मराठी सिनेसृष्टीत सध्या विविध विषयांवर नवनवीन सिनेमे येत आहेत. त्यामुळे मराठी सिनेरसिकांना वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे पाहायला मिळतात. यातील काही विषय ग्रामीण भागांवर आधारित असतात तर काही सामाजिक परिस्थितीवर. हेच विषय समाजात जनजागृती करण्याचे काम करत असतात. आता असाच एक आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘झाला बोभाटा’ असे या सिनेमाचे नाव आहे.
अनुप जगदाळे दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘झाला बोभाटा’ हा सिनेमा एका गावावर चित्रीत करण्यात आला आहे. आता गाव आलं की बारा भानगडी आल्या आणि त्यात ती मान्याची वाडी तर अग्रेसरच म्हणा. मान्याची वाडी फक्त आदर्श गाव पुरस्कार असला की नटते-सजते, सोहळा संपला की मात्र जैसे थे. भ्रष्टाचार, स्वच्छता, पाणीटंचाई, दारूबंदी अशा अनेक प्रश्नांना कंटाळून गेलेले हे गावकरी.
दिलीप प्रभावळकर आजारी असतात असे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. काहींना दिलीप प्रभावळकर जगावे असे वाटत असते तर काही ते लवकर मरावे म्हणून देवाकडे प्रार्थना करत असतात. दिलीप प्रभावळकर यांच्याकडे एका बाईचे गुपित असते पण ती बाई कोण हे ते काही केल्या सांगत नाहीत. नेमकी त्या बाईचे नाव ऐकण्यासाठी गावातले लोक प्रयत्न करतात. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळतं की नाही हे पाहण्यासाठी मात्र ६ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागेल.
या सिनेमात दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे, कमलेश सावंत, दिपाली आंबिकार, तेजा देवकर, मयूरेश पेम, मोनालिसा बागल, रोहित चव्हाण या कलाकारांचा समावेश आहे. किंग क्रिएशन आणि डीजी टेक्नो इंटरप्राईझेस प्रस्तुत, या सिनेमाची निर्मिती साईनाथ राजाध्यक्ष आणि महेंद्रनाथ यांनी केली आहे. येत्या ६ जानेवारीला हा सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.