फोन वाजला.. ‘हॅलो, दिनूकाका बोलतोय. मुक्ता, मी ‘कोडमंत्र’ हे गुजराती नाटक बघायला आलोय. मध्यांतर झालंय. आपण हे नाटक मराठीत करतोय.’ दिनूकाका (दिनेश पेडणेकर) हे नाटय़क्षेत्रात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेले निर्माते! ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’, ‘फायनल ड्राफ्ट’, ‘कळा या लागल्या जीवा’, ‘व्हाइट लिली आणि नाईट रायडर’, ‘छापाकाटा’ यांसारख्या उत्तमोत्तम नाटकांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. अनेक गाजलेली नाटके त्यांनी जवळून पाहिली आहेत. त्यामुळे कोणत्याही नाटकामुळे ते असे पटकन् भारावून जाताना मी बघितले नाही. त्यांचा भारावलेला फोन ऐकून माझी ‘कोडमंत्र’बद्दलची उत्सुकता वाढली आणि तातडीने जाऊन मी प्रयोग पाहिला. मला गुजराती येत नसतानाही तो प्रयोग थेट काळजापर्यंत पोचला. त्याला ‘नि:शब्द करणारा’, ‘विस्मयचकित व्हायला लावणारा’, ‘भारावून टाकणारा’ अशी कुठलीही विशेषणे लावली तरी कमीच होती!
त्याचे निर्माते होते भरत नारायणदास ठक्कर आणि अजय कासुर्डे. भरतभाईंची अन् माझी पहिली ओळख त्यापूर्वी मराठी नाटकांचा निस्सीम चाहता म्हणून झालेली होती. प्रत्येक मराठी नाटक तिकीट काढून बघणारा, आवडलं तर अनेकदा असंख्य गुजराती प्रेक्षकांना सोबत घेऊन नाटक पुन: पुन्हा बघणारा हा माणूस- स्वत: निर्माताही आहे, हे मला नंतर कळलं. तर या भरतभाईंना मराठी नाटक करण्याची मनापासून इच्छा होती. विशेषत: ‘कोडमंत्र’ मराठी रंगभूमीवर यावं आणि ते मी व दिनूकाकांनी त्यांच्यासोबत करावं असा प्रस्ताव पहिल्यांदा त्यांच्याकडूनच आला. त्यावर दिनूकाकांनी निश्चिततेची मोहोर उमटवली. आणि मला तर नाटकाने वेडच लावलं होतं! बघता बघता मराठी ‘कोडमंत्र’ हे आमच्यासाठी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ बनलं!
भलामोठा सेट. चाळीसेक कलाकार. इंडियन आर्मीसारखा जिव्हाळ्याचा आणि सेन्सेटिव्ह विषय. उत्साहात काम सुरू झालं. आमचे दिग्दर्शक राजेश जोशी सर गुजराती रंगभूमीवर नेहमी वेगळी नाटकं करण्यासाठी प्रसिद्ध असलेले. हिंदी चॅनल्ससाठी मालिकांचं लिखाण करणारे एक सिद्धहस्त लेखक. नाटक मराठीत करायचं ठरलं आणि पहिली मीटिंग झाली ती राजेश जोशी सरांबरोबर. पहिल्याच मीटिंगला त्यांनी इतक्या शिस्तशीर पद्धतीने प्लॅनिंग सांगितलं, की मी आणि दिनूकाका थक्कच झालो. ‘स्क्रिप्ट हातात आल्यावर सगळी कलाकार मंडळी जमली की मला एकूण ४० दिवस तालीम लागेल,’ असं सर पहिल्याच मीटिंगमध्ये सांगत होते. ते ४० दिवस कसे विभागले जातील, सेट कधी लागेल, टेक्निशियन कधीपासून येतील, ग्रँड रिहर्सल्स कधी होतील, या सगळ्याचं त्यांचं चोख प्लॅनिंग बघून आम्हालाच दडपण आलं. सगळं सांगून झाल्यावर ते म्हणाले, ‘मी आताही तयार आहे. नाटक माझ्या डोक्यात आहे. शब्द आणि नट माझ्या ताब्यात द्या; ४० दिवसांत नाटक उभं राहील.’
