतला होता. हे अर्थातच त्यांच्यावर ठेवलेल्या पाळतीमुळे सानेंना कळलं होतं. काही वेळानं देविका आणि कुणी एक व्यक्ती एक भलामोठा पेटारा घेऊन घरातून बाहेर पडले आणि गाडीतून कुठेतरी निघून गेले. साने सांगत असलेल्या घटनाक्रमातील या तपशिलांमुळे विश्वास गोंधळात पडतो. त्यांच्या म्हणण्यात काहीएक तथ्यांश असू शकतो असं त्याला वाटू लागतं. परंतु मग देविकाचं आजचं आपल्याबरोबरचं प्रेमळ वागणं..? त्याची संगती कशी लावायची, असा त्याला प्रश्न पडतो.
घरी परतल्यावर विश्वास देविकाला या सगळ्या घटनाक्रमाबद्दल विचारतो. तेव्हा ती तसं घडल्याचं मान्य करते. विश्वासच्याच करणीमुळे गोव्यात घडलेल्या एका अनपेक्षित प्रसंगापासून अभिजीत आपल्याला ब्लॅकमेल करून आपल्याशी जबरदस्तीनं संबंध ठेवायला भाग पाडत होता, हेही ती कबूल करते. त्याला अपघात झाला त्या दिवशी विश्वासनं त्या दोघांना आपल्या घरात रंगेहात पकडल्यावर रागाच्या भरात अभिजीतचा गोळ्या घालून खून केला होता. आणि मग अभिजीतचं प्रेत पेटाऱ्यातून विल्हेवाट लावण्यासाठी आपण दोघांनी नेलं होतं. मात्र काहीएक कारण सांगून मधेच विश्वास तिला वाटेत सोडून निघून गेला होता. त्यानंतर तिनं एकटीनंच त्या प्रेताची विल्हेवाट लावून ती घरी परतली होती. ती घरी परतली नाही तोच तिला विश्वासच्या गाडीला अपघात झाल्याचा पोलिसांचा फोन आला होता..
देविकाच्या या सांगण्यात तथ्य असेल तर मग आपणच अभिजीतचे खुनी आहोत..? विश्वास भलताच हडबडून जातो. आपल्या हातून काय घडलं हे? आता यातून कसं सुटायचं? कधी ना कधी या खुनाला वाचा फुटणारच!

