रेल्वेच्या फलाटावर बुटपॉलिश करणाऱ्या मुलांची टोळी, फलाटावर असलेल्या वजनी काटय़ाला खेटून लाकडी ठोका आणि पॉलिशचे फडके घेऊन बसलेली मुले, समोर येणाऱ्या बुटागणिक पुढे सरकत जाणारे त्यांचे फलाटावरचे आयुष्य आणि फलाटावरच्या गर्दीला कधीही न दिसणारे, न जाणवणारे दूर दडलेले त्यांचे वास्तव असे एक वेगळे जग होते. आताशा फलाटावरची ती बुटपॉलिश करणारी मंडळी दिसत नाहीत पण, त्यांचे ते लुप्त झालेले भावविश्व ज्येष्ठ साहित्यिक अरूण साधू यांच्या ‘झिपऱ्या’ या कादंबरीने लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवले होते. साधूंचा हा ‘झिपऱ्या’आता रुपेरी पडद्यावर येतो आहे.
१९९० साली आलेल्या ‘झिपऱ्या’ या कादंबरीने वाचकांच्या मनात घर के ले होते. आजही या कादंबरीचे नाव घेतले तरी ‘झिपऱ्या’बद्दल भरभरून बोलणारे, या कादंबरीवर प्रेम करणारे अनेकजण सापडतात. दिग्दर्शक केदार वैद्यही त्या अनेक जणांमधले एक नाव आहे. क धीतरी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, स्वत:च्या परिस्थितीवर कष्टाने मात करत असताना केदारच्या हातात ‘झिपऱ्या’ ही कादंबरी आली. त्या कादंबरीचा तेव्हा मनावर फार मोठा प्रभाव होता. पण, म्हणून तेव्हाच मी या कादंबरीवर चित्रपट करायचा निर्णय घेतला वगैरे असे काही मी सांगणार नाही, असे केदारने मनमोकळेपणाने सांगितले. महेश भट्ट यांच्या ‘जिस्म’साठी सहाय्यक दिग्दर्शक, त्यानंतर ‘अगंबाई अरेच्चा’ या चित्रपटातून मराठीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून झालेला प्रवेश, ‘कळत नकळत’, ‘सुवासिनी’ सारख्या मालिकोंचे दिग्दर्शन केल्यानंतर केदार ‘झिपऱ्या’ या चित्रपटातून स्वतंत्रपणे दिग्दर्शन करणार आहे. बुटपॉलिश करणारी मुले आता सहसा दिसत नाहीत. हार्बरच्या रेल्वे फलाटावर काहीजण दिसतात मात्र ती संख्या कमीच आहे. त्यामुळे ‘झिपऱ्या’ रुपेरी पडद्यावर आणताना ही त्यांची अखेरची टोळी होती, असा एक विचार मांडून कादंबरीतील त्यांचे विश्व सेल्यूलॉईडवर रंगवणार असल्याचे केदारने सांगितले.
या चित्रपटासाठी अरूण साधू यांना भेटल्यानंतर त्यांनी याआधीही अनेकांनी ‘झिपऱ्या’साठी   प्रयत्न केले होते म्हणून सांगितले. त्यांनी पहिल्यांदा लिखित पटकथा मागितली. आजच्या काळानुसार सुसंगत असे बदल मी पटकथेत केले होते पण, त्यांच्या कथेच्या गाभ्याला धक्का लागू दिला नव्हता. हे बदल साधूंनाही आवडले आणि त्यांनी चित्रपटासाठी होकार दिल्याचे केदार वैद्य यांनी सांगितले. ‘झिपऱ्या’चा अवाका खूप मोठा असल्याने निर्मात्यांचे सहकार्य खूप महत्वाचे होते. ‘झिपऱ्या’च्या निर्मितीचे शिवधनुष्य अश्विनी आणि रणजीत दरेकर यांनी उचलले असून या चित्रपटात प्रथमेश परब, चिन्मय कांबळी, सक्षम कुलकर्णी, हंसराज जगताप, अमन अत्तर अशी मराठीतील सगळी नावाजलेली बालकलाकारमंडळी एकत्र आली आहेत. अभिनेत्री अमृता सुभाषचीही यात मुख्य भूमिका असून चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात झाली असल्याचे वैद्य यांनी सांगितले.