मी चकितच झाले. प्रयोगात दिसणाऱ्या कडक मिलिटरी शिस्तीचा उगम कुठे आहे, हे आता माझ्या लक्षात आलं. एकूण काय, तर राजेश जोशी सरांबरोबर काम करायला मजा येणार असा विचार करत आम्ही पुढच्या तयारीला लागलो. राजेश सरांबरोबरचं हे संभाषण गुजराती, हिंदी आणि मराठी अशा संमिश्र भाषेत झालं. कारण सर गुजराती आहेत. गुजराती नाटकाची लेखिका स्नेहा देसाई- जी स्वत: सुंदर अभिनेत्री आहे आणि मूळ गुजराती ‘कोडमंत्र’मध्ये ती तोच रोल करते; जो आता मराठीमध्ये मी करते.. तर तिने मुळातच अप्रतिम असं लिहिलेलं हे नाटक! त्याचं आता उत्तम मराठी रूपांतर कोण करेल? मोठ्ठं प्रश्नचिन्ह समोर उभं ठाकलं. दिनूकाका, भरतभाई, मी अनेकांची नावं काढली. पण वेळेत आणि समजून-उमजून रूपांतर करणारा लेखक हवा. ‘मी विजय निकम सरांशी बोलतो. ते संहितेला योग्य न्याय देतील,’ असा विश्वास दिनूकाकांनी दाखवला. निकम सरांशी बोलणं झालं. ‘नाटकाचा प्रयोग बघून नको, तर मूळ संहिता वाचूनच हे रूपांतर करायला मला आवडेल,’ असं त्यांनी सांगितलं आणि मूळ गुजराती संहिता समजून घेऊन राजेश सर आणि स्नेहाशी बोलून त्यांनी रूपांतराचं काम सुरू केलं. भाषा बदलली की संस्कृती बदलते. त्यामुळे मूळ संहिता हातात असली तरी त्याचं रूपांतर तितकंच जिकिरीचं होतं. निकम सरांनी अतिशय जीव ओतून ते केलं. या सगळ्या प्रोसेसमध्ये मत-मतांतरं होती; पण त्या ऊहापोहानंतर एक अत्यंत देखणी संहिता तयार झाली. नाटक लिहून होत होतं तशी एकीकडे कास्टिंगची खटपट सुरू झाली. ४० कलाकारांचं नाटक. मुळात हल्ली नाटकासाठी भरपूर वेळ देणारे कलाकार शोधणं हा एक मोठाच टास्क असतो. त्यातून सर्व कलाकार उत्तम आणि त्या- त्या भूमिकेत चपखल बसणारे हवेत. राजेश सर गुजराती असल्याने त्यांनी मराठीतलं कोणाचं काम फारसं बघितलं नाही. त्यामुळे चक्क सिनेमा-मालिकांच्या असतात तशा ऑडिशन्स सुरू झाल्या. आर्मी ऑफिसर वाटू शकतील असे उंच, तंदुरुस्त प्रकृतीचे आणि उत्तम अभिनय करणारे अशा कॉम्बिनेशनचा शोध सुरू झाला. अनेकांनी ऑडिशन्स दिल्या. आमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या ओळखीतल्या व नाटकात शोभून दिसतील अशांना ऑडिशनला बोलावलं. मोठय़ा यादीतून छोटी यादी आणि छोटय़ातून आणखीन छोटी यादी.. नटांची शॉर्टलिस्ट होत गेली. एकेक पात्र मिळत गेलं. मिलिंद अधिकारी, अतुल महाजन, संजय महाडिक, फैज खान, अमित जांभेकर, कौस्तुभ दिवाण, उमेश