खुनाच्या आरोपात पकडले जाण्याच्या भीतीनं हादरलेल्या विश्वासला देविका शांत करू बघते.. ‘असं काहीही होणार नाहीए. तसं असतं तर एव्हाना पोलिसांना त्या गोष्टीचा सुगावा लागला असता. ज्या अर्थी अजूनपर्यंत तसं काही घडलेलं नाही, त्या अर्थी हे प्रकरण कुणाच्या लक्षात आलेलं नाही. तू घाबरू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत!’ म्हणत ती त्याला विश्वास देते. तो आणखीनच गोंधळतो. यातलं खरं काय? साने की देविकाचं म्हणणं? ..आणि त्याला तर यातलं काहीच आठवत नाहीए. तरीही खुनाच्या गुन्ह्य़ात आपण अडकणार! फासावर जाणार!
यानंतर अशा काही घटना एकामागोमाग घडतात, की विश्वासच्या मनातला गोंधळ आणखीनच वाढत जातो. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? विश्वास खरंच खुनी होता? मुळात अभिजीतचा खून झाला होता हे खरं कशावरून?.. या व अशा अनेक प्रश्नांचे भुंगे प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालू लागतात. या उलटसुलट प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटकात शोधणंच उचित ठरेल.
लेखक-दिग्दर्शक गिरीश जोशी यांनी तिसऱ्यांदा हे नाटक रंगमंचावर आणताना त्याची रंगावृत्ती नव्यानं लिहिली आहे. संहितेतले पेच, संदिग्ध, धूसर वळणं त्यांनी अधिक टोकदार व गहिरी केली आहेत. दुसऱ्या आवृत्तीत दृक्-श्राव्य माध्यमाचा केलेला अतिवापर त्यांनी यावेळी कमी केला आहे. त्यामुळे नाटक म्हणून ते अधिक सखोल झालं आहे. सर्वसाधारणपणे गुप्तहेर म्हटला की त्याचं स्मार्टपण आपण गृहीतच धरतो. परंतु इथं सानेंच्या रूपात काहीसा येडागबाळा माणूस उभा करून त्याच्याकरवी हे प्रकरण हाताळण्याची युगत गिरीश जोशी यांनी योजली आहे. ती भलतीच प्रभावी ठरली आहे. सस्पेन्स थ्रिलरमध्ये अपराधी कोण, हे गुपित शेवटापर्यंत टिकवावं लागतं. मराठी थ्रिलर नाटकांमध्ये सहसा हे गुपित लपून राहत नाही. ‘लव्हबर्ड्स’मध्ये मात्र शेवटापर्यंत ते कायम राहतं. त्याचं श्रेय गिरीश जोशींना द्यायलाच हवं. विश्वासची सेक्रेटरी सुप्रिया हे दुय्यम पात्र वगळता अन्य तिन्ही पात्रांचं रेखाटन सशक्त उतरलं आहे. त्यांचे बारीकसारीक कंगोरे, खुनाच्या घटनाक्रमाची साने आणि देविका यांनी सांगितलेली परस्परविरोधी, परंतु दोन्हीही पटणारी स्पष्टीकरणं, त्यातून प्रकरणाचा वाढत जाणारा गुंता, आणि मग खरा खुनी कोण, याबद्दलची संदिग्धता कळसाला जाणं.. अशा तऱ्हेनं नाटक चढत्या भाजणीनं उत्कंठावर्धक होत जातं.
कलाकारांचाही त्यात सिंहाचा वाटा आहे. विशेषत: मुक्ता बर्वे यांनी साकारलेली देविका- त्यांच्यातल्या श्रेष्ठ अभिनेत्रीचा प्रत्यय देणारी आहे. झरझर बदलणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांच्या मनात उठलेले क्षणिक कल्लोळ लपवताना त्यांची होणारी तारांबळ.. आणि तरीही प्रसंगावधान राखत अत्यंत विश्वसनीय व तर्कदृष्टय़ा पचनी पडणारं केलेलं स्पष्टीकरण- ही सारी भीषण कसरत त्यांनी कमालीची प्रत्ययकारी केली आहे. त्याबद्दल त्यांना हॅट्स ऑफ! देविकाची भूमिका अत्यंत विश्वसनीय करणं, हे कलाकाराकरता मोठंच आव्हान आहे. मुक्ता बर्वे यांनी तिचे सूक्ष्मातिसूक्ष्म कंगोरे उकलत ती संस्मरणीय केली आहे. त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांमध्ये देविकाला नक्कीच स्थान मिळेल. विद्याधर जोशी यांचा ‘वरपांगी बावळा, तरी अंगी नाना कळा’ छापाचा डिटेक्टिव्ह सानेही भन्नाट! म्हटलं तर ही तिकडम् व्यक्तिरेखा! विद्याधर जोशींनी गबाळा आव आणत तीत संभ्रमिततेचे गहिरे रंग भरले आहेत. ओंकार गोवर्धन यांचा विश्वासही विश्वासार्ह उतरलाय. पूर्वस्मृती नष्ट झाल्याने सतत गोंधळी मन:स्थितीत वावरणारा आणि अपघातपूर्व आपलं खून-प्रकरण उघड झाल्यानं विलक्षण भेदरलेला विश्वास त्यांनी यथार्थ वठवला आहे. केतकी सराफ ‘लव्हबर्ड्स’च्या गेल्या आवृत्तीतही सुप्रियाच्याच भूमिकेत होत्या. त्यांनी ती सफाईनं साकारली आहे.
नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी विश्वासचं घर व ऑफिस ही दोन्ही स्थळं संहितेच्या मागणीनुसार उभी केली आहेत. गिरीश जोशींच्या प्रकाशयोजनेनं प्रयोगातला थरार गडद केला आहे. नरेंद्र भिडेंच्या पाश्र्वसंगीताचाही त्यात वाटा आहे. सुप्रिया विनोद यांनी पात्रांच्या व्यक्तिमत्त्वानुसारी दिलेली वेशभूषा आणि तद्वत संतोष पेडणेकरांची रंगभूषा निर्मितीमूल्यांत भर घालते. एक सर्वागसुंदर सस्पेन्स थ्रिलर अनुभवल्याचं समाधान ‘लव्हबर्ड्स’ नक्कीच देतं.

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
Navjot Singh Sidhu returns to Kapil Sharma Show
तब्बल ५ वर्षांनी नवज्योत सिंग सिद्धू यांची कपिल शर्माच्या शोमध्ये पुन्हा एन्ट्री; अर्चना म्हणाली, “माझ्या खुर्चीवर कब्जा…”
Kushal Badrike
“कवीने संसारात अडकू नये…”, कुशल बद्रिकेने शेअर केला पत्नीबरोबरचा व्हिडीओ; श्रेया बुगडे कमेंट करीत म्हणाली…
savlyachi janu savali fame megha dhade gift to veena jagtap
Video: ‘सावळ्याची जणू सावली’मधील वीणा जगतापला ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीने दिलं सुंदर गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझी मोठी समस्या…”
ghanshyam aka chota pudhari meets nikki arbaz
Video : निक्कीला भेटण्यासाठी मुंबईत आला घन:श्याम! अरबाजला चुकून ‘या’ नावाने मारली हाक अन्…; पुढे काय घडलं?

रवींद्र पाथरे