अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत महामंडळाच्या विद्यमान अध्यक्षांसह दोघा माजी अध्यक्षांच्या आघाडीचा पार धुव्वा उडाला. निवडणुकीत निर्माते मेघराज राजेभोसले यांच्या ‘समर्थ आघाडी’ने एकूण चौदापैकी बारा जागांवर विजय मिळवून महामंडळात ‘समर्थ’पणे प्रवेश केला. स्वत: मेघराज ‘निर्माता’ या विभागातून निवडून आले आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि भल्याभल्यांना धक्का बसला. महामंडळाची निवडणूक या वेळी कधी नव्हे इतकी चुरशीची झाली. एक, दोन नव्हे, तर चक्क नऊ आघाडय़ा निवडणूक रिंगणात होत्या. यात महामंडळाचे मावळते अध्यक्ष विजय पाटकर, माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, माजी अध्यक्ष विजय कोंडके यांच्याही स्वतंत्र आघाडय़ांचा समावेश होता. मात्र मतदारांनी त्यांना आणि त्यांच्या आघाडीतील उमेदवारांना धूळ चारत मेघराज राजेभोसले यांच्या आघाडीतील उमेदवारांवर विश्वास टाकला. महामंडळामधील वाद, हाणामाऱ्या आणि भ्रष्टाचार, मावळत्या महामंडळाच्या कार्यकाळात एक नव्हे, तर तीन झालेले अध्यक्ष, त्या प्रत्येकाचा कारभार हे सर्व या निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे होते.
‘समर्थ आघाडी’ने एक विद्यमान आणि दोन माजी अध्यक्षांना पराभवाची धूळ चारत मिळविलेले यश आणि गेल्या पाच वर्षांतील महामंडळाचा एकूण कारभार या पाश्र्वभूमीवर महामंडळाचे सदस्य तसेच मराठी चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेल्या सगळ्यांच्या ‘समर्थ आघाडी’कडून काही अपेक्षा आहेत. मेघराज राजेभोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर खूप मोठी जबाबदारी आहे. निवडणुकीतील या यशाबद्दल मेघराज यांच्याशी चर्चा करताना हाच मुद्दा पहिल्यांदा उपस्थित केला तेव्हा त्यांनीही तो मान्य केला. आमच्यावर फार मोठी जबाबदारी आणि मोठे आव्हान असल्याचे सांगून असून ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’चा येत्या पाच वर्षांतील कारभार स्वच्छ आणि पारदर्शक करण्यावर आपला सर्वाधिक भर असेल, असे मेघराज यांनी ‘रविवार वृत्तान्त’ला सांगितले.
भल्या भल्या मातब्बरांच्या आघाडय़ांचा धुव्वा उडवून हे यश कसे मिळविले, असे विचारले असता राजेभोसले म्हणाले, गेल्या पाच वर्षांतील या लोकांची निष्क्रियता, अध्यक्षपद मिळविण्यासाठी केलेले वाद सगळ्यांनी पाहिले. चित्रपटसृष्टी आणि कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ, कामगार यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही ठोस काम या काळात झाले नाही. महत्त्वाचे म्हणजे या मंडळींनी सगळ्यांचा विश्वास गमावला आणि त्याचा थेट परिणाम मतदानावर झाला. तसेच अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेचा कोषाध्यक्ष, लोककला लावणी निर्माता संघाचा अध्यक्ष तसेच व्यावसायिक नाटय़निर्माता संघाचा उर्वरित महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे. माझे काम सगळ्यांनी जवळून पाहिले आहे. त्याचाही या निवडणुकीत उपयोग झाला.
महामंडळाचे सुमारे २५ हजार सभासद आहेत, पण त्यापैकी अवघे २२०० ते २३०० मतदार होते. मग बाकीच्या सदस्यांपर्यंत महामंडळ पोहोचलेच नाही. महामंडळाच्या आजीव सभासदांपैकी काहींची नावेही मतदार यादीत नव्हती. या सगळ्या गोंधळातून मतदारांनी आमच्या ‘समर्थ आघाडी’वर विश्वास टाकला. त्यांच्या या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, असेही राजेभोसले म्हणाले.
पाच वर्षांतील महामंडळाचा कारभार आणि भावी योजनांविषयी विचारले असता ते म्हणाले, महामंडळाचा सर्व कारभार ‘पेपरलेस’ करण्याचा आमचा प्रयत्न असेल. महामंडळाचा मतदार होण्यापासून अन्य कोणतेही काम असेल तर सदस्यांना मुंबई, पुणे किंवा कोल्हापूर येथे यावे लागणार नाही. घरबसल्या त्याला सर्व काही ‘ऑनलाइन’ करता येईल, असे आम्ही करू. महामंडळाचे संकेतस्थळ तातडीने अद्ययावत केले जाईल. आमचा पाच वर्षांतील कारभार आणि व्यवहार याचा हिशेब आणि आम्ही काय करतो आहोत त्याची माहिती या संकेतस्थळावर दिली जाईल. एकूणच आमचा सर्व कारभार स्वच्छ आणि पारदर्शक राहण्यावर आमचा भर असेल. अनेक जण निर्माते म्हणून या क्षेत्रात येत असतात. प्रत्येकालाच या क्षेत्राची पूर्ण माहिती असतेच असे नाही. त्यामुळे जो निर्माता म्हणून येऊ इच्छितो त्याच्यासाठी एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याचाही विचार आहे. चित्रपटनिर्मिती व त्या अनुषंगाने तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन त्यांना यात दिले जाईल. निर्माता म्हणून त्यांची जडणघडण होण्यास त्याचा नक्कीच उपयोग होईल.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची बैठक येत्या ५ मे रोजी कोल्हापूर येथे होणार आहे. त्या बैठकीत महामंडळाच्या जुन्या कार्यकारिणीकडून नव्या कार्यकारिणीकडे महामंडळाच्या कारभाराची सूत्रे सोपविली जातील. त्यानंतर लगेचच महामंडळाचे अध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांची निवड या बैठकीत केली जाणार आहे.

निवडणूक निकालाची वैशिष्टय़े
* महेश मांजरेकर, निवेदिता जोशी, सुशांत शेलार हे मातब्बर पराभूत
* मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेली मतमोजणी पहाटे तीनपर्यंत सुरू
* विजय पाटकर व सुशांत शेलार यांच्यातील अटीतटीच्या लढतीत अखेर पाटकर विजयी
* वर्षां उसगावकर पहिल्याच निवडणुकीत विजयी
* २ हजार १३५ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला
* विद्यमान आणि माजी अध्यक्षांच्या आघाडीचा धुव्वा
* सतीश रणदिवे आणि सतीश बीडकर यांची ‘हॅट्ट्रिक’