जगताप, कर्नल निंबाळकरांच्या मध्यवर्ती भूमिकेसाठी अजय पूरकर.. हळूहळू मराठा रेजिमेंट उभं राहत होतं. नाटकातल्या आईच्या रोलसाठी मात्र स्वाती बोवलेकर यांनाच बोलावलं आणि पहिल्या वाचनातच तो रोल स्वातीताईंचा झाला. अजून दोन पात्रांचं कास्टिंग बाकी होतं. नाटक हळूहळू आकार घेत होतं, पण मुख्य प्रश्न अजूनही सुटला नव्हता. युद्धभूमीवरचं नाटक.. पण यातले सैनिक कुठून मिळवायचे? थोडी चौकशी केली होती, पण तेवढय़ात नाटकातल्या मिलिंद अधिकारींनी डोंबिवलीतल्या पेंढारकर कॉलेजचा रेफरन्स दिला आणि लेफ्टनंट उदय नाईक सरांशी त्यासंदर्भात बोलून ठेवलं. नाईक सरांना नाटकाची सगळी माहिती दिल्यावर त्यांनी खुशीने त्यांच्याकडच्या मुलांना परवानगी दिली आणि त्यांचे कॅडेट्स नाटकातील सैन्याचा अविभाज्य भाग बनले. या कॅडेट्सचा यापूर्वी नाटकाशी दुरूनदेखील संबंध आलेला नव्हता. त्यांचं खाणंपिणं, शंकानिरसन, अडचणी, तालमीच्या वेळांचं शेडय़ूल याची जबाबदारी आमचा बॅकस्टेजचा सहकारी विनायक कावळे याच्याकडे दिली गेली.एव्हाना तालमी जोरात सुरू झाल्या होत्या. तालमीत पहिला अर्धा तास कवायत चाले. सगळे नट आधी मिलिटरी ऑफिसर्स वाटायला
हवेत, असा राजेश सरांचा आग्रहच होता. फिटनेस, स्टॅमिना, आवाज आणि त्याकरता अंगात भिनवायची होती ती शिस्त. तालमीच्या वेळा पाळण्यापासून ही शिस्त सरांनी आमच्यात रुजवली. राजेश सर व सहदिग्दर्शक सूरज व्यास हे दिलेल्या वेळेआधीच तालमीत पोहोचत. मग हळूहळू ही शिस्त आमच्यातही भिनू लागली. एकीकडे सेट्स, कॉश्च्युम्सचीही तयारी सुरू झाली. सुरुवातीला सकाळी १० ते ५, मग १० ते ८ आणि शेवटी शेवटी सकाळी १० ते रात्री १० तालमी होत होत्या. सर्व कलाकारांनी आधीच्या अन्य कमिटमेंट्स हळूहळू संपवत आणल्या. दिनूकाकांची इतक्या वर्षांची मॅनेजमेंट स्किल्स या तालमींत आणि आता प्रयोगांतही पणाला लागलेली दिसते.
एकेक पात्र जिवंत होत होतं. सहदिग्दर्शक सूरज पात्रांचं कोरीवकाम फार सुरेख करायचा. तालमी कडाक्याच्या उन्हाळ्यात सुरू होत्या. त्यामुळे डिहायड्रेशन व्हायचं, कधी कोणी आजारी पडायचं. पण सगळे एकमेकांना सांभाळत पुढे जात होतो. तेव्हा मनात विचार येई- आपण तर फक्त मिलिटरी बॅकड्रॉप असलेलं नाटक करतोय तर इतके थकून जातोय! सीमेवर लढणारे खरे जवान काय लेव्हलचं खडतर ट्रेनिंग घेत असतील! कशाकशातून जात असतील! त्या साऱ्या सैनिक बांधवांना खरोखरच सलाम!
