एका लग्नाच्या गोष्टीचं नाटक पहिल्यांदा लिहिलं गेलं त्याच वेळेस कुठे तरी लेखकाच्या मनात या कथेवर मालिका व्हावी असे विचार घोळत होते, पण योग आला नाही. दरम्यान, झी मराठीवर एका लग्नाची दुसरी गोष्ट सुरू झाली. दोन टोकांची वेगळी व्यक्तिमत्त्व असलेले राधा आणि घना, त्यांच्या प्रेमातून घडलेली लग्नाची गोष्ट प्रेक्षकांना प्रचंड आवडली. मात्र, ही गोष्ट संपल्यानंतर पुढे काय? या प्रश्नाला एक नवं उत्तर म्हणून पुन्हा एकदा ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ ही नवीन मालिका झी मराठी वाहिनीवर लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती झी मराठीचे व्यवसाय प्रमुख दीपक राजाध्यक्ष यांनी दिली.
‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ही मालिका आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक पाहिली गेलेली मालिका होती. ही मालिका संपल्यानंतर ‘पुढची गोष्ट’ कधी सांगणार, असा प्रश्न वाहिनीकडे सातत्याने विचारला जात होता. त्यामुळे एका लग्नाची ‘तिसरी गोष्ट’ घेऊन आम्ही येत आहोत, असे राजाध्यक्ष यांनी सांगितले. मात्र ही पूर्णत: नवीन गोष्ट असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मूल्याधारित समाजव्यवस्था मांडणारे एक कुटुंब आणि त्या कुटुंबात घडलेल्या एका लग्नामुळे कुटुंबातील विविध नातेसंबंधांमध्ये झालेले बदल हा या मालिकेचा गाभा असेल. पुन्हा एकदा कुटुंबसंस्था, त्यातील एकमेकांशी असलेले नातेसंबंध हाच विषय असला तरीही संपूर्णपणे वेगळा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती राजाध्यक्ष यांनी दिली.
‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेत उमेश कामत आणि स्पृहा जोशी ही जोडी मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. त्यांच्याबरोबर बऱ्याच वर्षांनी मराठी वाहिनीवर शुभांगी गोखलेही चांगल्या भूमिकेत दिसणार असून मोहन जोशी, शुभा खोटे असे कलावंत या मालिकेत दिसतील. श्रीरंग गोडबोले यांनीच या मालिकेची निर्मिती केली असून पटकथा लेखनाची धुरा चिन्मय मांडलेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. याशिवाय मालिकेचे शीर्षकगीत संदीप खरे यांनी लिहिले असून सलील कुलकर्णीच्या संगीत दिग्दर्शनाखाली सचिन पिळगावकर यांनी शीर्षकगीत गायले आहे. विनोद लव्हेकर दिग्दर्शित ही मालिका लवकरच सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
‘झी’च्या फॅक्टरीत लग्नाच्या गोष्टी!
एका लग्नाच्या गोष्टीचं नाटक पहिल्यांदा लिहिलं गेलं त्याच वेळेस कुठे तरी लेखकाच्या मनात या कथेवर मालिका व्हावी असे विचार घोळत होते, पण योग आला नाही.

First published on: 17-09-2013 at 06:25 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New marathi upcoming serial eka lagnachi tisari goasht