भूक लागली म्हणून जेवणाच्या ताटावर बसलेल्याला समोर वाढलेले सुग्रास अन्नपदार्थ पाहिल्यानंतर ते पदार्थ केवळ भुकेसाठी म्हणून खाल्ले जात नाहीत, तर चवीचवीने एकेक पदार्थ चाखला जातो आणि मग हा पदार्थ सुंदर की त्याची चव निराळी असे करत करत खरोखरच रुचकर जेवण जेवल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर पसरतं. मात्र आत कुठे तरी त्याची चव जिभेवर रेंगाळतच राहते.. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित ‘अस्तु’ अशा अनेक अनोळखी भावभावनांची ओळख करून देतो आणि चित्रपट संपल्यावरही ते भाव मनात रेंगाळतच राहतात..
‘अस्तु’ स्मृतिभ्रंशासारख्या आजाराच्या विषयाला हात घालतो; पण या आजाराच्या निमित्ताने कोहम या प्रश्नापर्यंत आपल्याला आणून ठेवतो. माणूस स्वत:चीच ओळख विसरला, तर त्याचं अस्तित्व उरतं? डॉ. चक्रपाणी शास्त्री (मोहन आगाशे) हे संस्कृत विद्वान. निवृत्त झालेले शास्त्री म्हणजेच अप्पांना स्मृतिभ्रशांचा आजार जडला आहे. त्यांचा हा आजार वाढत जातो आणि त्याच वेगाने त्यांच्या घरच्यांसमोरच्या अडचणीही वाढत जातात, एवढीच खरं म्हटलं तर चित्रपटाची कथा; पण दिग्दर्शक जोडी आपल्याला त्यांच्या आजाराच्या साथीने अनेक नात्यांचे, अनेक विषयांची सफर घडवते. अप्पा राम या तरुणाच्या मदतीने एकटेच राहत आहेत. मात्र अप्पांची काळजी घेणारी त्यांची मुलगी इराची (इरावती हर्षे) तगमग सतत वाढती आहे. अप्पांचं आजारपण लक्षात आल्यानंतर इरा त्यांना आपल्या घरी घेऊन येते. इराचा पती डॉक्टर माधवही (मिलिंद सोमण) अप्पांच्या जवळ आहे. आपल्या सासऱ्यांचा आजार आणि पत्नीची काळजी या दोन्ही गोष्टी माधव सांभाळतो आहे. तरीही अप्पांच्या आजारपणामुळे त्यांचं वागणं इराच्या मुलीला पटत नाही. परिस्थितीला शरण जाऊन इरा अप्पांना पुन्हा त्यांच्या घरी सोडते, मात्र तिच्या एका क्षुल्लक चुकीमुळे अप्पा हरवतात. अप्पांना शोधेपर्यंतच्या प्रवासात प्रेक्षक इराबरोबर चक्रपाणी शास्त्रींचं तत्त्वज्ञान, सतत संस्कृतच्या अभ्यासात हरवलेल्या शास्त्रींचा त्यांच्या पत्नीशी हरवलेला संवाद त्यामुळे इराच्या आईची झालेली कुतरओढ, इरा आणि तिच्या बहिणीचं नातं असे अनेक भावनिक पदर धुंडाळत राहतात.
चक्रपाणी शास्त्री म्हणून अप्पांना भगवद्गीता, उपनिषदं सगळं तोंडपाठ आहे; पण त्यांना स्वत:चं नाव लक्षात राहत नाही, मुलीचं नाव आठवत नाही. या गोष्टी मुलगी म्हणून इरासाठी चक्रावणाऱ्या असतात. प्रेक्षकांना या आजाराची ओळख करून देतात; पण इथेच शास्त्रीचं तत्त्वज्ञान आपल्याला विचार करायला लावतं. ‘निरभ्र आकाशासारखं नीरव शांतता असणारं मन असू शकतं?’ असा प्रश्न इरा शास्त्रींना करते. कोरी पाटी असलेलं, भूतकाळाचा कोणताही धागा डोक्यात न उरलेलं मन, रिकामं तरीही जागं असलेलं, शोध घेणारं मन जिवंत म्हणायचं का? इराची बहीण अशा मृत मनांच्या अप्पांना व्यावहारिकपणे वृद्धाश्रमात केवळ मरेपर्यंत जगण्यासाठी सोडण्याचा सल्ला देते. मात्र अप्पांना स्मृतिभ्रंश झाला म्हणजे त्यांचं मन मेलेलं नाही हे मानणाऱ्या इराला वृद्धाश्रमाचा पर्याय पटत नाही. वैद्यकीय संशोधन पुढारल्याने माणसाचं आयुष्य वाढलं, पण त्याच्या आयुष्याचा दर्जा वाढला का? हा आणखी एक प्रश्न या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकाने उपस्थित केला आहे.
मोहन आगाशे, इरावती हर्षे, मिलिंद सोमण, चित्रपटात पूर्वार्धानंतर माहुताची बायको म्हणून येणारी अमृता सुभाष या सगळ्यांचा एकत्रित अभिनय म्हणजे त्या सुग्रास अन्नपदार्थानी भरलेल्या जेवणाच्या ताटासारखी आहे. या प्रत्येकाच्या अभिनयामुळे ‘अस्तु’ हा चित्रपटाच्या पलीकडे जात एक विलक्षण, रसरशीत अनुभव ठरला आहे. मात्र इतका चांगला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी क्राऊड फंडिंगसारख्या पर्यायांचा शोध घेत तीन वर्षे वाट पाहावी लागली, यासारखी वाईट गोष्ट नाही.
अस्तु
दिग्दर्शक – सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर
कलाकार – डॉ. मोहन आगाशे, इरावती हर्षे, मिलिंद सोमण, देविका दफ्तरदार, अमृता सुभाष, नचिकेत पूर्णपात्रे, इला भाटे.

Chiki Chiki Bubum bum marathi movie
चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर प्रेक्षकांच्या भेटीला; बॅकबेंचर्स मित्रमंडळींच्या रियुनियनची धमाल मस्ती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
While running in the police recruitment field, two young women clashed, pulled each other's clothes shocking video viral
“अगं काहीतरी भान ठेवा” पोलीस भरतीच्या मैदानात धावतानाच दोन तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन् शेवटी…VIDEO व्हायरल
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
Ankush Chaudhari as Police officer
अंकुश चौधरी पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत; ‘पी. एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील लूक पोस्टर रिलीज
paaru fame sharayu sonawane get ukhana for husband Jayant lade
“संसार असतो दोघांचा…”, ‘पारू’ फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने घेतला हटके उखाणा, म्हणाली…
chhaava movie santosh juvekar talks about last scene of movie
“आपले महाराज एकटे…”, ‘छावा’मधला ‘तो’ शेवटचा सीन आठवून संतोष जुवेकरचे डोळे पाणावले; साकारतोय ‘ही’ भूमिका
फसक्लास मनोरंजन
Story img Loader