नाटक हळूहळू आमच्या अंगी मुरत होतं. एकमेकांना भेटल्यावर ‘हाय-हॅलो’ऐवजी आम्ही ‘जय हिंद’ कधी म्हणू लागलो, कळलंच नाही. राजेश सरांनी पहिल्या मीटिंगमध्ये सांगितलेल्या शेडय़ुलबरहुकूम सगळं सुरू होतं. ११ व्या दिवशीच नाटकाचा पहिला अंक प्रयोगाइतका पक्का बसवून झाला होता आणि आमची पहिली ग्रँड रिहर्सल झाली. चक्क सेट आणि म्युझिकसह! इतक्या वर्षांत मी अशा पद्धतीने कधीच काम केलं नव्हतं. ‘तालमी या चुकण्यासाठी आणि चुका सुधारण्यासाठी आहेत. चुका संपेपर्यंत तालमी करत राहू आणि प्रेक्षकांना अचूक व परिपूर्ण प्रयोगाचाच आनंद देऊ,’ असं राजेश सरांचं ठाम मत. पहिला अंक बसला तरी दोन पात्रांची निवड काही कारणाने तशीच राहिली होती. डॉक्टर गोखले आणि वकील विश्वास राजेशिर्के. डॉक्टरची भूमिका छोटी, पण महत्त्वाची. छोटय़ा भूमिकेसाठी एक कलाकार वाढवायचा म्हणजे..? आता प्रोडय़ुसर म्हणून डोक्यात पुढचे विचार आणि प्लॅनिंग सुरू होतं. दिनूकाका, भरतभाई, अजय कासुर्डे ती तयारी करत होते. बाहेरचे प्रयोग, प्रवास, गाडीतली जागा, नटांची विश्रांती याचाही विचार व्हायला हवा. कलाकारांची संख्या वाढली की सारंच वरखाली होणार. गरजेतून मग शोध लागला. सहनिर्माते अजय कासुर्डे यांनी पूर्वी नट म्हणूनही काम केलंय. आता जरी तो सहनिर्माता, प्रकाशयोजनाकार म्हणून काम करत असला तरी त्याने सुरुवात नट म्हणूनच केली होती. अजयची रीतसर ऑडिशन झाली. डॉक्टर मिळाला. युरेका! युरेका!! आता उरला फक्त विश्वास राजेशिर्के. कोर्टात केस लढवणारा तडफदार वकील. एकीकडे तालमींनी जोर धरला होता आणि अजून हे पात्र सापडायचं होतं. आता मात्र थोडंसं टेन्शन येऊ लागलं. एकीकडे नाटकाचं कशिदाकाम सुरू होतं आणि कोर्टातले सीन उभे राहण्यासाठी महत्त्वाचा असणारा विश्वास राजेशिर्के अद्याप सापडला नव्हता. पहिल्या प्रयोगाला दहाच दिवस उरले होते. आणि रात्री ग्रुपवर दिनूकाकांचा मेसेज आला- ‘उद्या विक्रम गायकवाड येतोय- विश्वासच्या रोलसाठी. पण त्याचं चार दिवस शूटिंग लागलंय. ते तेवढं अॅडजस्ट करावं लागेल.’ विक्रम आला. त्याचे सीन वगळून त्यानं अख्खं नाटक बघितलं. त्याला आवडलं. त्यानं रोलला होकार दिला. आणि मग चारातले दोन दिवस त्यानं आणि दोन दिवस राजेश सरांनी अॅडजस्ट केले आणि विश्वास राजेशिर्के एकदाचा मिळाला. एकीकडे कपडेखरेदी सुरू झाली. चपला, बूट, नवीन म्युझिक, अनाऊन्समेंट, गीतकार-संगीतकार मित्र मििलद जोशीने जे गीत लिहिलं होतं त्याचं रेकॉर्डिग, नवा सेट..
