टेक्नोलॉजीचा वापर वाढल्याने टेक्नोसॅव्ही होत जाणारी आजची पिढी आणि त्यामुळे भविष्यात माणसाच्या नातेसंबंधावर होणारा प्रभाव यावर भाष्य करणारा ‘बंध नायलॉनचे’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या नवीन वर्षात म्हणजेच २९ जानेवारीला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नात्यांच्या भावविश्वावर भाष्य करणा-या या सिनेमाचा अंधेरी येथील ‘द क्लब’ मध्ये नुकताच धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा पार पडला. लॅविश वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात सिनेमातील स्टारकास्ट सोबतच सिनेवर्तुळातील अनेक स्टार चेह-यांनीदेखील उपस्थिती लावली होती. या सोहळ्यात ‘बंध नायलॉनचे’ या सिनेमातील गायक अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे आणि आदित्य पाटेकर यांनी आपापल्या गाण्याचं लाईव्ह सादरीकरण करत उपस्थितांची वाहवा मिळवली.
या सिनेमात महत्वाची भूमिका असणारे महेश मांजरेकर यांनी आपल्या भूमिकेविषयी बोलताना सांगितले की, ‘ हा सिनेमा नावाजलेल्या एका एकांकिकेवर आधारित असल्यामुळे, या सिनेमाचा विषय मला खूप आवडला. तसेच जतिनने सिनेमाचे अप्रतिम दिग्दर्शन केले असून यात माझी एक वेगळी भूमिका आहे. माझा यात डबल रोल असून या सिनेमात एक ट्विस्ट आहे, त्या ट्विस्टचा मी एक महत्वाचा भाग आहे, याचा मला आनंद वाटतो, असे त्यांनी सांगितल. तसेच मेधा मांजरेकर यांनी आपल्या भूमिकेविषयी बोलताना सांगितल की , ‘ सिनेमाच्या निमित्ताने मला प्रथमच महेश सोबत काम करण्याची संधी मिळाली असून या सिनेमाचा विषय वेगळा आहे, लोकांना हा सिनेमा खूप आवडेल अशी मी आशा करते’. या सिनेमाच्या प्रमुख भूमिकेत असणा-या श्रुती मराठेनेदेखील आपल्या भूमिकेविषयी आपले मत मांडले. मी या सिनेमात सून, बायको आणि आई अशी तिहेरी भूमिका करत असून हा रोल माझ्यासाठी खूप चॅलेन्जिंग होता. पण दिग्दर्शकांनी माझ्याकडून हा रोल अतिशय चांगल्यारीत्या करवून घेतला असल्याचे श्रुती म्हणाली. तर अभिनेता सुबोध भावेने सिनेमातील कलाकारांसोबत काम करायला मजा आली असल्याचे सांगितले. ‘महेश आणि मेधा या दोन दिग्गज जोडीसोबत मला करण्याची संधी मिळाली. या सिनेमाचा विषय कौटुंबिक असून प्रत्येक घराघरात जे घडते तेच या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे सुबोध यांनी सांगितले.
लेखक अंबर हडप आणि गणेश पंडित लिखित ‘बंध नायलॉनचे’ या एकांकिकेवर आधारित हा सिनेमा आहे. अमितराजने चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली असून मंदार चोळकर आणि सचिन पाठक या दोघांनी मिळून गीते लिहिली आहेत. या सिनेमात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सुबोध भावे, श्रुती मराठे, संजय नार्वेकर, सुनील बर्वे असे प्रसिद्ध चेहरे असून प्रांजल परब ही बालकलाकार सुद्धा आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
जल्लोषात पार पडला ‘बंध नायलॉनचे’चा संगीतमय सोहळा
लेखक अंबर हडप आणि गणेश पंडित लिखित 'बंध नायलॉनचे' या एकांकिकेवर आधारित हा सिनेमा आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
आणखी वाचा
First published on: 19-12-2015 at 17:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Music launch of bandh nylonche