आणि मग थिएटरमधल्या फायनल तालमी सुरू झाल्या. चुकण्याचं प्रमाण कमी कमी होत आता पॉलिश्ड परफॉर्मन्सकडे कूच सुरू होती. पहिल्यांदाच टीमव्यतिरिक्तचे प्रेक्षक नाटक बघायला येणार होते. ती तालीम आजही लख्ख आठवतेय. युद्धभूमीवर जाण्याआधी एखाद्या कमांडिंग ऑफिसरने जवानांच्या तुकडीला मोटिवेट करणारं भाषण करावं तसं राजेश जोशी सरांनी भाषण केलं होतं. ‘आजपासून हे नाटक प्रेक्षकांचं होणार. आता चुकायचं नाही. आता फक्त उत्तम आणि त्याहून उत्तम असाच प्रयोग करायचा. जयहिंद!’ त्यानंतर सरांनी नाटक आमच्यावर सोपवलं आणि ते कमालीच्या अलिप्ततेने समोर प्रेक्षकांत जाऊन बसले. एक क्षण आम्हाला सगळ्यांनाच धस्स झालं. आता यापुढे जे होईल त्याची जबाबदारी फक्त आमची असणार! ४० कलाकारांची चाळीस दिवसांची मेहनत पणाला लागणार. आता जो प्रयोग होणार तो केवळ प्रेक्षकांच्या साक्षीनं! आता राजेश सरसुद्धा शांतपणे प्रेक्षकांत जाऊन बसले होते.
आम्ही सगळी टीम एकत्र आलो. एकाग्रतेसाठी तीन वेळा ओमकार लावला आणि प्रयोग सुरू केला. पहिली बेल. दुसरी बेल. म्युझिक सुरू. राष्ट्रगीत. तिसरी बेल.. आणि पडदा उघडला. पहिल्यावहिल्या प्रयोगाची ओढ आणि आकर्षक भीती, त्यामुळे फुटलेला घाम आणि त्याचवेळी पोटात आलेला थंड गोळा. एकेक सीन होत होता तसं सगळं नॉर्मल होत गेलं. बघता बघता मध्यांतर.. आणि प्रयोग संपला.
दोन अंक संपले आणि आम्ही ज्याला गमतीने नाटकाचा तिसरा अंक म्हणतो तो कर्टन कॉल सुरू झाला. पहिल्यावहिल्या मोजक्या प्रेक्षकांसमोर साकारलेला हा प्रयोग अविस्मरणीय होता. कर्टन कॉल संपला. सगळंच वातावरण भारलेलं होतं. पडदा पडला आणि राजेश सर म्हणाले, ‘जिंकलंत! आजचा आपला पहिला परफॉर्मन्स एक सुखद आनंदाचा सोहोळा होता. इतक्या तालमी बघूनही हा प्रयोग बघून माझे हात उत्स्फूर्त टाळ्या वाजवीत होते. शाब्बास!’
त्यानंतरच्या तीन दिवसांत असेच आमंत्रितांसाठी प्रयोग होऊन नाटक ‘ओपन’ झालं. प्रयोग सुरू झाले तशी प्रेक्षकांची पसंती आणि कौतुक मिळू लागलं. पण त्याचबरोबर २०१६ सालची ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ मिळण्याचं भाग्यही नाटकाला लाभलं. ‘लोकसत्ता’ची ही शाबासकी ‘कोडमंत्र’च्या शिरपेचातला पहिला तुरा ठरला. आज पन्नास प्रयोग होऊन गेले तरी प्रत्येक प्रयोग हा पहिल्या प्रयोगाइतकाच कठीण परीक्षेचा वाटतो. प्रत्येक श्वास, प्रत्येक पाऊल तालमीत ठरल्या वेळी आणि ठरल्या ठिकाणी टाकलं जातं. शिस्त न मोडता आहे त्या सुंदर चित्रात रोज आणखीन शोभून दिसतील असे रंग भरण्याचं आमचं काम सुरूच असतं. कधीकाळी एकटय़ादुकटय़ाने बघितलेलं एक सुंदर स्वप्न आज आम्ही ४० लोक रोज जगतो आहोत. आपण या नाटकाचा भाग आहोत ही अभिमानाची गोष्ट आहे, ही भावना यात सहभागी असणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आहे. ही भावना हीच या नाटकाची ताकद आहे असं मला वाटतं.
जय हिंद!
मुक्ता बर्वे – muktabarve@gmail.com